अश्विनी-भरणी नक्षत्र :

                            मेषेचा नकाशा

अश्विनी हे नक्षत्र चक्रातील पहिलं नक्षत्र मानलं गेलं आहे. आयनिक वृत्तावरील पश्चिमेस मीन (Pisces), दक्षिणेस तिमिंगल (Cetus), पूर्वेस वृषभ (Taurus), उत्तरेस ययाती (Perseus) आणि त्रिकोण (Triangulum) या तारकासमूहांच्या मध्ये असलेल्या तारकासमूहाला मेष (Aries) म्हणतात. मेषेला पहिली राशीही मानतात. यात चार मुख्य तारे आहेत. त्यातला सगळ्यात ठळक तारा हा अश्विनीचा योग तारा गणला जातो. त्याचे पाश्चिमात्य नाव ‘हामाल’ असे आहे. हामाल हा तारा २.२३ दृश्यप्रतीचा असून पृथ्वी पासून ६५.८ प्रकाश वर्षे एवढ्या अंतरावर आहे. हा तारा वर्णपटीय वर्गीकरणाच्या दृष्टीने ‘लाल महाकाय तारा’ या प्रकारात मोडतो. त्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे ४,४८0 केल्विन असून, आपल्या सूर्यापेक्षा थोडे कमी आहे. या ताऱ्याभोवती गुरु सदृष्य परग्रह फिरत असण्याची शक्यताही वर्तवली गेली आहे.

मेष या राशीतील हामाल, शेराटन आणि मेसार्टीम (यांना बायर पद्धतीप्रमाणे अल्फा एरिटिस, बीटा एरिटिस आणि गॅमा एरिटिस तारे असे म्हटले जाते) या ताऱ्यांना भारतीय परिभाषेत ‘अश्विनी’ नक्षत्र म्हणतात. याची काल्पनिक आकृती मात्र घोड्याच्या तोंडाची म्हणजे अश्वमुखाची काढतात.

        पुराणकथेतील अश्वमुख

एकेकाळी वसंत संपात बिंदू मेष राशीतील या योगताऱ्याजवळ होता. त्यावरून ‘मेषातील प्रारंभ बिंदू’ (First point of Aries) असा शब्दप्रयोग रूढ झाला. सध्या मात्र वसंत संपात बिंदू मीन राशीत सरकला आहे. अर्थातच अश्विनीला पहिले नक्षत्र म्हणतात. अश्विनीपासून सुरू झालेली २७ नक्षत्रे आयनिक वृत्ताच्या महावर्तुळात साधारण १० अंशांच्या रुंद पट्ट्यात पश्चिमेकडून पूर्वेकडे कल्पिलेली आहेत.

या नक्षत्राशी एक भारतीय मिथक कथा जोडली गेली आहे: वेदकालीन वाङ्‍मयानुसार अश्विनीकुमारांना मधुविद्या आत्मसात करायची होती. ती विद्या फक्त दधीची ऋषींना ज्ञात होती. ती त्यांनी इतर कोणालाही शिकवली, तर त्यांचा शिरच्छेद करीन अशी भीती इंद्राने त्यांना घातली होती. म्हणून ते ती विद्या अश्विनीकुमारांना शिकवायला तयार नव्हते. वाट्टेल ते करून ती विद्या मिळवायचीच असा चंग अश्विनीकुमारांनी बांधला आणि एक युक्ती केली. ज्या अर्थी दधीचींच्या डोक्यात सर्व विद्या आहे, त्याअर्थी ते डोके आधीच कापून वेगळे करावे आणि त्या जागी घोड्याचे डोके बसवावे; म्हणजे जर इंद्राने शिरच्छेद केलाच, तर घोड्याचे डोके कापले जाईल आणि दधीचींचे डोके आणि त्यातली विद्या शाबूत राहील. इंद्राला अश्विनीकुमार दधीचींकडून विद्या शिकून घेताहेत हे समजल्यावर त्याने दधीचींचा शिरच्छेद केला. परंतु त्यात घोड्याचेच डोके कापले गेले आणि तोवर अश्विनी कुमारांनी दधीचींची विद्या अंशत: का होईना मिळवली होती. नंतर दधीचींचे मूळ डोके त्यांना परत बसवून देण्यात आले. त्यामुळे नक्षत्राच्या चित्रात अश्विनी म्हणजे हे अश्वमुख दाखवतात. खरे तर अशा कथांमुळे आकाशातील हे तारे लक्षात राहण्यास मदत होते.

प्रत्येक राशीमध्ये साधारण सव्वा दोन नक्षत्रांचा समावेश असतो. मेष राशीत अश्विनीतील चार चरण, भरणीचे चार चरण आणि कृत्तिकेचा एक चरण अशा नक्षत्रांचा समावेश होतो.

भरणी नक्षत्र

अश्विनी – भरणी नक्षत्र

नक्षत्र चक्रातील भरणी हे दुसरे नक्षत्र आहे.  मेष राशीतील ३५, ३९ आणि ४१ क्रमांकाचे अगदी मंद तारे म्हणजे भरणी हे नक्षत्र. त्यातील ४१ क्रमांकाचा तारा त्यातल्या त्यात थोडा उजळ आहे (दृश्य प्रत ३.६३) त्यामुळे साध्या डोळ्यांना हा तारा दिसू शकतो. हा तारा जरी डोळ्यांनी एक वाटला, तरी प्रत्यक्षात हे द्वैती तारे (एकमेकांभोवती फिरणारे दोन तारे) असून एक तिसराही तारा त्यांच्या अगदी नजीक दिसतो (जो प्रत्यक्षात त्यांच्याशी संबंधित नाही, दूरवरचा आहे). परंतु त्यामुळे ४१ क्रमांकाचा तारा तीन ताऱ्यांचा मिळून बनला आहे असे म्हणावे लागते.

पृथ्वीपासून ४१ क्रमांकाचा हा तारा सुमारे १६६ प्रकाश वर्षे दूर आहे. त्याच्या पृष्ठभागाचे तापमान ११,९०० केल्विन आहे. वर्णपटीय  वर्गीकरणाप्रमाणे हा तारा ‘बी’ या प्रकारचा आहे. या ताऱ्याचा रंग पांढरा – निळा आहे. हा अति उष्ण  तारा आहे. याचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या सुमारे ३.१ पट आहे. भरणीतील इतर ३५ आणि ३९ तारे नीट पाहण्यासाठी द्विनेत्री वापरावी लागेल.

भरणी नक्षत्रातील या ४१,३५,३९ या ताऱ्यांनाच चीनी लोक ‘वई सू’ म्हणजे पोट असे ओळखतात, तर झोरोस्ट्रियन संस्कृतीच्या अवेस्ता या धार्मिक पुस्तकात याला ‘यझतास’ म्हणजे देवतेसमान मानले जाते. भरणीच्या नंतरचे नक्षत्र कृत्तिका असते.

संदर्भ :

समीक्षक : आनंद घैसास.