गुलामगिरीशी निगडित स्थळांचे पुरातत्त्व हा संघर्षाचे पुरातत्त्व या शाखेचा एक भाग आहे. माणसांची खरेदी-विक्री, दास्यत्व आणि गुलामगिरी हे प्राचीन काळापासून मानवी इतिहासाचा भाग आहेत.

लष्करी इतिहासकार जॉन कीगन (१९३४ — २०१२) यांच्या मते, मालक-गुलाम पद्धतीचा उगम हा मध्य आशियातील पशुपालक लोकांमध्ये इ. स. पू. २००० ते १००० या दरम्यान झाला. असे असले तरी सर्वसाधारणपणे ग्रीक काळापासून गुलामगिरीची प्रथा ठळकपणे दिसू लागली. मुख्य म्हणजे गुलामगिरीची प्रथा ही कायदामान्य आणि गुलाम ही मालकांची कायदेशीर मालमत्ता होती. शत्रूच्या लोकांना पकडून त्यांना गुलाम बनवणे आणि त्यांचा मजूर म्हणून वापर करणे, श्रमाची-कष्टाची कामे करण्यासाठी पुरुष, स्त्रिया आणि लहान मुलांना विकत घेणे आणि निव्वळ विक्रीयोग्य वस्तू समजून, माणसांना एका देशातून विकत घेऊन जबरदस्तीने दुसर्‍या देशांमध्ये विकून नफा कमावणे असे गुलामगिरीशी संबंधित अनेक पैलू आहेत. ब्रिटिश साम्राज्यात १८३३ नंतर गुलामगिरी बंद झाली आणि त्या जागी कंत्राटी मजूर अथवा बांधील सेवक ही नवीन पद्धत आली. या नावाखाली वेगळ्या प्रकारे गुलामगिरीच चालत होती. ही पद्धत १९१७ मध्ये बंद झाली. अशा प्रकारे सक्तीने एका देशातील लोकांना दुसरीकडे जवळजवळ गुलाम बनवणे, याचाही समावेश गुलामगिरीशी निगडित स्थळांच्या पुरातत्त्वात होतो.

स्त्री-गुलामांची अंधार कोठडी, केप कोस्ट कॅसल, घाना.

पंधराव्या शतकात निरनिराळ्या युरोपीय सत्तांनी अमेरिका, आफ्रिका आणि आशिया खंडांत मोहिमा सुरू केल्यानंतर गुलामगिरीच्या प्रथेला नवे परिमाण मिळून तिचा एक भरपूर नफा देणारा धंदा म्हणून जागतिक विस्तार झाला. लक्षावधी लोकांना गुलाम करून विकण्यात आले. सर्व यूरोपीय कंपन्यांनी मिळून आफ्रिकेतून १ कोटी १० लाख लोकांना आणून अमेरिकेत विकले होते. एकट्या इंग्लंडने १६८० ते १७८६ दरम्यान ३० लाख गुलामांचा व्यापार केला होता. तर सतराव्या व अठराव्या शतकात डच ईस्ट इंडिया कंपनीने आग्नेय आशियात ५ लाख गुलामांची विक्री केली होती. यूरोपीय सत्तांनी अशा प्रकारे केलेल्या गुलामांच्या व्यापाराचे जागतिक पातळीवर अनेक देशांमध्ये सांस्कृतिक व आर्थिक परिणाम झाले. विविध ऐतिहासिक साधनांचा वापर करून गुलामगिरीच्या प्रथेचा भरपूर अभ्यास करण्यात आला; तथापि पुरातत्त्वीय दृष्टीकोनातून गुलामांच्या हालअपेष्टांनी भरलेल्या जीवनाचा सर्वांगीण अभ्यास करण्याची कल्पना पुरातत्त्वविद्येत तुलनेने नवी आहे. उत्तर अमेरिकेतील यूरोपीय वसाहतींच्या इतिहासात आफ्रिकेतून पकडून आणून गुलाम म्हणून वापरलेल्या लोकांचा मोठा सहभाग असल्याने अमेरिकेतील गुलामगिरीचा अधिक सखोल अभ्यास करावा, या कल्पनेतून गुलामगिरीशी निगडित स्थळांच्या पुरातत्त्वीय संशोधनाला विसाव्या शतकाच्या अखेर चालना मिळाली.

गुलामगिरीशी निगडित पुरातत्त्वीय अवशेष विविध प्रकारचे आहेत. लोकांना पकडून आणून किनार्‍यावर आणताना वापरलेल्या तात्पुरत्या छावण्या (याला घानामध्ये विश्रांतीस्थळ असे गोंडस नाव होते), लोखंडी साखळ्या, डाग देण्यासाठी वापरलेले लोखंडी तुकडे, कोठड्यांमधील मानवी विष्ठेचे थर, हताश कैद्यांनी भिंतीवर कोरलेल्या खुणा, कैद्यांच्या वैयक्तिक वस्तू, मालाचा करतात तसा माणसांचा साठा करण्यासाठी किनार्‍यांवर बांधलेले किल्ले व त्यांमधील अंधारकोठड्या (उदा., घानामधील केप कोस्ट कॅसल, माइन येथील फोर्ट सेंट जॉर्ज, अक्सिम येथील सेंट अँटोनियो किल्ला व ख्रिश्चन्सबोर्ग कॅसल), गुलामांना नेण्यासाठी वापरलेली जहाजे (उदा., फ्लोरिडाच्या किनार्‍यावर सन १७०० मध्ये बुडालेले हेनरिटा मारी, बाल्टिक समुद्रात १७६८ मध्ये बुडालेले फ्रेडेन्सबोर्ग आणि पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या किनार्‍यावर १८४१ मध्ये बुडालेले जेम्स मॅथ्यूज), गुलामांची विक्री करण्यापूर्वी त्यांना ठेवलेल्या छावण्या, मळे किंवा मजूर म्हणून काम करण्याच्या ठिकाणी असलेल्या गुलामांच्या वसाहती व इतर औद्योगिक इमारती (उदा., वेस्ट इंडीजमधील सेंट कीट्स बेटावरील ऊसमळे व साखर कारखाने) आणि गुलामांच्या दफनभूमी अशा अनेक अवशेषांचे संशोधन सन २००० नंतर करण्यात आले आहे.

गुलामगिरीशी निगडित स्थळांच्या पुरातत्त्वीय अभ्यासामुळे गुलाम आणि त्यांना गुलाम बनवणार्‍या अधिक बलवान घटकांची तौलनिक सांस्कृतिक परिस्थिती समजण्यास मदत होते. तसेच गुलाम म्हणून जगणार्‍या लोकांच्या जीवनात कोणते बदल घडतात, हे समजू शकते. आफ्रिकेतून पकडून आणलेल्या पहिल्या पिढीतील लोकांना अमेरिकेत विकल्यानंतर त्यांच्या अनेक पिढ्याही गुलाम म्हणून जगत होत्या. अशा गुलामांच्या जीवन पद्धतींचा सखोल अभ्यास झाल्याचे एक ठळक उदाहरण न्यूयॉर्कमध्ये आढळते. मॅनहटन भागात १९९१ मध्ये बांधकाम सुरू करताना एकोणिसाव्या शतकातील गुलाम आफ्रिकन लोकांची दफने मिळाली. तेथील ४०० सांगाड्यांचा जोसेफ जोन्स यांनी पुरातत्त्वीय वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास केला (२०१३). दातांमधील शिसे या मूलद्रव्याच्या प्रमाणावरून त्यांना आफ्रिकेत वाढलेले पहिल्या पिढीतील गुलाम आणि जन्मतःच गुलाम झालेल्या पिढ्यांमधील लोकांना ओळखता आले.

केनियाच्या दक्षिण किनार्‍यावरील शिमोनी या स्थळाचे उत्खनन करण्यात आले असून एकोणिसाव्या शतकात गुलाम गोळा करण्याच्या अशा ठिकाणी दैनंदिन जीवन कसे  भीषण होते, हे लक्षात आले. तसेच ब्रिटिश शाही नौदलाने एकोणिसाव्या शतकात ’मुक्त केलेल्या आफ्रिकन’ गुलामांना सेंट हेलेना बेटावर ठेवले होते. त्या छावणीतील परिस्थिती कशी होती व हे लोक कसे जगत होते, हे उत्खननातून समजून आले.

सन १८१९ व १८२० या दोन वर्षांमध्ये ले कुरियर (Le Coureur) नावाच्या जहाजाने मॅारिशसमध्ये सहा फेर्‍या करून प्रत्येक वेळी दीडशे ते दोनशे गुलामांची वाहतूक केली होती. हे जहाज १८२१ मध्ये झांजीबारमधील शंभर गुलामांसह मॅारिशसच्या किनार्‍यावर बुडाले. या जहाजाच्या उत्खननातून महत्त्वाची माहिती मिळाली आहे. त्याचप्रमाणे साओ जोसे-पकेट डी आफ्रिका (São José-Paquete de Africa) हे गुलामांची वाहतूक करणारे पोर्तुगीज जहाज १७९४ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या केप टाऊनजवळ बुडाले. त्यावेळी या छोट्या जहाजावर ५०० गुलाम अत्यंत अमानवी परिस्थितीत बांधलेले होते. या जहाजाच्या उत्खननातून गुलामांच्या व्यापारासाठी वापरलेल्या जहाजाची रचना आणि त्यावरील जीवनाची वेगळी आणि सुन्न करणारी माहिती मिळाली आहे.

गुलामगिरीला अनेक ठिकाणी विरोध झाला होता. अमेरिका, मॉरिशस, वेस्ट इंडीज अशा अनेक देशांमध्ये पळून गेलेल्या गुलामांनी दुर्गम भागात वसाहती स्थापन केल्या होत्या. मॉरिशसमध्ये ले मोर्न (Le Morne) या ठिकाणी असलेल्या वसाहतीमधील दफनातून (१८३०) डीएनए रेणू मिळवण्यात आले. त्यांच्या अभ्यासातून गुलामगिरीला प्रतिकार करणार्‍यांच्या जीवनावर प्रकाश पडला आहे.

संदर्भ :

  • Alexander, J. ‘Islam, archaeology and slavery in Africa’, World Archaeology, 33(1) : 44-60, 2001.
  • Allen, Richard, ‘Ending The History of Silence : Reconstructing European Slave trading in the Indian Ocean’, Rivista Tempo, 23 (2) : 295-313, 2017.
  • Croucher, S. Capitalism and Cloves, New York, 2015.
  • Fontaine, Janel M. ‘Early medieval slave‐trading in the archaeological record : comparative methodologies’, Early Medieval Europe, 25 (4) : 466-488, 2017.
  • Lane, Paul J. & Macdonald, Kevin C. Eds., Slavery in Africa : Archaeology and Memory, 2011.

                                                                                                                                                                                   समीक्षक : सुषमा देव