स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीच्या कालखंडातील एक महत्त्वाची घटना (१६४८-४९). मावळातील काही किल्ले, महसुलाची ठाणी आणि काही भूभाग छ. शिवाजी महाराजांनी आपल्या अंमलाखाली आणला होता (१६४८). जी स्थळे आपण घेतली, ती विजापूर राज्याच्या सुरक्षिततेच्या हेतूनेच, अशी भूमिका महाराजांनी घेतली. विजापूर दरबारनेही सुरुवातीस महाराजांच्या या चळवळीकडे फारसे लक्ष दिले नाही; पण महाराजांनी कोंडाण्याच्या (सिंहगडच्या) किल्लेदाराला आपलेसे करून तो आपल्या ताब्यात घेतला. त्या वेळी मुहंमद आदिलशहाचे डोळे उघडले आणि महाराजांच्या विरुद्ध विजापूरचे सैन्य चालून आले.

दक्षिणेत कर्नाटकात विजापूरच्या सैन्यात शहाजीराजे हे अधिकारी होते. त्यांच्यावर फितुरीचा आरोप ठेवून विजापूरचा वजीर मुस्तफाखान, अफजलखान, बाजी घोरपडे यांनी दगलबाजीने अटक केली (१६४८). या अटकेमागे शहाजीराजांच्या कर्नाटकातील वाढत्या प्रभावाला अटकाव करणे आणि छ. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत व्यत्यय आणणे असे दुहेरी हेतू होते. शहाजीराजांचा संपूर्ण बंदोबस्त करण्याच्या हेतूने कर्नाटकात शहाजीराजांची जहागीर सांभाळणारे छ. शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे यांच्यावर फरहादखान आणि प्रत्यक्ष छ. शिवाजी महाराजांवर फतेहखान यांची नेमणूक करण्यात आली. कैदेत पडलेले वडील आणि आपल्यावर चालून येणारे मातबर सरदार यांना घाबरून शहाजीराजांची ही दोन्ही मुले शरण येतील, या गैरसमजातून ही मोहीम सुरू झाली.

सन १६४८ चा पावसाळा संपल्यावर फतेहखान ऑक्टोबर अखेरीस भीमा आणि नीरा ओलांडून जेजुरी जवळील बेलसर येथे पोहोचला. तो सिंहगडावर हल्ला करण्याच्या बेतात होता. परंतु या मोहिमेची कल्पना महाराजांना आधीच आल्याने त्यांनी पुरंदर किल्ला सामंजस्याने मिळवून तेथूनच या मोहिमेस तोंड देण्याचे ठरवले. महाराजांच्या या योजनेमुळे फतेहखानाला बेलसरच्या उघड्या मैदानावर आपला तळ ठोकावा लागला. सिंहगडावर हल्ला न करता त्याने महाराजांच्या ताब्यातील सुभानमंगळ जिंकून शिरवळचे ठाणे ताब्यात ठेवायचे ठरवले. या मागे खानाचे तीन उद्देश होते. एक म्हणजे छ. शिवाजी महाराजांचे लष्करी सामर्थ्य तपासणे, दुसरे पुरंदरावरून शिरवळ सुभानमंगळला होणारी रसद तोडणे आणि तिसरे विजापुरहून अधिक कुमक मागवून पुरंदर किल्ल्यावर सासवड आणि शिरवळकडून दुहेरी आक्रमण करणे.

मोहिमेच्या सुरुवातीलाच फतेहखानाच्या बाळाजी हैबतराव नावाच्या सरदाराने पुरंदरजवळून फारसा अडथळा न होता शिरवळ गाठले आणि सुभानमंगळचा भुईकोट आणि शिरवळचे ठाणे जिंकून घेतले. सुभानमंगळचा भुईकोट आणि शिरवळचे ठाणे जिंकून घेताना बाळाजी हैबतरावाला फारसा लष्करी प्रतिकार न झाल्याने फतेहखान निर्धास्त झाला. शिरवळसारखे महत्त्वाचे ठाणे हातून गेले, तरी विचलित न होता महाराजांनी पुरंदरवर खानाशी लढण्याची तयारी केली होती. सुमारे तीन हजारांहून अधिक जमाव पुरंदरवर जमा केला होता. या जमावात गुंजण मावळचे शिळीमकर देशमुख, मुसे खोऱ्याचे बाजी पासलकर देशमुख, हिरडस मावळचे बाजी बांदल देशमुख, कानद खोऱ्यातील बाबाजी झुंझारराव मरळ देशमुख तसेच गोदाजी जगताप, भीमाजी वाघ, संभाजी काटे, शिवाजी इंगळे, कावजी मल्हार, भिकाजी चोर व त्याचा भाऊ भैरोजी चोर इ. निष्ठावान मंडळी होती.

या मोहिमेची सर्व सूत्रे महाराजांनी आपल्या हातात ठेवत कावजी मल्हार यांना शिरवळ ठाणे पुन्हा जिंकून घेण्यास रवाना केले. कावजी मल्हारांचे आडनाव बहुधा खासनीस असून हे बाजी पासलकर यांचे कारभारी असावेत. गोदाजी जगताप, भिमाजी वाघ, संभाजी काटे, भिकाजी चोर, भैरोजी चोर यांच्या समवेत कावजी मल्हार पुरंदरवरून शिरवळवर चालून गेले. बाळाजी हैबतरावानेही कडवा प्रतिकार केला. पण महाराजांच्या सैन्यासमोर त्याचा टिकाव लागला नाही. अखेर कावजी मल्हाराने बाळाजी हैबतरावास गाठून ठार केले आणि शिरवळ पुन्हा एकदा मराठ्यांच्या ताब्यात आले. मोठी लूट आणि किमती ऐवज घेऊन शिरवळचा योग्य बंदोबस्त लावून कावजी मल्हार पुरंदरवर परतला. लगेचच महाराजांनी फौजेची एक तुकडी प्रत्यक्ष फतेहखानच्या तळावर म्हणजेच बेलसरवर पाठवली. या तुकडीचे नेतृत्व महाराजांनी बहुधा साठ वर्षांच्या अनुभवी बाजी पासलकरांकडे दिले असावे. या तुकडी सोबत कान्होजी जेध्यांचे चिरंजीव बाजी जेधे, कावजी मल्हार, बाजी बांदल आणि झेंड्याची तुकडीही होती. या तुकडीने खानाच्या तळावर हल्ला केला; पण विजापुरी फौजेचा प्रतिहल्ला न सोसल्याने मराठा सैन्याला काढता पाय घ्यावा लागला. मराठ्यांचा जमाव फुटला आणि तिथे झालेल्या लढाईत बाजी पासलकर आणि बांदलांचे सुमारे अडीचशे लोक मारले गेले. पण विजापुरी सैन्य फक्त प्रतिहल्ला करून थांबले नाही, तर त्यांनी मराठ्यांचा काही अंतरापर्यंत पाठलागही केला. खळद बेलसरच्या सपाटीवर मराठ्यांनी माघार घेतल्याने फतेहखानाचा आत्मविश्वास दुणावला. त्यानेही वेळ न दवडता पुरंदरवर हल्ला चढवला. एरवी हत्तीघोडे आणि पालखीतून फिरणारे खानाचे सरदार पुरंदरची अवघड चढण पायी चढत होते. महाराजांनी गडावरील तयारीचा अंदाज खानाला येऊ दिला नाही. शत्रू माऱ्याच्या टप्प्यात येताच किल्ल्यावरून दगडधोड्यांचा, पेटत्या पलित्यांचा आणि बाणांचा वर्षाव झाला. त्यातून वाचलेल्या अशरफखान, मिनादशेख, रतनशेख, मताजी घाडगे राजे निंबाळकर यांच्या विजापुरी सैन्यावर भैरोजी चोर, भिमाजी वाघ, गोदाजी जगताप यांची तुकडी तुटून पडली. या सगळ्यांचे नेतृत्व करणाऱ्या मुसेखानला गोदाजी जगतापाने ठार केले. मुसेखान पडल्यामुळे विजापुरी सैन्य चारी वाटांनी पळून गेले. या पळणाऱ्या सैन्याला स्वतः फतेहखानही रोखू शकला नाही. तोही विजापूरच्या दिशेने पळत सुटला (१६४८ अखेर). पुढे शहाजीराजेंच्या सुटकेसाठी महाराजांनी प्रयत्न केले. आदिलशहाने कोंडाणा किल्ला परत देण्याची अट घातली. महाराज किल्ला परत देण्यास नाखूष होते. सोनोपंत डबीर यांनी महाराजांची समजूत घातली व कोंडाणा किल्ला आदिलशहाकडे परत करण्यात आला. त्यानंतर शहाजीराजांची सुटका होऊन त्यांची बंगलोरला सन्मानाने रवानगी करण्यात आली (१६४९). अशा रीतीने स्वराज्यावर आलेले पहिले संकट छ. शिवाजी महाराजांनी यशस्वीरीत्या परतवले. वयाच्या अठराव्या वर्षी महाराजांनी दाखविलेले हे धाडस पाहून सर्वांचेच मनोधैर्य उंचावले.

या मोहिमेत मावळातील वतनदार मंडळींनी महाराजांना निष्ठेने साथ दिली. बाजी कान्होजी जेधे याने पराक्रमाची शर्थ केली; म्हणून महाराजांनी त्याला सर्जेराव ही पदवी दिली.

संदर्भ :

  • कुलकर्णी, अ. रा. जेधे करीना , पुणे, २००७.
  • दिवेकर, सदाशिव महादेव, शिवभारत (कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर), भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे, १९२७.
  • देशमुख, विजयराव, शककर्ते शिवराय खंड १ (तिसरी आवृत्ती), नागपूर, २०१०.
  • पुरंदरे, कृष्णाजी वासुदेव, शिवचरित्र साहित्य खंड १, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे, १९२६.
  • मुजुमदार, गं. ना.;  कर्वे, चिं. ग.; जोशी, चिं. ब. शिवचरित्र साहित्य खंड ५, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे, १९४२.
  • मेहेंदळे, गजानन भास्कर, श्री राजा शिवछत्रपती खंड -१ (दुसरी आवृत्ती), पुणे, २००८.

                                                                                                                                                                                             समीक्षक : उमेश जोशी