मराठेशाहीचे सरखेल ठरलेले कान्होजी आंग्रे व त्यांच्या वंशजांनी पाडलेली नाणी. आंग्रे हे तत्त्वत: छत्रपतींचे आधिपत्य मानत असले, तरी व्यवहारात बहुतांशी स्वतंत्रच होते. १७२९ मध्ये कान्होजी आंग्र्यांचा मृत्यूनंतर त्यांचे पुत्र सेखोजी आंग्र्यांनी कार्यभार पाहिला. सेखोजीनंतर (१७३४) संभाजी व मानाजी या भावांमध्ये बेबनाव झाल्याने आंग्र्यांच्या दौलतीचे दोन वाटे झाले. उत्तर कोकणचा वाटा मानाजी आंग्रे, तर दक्षिण कोकणचा वाटा संभाजी आंग्रे यांना मिळाला. पुढे दक्षिण कोकण शाखेचे प्रमुख तुळाजी आंग्रे यांची सत्ता पेशवे आणि ब्रिटिश दोघांनीही संयुक्तपणे संपवली (१७५६), तर उत्तर शाखा ब्रिटिशांनी विलीन केली (१८४४).
अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात आंग्र्यांनी पाडलेली नाणी बरीच दुर्मीळ असून १७३५-५५ पर्यंत आंग्रे घराण्यातील यादवी हे त्याचे एक कारण असावे, असा अंदाज काही संशोधकांनी वर्तवला आहे. आंग्र्यांच्या अंमलाखालील प्रदेशात मोगल बादशहाच्या नावाचे रुपये व छत्रपती शाहू महाराजांच्या नावाचे पैसे पाडले जायचे, असे समकालीन साधनांत उल्लेख आहेत. अलिबाग, राजापूर इ. ठिकाणी आंग्र्यांच्या प्रमुख टाकसाळी होत्या. आंग्र्यांनी पाडलेल्या नाण्यांचा सर्वांत जुना उल्लेख सापडतो, तो १७३८ सालच्या एका इंग्रजी पुस्तकात. अ फेथफुल अकाउंट ऑफ द कॅप्चर ऑफ द शिप डर्बी बीलाँगिंग टू ईस्ट इंडिया कंपनी बाय आंग्रे द पाइरेट असे या पुस्तकाचे नाव असून यात इंग्रज-आंग्रे लढाईबद्दल आणि संबंधित नाण्यांबद्दल माहिती मिळते.
ही लढाई ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि संभाजी आंग्रे यांच्यात झाली. डर्बी या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताफ्यातील जहाजावर ९६ माणसे व ३२ तोफा होत्या. इंग्लंडहून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर विजयदुर्गाजवळ हे जहाज आल्यावर संभाजी आंग्र्यांनी ९ जहाजांनिशी त्यावर चढाई केली (२६ डिसेंबर १७३५). जलद झटापटीनंतर त्यांनी ते जहाज व त्यावरील लोकांना ताब्यात घेतले. त्यासोबतच जहाजावरील स्पॅनिश डॉलर प्रकारातील बत्तीस हजार नाणी ताब्यात घेतली.

१८ फेब्रुवारी १७५५ रोजी अन्य भारतीय नाण्यांसोबतच आंग्र्यांनी ‘डर्बी जहाजातील चांदी वापरून पाडलेला रुपयाʼ अशा शब्दांत एका नाण्याची नोंद सापडते. ही नाणी लंडनमधील एका लिलावगृहात विकण्यासाठी आलेली होती व डॉ. रिचर्ड मीड याच्या संग्रहात ती असल्याचा उल्लेख सापडतो. पण मूळ नाण्याचा शोध मात्र उशिरा लागला. ब्रिटिश म्युझियम व ऑक्सफर्ड विद्यापीठातील ॲश्मोलिअन म्युझिअम या इंग्लंडमधील दोन अग्रगण्य संस्थांच्या संग्रहांत दोन सारख्याच प्रकारातली चांदीची नाणी असून त्यांवर समोरच्या बाजूस ‘मुहम्मद शाह बादशाह गाझी सिक्का मुबारकʼ हा मजकूर व ११४८ हे हिजरी वर्ष आणि दुसऱ्या बाजूला ‘जुलूस सनह मैमनत मालूस झर्ब राजापूरʼ असा मजकूर येतो. झर्ब म्हणजे टाकसाळ, तर जुलूस म्हणजे नाणे पाडतेवेळी बादशहा राज्यारूढ झाल्यावर उलटलेली वर्षे. सदर नाण्यांत तत्कालीन मोगल बादशहा मुहम्मद शाहचे नाव येते. नेहमीप्रमाणे आलंकारिक मजकूर येतो, शिवाय हिजरी वर्ष ११४८ म्हणजे इ. स.१७३५-३६ हे वर्ष येते. तसेच राजापूर हे संभाजी आंग्र्यांच्या अमलाखालील दक्षिण कोकणातील एकमेव महत्त्वाचे व्यापारी शहर असल्याने टाकसाळ म्हणून त्याचे नाव येणे साहजिकच आहे. समकालीन ब्रिटिश साधनांतून आंग्रे हे मोगली छापाचे रुपये पाडत असल्याचा उल्लेखही येतो. या माहितीवरून, ब्रिटिश म्युझियम व ॲश्मोलिअन म्युझियममधील नाणी ही डर्बी जहाजातील चांदीतूनच पाडली असावीत, हे स्पष्ट होते. ह्या प्रकारची नाणी सांप्रत दुर्मीळ आहेत.

आंग्र्यांच्या नाण्यांचे आणखी काही संदर्भ मिळतात. ‘अलीबाग-कुलाबाʼ नामक एक रुपया कुलाबा संस्थानतर्फे अलिबाग येथे पाडला जात असे. कुलाब्याचे तत्कालीन सत्ताधीश बाबूराव आंग्रे यांनी हा रुपया प्रथम पाडला. पुणे हाली सिक्का या व्यापारासाठीच्या प्रमाणभूत मानल्या गेलेल्या प्रकारातील १०० रुपयांची किंमत ही अलीबाग-कुलाबा प्रकारातील ११९ रुपयांच्या बरोबरीची असल्याची नोंद उपलब्ध आहे. हा रुपया थोरले माधवराव पेशवे यांच्या कारकिर्दीत पुण्यात पाडल्या गेलेल्या अंकुशी रुपयाचाच एक प्रकार होता. यात ८४.७५% इतक्या वजनी प्रमाणात शुद्ध चांदी असून, टाकसाळीचे नाव ‘सुरतʼ असे नमूद आहे. सुरतेतील रुपयांच्या बरोबरीने हे रुपये बाजारात चालावेत, हाच हेतू या मागे असेल हे स्पष्ट आहे. इ. स.१८०५-०६ मध्ये ह्या रुपयांची शुद्धता ८२-८०% पर्यंत खालावली. या कमी शुद्धतेचे रुपये हे बेलापूर येथील टाकसाळीतील रुपयांच्या धर्तीवर पाडले जात. हे रुपये साधारणपणे इ. स.१८२५-२६ पर्यंत पाडले गेले. त्यानंतर ब्रिटिश सरकारने आपल्या आधिपत्याखालील प्रदेशातील नाणी पाडायचे अधिकार असलेल्या सर्वांच्या कागदपत्रांची तपासणी केली व त्यानंतर बहुतांश टांकसाळी बंद पाडल्या; परंतु अलिबागची टाकसाळ मात्र, कमी शुद्धतेचे चांदीचे नाणे पाडले जाईल आणि संस्थानाबाहेर त्याचे चलनवलन होणार नाही, या अटीवर चालू ठेवण्यात आली.
यानंतर पाडलेली अलिबाग टाकसाळीची नाणी आधीपेक्षा पूर्णच वेगळी असून, वर्तुळाकृती आणि चौकोनी अशा दोन्ही प्रकारांत ही नाणी सापडतात. यांवर दोन्ही बाजूस देवनागरी लिपीत ‘श्रीʼ हे अक्षर लिहिलेले असते. हे नव्या प्रकारचे नाणे सु. दहा वर्षेच चलनात असून, कुलाबा संस्थान खालसा झाल्याबरोबर तेही चलनबाह्य झाले. हे ही नाणे सांप्रत दुर्मीळ आहे.
चांदीच्या नाण्यांखेरीज तांब्याची नाणी पाडणाऱ्या आंग्रेंच्या टाकसाळी आपटा, कोपर, गौहन, दापोली, रेवदंडा, मणेरी इ. गावांतही होत्या. तांब्याची नाणी ही शिवराई प्रकारात असून त्यांवर सातारकर छत्रपतींचे नाव असे. स्वत: पाडलेल्या नाण्यांखेरीज लारी, बाझारुको इ. परदेशी नाणीही आंग्र्यांच्या आधिपत्याखालील चलनात होती. किनारपट्टीवरील परकीय सत्तांचा व्यापार व राजकीयदृष्ट्या संपर्क असल्याने या नाण्यांचा वापर होत असावा.
संदर्भ :
- Bhandare, Shailendra, ‘History and Coinage of tlie Angreys, Admirals of the Maratha Navyʼ, Journal of the Oriental Numismatic Society, Vol. 180, pp.15-23, UK, 2004.
- छायाचित्र सौजन्य १. डॉ. शैलेंद्र भांडारे, ऑक्सफर्ड विद्यापीठ. २. https://www.zeno.ru/
समीक्षक : सचिन जोशी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.