मराठे आणि जंजिरेकर सिद्दी यांच्यातील महत्त्वाची लढाई. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात हा गोवळकोट आहे.
सन १७३० पासून गोवळकोटचा परिसर सिद्दीकडून जिंकून घेण्यासाठी मराठ्यांकडून खूप प्रयत्न झाले. एप्रिल १७३२-३३ मध्ये बाजीराव पेशवे व फत्तेसिंग भोसले सिद्दीच्या मोहिमेसाठी कोकणात उतरले. दाभाडे, गायकवाड, आंग्रे बाजीरावांना येऊन मिळाले. श्रीनिवास पंतप्रतिनिधी व आनंदराव सोमवंशी सरलष्कर व कृष्णाजी दाभाडे हे ही कोकणात पोहोचले. छ. शाहू महाराजांच्या वतीने पंतप्रतिनिधी व जिवाजी खंडेराव चिटणीस सिद्दीबरोबर बोलणी करत होते. पण सिद्दी प्रतिनिधींस दाद देत नव्हता. सेखोजी आंग्रे छ. शाहूंना मदत करत होते. आंग्र्यांतर्फे बंकाजी नाईक महाडीक हे गोवळकोट व अंजनवेल भागात सिद्दीशी लढत होते. सिद्दी सात हा प्रतिनिधींबरोबर फक्त टोलवाटोलवीचे राजकारण करत होता. त्याचा अंदाज न आल्याने प्रतिनिधींच्या सैन्याने आंग्र्यांना साहाय्य केले नाही. त्यामुळे मराठी सैन्याची द्विधा मनःस्थिती झाली होती. हे सर्व वर्तमान अंबाजी पुरंदरे प्रतिनिधींबरोबर राहून बाजीरावांस कळवत होते. १४ जुलै १७३३ च्या एका पत्रात लिहिताना अंबाजी पुरंदरे बाजीरावास लिहितात की, ‘काशिबंदर येथे सिद्दी सात व प्रतिनिधींची भेट झाली, सर्व कोकण प्रांत आपल्या ताब्यात द्यावा असे प्रतिनिधींनी सांगितले, पण बोलणे फिसकटले व सिद्दी सात गोवळकोटास परत गेला’.
पुढे छ. शाहू महाराजांनी चिमाजी आप्पा यांना प्रतिनिधींच्या मदतीस सैन्य पाठवण्यासाठी अनेक आज्ञापत्रे पाठवली; पण चिमाजी आप्पांकडून मदत गेली नाही. यावर चिडून महाराजांनी, “तुम्ही जर मदतीस गेला नाहीत तर मी स्वतः मोहिमेवर जाईन” असे खरमरीत पत्र चिमाजी आप्पांस पाठवले. याचा परिणाम म्हणून पेशव्यांनी पिलाजी जाधव यांना या मोहिमेवर पाठवले. ऑक्टोबर १७३३ च्या एका पत्रात येथे झालेल्या लढाईचे वर्णन वाचायला मिळते. यात किल्ल्याच्या उत्तरेकडून येसाजी गायकवाड, धनाजी थोरात, सिदोजी घाटगे या सरदारांनी किल्ल्याच्या पूर्वेकडील चरावर हल्ला करून चौक्या मारून काढल्या व चर ताब्यात घेतला. किल्ल्याच्या लकडकोटातून व सुभेकोटातून तोफा, गोफणगुंडे, जेजला, बंदुकींचा बेसुमार मारा झाला. किल्ल्याच्या दक्षिणेकडून बाबुराव कऱ्हाडकर चरावर आले, काशिबंदराकडून पाच गलबते आली, खूप मोठी लढाई झाली. यात झालेल्या नुकसानीबद्दल पत्रलेखक लिहितो की, ‘मराठयांचे सरदार आनंदराव गोळे व त्यांची १० माणसे मृत्यूमुखी पडली, तर ६ जखमी झाली. बाबुराव कऱ्हाडकर यांची ७ माणसे मेली, तर ४ जखमी झाले. याशिवाय खंडोजी जाधव व येसाजी गायकवाड यांचेकडील १ माणूस मेला, तर २ जखमी झाली. चरावर सूळ रोवलेले होते, त्यामुळे काही माणसे जखमी झाली. सिद्दीकडील ८-१० माणसे मृत्युमुखी पडली. या हल्ल्यात चर ताब्यात आला, पण किल्ला मराठ्यांना जिंकता आला नाही’. पुढे इ. स. १७३४ मध्ये चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली मराठा सरदार पिलाजी जाधव, फत्तेसिंग भोसले आणि मानाजी आंग्रे यांचे सरदार महाडीक यांनी गोवळकोटावर हल्ला केला. गोवळकोट जिंकून घेण्यासाठी गोवळकोटच्या जवळ दळवटणे व धामणी येथे मराठ्यांनी मोर्चे लावले. पश्चिमेकडील काळूस्त्याच्या टेकडीवर मराठ्यांचे सरदार बाबाजी म्हस्के यांनी मोर्चा बसवून तोफांचा मारा केला. त्यात तोफगोळे गडावरील टाक्याच्या थोडे अलीकडे पडत होते. ते टाक्यापर्यंत गेले असते, तर शत्रूचे पाणी तोडून किल्ला जिंकता आला असता, असे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांत मिळतात. यासाठी लांब पल्ल्याच्या तोफा बाणकोट येथून मागविल्या गेल्या होत्या. डिसेंबर १७३४ मध्ये गोवळकोट परिसरात धामणी येथील चौकीवर पाण्याचा तुटवडा असल्याचे एका पत्रावरून समजते. येथील मराठ्यांच्या छावणीवर सिद्दीने तोफा, जेजला, बाण यांनी हल्ला चढवला, त्यात मराठ्यांच्या तुकडीला माघार घ्यावी लागली. यात सिद्दीची पंधरा-वीस माणसे मारली गेली, तर पंचवीस-तीस जखमी झाली. मराठ्यांकडील बाबुराव विश्वनाथ वैद्य नावाचा एक जण मारला गेला व पंधरा-वीस माणसे जखमी झाली. या मोहिमेसाठी वासोट्याहून एक तोफ, तर बाणकोट व अंजनवेल येथून ५-५ तोफा मागवण्यात आल्या होत्या. आंग्र्यांकडील पंधराशे माणसांची कुमक होती. खाडीत सिद्दी व मराठ्यांत युद्ध झाले, या हल्ल्यात मराठ्यांचा यशवंतराव घोसाळकर मारला गेला. खाडीत झालेल्या युद्धात मराठ्यांचा विजय झला. सिद्दीचे १३००, तर मराठ्यांचे ८०० लोक मारले गेले. यावेळी सिद्दीबरोबर झालेल्या तहात गोवळकोट सिद्दीने आपल्याच ताब्यात ठेवला. याला दुजोरा देणारे संभाजी आंग्रे यांनी ब्रम्हेंद्रस्वामींना पाठवलेले १७३६ मधील एक पत्र उपलब्ध आहे. या मोहिमेवेळचा पत्रव्यवहार वाचताना असे दिसून येते की, ही मोहीम चालू असताना पेशव्यांच्या फौजा एकाच वेळी सिद्दीबरोबर व महाराष्ट्राबाहेरील लढायांत गुंतलेल्या असल्याने येथे कुमक पोहोचायला खूप वेळ लागत होता. पोर्तुगीज व इंग्रज अंतस्थपणे सिद्दीला मदत करत असल्याचे त्यांच्या पत्रव्यवहारांवरून दिसते.
इ. स. १७३६-४४ या काळातला इतिहास ज्ञात नसला तरी, जानेवारी १७४५ मध्ये तुळाजी आंग्रे यांनी अंजनवेल सिद्दीकडून जिंकून घेतला, त्या वेळी गोवळकोटावर असणाऱ्या सिद्दी याकूत यास ही बातमी समजताच तो गोवळकोटावरून पळून गेला. आंग्र्यांची माणसे किल्ला ताब्यात घेण्यासाठी किल्ल्यावर निघाली असता, वरून सिद्दीच्या लोकांनी तोफा व बंदुकांचा मारा सुरू केला. यात मराठ्यांची काही माणसे पडली, पण किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. सन १७४८ च्या एका पत्रावरून येथे आंग्र्यांतर्फे महादजी अनंत हा किल्लेदार असल्याचे दिसते. याच काळात किल्ल्याचे नामकरण ‘गोविंदगड’ झाले असावे. १७४८ च्या एका पत्रात ‘गोविंदगड’ नावाचा उल्लेख वाचायला मिळतो.
पुढे १७५५ मध्ये हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात आला. १८१६ ते १८१९ या काळात मराठ्यांचे सर्व किल्ले व मुलूख इंग्रजांनी जिंकून घेतले. त्यात अंजनवेल बरोबरच गोवळकोट मे १८१८ मध्ये इंग्रजांतर्फे कर्नल केनेडी याने ताब्यात घेतला. १८६२ साली किल्ल्यावर २२ तोफा असल्याची नोंद इंग्रजांच्या कागदपत्रात मिळते.
संदर्भ :
- Gazetteer of the Bombay Presidency, Ratnagiri and Sawantwadi, Vol. 10, Government Central press, Bombay, 1880.
- पारसनीस, द.,ब. ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर चरित्र, पुणे, १९००.
- पेशवे दप्तरातून निवडलेले कागद – खंड ३, मुंबई, १९३०.
समीक्षक : जयकुमार पाठक