मराठी राज्याचे शेवटचे पेशवे दुसरे बाजीराव (कार. १७९५–१८१८) यांनी पुण्यात बांधलेला वाडा. पहिले बाजीराव पेशवे (१७००–१७४०) यांनी शनिवार वाडा बांधला होता. पेशव्यांच्या सर्व पिढ्यांनी येथेच वास्तव्य केले व तेथूनच कारभार केला. दुसऱ्या बाजीरावांचीही सुरुवातीची काही वर्षे येथेच गेली. पुढे दुसरे बाजीराव यांनी पुण्यामध्ये बुधवार वाडा, विश्रामबाग वाडा आणि शुक्रवार वाडा हे वाडे बांधले, तसेच पुण्यानजीक फुलगाव येथेही एक वाडा बांधला.

पुण्यातील हे तीनही वाडे शनिवार वाड्यापासून जवळच्या अंतरावर होते. बुधवार वाडा व विश्रामबाग वाडा यांना १८७९ साली आग लावण्यात आली. विश्रामबाग वाड्याचा बराचसा भाग वाचवण्यात आला; पण बुधवार वाड्याचे मोठे नुकसान झाले. बुधवार वाड्याच्या जागी सध्या जी इमारत उभी आहे, ती फरासखाना म्हणून ओळखली जाते. तेथे आता पोलीस चौकी आहे. बाजीरावांनी १७९९ सालीच शुक्रवार वाडा बांधावयाचे ठरविले होते. वाडा पूर्णतः नवीन बांधण्यापेक्षा एखादा जुनाच वाडा विकत घेऊन त्यात पाहिजे तशा दुरुस्त्या करून तो स्वतःस राहण्या लायक करून घ्यावा, अशी त्यांची कल्पना होती. यासाठी शुक्रवार पेठेतील एक जुना वाडा त्यांनी खरेदी केला व त्याच्यामागे एक नवा चौक बांधला. परंतु नव्या बांधकामामुळे जुन्या वाड्याचे बांधकाम विसंगत आणि खराब दिसू लागले. म्हणून त्यांनी जुन्या वाड्याचे बांधकाम पाडण्याचा व नव्याने बांधलेल्या कामाप्रमाणे जुन्या वाड्याचा जो भाग पाडला होता, तेथे बांधकाम करण्याचा हुकूम दिला. त्याप्रमाणे बांधकाम चालू झाले. पुढे दोन-तीन वर्षे अस्थिरता निर्माण झाल्यामुळे बाजीरावांस पुणे सोडून जाण्याची वेळ आली. वसईचा तह झाल्यावर ते पुण्यास आले व पुन्हा एकदा शुक्रवार वाड्याचे बांधकाम चालू झाले. अखेर १८०३ साली अखेरीस वाडा तयार झाल्यावर बाजीराव आपल्या बायकांबरोबर शुक्रवार वाड्यात राहण्यास गेले.

पुढे बाजीरावांनी या वाड्याच्या आसपासच्या अनेक इमारती विकत घेतल्या (१८०८). तसेच या वाड्यात दुरुस्त्या, पाडापाडी, नवीन बांधकामे जरूरीप्रमाणे होत राहिली. वाडा सहा मजली उंच होता. वाड्याजवळ समोरील बाजूस बाजीरावांनी तालीमखाना म्हणून एक स्वतंत्र इमारत बांधली होती. या तालीमखान्यात दरबार व इतर समारंभांचे आयोजन केले जात होते. पुण्यातले सरदार नगरकर, नारो बाबाजीचे वंशज हे तर पूर्वीपासूनच पेशव्यांचे वाडे बांधणारे एक कंत्राटदार किंवा इंजिनिअर होते. शुक्रवार वाड्याच्या बांधकामातील काही कामे नगरकरांकडे दिलेली आढळतात. या वाड्यात भोजनाचेही मक्ते दिले जात असत व ते वर्षभराचे असत. सुरुवातीच्या वर्षी रास्ते यांच्याकडे, तर नंतरच्या काळात ओगले यांना मक्ता दिल्याची नोंद आहे. या वाड्यात बडोद्याचे दिवाण गंगाधरशास्त्री पटवर्धन यांस १८१५ साली मेजवानी दिल्याची नोंद बडोद्याच्या शास्त्री दप्तरातील वेचे  या ग्रंथात आहे.

वाड्यात बाजीरावांनी नव्याने व्यंकटेश बालाजीचा उत्सव सुरू केला. गणपती उत्सवाप्रमाणे हा उत्सव मोठ्या प्रमाणावर होत असे. पेशवाई गेल्यावर (१८१८) हा वाडा पुढे आगीच्या भक्ष्यस्थानी पडला व त्यातला बराचसा भाग जळून गेला (१८२०). शिल्लक राहिलेला भागही पुढे इंग्रज सरकारने पाडून त्यातील काही साहित्य विकले. पुण्यात इंग्रजी विद्या शिकविण्याचे ठरल्यावर स्टिव्हन्सन पाद्री यांनी वाड्याच्या तालीमखान्यात पहिल्यांदा शाळा स्थापन केली (१८३०). या ठिकाणी पुढे बाबा गोखले यांची शाळा होती. विष्णुशास्त्री चिपळूणकर काही दिवस येथे शिक्षक म्हणून काम करीत होते. १८८५ साली तालीमखान्यात पुणे नगरपालिकेची कचेरी व दवाखाना होता, त्यानंतर तेथे धर्मार्थ मिशनचा दवाखाना होता. १९२२-२३ साली वाड्याचा शिल्लक भाग एका कंत्राटदाराने विकत घेतला. त्यांपैकी एक मोठी लाकडी जाळी सदाशिव पेठेतील उपाशी विठोबा मंदिराच्या व्यवस्थापकांनी विकत घेऊन आपल्या देवळाच्या नव्या बांधकामात उपयोगात आणली.

पुणे शहरातील स्वारगेटजवळील गोटीराम काची चौकाच्या पुढे उजव्या बाजूस ज्या इमारती आहेत, तेथे शुक्रवार वाडा होता. या चौकाजवळील सध्याच्या कोटणीस दवाखान्याच्या समोरील बाजूपर्यंत हा वाडा व समोर तालीमखाना होता. पेशव्यांनी बांधलेल्या वाड्यांत सर्वांत कमी आयुष्य या वाड्यास मिळाले.

संदर्भ :

केळकर, य. न. इतिहासातील सहली, खंड – २, पुणे, १९५१.

                                                                                                                                                                                    समीक्षक : भासवती सोमण