दक्षिण अमेरिकेतील हाँडुरस या देशातील कॉर्तेझ विभागाच्या राजधानीचे ठिकाण, तसेच देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर. लोकसंख्या ६,६१,१९० (२०१९). देशाच्या वायव्य भागातील ऊलूआ नदीखोऱ्यात हे शहर वसले आहे. हाँडुरस आखाताच्या किनाऱ्यावरील व देशातील सर्वांत मोठ्या प्वेर्तो कॉर्तेझ या बंदरापासून महामार्ग व लोहमार्गाने ६० किमी. आत हे शहर आहे. स्पॅनिशांनी १५३६ मध्ये या शहराची स्थापना केली. सांप्रत शहराची संपूर्ण पुन:र्रचना केली आहे.
शहराचा परिसर महत्त्वाचा कृषिप्रदेश असून तेथून निर्यातीसाठी केळी, तर स्थानिक उपभोगासाठी ऊस, तांदूळ, मका, रताळी, कसाव्हा ही पिके आणि प्राणिज उत्पादने घेतली जातात. देशातील हे प्रमुख औद्योगिक केंद्र असून येथे कापड, कागद, फर्निचर, रंग, प्लास्टिक, सिमेंट, काच, विद्युत उपकरणे, सायकली, औषधे, रसायने, साबण, बीर, प्रकिया केलेले लाकूड, धातूच्या वस्तू, खाद्यपदार्थ, पशुखाद्य इत्यादी उत्पादनांच्या निर्मितीचे कारखाने आहेत. हाँडुरसच्या उत्तर व पश्चिम भागाचे हे प्रमुख व्यापारी, वित्तीय व वितरणाचे केंद्र आहे. १९७६ मध्ये हे खुले औद्योगिक व्यापारी क्षेत्र बनले. हे शहर रस्ते आणि लोहमार्ग वाहतुकीचे प्रमुख केंद्र असून येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

हे शहर हरिकेन आणि उष्णकटिबंधीय चक्रीवादळांच्या टापूत येत असल्यामुळे त्यांचा फटका या शहराला वारंवार बसत असतो. १९७४ मध्ये आलेल्या फिफी या हरिकेन वादळात शहरातील उद्योगधंद्यांचे, तसेच पृष्ठप्रदेशातील कृषी क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले होते. १९९० च्या दशकात शहराच्या वाढीची आणि आर्थिक विकासाची गती मंदावली होती. त्यातच १९९८ मध्ये आलेल्या हरिकेन मिच या चक्रीवादळामुळे शहराची बरीच हानी झाली. हरिकेन मिच या चक्रीवादळानंतर साधारण १५ वर्षांपर्यंत (२०१३ पर्यंत) आर्थिक स्थिती खालावल्यामुळे लॅटिन अमेरिकेतील सर्वांत गरीब राष्ट्रांपैकी हाँडुरस हे एक राष्ट्र होते. साहजिकच त्याचा विपरित परिणाम सान पेद्रो सूला शहरावर झाला. शहराच्या परिसरातील केळी उत्पादन, तसेच येथील औद्योगिक उत्पादनात बरीच घट झाली. त्यानंतर येथील टोळीयुद्धाने उग्र स्वरूप धारण केले. २०१६ पर्यंत तर टोळीयुद्ध आणि मनुष्यवधाचे हे प्रथम क्रमांकाचे कुप्रसिद्ध शहर होते. त्यानंतर ती जागा व्हेनेझुएलाची राजधानी काराकासने घेतली. बेरोजगारी आणि अमली पदार्थांचा बेकायदेशीर व्यापार या समस्याही येथे निर्माण झाल्या आहेत. अनेकांनी येथून स्थलांतरही केले आहे.
समीक्षक : ना. स. गाडे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.