भारताच्या महाराष्ट्र राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे व तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ६८,९३० (२०११). हे मुंबई व विरारच्या उत्तरेस अनुक्रमे ८७ किमी. व ३५ किमी. वर वसलेले आहे. १ ऑगस्ट २०१४ रोजी पूर्वीच्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून नव्या पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात येऊन, पालघर हे त्याचे मुख्य ठिकाण ठेवण्यात आले. पालघर हा महाराष्ट्राच्या कोकण विभागातील सर्वांत उत्तरेकडील जिल्हा आहे. पश्चिम रेल्वेवरील मुंबई-अहमदाबाद दरम्यानचे पालघर प्रमुख स्थानक आहे. तसेच मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावरील मनोर या ठिकाणापासून पश्चिमेस २४ किमी. वर हे शहर आहे. महाराष्ट्र व गुजरात या राज्यांमधील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांशी हे शहर रस्त्यांनी जोडलेले आहे.

पालघर शहर भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील १९४२ च्या चले जाव चळवळीतील महत्त्वाचे ठिकाण होते. पालघरच्या परिसरात कुणबी, भंडारी, वारली, कातकरी, कोळी, महादेव कोळी, वंजारी, वडवळ या लोकांचे आधिक्य आहे. शहराच्या परिसरात शेती, गुरेढोरे पाळणे, दुग्धव्यवसाय, मासेमारी इत्यादी व्य्वसाय चालतात. येथे अनेक विद्यालये व महाविद्यालये आहेत. मुंबईचे सान्निध्य, वाहतुकीच्या सुविधा इत्यादींमुळे शहराची भरभराट होत आहे. सिडकोमार्फत नवी मुंबईप्रमाणे येथील ३३७ हेक्टरांत नवीन नियोजनबद्ध वसाहत विकसित करण्याची योजना आहे. पालघरच्या परिसरातील केळवा व चिंचणी या पुळणी, केळवा, शिरगाव व कलदुर्ग हे किल्ले, दाभोसा धबधबा इत्यादी प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत.

समीक्षक : वसंत चौधरी