कुलकर्णी, भीमराव बळवंत : (४ नोव्हेंबर १९३२ – २७ सप्टेंबर १९८७). मराठीतील संस्थात्मक कार्याचा ध्यास असलेले साहित्यिक, वक्ते, समीक्षक आणि ललितलेखक. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मुचंडी हे त्यांचे गाव. ते महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर आहे. गावात मराठी कन्नड भाषा बोलल्या जातात. मुचंडी या जन्मगावात त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. ते कन्नड भाषाही उत्तम बोलत. घरची परिस्थिती अगदीच सामान्य होती. गावात माध्यमिक शाळा नसल्याने माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना जतला जावे लागले. १९४० ते १९५८ हा त्यांच्या जीवनातील पहिला कालखंड. जत येथील मराठा मंदिर, मुंबई संचालित श्री.रामराव विद्यामंदिर विद्यालयात १९५२ साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. शाळेतील शिक्षण पूर्ण करण्यासाठी घरोघरी वृत्तपत्र वाटणे व तत्सम स्वावलंबने त्यांनी त्याकाळात केली. मात्र मॅट्रिकनंतर पुढील शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर विद्यालयाचे तत्कालीन शालाप्रमुख शं.पि. शेटके यांनी आपल्या मुंबई येथील मित्रांच्या मदतीने मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात त्यांची निवास व भोजनाची सोय केली. १९५२ ते १९५८ याकाळात ते तेथे स्वावलंबनाने शिकले. १९५६ साली कीर्ती महाविद्यालयातून ते बी.ए. उत्तीर्ण झाले.
भीमराव कुलकर्णी यांच्या जीवनाचा दुसरा कालखंड १९५९ ते १९८३ असा पुण्यातील वास्तव्य काळाचा आहे. अध्यापन, संशोधन, व्याख्याते, लेखन आणि संस्थात्मक कार्य यांनी गजबजलेला आहे. व्यासंगी वक्ते, संशोधक, संस्थात्मक कार्य करणारे कार्यकर्ते, साहित्याचे मार्मिक भाष्यकार, कुशल प्राध्यापक अशी त्यांची प्रतिमा या कालखंडात मान्यता पावली. १९५९ ते १९६० या काळात ते श्रीमती सीताबाई कला महाविद्यालय, अकोला येथे मराठी विषयाचे व्याख्याते होते. १९६० ते १९६९ या काळात ते सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे येथे मराठीचे प्राध्यापक होते. १९७१ साली त्यांनी पुणे विद्यापीठात ‘ ऐतिहासिक मराठी नाटके ‘ या विषयावर प्रबंध सादर केला. ते विद्यावाचस्पती झाले. १९६२-१९६९ या काळात ते स.प.महाविद्यालयात एन.सी.सी. अधिकारी होते. १९७४ ते १९७७ या काळात ते मॉडर्न महाविद्यालयात उपप्राचार्य होते. आपल्या प्राध्यापकीय सेवाकाळात स.प. महाविद्यालय आणि मॉडर्न महाविद्यालय या दोन्ही महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळाच्या कार्याला त्यांनी गती दिली. पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेत त्यांनी कृतीशील कार्य केले. ते या संस्थेचे सभासद, कार्यवाह व पुढे कार्याध्यक्ष झाले. तेथे त्यांनी परंपरा आणि नवता यांचा सुंदर मेळ घातला. म.सा.परिषदेच्या वाङ्मय परीक्षांना त्यांनी गती दिली. पुढे साहित्य पत्रिका या परिषदेच्या मुखपत्राचे ते संपादक झाले. त्यांनी साहित्य पत्रिका या नियतकालिकाला नवे रूप दिले. म.सा. परिषदेची विभागीय साहित्य संमेलने दरसाल होतील अशा योजना त्यांनी केल्या. म.सा. परिषदेच्या वतीने होणारी साहित्य संमेलने व्यापक उत्साही होतील यांवर त्यांनी भर दिला. इचलकरंजी, कराड आणि मुंबई येथील संमेलने चिरस्मरणीय करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. मराठी साहित्य संस्था हा त्यांचा श्वास आणि ध्यास होता. त्यांचे महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणाचे संग्रह खंड स्वरूपात प्रसिद्ध करण्याची योजना केली. त्यांनी या भाषणाचे तीन खंड प्रसिद्ध केले. या खंडांचे ते संपादक होते.
म.सा. परिषदेच्या विविध उपक्रमासाठी महाराष्ट्राच्या बहुतेक भागात त्यांनी प्रवास केला. असंख्य कार्यकर्ते जोडले. आकाशवाणी, दूरदर्शनवरील साहित्यिक उपक्रमात ते सहभागी होत. १९६४ ते १९८३ या काळात साहित्य संस्थांचे उपक्रम आणि विविध साहित्य विषयक कामे सांभाळून त्यांनी पुणे विद्यापीठ आणि फर्ग्युसन महाविद्यालयात एम.ए. च्या विद्यार्थ्यांना योगदायी प्राध्यापक म्हणून अध्यापन केले. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली १९ विद्यार्थ्यांनी पुणे विद्यापीठात प्रबंध सादर करून पी.एचडी. पदवी प्राप्त केली. नाटककार रा.ग. गडकरी यांच्या समग्र साहित्यावर यथार्थ संशोधन कार्य झाले नाही, असे त्यांचे मत होते. त्यासाठी त्यांनी संपूर्ण गडकरी खंड १ ते ३ नव्याने संपादित केले आणि त्याला प्रदीर्घ प्रस्तावना लिहिली. तसेच गोविंदाग्रज यांचा काव्यसंग्रह संपूर्ण वाग्वैजयंती त्यांनी नव्याने संपादित केला. १९६० ते १९८३ हा मोठा कालखंड. या काळात त्यांनी अध्यापन आणि संख्यात्मक कार्य केले. त्याचबरोबर स्वतः साहित्य निर्मितीही केली. बाल, कुमार आणि युवा अवस्थेत त्यांनी कष्टपूर्वक शिक्षण घेतले होते. या काळात परिस्थिती आणि माणसे यांचे त्यांचे वाचन झाले होते. त्यांचा जीवन प्रवास जत ते पुणे व्हाया मुंबई असा झाला.
भीमराव कुलकर्णी यांनी मराठी कथा, कादंबरी, बालसाहित्य, ऐतिहासिक, जीवनकथा, चरित्रलेखन, समीक्षा आणि संपादने या प्रकारात विपुल लेखन केले. भीमराव कुलकर्णी यांचे साहित्य : कादंबरी – हरिनारायण (१९६५), समशेरबहादूर (१९७२), ओंकार (१९८६ ); कथासंग्रह – मुर्दाड (१९६२), स्त्रीफळा (१९७०), घाईस पोरं झालीस पाहिजेत (१९८२); समीक्षा – वाङ्मयीन रसास्वाद (१९६५), ऐतिहासिक मराठी नाटके (१९७१), काही साहित्यिक : काही साहित्यकृती; ललितलेखन – देवाची माणसं (१९८१), साहित्य संमेलनाचे महाभारत, साहित्यिकी ; बालसाहित्य – बाळू शेतकरी आणि भूत (१९६५), माणूस बोलू लागला (१९६७), गडकऱ्यांचा रानमेवा, जोडाक्षर विरहित छिटकुली इसापनीती भाग १ आणि २ (१९८४) ; ऐतिहासिक जीवनकथा – स्वामी विवेकानंद (१९६४), डॉ.बाबासाहेब आंबेडकर (१९६६), हिरोजी फर्जंद (१९८२), सखाराम हरी (१९८३), इतिहासातील स्वामीनिष्ठांच्या कथा (१९८५), बापू कान्हो (१९८५) ; संकीर्ण – युद्ध पेटले घराघरातून (१९६९), संभाषण कला (१९८१), सभेत कसे बोलावे (१९८४), नवे मराठी व्याकरण लेखन (१९८५) ; संकलने – संपादने – अच्युत बळवंत कोल्हटकर : वाङ्मयदर्शन (१९६२), सहस्त्रबुद्धे (डॉ.) पु.ग. व्यक्तिदर्शन (१९६४), संगीत सौभद्र (१९६४), गद्य प्रसाद (१९६४), मो.के दामले शास्त्रीय मराठी व्याकरण (१९६६), आमचे जीवन आमच्या स्मृती (१९६६), मराठी गद्याचा पूर्वरंग (१९६६), भाऊसाहेबांची बखर (१९६६), ऐतिहासिक पत्रबोध, कथा नवनीत (१९६६), मल्हार रामराव चिटणीस विरचित श्री शिवछत्रपतींचे सप्तप्रकराणात्मक चरित्र (१९६७), पारिजात (१९६८), अस्मिता महाराष्ट्राची (१९७१), अक्षर चिंतामणी (१९७२), मराठी साहित्य संमेलन अध्यक्षीय भाषणे खंड १ (१९७१); खंड २ (१९७१ ); खंड ३ (१९७२), साहित्य आणि नाट्य काही समस्या (१९७४), मुक्तेश्वराचे विराटपर्व (१९८१), काव्यगंगा (१९८४), गद्य शिखरे (१९८४), गुर्जर कथा (१९८५), वामन पंडिताची सुधाकाव्ये (१९८५) कथाविमर्श (१९८७), मराठी फार्स (१९८७), मराठी वाङ्मय चर्चा आणि चिकित्सा (१९९३) इत्यादी.
भीमराव कुलकर्णी यांच्या जीवनाचा तिसरा कालखंड १९८३ ते १९८७ असा आहे. या कार्यकाळात त्यांनी ना.दा.ठा. महिला विद्यापीठ येथे मराठीचे प्राध्यापक आणि विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुखपद स्वीकारले. १९८६ साली अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे मुंबई येथे त्यांनी अगदी नेटके आयोजन केले. दरम्यान महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. तसेच त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्षपद भूषविले आहे. मुंबई येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ : गणोरकर, प्रभा, डहाके, वसंत, आबाजी आणि अन्य (संपा), संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश (१९२०-२००३), मुंबई, २००४.