गोड्या पाण्यातील एक मासा. मरळ माशाचा समावेश अस्थिमत्स्य वर्गाच्या चॅनिफॉर्मिस गणाच्या चॅनिडी कुलात करतात. भारतात मरळीच्या पाच जाती असून त्या सर्व नद्यांमध्ये व जलाशयांत आढळतात. मरळीच्या जातींना फुलमरळ, पट्टमरळ, घडक्या, बोटरी मरळ, डाकू, डोक व डोकऱ्या अशी विविध नावे आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर भागात आढळणाऱ्या मरळीचे शास्त्रीय नाव चॅना पंक्टॅटा आहे.
मरळ साधारणपणे २० सेंमी. ते २ मी.पर्यंत वाढतात. शरीर अग्रभागाकडे दंडगोल व पश्चभागाकडे संकोचलेले असते. शरीरावर एक लांब पृष्ठपर व एक लांब गुदपर असतात. यांशिवाय श्रोणिपर, अधरपर आणि पुच्छपर असून ते लहान असतात. सर्व परांवर लवचिक काटे असतात. डोके सापाच्या डोक्यासारखे असते. त्यांच्या कल्लाछिद्रांभोवती पापुद्र्यांसारखे आवरण असते. या आवरणावर अनेक घड्या असून त्यांवर असंख्य केशवाहिन्या असतात. त्यामुळे ते हवेतही काही वेळ श्वसन करतात.
मरळ ओसाड प्रदेशातील दलदलीच्या जागी, अस्वच्छ पाण्यात व विहिरीतही आढळतात. हे मासे अतिगढूळ पाण्यात राहू शकतात. ते काही वेळा स्थलांतर करतात व घरटीही बांधतात. ते प्राणिभक्षी असून वलयांकित प्राणी, कीटक, लहान साप व बेडूक तसेच बेडूकमासे खातात. विशेषेकरून इतर लहान माशांवर ते उपजीविका करतात. त्यामुळे रोहू, कटला व मृगळ अशा माशांचे जेथे एकत्रित संवर्धन केले जाते, अशा मत्स्यतळ्यात मरळ माशांना ठेवत नाहीत. त्यांचे संवर्धन स्वतंत्रपणे वेगळ्या मत्स्यतळ्यात किंवा डोहात केले जाते.
मरळीची वीण लहान तलावांत किंवा नद्यांच्या डोहांत होते. ते गवत, पाणवनस्पतींची पाने व तरंगणारी पाने एका ठिकाणी गोळा करून त्यांचे घरटे तयार करतात. या घरट्यात मादी अंडी घालते. अंडी फलित झाल्यावर नर आणि मादी अंड्यांचे व पिलांचे संरक्षण करतात. तसेच ते पिलांना भक्ष्य शोधण्यासाठी मदत करतात. पिले मोठी झाली की ते त्यांना हुसकून लावून स्वतंत्रपणे जीवन जगायला लावतात. खाण्याच्या दृष्टीने मरळ हा उत्तम मासा आहे. ते हवेतही श्वसन करू शकत असल्यामुळे त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विनासायास जिवंत नेता येते.