गोविंद मल्‍हार कुलकर्णी : ( २९ डिसेंबर १९१४ – ४ एप्रिल २००१). मराठी साहित्यातील समन्‍वयशील वृत्‍तीचे समीक्षक. हिंगणगाव (सांगली) येथे जन्‍म. बालपणी दररोज वडिलांचे व घरासमोरील विधवा बाईचे पोथीवाचन, सत्‍यशोधक चळवळ जोरात असताना गावकऱ्यांनी त्‍यांच्‍या वडिलांना बेडग गावी राहण्‍यासाठी केलेला आग्रह यांचा त्‍यांच्‍या मनावर खोल संस्‍कार झाला. त्‍यांचे पाचवी पर्यंतचे शिक्षण बेडगला, पुढे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण इचलकरंजीला गोविंदराव विद्यालयात तर नंतर एम. ए. पर्यंतचे शिक्षण विलिंग्डन महाविद्यालय, सांगली येथे झाले. १९४२ साली त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल, नानावाडा, पुणे येथे शिक्षक म्‍हणून अध्‍यापनाला सुरुवात केली. १९४२ ते १९४६ पर्यंत नानावाडा येथे ते माध्‍यमिक शिक्षक होते. तेथे मो. शं. भडभडे ऊर्फ शशिकांत पुनर्वसु यांचा सहवास लाभल्‍यामुळे ते मार्क्‍सवादाकडे वळले व पुढे दि. के. बेडेकर यांच्‍या सहवासात आले. त्‍यामुळे त्‍यांची जीवनवादी समीक्षादृष्‍टी विकसित होण्‍यास याचा निश्चितच फायदा झाला. गो. म. १९४६ ते १९७४ विजापुरच्‍या विजय महाविद्यालयात व १९७४ ते १९७६ या काळात कराडच्‍या वेणूताई चव्‍हाण महाविद्यालयात मराठीचे प्राध्‍यापक होते. १९५५ ते १९७४ पर्यंत एम्.ए् च्‍या अध्‍यापनासाठी ते बेळगाव येथे तर १९७४ ते १९७८ पर्यंत वाईच्‍या किसनवीर महाविद्यालयात येत असत. १९६९ पासून कर्नाटक विद्यापीठात व १९७४ पासून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे ते पीएच्.डी. चे मार्गदर्शक होते.

गो. म. कुलकर्णी पहिला समीक्षाग्रंथ रसग्रहण : कला आणि स्‍वरूप  (१९५२) साली प्रसिद्ध झाला. त्‍यानंतर खंडणमंडन  (१९६८ ), साद-पडसाद (१९७५), वाटा आणि वळणे  (१९७५), मराठी साहित्‍यातील स्‍पंदने  (१९८५), भारतीय साहित्‍याचे निर्माते : वा. म. जोशी (१९८६ ), मराठी कविता : काही रूपे, काही रंग (१९९१ ), मराठी नाट्यसृष्‍टी (१९९३), आधुनिक मराठी वाङ्मयाची सांस्‍कृतिक पार्श्‍वभूमी (१९९४), संत साहित्‍य : काही निरीक्षणे (१९९४), मराठी समीक्षेची वाटचाल (१९९८), बारा साहित्यिक (१९९८ ), मराठी ग्रामीण साहित्‍य : परिसर आणि प्रवाह (१९९९), ग्रंथकीर्तन (२०००), साहित्‍याचा स्वभाव (२००८ ) हे समीक्षाग्रंथ प्रसिद्ध झाले. त्यांचा प्राची (१९५४ ) हा काव्‍यसंग्रहही प्रकाशित आहे. त्यांनी द. गो. कर्वे यांच्‍या रानडे – द प्रॉफेट ऑफ लिबरेटेड इंडिया  या ग्रंथाचा स्‍वतंत्र भारताचे द्रष्‍टे न्‍या. रानडे  (१९४१ ) हा अनुवाद केला. ऑस्‍कर वाईल्‍ड यांच्‍या लेडी विडंरमेअर्स फॅन  या नाटकाचा श्री. र. भिडे यांच्‍या सहकार्याने ती तशी नव्‍हती (१९५७ ) आणि साहित्‍य अकादमी प्रकाशित मल्‍याळम साहित्‍याचा इतिहास (१९८४ ) हे अनुवादही त्यांनी केले.

संपादित ग्रंथात श्री. र. भिडे यांच्‍या सहकार्याने मराठीचे स्‍वरूपदर्शन (१९५४), वि. म. कुलकर्णी यांच्‍या सहकार्याने झपूर्झा (१९६२,  ), कृ. ब. निकुंब यांच्‍या सहाकार्याने पत्रंपुष्‍पम (१९६४,), साहित्‍यपराग (१९६९), हृदयशारदा, वि. वा. शिरवाडकर यांच्‍या सहकार्याने चांदणवेल, (१९७२), पुण्‍याई (१९७४, अ. भा. मराठी साहित्‍य संमेलन, पुणे स्‍मरणिका), श्री. शिवछत्रपती : एक स्‍मरण (१९७५, कला वाणिज्‍य महाविद्यालय, कराड ), अभिरुची : ग्रामीण आणि नागर (१९७६,अ. भा. मराठी साहित्‍य संमेलन, कराड), वि. त्र्यं. शेटे यांच्‍या सहकार्याने महाराष्‍ट्राची सत्त्वधारा : रा. चिं. ढेरे अभिनंदन ग्रंथ (१९८१), नवसमीक्षा – काही विचार प्रवाह (१९८२, ह. श्री. शेणोलीकर षष्‍ठ्यद्बिपूर्तिनिमित्‍त समीक्षेच्‍या शाखातील विवेचक लेखांचे संपादन ), वा. ल. कुलकर्णी यांच्‍या सहकार्यानेवा. म. जोशी-साहित्‍य दर्शन (१९८५), दलित साहित्‍य : प्रवाह आणि प्रतिक्रिया (१९८६ ), वा. रा. ढवळे लेखसंग्रह, , व. दि. कुलकर्णी यांच्‍या सहकार्याने मराठी वाङ्ममयाचा इतिहास खंड-६, भाग १ व भाग २ (१९८८), विद्याधर पुंडलिक यांच्‍या सहकार्याने दलित साहित्‍य : एक सामाजिक सांस्‍कृतिक अभ्‍यास (१९९२), दत्तात्रय पुंडे यांच्‍या सहकार्याने वाङ्मयेतिहास : सद्यस्थिती आणि अपेक्षा (१९९५), पुन्‍हा वामन मल्‍हार (२०००), वाङ्मयेतिहास : एक मुक्‍त संवाद, (२०१५), सुषमा करोगल यांच्‍या सहकार्याने सौंदयोत्‍सव (१९९६) या ग्रंथांचा समावेश होतो.

गो. म. हे जीवनवादी समीक्षक म्‍हणून ओळखले जातात. त्‍यांच्‍या प्राची  या काव्‍यसंग्रहात प्रकाश पूजनाच्‍या आशावादी वृत्तीबरोबर यंत्रयुगाचे औपरोधिक चित्रण येते. त्‍यांनी मराठीत प्रथमच समाजशास्‍त्रीय समीक्षा पद्धतीचा पद्धतशीर तत्त्वविचार आणि आचार मांडलेला आहे. तसेच वाङ्ममयेतिहासकारांना पडणारे अनेक प्रश्‍न त्‍यांनी उपस्थित केलेले असून त्‍यांच्‍या सोडवणूकीची दिशादर्शक सूत्रेही सांगितली आहेत. त्यांनी आधुनिक मराठी साहित्‍याची जशी समीक्षा केली आहे तशीच संत साहित्‍याचीही समीक्षा केली आहे. अध्‍यात्‍म व काव्‍य यांच्‍या एकात्‍मतेत संतांचे स्‍वतंत्र साहित्‍यशास्‍त्र शोधता येते व ते शोधण्‍याची अर्थपूर्ण व मौलिक दिशा दाखवून संत साहित्‍याच्‍या स्‍वरूप मीमांसेला पूर्णता देण्‍याचा मार्ग त्‍यांनी दाखविला आहे. त्‍यांच्‍या समीक्षेत काव्‍य समीक्षा अधिक उठून दिसते. मराठी कवितेच्‍या प्रकार – उपप्रकारांची जशी त्‍यांनी तत्त्वचर्चा केली तशी कवितांची नमुनेदार संपादने केली. त्‍याचप्रमाणे नवसाहित्‍य, ग्रामीण साहित्‍य व दलित साहित्‍य या साहित्‍य प्रवाहांची त्‍यांनी सखोल व सहृदयतेने चर्चा केली. नाटक, कादंबरी, कथा, निबंध, चरित्र-आत्‍मचरित्र या वाङ्ममयप्रकारावरील त्‍यांचे लेखन हे जसे त्‍या त्‍या साहित्यिकाची बलस्‍थाने दाखविणारे आहे  तसेच त्‍यांच्‍या मर्यादाही दाखविणारे आहे.

संदर्भ समृद्ध व तौलनिक विवेचन, ऐतिहासिक दृष्‍टी, सारख्‍याच तोलामोलाने खंडण आणि मंडन, नवा विचार ग्रहण करण्‍यास सदैव सिद्ध असलेली प्रसन्नावृत्‍ती त्‍यांच्‍या ठायी आहे. १९९३ मध्‍ये गुलबर्गा येथे संपन्‍न झालेल्‍या दुसऱ्या कर्नाटक राज्‍य मराठी साहित्‍य संमेलनाचे ते अध्‍यक्ष होते. रा. श्री. जोग पारितोषिक, महाराष्‍ट्र फौंडेशन पुरस्‍कार (१९९५ ), रंगत संगत संस्‍थेतर्फे दिला जाणारा माधव मनोहर पुरस्‍कार (१९९६ ) इत्यादी पुरस्कारांनी ते सन्मानित झाले आहेत. गो. म. हे सामाजिक जाणिवांची प्राची उजळणारे कवी, विस्‍तृत वाङ्ममयपटाचे चिंतनकार, समन्‍वयशील वृत्‍तीचे समीक्षक, ललित आणि वैचारिक ग्रंथांचे सिद्धहस्‍त भाषांतरकार होते.

पुणे येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ : मंचरकर, रत्‍नाकर बापूराव  गो. म. कुलकर्णी यांची समीक्षा, वाई (सातारा), १९९०.