मध्य अमेरिकेतील एल साल्वादोर प्रजासत्ताकामधील याच नावाच्या विभागाचे मुख्य ठिकाण, तसेच देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर. लोकसंख्या ३,३०,३८९ (२०२० अंदाज). पश्चिम साल्वादोरमध्ये एका पर्वतांतर्गत द्रोणी प्रदेशात सस. पासून ६६५ मी. उंचीवर हे शहर वसले आहे. सॅन साल्वादोर या देशाच्या राजधानीच्या ठिकाणापासून वायव्येस ७७ किमी., तर ग्वातेमालाच्या सरहद्दीपासून पूर्वेस ३२ किमी. वर सांता आना आहे. याच्या उत्तर ईशान्येस १६ किमी. वर सांता आना ज्वालामुखी शिखर असून ते देशातील सर्वोच्च (उंची २,३८६ मी.) शिखर आहे. सोळाव्या शतकापासून हा जागृत ज्वालामुखी असून अखेरचा उद्रेक २००५ मधील आहे. त्याच्या मुखाशी गंधकयुक्त पाण्याचे सरोवर आहे. इ. स. १७०८ पासून याला सांता आना नावाने ओळखले जाते. कॉफी प्रक्रिया उद्योगासाठी सांता आना विशेष प्रसिद्ध असून जगातील सर्वांत मोठ्या कॉफी प्रक्रिया गिरण्यांकांपैकी एक असलेले एल मोलिनो गिरणी येथे आहे.

चालचूआपा (सांता आना)

त्याशिवाय मद्य व साखरनिर्मिती, वस्त्रोद्योग, फर्निचर व चामड्याच्या वस्तूंची निर्मिती हे उद्योग येथे चालतात. हे प्रमुख व्यापारी केंद्र असून येथील कॉफी निर्यात महत्त्वाची आहे. जगातील सर्वांत मोठ्या कॉफी प्रक्रिया केंद्रांपैकी हे एक आहे. पॅन-अमेरिकन महामार्गाचा भाग असलेला इंटर-अमेरिकन महामार्ग या शहराजवळून जातो.

स्पॅनिश गॉथिक चर्च व वसाहतकालीन एल काल्व्हारिओ या उल्लेखनीय चर्चवास्तू येथे आहेत. चालचूआपा हे इंडियनांचे भग्नावशेषी शहर येथून पश्चिमेस १४ किमी. वर आहे. एल साल्वादोर विद्यापीठाची शाखा येथे असून शहरात राष्ट्रीय रंगमंदिर व कला विद्यालय आहे. सांता आनापासून पश्चिमेस १९ किमी. वरील लेक कोटपेक हे उन्हाळ्यातील हवेशीर ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. १९८० च्या दशकात डाव्या विचारसरणीच्या गनिमी सैनिकांनी शहरातील मालमत्तेची खूप नासधूस केली होती.

समीक्षक : ना. स. गाडे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.