बाऊल संगीत : पश्चिम बंगाल आणि संलग्न प्रांतातील एक भारतीय लोकसंगीत प्रकार. भारतीय लोकसंगीताचे वैविध्य सर्वश्रुत आहे. प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या भक्तिसंगीताचा बंगालमधील हा प्रवाह आहे. हे संगीत गाणाऱ्या पंथालाही बाऊल म्हटले जाते. खेडोपाडी, सहज उपलब्ध साधनांतून वाद्य बनवून गाणारे हे ईश्वर भक्तीने झपाटलेले वेडे फकीर हा संगीत प्रकार सादर करतात. साधारणतः १८ व्या शतकाच्या शेवटी समाजाने बाऊल पंथाची दखल घ्यायला सुरुवात केली आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी बाऊल पंथाची जगाला ओळख करून दिली.

बाऊल गायकांच्या एका हातात एकतारा असतो आणि कमरेला ताल वाजविण्यासाठी डुग्गी बांधलेली असते. पायात घुंगरूही असतात. दोन्ही वाद्ये वाजवत गाता गाता ते नाचूही लागतात. काही वेळा भक्तीच्या उन्मादाने ते उड्याही मारू लागतात. उंचपट्टीत, अतिशय उत्कटतेने भावविभोर होऊन गाणाऱ्या या वेड्यांना बाऊल म्हणतात. संस्कृत भाषेतील ‘वातुल’ म्हणजे वेडा, ह्या शब्दावरूनच बाऊल हा शब्द आला असावा असे मानले जाते. रंगीत कापडांचे तुकडे जोडून शिवलेले कपडे घालणारे, रंगीत मणी, खडे असलेल्या माळांनी नटलेले हे कलाकार फिरस्ते असतात. ते आपल्या गीतांमधून देवाची आळवणी करतात, तर कधी समाजाला शिकवण देतात, कधी लोकांच्या डोळ्यात अंजन घालतात. आत्ममग्न असं बाउल संगीताचं वर्णन करता येईल. बंगालमधील संत श्री चैतन्य महाप्रभू ह्यांनी नाम संकीर्तनाचे महत्त्व सांगणारे शिक्षाष्टकम्  हे स्तोत्र रचले. ह्या स्तोत्राच्या आधारे महाप्रभूंच्या अनुयायांनी बंगाली भाषेत जी गाणी रचली तीच सुरुवातीची बाऊल गीते होत. बाऊल संगीतावर बौद्ध विचारांचा प्रभाव आहे म्हणून काही रचना पाली भाषेतही आहेत. पर्शियन प्रांतातही ‘बा-आल’ नावाचे असेच फिरस्ते गायक होते, जे पुढे भारतातही आले, त्यामुळे सूफी विचारांचाही प्रभाव बाऊल गीतांवर झाला. आजही भारत व बांगलादेशात बाऊल गायक आहेत. इतर अनेक बाऊल गायकांप्रमाणेच श्रीमती पार्वती बाऊल आज जगभरात हे संगीत पोचवत आहेत.

बाऊल संगीत गाताना वापरली जाणारी वाद्ये – बाऊल गीत गाताना गायक जी एकतानता साधतात त्यासाठी त्यांना साथ देणारी तीन वाद्ये आहेत. एकतारा, डुग्गी आणि नुपूर. बाऊल गायक – गायिका उजव्या हातात एकतारा धरतात. एकतारा हे वाद्य भोपळा, बांबू, कडुलिंब किंवा इतर झाडांच्या खोडापासून बनवतात. बांबूचा दांडा फाकवून छोट्या चुकांच्या आधाराने गोलाकार खोडाला जोडलेला असतो. हे खोड खालच्या बाजूने चर्माच्छादित असते आणि वरच्या बाजूने उघडे असते. एकताऱ्याच्या खालच्या बाजूला जे गोलाकार चामडे लावलेले असते त्याच्या मध्यबिंदूतून तार ओवली जाते. ही तार फाकवलेल्या बांबूच्या निमुळत्या भागापर्यंत नेऊन खुंटीच्या आधाराने बांधलेली असते. एकतारा हे केवळ वाद्य नसून बाऊल साधकांच्या मते ते मनुष्य देहाचं प्रतीक आहे. इडा, सुषुम्ना आणि पिंगला अशा तीन नाडया मनुष्य शरीरात असतात. एकताऱ्याचे रूप पाहिल्यावर लक्षात येते की फाकवलेल्या बांबूचे दोन भाग म्हणजे इडा आणि पिंगला नाडी आणि मधली तार ही सुषुम्ना नाडी होय. एकतारा हा गायकाला सतत स्वरसाथ करतो. ज्याप्रमाणे गाण्याची लय असते त्याप्रमाणे एकतारा छेडत बाऊल गीत गायले जाते. एकताऱ्याच्या सतत झंकाराने एक नादवलय तयार होते जे बाऊल गीतातील आध्यात्मिक काव्याला पोषक ठरते.

डुग्गी हे एक तालवाद्य आहे. तबला-डग्गा ह्या जोडीतील डग्ग्याप्रमाणे दिसणारे पण आकाराने लहान असे डुग्गीचे वर्णन करता येईल. साधारणतः ही डुग्गी बनविण्यासाठी मातीचा वापर केला जातो. त्यामुळे वाद्याचे वजन हलके राहते. मातीच्या भांडयावर चामडयाचे आच्छादन असते आणि मध्यभागी शाई असते. चामडे ताणण्यासाठी वादीऐवजी जाड दोरी वापरतात. साधारणतः बाऊल गायक हे वाद्य उजव्या खांद्यावर अडकवतात आणि कमरेच्या डाव्या बाजूला बांधतात ज्यामुळे त्यांना ते डाव्या हाताने वाजवत नर्तनही करता येते. एकताऱ्याच्या स्वरात डुग्गी मिळवली जाते. गाण्यातील काव्याच्या छंदाप्रमाणे ठेका वाजतो. नूपुर : बरेचसे बाऊल गायक – गायिका पायात घुंगरू बांधतात. नर्तक वापरतात त्या चाळांपेक्षा हे घुंगरू वेगळे असतात. मृदु ध्वनी उत्पन्न व्हावा म्हणून घुंगरू कमी असतात. काही विशेष प्राविण्य मिळवल्यावर गुरूच्या इच्छेने काही बाऊल साधकांना गुरूकडून नूपुर दिले जातात. पार्वती बाऊल ह्या अशा साधिका आहेत ज्या नूपुर बांधतात. ह्याची रचना अंडाकृती कड्याप्रमाणे असते. ह्या कडयाला मधोमध फट असते आणि चांदीच्या कडयात चांदीचे मणी असतात. नूपुरांच्या अग्रभागी एक मोराकृती आकडा असतो ज्यात दोरीचा वेढा बांधलेला असते. तो वेढा पायाच्या अंगठयाच्या शेजारच्या बोटात अडकवावा लागतो. नूपुरांच्या मागच्या बाजूलाही दोरी बांधलेली असते जी पायाला बांधली जाते.

बाऊल संगीतासाठी वापरली जाणारी इतर काही वाद्ये : दोतारा हे एक तंतूवाद्य आहे. ह्याला चार तारा असतात. ज्या चार खुंटयांना बांधलेल्या असतात. हे वाद्य बनवायला भोपळा किंवा झाडाचे खोड वापरतात. नखी किंवा मिजराफाच्या सहाय्याने हे वाजवले जाते. काही बाऊल गायक हे वाद्य वाजवत गातात किंवा काही गायकांबरोबर दोतारा वादक साथ करतात. नादगर्भ आवाज असलेलं हे वाद्य बाऊल गीतांमधील आध्यात्मिक भावाला पोषक आहे. डमरूसारखे दिसणारे पण तंतूच्या सहाय्याने वाजणारे आनंदलहरी-खोमोक हे विलक्षण नादमय लोकवाद्य आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशा आणि भारताच्या ईशान्य प्रांतातील संगीतात हे वाद्य विशेषतः बाऊल संगीतासाठी वापरले जाते. ह्या वाद्याचे तीन भाग असतात. एक लाकडाच्या खोडाचा गोलाकार भाग, जो एका बाजूने उघडा तर दुसऱ्या बाजूने चर्माच्छादित असतो. ह्या खोडाला दोराने आवळलेलं असतं. चामड्याच्या मध्यावर बारीक तंतू (आता नायलॉन वापरले जाते) ओवून तो खोडाच्या उघड्या भागातून बाहेर येतो आणि तिथे त्याला छोट्या घागरीसारखा दिसणारा एक धातूचा तुकडा असतो जो वादक हाताने ताणून धरतात. हा ताणलेला तंतू दुसऱ्या एका पानाच्या आकाराच्या दगडाच्या तुकड्याने छेडला जातो. ह्या तुकड्यात हाताचे बोट अडकवण्यासाठी एक छिद्र असते. ह्या वाद्यातून सूर आणि ताल दोन्ही मिळतो. हे वाद्य खांद्याला अडकवतात आणि बगलेत धरून वाजवतात.

संदर्भ :

  • Chowdhury, Kabir, Folk Poems From Bangladesh, Bangla Academy Dhaka, 1985.