पार्वती बाऊल : (१९७६). पश्चिम बंगालमधील बाऊल हा संगीत प्रकार सादर करणाऱ्या लोककलाकार. पश्चिम बंगालमधील सनातन ब्राह्मण कुटुंबात मौशमी परियल म्हणून पार्वतीजींचा जन्म झाला. त्यांचा परिवार हा मूळचा पूर्व बंगाल मधला. भारताच्या फाळणीनंतर पार्वतीजींचा परिवार पश्चिम बंगालमध्ये स्थलांतरित झाला. त्यांचे वडील भारतीय रेल्वेत अभियांत्रिकी विभागात कार्यरत होते. शास्त्रीय संगीतात त्यांना विशेष रुची होती. ते आपल्या मुलीला वेगवेगळ्या संगीत मैफलींना घेऊन जात. पार्वतीजींची आई गूढ संत रामकृष्ण यांची भक्त होती. पार्वतीजींच्या वडिलांची सतत वेगवेगळ्या ठिकाणी बदली होत असे. त्यामुळे आसाम, कुचबिहार, पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागात पार्वतीजींचे वास्तव्य असे. कुचबिहारच्या सुनीती अकॅडमीमध्ये त्यांनी शिक्षण घेतले.

पार्वती बाउल आणि रवी गोपालन् नायर

त्या तेथूनच उच्च माध्यमिक शाळेतून उत्तीर्ण झाल्या. प्रारंभी श्रीलेखा मुखर्जी यांच्याकडून त्यांनी कथ्थक नृत्याचे शिक्षण घेतले. विश्वभारती विद्यापीठ शांती निकेतन कलाभवन येथून त्यांनी दृक कलेचे शिक्षण घेतले. शांती निकेतनच्या संकुलात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवित असतानाच त्यांनी एका अंध बाऊल साधकाचे गायन ऐकले. त्याचा प्रभाव पार्वतीजींवर पडला. पार्वतीजींची त्याच संकुलात फुलमाला दाशी या बाऊल गान सादर करणाऱ्या महिला साधकाशी गाठ पडली. फुलमाला यांच्याकडून पार्वतीजींनी संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली. फुलमाला यांनी त्यांना अन्य गुरूंचा शोध घ्यायला सांगितले, त्याच दरम्यान ८० वर्षांच्या सनातनदास बाऊल यांच्याशी पार्वतीजींचा संपर्क आला. पश्चिम बंगालमधील बंकुरा येथे ते राहत होते. बंकूऱ्यातल्या सनातनदास यांच्या सोनामुखी आश्रमाला त्यांनी भेट दिली. सुमारे पंधरा दिवसानंतर त्यांना दीक्षा प्राप्त झाली. सनातनदास हे पार्वतीजींचे लौकिकार्थाने पहिले गुरु ठरले. पुढील सात वर्षे त्यांनी आपल्या गुरूंबरोबर विविध ठिकाणी भ्रमण केले. गुरूंच्या बाऊलगानात गायनाची साथसंगत त्या करू लागल्या. त्या बाऊल गीते गायल्या, शिकल्या, बाऊल नृत्य शिकू लागल्या. एकतारा आणि डुग्गी या वाद्यांचे वादन करू लागल्या. गुरु सनातनदास यांनी त्यांना प्रत्यक्ष प्रयोग सादर करण्याची अनुमती दिली, नंतर पार्वती आपले पुढचे गुरु शशांको गोशांई बाऊल यांच्या संपर्कात आल्या. शशांको गोशांई यांचे त्यावेळचे वय ९७ वर्षांचे होते. बंकूरा जिल्ह्यातल्या खोईरबोनी या छोट्या खेड्यात शशांको गोशांई वास्तव्यास होते. एक महिला बाऊल साधकाला शिष्य म्हणून स्वीकारण्यास शशांको गोशांई प्रथम तयार नव्हते. काही दिवस शशांको यांनी पार्वतीजींच्या निष्ठतेची, श्रद्धेची परीक्षा घेतली. आपल्या उर्वरित तीन वर्षांच्या आयुष्यात शशांको गोशांई यांनी बाऊलची अनेक पदे पार्वतीजींना शिकविली तसेच बाऊल परंपरेतील गुह्य गोष्टींचे ज्ञान करवून दिले .

पार्वतीजींनी १९९५ सालापासून आपल्या बाऊलगानाचे प्रयोग सुरु केले. ते करीत असताना १९९७ मध्ये त्या केरळमध्ये गेल्या. त्या तिरुवनंतपुरम येथे गेल्या. स्थानिक आध्यात्मिक परंपरेचा आणि रंगभूमी परंपरेचा अभ्यास करावा हा त्यांचा उद्देश होता. तेथे रवी गोपालन नायर या पारंपरिक कळसूत्री बाहुल्या परंपरेच्या ज्येष्ठ कलावंताचा त्यांच्याशी परिचय झाला. रवी गोपालन नायर कथकली कार्यक्रम करीत असत. ग्रोटोवस्की यांच्या नाट्यतंत्राचा अभ्यास पार्वतीजींनी रवी गोपालन नायर यांच्याकडून केला. सन २००० मध्ये रवी गोपालन नायर यांच्यासोबत त्या कळसूत्री बाहुल्यांच्या रंगमंच परंपरेच्या अधिक अभ्यासासाठी वरमॉँट,अमेरिका येथे गेल्या. रंगभूमीवर कळसूत्री बाहुल्यांच्या उपयोजनासंबंधी अपूर्व योगदानासाठी प्रसिद्ध असलेल्या पीटर शुमन यांचे मार्गदर्शन पार्वतीजी आणि रवी गोपालन नायर यांना लाभले. त्यापूर्वी जर्मनीमधील हॅनोव्हर येथे एक्स्पो २००० या एका थिएटर कंपनीत पाच महिने त्यांनी प्रदर्शन आणि प्रयोग या संबंधीच्या सात मूलभूत तत्वांच्या संदर्भात प्रशिक्षण घेतले. तिरुवनंतपुरम येथे अब्दुल सलाम मुस्लिम फकीर कलंदर यांची भेट झाल्यावर पार्वतीजींनी त्यांना आपले गुरु केले. बाऊल मागच्या आध्यात्मिक परंपरेचे ज्ञान पार्वतीजींनी अब्दुल सलाम यांच्याकडून प्राप्त झाले. बाऊल संगीताचे शास्त्रही त्या त्यांच्याकडून शिकल्या. सन २००१ नंतर बाउल परंपरेला पूर्णपणे वाहून घेण्याचा निश्चय पार्वतीजींनी केला. डुग्गी, नुपूर आणि एकतारा या वाद्यांच्या साथीने त्यांनी आपले कार्यक्रम सुरु केले. स्वरचित दोहे आणि पारंपरिक बाऊल पदांचे दर्शन त्यांच्या कार्यक्रमातून होऊ लागले. त्या आपल्या कार्यक्रमात नाट्यतंत्राचा वापर करू लागल्या. पदगायन, निरूपण, नर्तन आणि वादन यांचा सुंदर सुमेळ म्हणून पार्वतीजींचा प्रयोग ओळखला जातो. पार्वतीजींच्या बाऊल सादरीकरणावर पश्चिम बंगालच्या कथेकऱ्यांच्या, पटचित्र कथेकऱ्यांच्या निवेदन शैलीचा फार मोठा प्रभाव आहे. चित्रित नेपथ्य तंत्राने पार्वतीजी आपल्या बाऊल सादरीकरणाला दृक सौंर्दयाचे नवे परिमाण प्राप्त करून देतात. शुमन यांचा फार मोठा प्रभाव पार्वतीजींवर आहे. त्यामुळे त्या मोठ्या कॅनव्हासवर चित्रे काढून सोबत कथाकथन व निवेदन करीत वेगळा परिणाम साधतात.

सन १९९० मध्ये त्या आपले गुरु रवी गोपालन नायर यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. त्यांच्यासोबत १५ वर्षे त्या तिरुवनंतपुरम येथे वास्तव्य करून आहेत. तिरुवनंतपुरम पासून जवळच असलेल्या नेदुमंगंड येथे एकतारा बाऊल संगीत कलारी या बाऊल गुरुकुलाची त्यांनी स्थापना केली. पार्वतीजींना ग्रामीण भागात वास्तव्य करणे अधिक आवडते. सोईरीज या केरळमधील गावात त्या राहतात. सन २००५ साली इंटरनॅशनल स्कुल ऑफ थिएटर ऍन्थ्रापॉलॉजी येथे प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी विदेशात दौरा केला होता. बाऊलगानाची चळवळ त्यांनी महिलांमध्ये लोकप्रिय केली आहे. बाउलसंबंधी त्यांनी ग्रंथलेखन केले आहे. रुहानियात या आंतरराष्ट्रीय बाऊल महोत्सवासह अनेक देशात त्यांनी आपले कार्यक्रम सादर केले आहेत.

संदर्भ : क्षेत्र संशोधन.