बहमनी साम्राज्याचा नववा सुलतान (कार.१४२२–१४३६). मूळ नाव शियाबुद्दीन अहमद. पहिला अहमदशाह म्हणून ओळख. हा चौथा बहमनी सुलतान दाऊदशाहचा मुलगा, तर आठवा बहमनी सुलतान फिरोझशाह (कार. १३९७–१४२२) याचा धाकटा भाऊ होता. फिरोझशाहला सुलतानपद मिळवून देण्यात अहमदशाहचा सिंहाचा वाटा होता. फिरोझशाहने सुलतान झाल्यावर अहमदशाहास आमीर उल उमरा हे पद दिले. त्याने फिरोझशाहशी एकनिष्ठ राहून बहमनी साम्राज्य वाढवण्यास मदत केली. परंतु पुढे फिरोझशाहने आपला पुत्र हसनखान यास सुलतान बनविण्याचा प्रयत्न सुरू केला, तेव्हा अहमदशाहने गादीसाठी हक्क सांगितला आणि फिरोझशाह विरुद्ध बंड पुकारले. अखेर अहमदशाहची वाढती ताकद पाहून फिरोझशाहने स्वतःहून सुलतानपदाचा त्याग केला आणि गुलबर्गा येथे अहमदशाहला सुलतान म्हणून मान्यता दिली (१४२२). राज्य मिळविण्याच्या कामात त्याच्याबरोबर सहभागी असणाऱ्या खलफ हसन बसरी या परदेशी घोडे व्यापाऱ्याची अहमदशाहास खूप मदत झाली. या मदतीचे बक्षीस म्हणून सत्तेवर येताच अहमदशाहने खलफ हसन याची मुख्य वजीराच्या जागेवर नेमणूक करून त्याला मलिक उत्तुजार हा किताब दिला.

सत्तेवर येताच अहमदशाहने विजयनगरवर आक्रमण केले. या स्वारीत विजयनगरचा पराभव झाला. विजयनगरच्या राजाने खंडणी देण्याचे कबूल केल्यावर दोन्ही राज्यांत तात्पुरता तह झाला (१४२३). या मोहिमेनंतर अहमदशाहने आपले लक्ष पूर्वेकडील वारंगळ प्रांतावर केंद्रित केले. अहमदशाहने वारंगळचा पराभव करून हा प्रदेश बहमनी साम्राज्यास जोडला (१४२५).

अहमदशाहच्या कारकिर्दीतील महत्त्वाची घटना म्हणजे बहमनी साम्राज्याच्या राजधानीचे गुलबर्गा येथून बीदर येथे झालेले स्थलांतर (१४२४-२५). बहमनी साम्राज्याच्या वाढलेल्या सीमांमुळे बीदर हे अधिक मध्यवर्ती असलेले ठिकाण राजधानीसाठी निवडले गेले. तेथील थंड व आल्हाददायक वातावरण हे या स्थलांतरामागील कारण असल्याचे अभ्यासक सांगतात. आणखी एक कारण म्हणजे अहमदशाह याचा गुरू हजरत मुहंमद बंदे नवाज गेसू दराज यांचा गुलबर्गा येथे १४२२ मध्ये झालेला मृत्यू. अहमदशाह या सुफी संतांचा निस्सीम भक्त होता. तसेच त्यांनी अहमदशाहला सुलतानपद मिळवून देण्यात मोठा पाठिंबा दिला होता. आपल्या गुरूच्या आठवणींमुळे अहमदशाह गुलबर्ग्यात अधिकच उदास राहू लागला होता. त्यामुळे त्याने आपली राजधानी बदलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते, तसेच आपल्या राजवटीला गुलबर्ग्यात धोका आहे, असे वाटून त्याने राजधानी बीदरला हलविल्याचा अभ्यासकांचा तर्क आहे. बीदरचे नाव बदलून मुहंमदाबाद असे ठेवण्यात आले.

यानंतर अहमदशाह याचे आपल्या साम्राज्याच्या उत्तर सीमेवरील माळवा व गुजरात या साम्राज्यांबरोबर संघर्ष सुरू झाले. १४२६ मध्ये त्याने माळव्याच्या सुलतानाचा पराभव केला. गुजरात सीमेवरील एका बंडखोर सरदाराला त्याने मदत केली, पण या प्रयत्नात बहमनी फौजांना गुजरातच्या सुलतानाकडून पराभव पतकरावा लागला (१४२९). अहमदशाहच्या आज्ञेवरून मलिक उत्तुजारने गुजरातच्या ताब्यातील साष्टी प्रांतावर स्वारी केली (१४३०). या स्वारीत बहमनी फौजेतील देशी स्थानिक मुसलमान व परदेशी मुसलमान यांच्यातील मतभेद समोर आले. परिणामी बहमनी फौजांचा दारुण पराभव झाला.

अहमदशाह याने आपल्या कारकिर्दीत इराण, इराक, सिरिया येथून येणाऱ्या मुसलमानांना आपल्या सेवेत ठेवण्यास कायम प्राधान्य दिले. यामुळे स्थानिक देशी मुसलमान दुखावले जाण्यास सुरुवात झाली. त्याच्या दरबारात अनेक मुस्लीम साधूसंतांचा भरणा होता. अहमदशाहाचा परदेशी साधूंकडे जास्ती ओढा होता. यामुळे त्याच्या दरबारात कायम परदेशी मुसलमानांचे वर्चस्व होते. यातूनच पूर्वी येऊन स्थायिक झालेले मुसलमान व नव्याने आलेले मुसलमान यांचे आपापसांत कधीच पटले नाही. पुढे हा संघर्ष अधिक तीव्र होत जाऊन भविष्यात त्याचे परिणाम बहमनी साम्राज्याला भोगावे लागले.

अहमदशाह हा विद्वान आणि सुसंस्कृत होता. त्याची प्रजा त्याला वली (अवलिया) समजत असे. बीदर येथे तो मरण पावला (१४ जुलै १४३६). त्याच्यानंतर त्याचा ज्येष्ठ मुलगा दुसरा अलाउद्दीन अहमद (कार. १४३६–५८) हा गादीवर आला.

संदर्भ :

  • Nayeem, M. A. The Heritage of the Bahmanis & The Baridis of the Deccan, Hyderabad, 2012.
  • कुंटे, भ. ग. फरिश्ता लिखित गुलशन ई इब्राहिमी, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, १९८२.
  • खरे, ग. ह. मध्ययुगीन महाराष्ट्राचा इतिहास (इ.स.१२९६ ते १६३६), महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, २००१.
  • फडके, य. दी.; माटे, म. श्री.; कंटक, मा. रा.; कुलकर्णी, गो. त्र्यं. शिवछत्रपती इतिहास आणि चरित्र,खंड :१, शिवपूर्वकाल, पुणे, २००१.

                                                                                                                                                                           समीक्षक : प्रमोद जोगळेकर