दुसरा इब्राहिम आदिलशाह : (१५५६ – १६२७). मध्ययुगीन दक्षिण भारतातील मुसलमानी राज्यसत्तेतील एक सुलतान. ‘अज पूजा सिरी सरसतीʼ आणि इब्राहिम आदिलशाह (दुसरा) असा त्याचा उल्लेख वा. सी. बेंद्रे यांच्या विजापूरची आदिलशाही  या ग्रंथामध्ये येतो. मुळात एक मुस्लीम राज्यकर्ता आणि त्याच्या नावासोबत हिंदू देवतेचा उल्लेख हा विरोधाभास वाटतो.

दक्षिणेतील बहमनी सत्ता निष्प्रभ झाल्याचा फायदा घेऊन त्याच राज्यातील विजापूरचा सुभेदार युसुफ आदिलखान १४८९ मध्ये स्वतंत्र झाला. तोच आदिलशाही घराण्याचा संस्थापक. युसुफ आदिलखान, इस्माइल आदिलशाह, इब्राहिम आदिलशाह, पहिला अली आदिलशाह यांच्यानंतर दुसरा इब्राहिम आदिलशाह गादीवर आला (१५८०). हा शहाजीराजांना समकालीन होता, तर त्याच्यानंतर जन्मलेले मुहम्मद आदिलशहा आणि दुसरा अली आदिलशहा हे दोघे शिवरायांचे समकालीन होते.

दुसरा इब्राहिम आदिलशाह हा धर्मनिरपेक्ष, हिंदू धर्म प्रेमी होता. त्याच्या कारकिर्दीत हिंदूंच्या कत्तली, हिंदू धर्मस्थळांचा विध्वंस, हिंदू-मुस्लीम भेद अशा नोंदी नाहीत. सर्वधर्मियांना समान वागणूक देणाऱ्या या बादशहाने हिंदू, मुस्लीम प्रार्थनास्थळांना देणग्या दिल्या, शिवाय तळकोकणात आणि गोव्यात काही गिरीजाघरेही (चर्चेस) बांधून दिली होती. त्यांतील काही गिरीजाघरे अद्यापि गोव्याच्या बिशपच्या आधिपत्याखाली आहेत. इस्लामी जगात कुप्रसिद्ध असलेले शिया आणि सुन्नी वादही त्याने आपल्या राज्यात काही प्रमाणात आटोक्यात आणले होते. हा बादशहा त्याच्या फर्मानांची सुरुवात ‘अज पूजा सिरी सरसतीʼ अशी करत असे. याचा अर्थ असा की, ‘हा इब्राहिम आदिलशहा श्री सरस्वतीची पूजा करून हे फर्मान बजावत आहेʼ. तो स्वतःला श्रीसरस्वती आणि श्रीगणपती या बुद्धी देवतांचा पुत्र मानी, तसेच स्वतःला जगद्गुरू समजत असे. याबाबतचा उल्लेख बसातीन उस्स सलातीन मध्ये वारंवार येतो. त्याने विजापूर जवळ ‘नवरसपूरʼ नावाचे शहर वसवून त्यात ‘आसारमहालʼ नावाचा सुंदर महालही बांधला. या महालात त्याने श्रीकृष्णाच्या लीलांचे चित्रण करून घेतले होते.

इब्राहिमने विजापूरचा उल्लेख ‘विद्यानगरीʼ असाही केल्याचे आढळते. विद्या आणि संगीत या विद्या आत्मसात करण्यासाठी गुरुसेवा करण्याचीही त्याची तयारी होती. त्याच्या कारकिर्दीत संगीत, नृत्य, स्थापत्य या कलांचा उदय झाला. तो संगीतज्ञ होता. त्याच्या ‘मोतीखानʼ या तानपुऱ्यावर तो स्वतः रागदारी संगीत म्हणत असे. नवरसांचे वर्णन करणारा किताब-ए-नवरस  हा ग्रंथ त्याने दख्खनी भाषेत सिद्ध केला होता. या ग्रंथाची सुरुवातच सरस्वती स्तवनाने केली आहे. या ग्रंथात तो स्वतःचे वर्णन करताना म्हणतो, ‘हा देवांच्या कृपेने विद्वत्ता प्राप्त झालेला इब्राहिम तानपुरावाला विद्यानगरीचा (विजापूरचा) रहिवासी आहेʼ, ‘हे सरस्वती माते तुझ्या कृपाशीर्वादाने सिद्ध झालेला इब्राहिमाचा किताब-ए-नवरस (नवरसनामा) चिरायू होवोʼ असे उल्लेख विजापूरची आदिलशाही  या ग्रंथात दिसून येतात. अर्थात या सर्व गोष्टींच्या संवर्धनासाठी आवश्यक असलेला पैसा आणि राजकीय स्थैर्य त्याच्या कारकिर्दीत मुबलक प्रमाणात होते, ही बाब लक्षात घेतली पाहिजे. त्याच्या सरस्वती आणि गणपतीवरील श्रद्धेपोटी त्याने हिंदू देवदेवतांवर काही कवने आणि आरत्या रचल्याचे उल्लेखही सापडतात.

इब्राहिमच्या या वेड्या प्रेमावर त्याचे काही कट्टर मुस्लीम सल्लागार आणि सरदार नाराज होते. निव्वळ एकेश्वर वादावर नितांत श्रद्धा असणाऱ्यांच्या दृष्टीने हे अक्षम्य पाप होतेच. त्याचे निकटवर्तीय इब्राहिमला परधर्मीय देवतांचा उल्लेख करणे, भक्ती करणे आपल्या धर्मात निषिद्ध आहे, असे वारंवार सांगत. पण यावर त्याने ‘ज्या धर्मात या पूजा आणि भक्तीला मान्यता आहे तो धर्म मी स्वीकारीनʼ असे निक्षून सांगितले. शेकडो वर्षे अनेक सुलतानांच्या बेजरब सुलतानीने भाजून निघालेल्या या भूमीने असाही एक कलंदर राज्यकर्ता अनुभवला.

संदर्भ :

  • Farooqui, Salma Ahmed,  A Comprehensive History of Medieval India, Pearson Education, 2011.
  • Sen, Shailendra Nath, A Textbook of Medieval Indian History, Primus Books, New Delhi,  2013.
  • बेंद्रे, वा. सी. विजापूरची आदिलशाही, मुंबई, १९६८.
  • सरदेसाई, गोविंद सखाराम, मुसलमानी रियासत, पॉप्युलर प्रकाशन, १९९८.
  • छायासौजन्य  : ब्रिटिश लायब्ररी.

                                                                                                                                                                              समीक्षक : जयकुमार पाठक