मलिक सैफुद्दीन घोरी : (मृत्यू १३९७). बहमनी साम्राज्यातील एक धुरंधर वजीर आणि सुलतान अलाउद्दीन हसन गंगू बहमनी याचा स्वामिनिष्ठ सरदार. त्याच्या पूर्वायुष्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. मध्ययुगीन काळात दक्षिणेत मुहंमद तुघलकाची सत्ता झुगारून देऊन त्याच्या अल्लाउद्दिन हसन गंगू या सरदाराने बहमनी सत्तेची स्थापना केली (१३४७). मलिक सैफुद्दीन घोरी हा हसनच्या सैन्यात अधिकारी होता. या बंडात त्याने महत्त्वाची कामगिरी बजावली. हसनने सिंहासनारोहण केले आणि एक विश्वासू सरदार म्हणून मलिकची नेमणूक साम्राज्याचा ‘वकील-इ-मुतालिक’ म्हणजेच मुख्य वजीर पदावर केली.

मलिकच्या कन्येचा विवाह सुलतानाने आपला ज्येष्ठ पुत्र मुहंमदशाह (पहिला) याच्याशी करून दिला. हा विवाह समारंभ जवळजवळ वर्षभर चालू होता. या विवाहामुळे मलिकचे दरबारातील महत्त्व वाढले. तो उत्तम सेनापती आणि सल्लागार होता. त्याने दिलेल्या योग्य सल्ल्यामुळे सुलतानाची कर्नाटक प्रांतातील लष्करी मोहीम यशस्वी ठरली आणि तेथून प्रचंड संपत्ती मिळाली. मलिक बहुश्रुत होता. त्याने राज्यशास्त्रावर नसिहूलमुल्क या नावाने एक ग्रंथ लिहिला. त्यात सुलतान, मंत्रिमंडळ आणि प्रशासनातील इतर अधिकारी यांची कर्तव्ये, अधिकार यांची चर्चा करण्यात आली आहे. मलिकच्या सल्ल्यानुसार सुलतानाने राज्याची विभागणी दौलताबाद, तेलंगणा, वऱ्हाड आणि गुलबर्गा अशा चार प्रशासकीय विभांगामध्ये केली. यांपैकी गुलबर्ग्याचा सुभेदार स्वतः मलिक होता, तर तेलंगणाच्या सुभेदारीचे काम मलिकचा पुत्र आजम हुमायून याच्याकडे देण्यात आले होते.

हसन गंगू नंतर त्याचा मुलगा मुहंमदशहा (पहिला) बहमनी हा गादीवर आला (१३५८). मलिक हा मुहंमदशाहाचा सासरा असला, तरी त्याचे कर्तृत्व पाहूनच त्याची वजीर पदावर फेर नेमणूक करण्यात आली. सुलतान मुहंमदशाहाचा तो इतका विश्वासपात्र होता की, सुलतान तेलंगणाच्या मोहिमेवर असताना राज्यकारभाराची आणि राजधानीची संपूर्ण जबाबदारी मलिकवर सोपवण्यात आली होती (१३७१). तेलंगणाच्या या मोहिमेत सुलतान अडचणीत आलेला असताना अगदी योग्यवेळी सुलतानाच्या साहाय्यास जाऊन सुलतान आणि त्याच्या फौजांचा मलिक याने बचाव केला.

मुहंमदशाहाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अलाउद्दीन मुजाहिदशाह सुलतान बनला (१३७५). त्याच्या कारकिर्दीतही मुख्य वजीरपद मलिककडेच होते. मुजाहिदशाहाच्या काळात बहमनी आणि विजयनगर साम्राज्य यांच्यातील संघर्ष चिघळला आणि युद्धाचा निकाल लागण्याची चिन्हे दिसेनात. त्या वेळी मलिकने आपल्या साम्राज्याच्या क्षमता आणि मर्यादा यांची जाणीव सुलतानाला करून दिली आणि फार काळ चाललेल्या युद्धामुळे होणाऱ्या भीषण परिणामांची कल्पना देऊन सुलतानाला तहासाठी तयार केले. मलिकच्या पुढाकाराने आणि मध्यस्थीने हा तह करण्यात आला. विजयनगरच्या या युद्धानंतर दाऊदशाह या चुलतभावाने सुलतानाचा दगाबाजीने खून करून सत्ता ताब्यात घेतली (१६ एप्रिल १३७८). यावेळी दरबारात दोन पक्ष पडले होते. एक पक्ष दाऊदशाहाच्या बाजूने तर दुसरा त्याच्या विरुद्ध होता आणि त्यांच्यात यादवीची चिन्हे दिसू लागली. यावेळी मलिकने यादवी टाळण्यासाठी प्रयत्न केले. दाऊदशाहने केलेले कृत्य अनैतिक असले, तरी तोच सुलतानाचा सर्वांत जवळचा नातेवाईक आणि कायदेशीर वारस असल्याने यादवी युद्धामुळे राज्य नष्ट होण्यापेक्षा दाऊदशाहाचा सर्वांनी सुलतान म्हणून स्वीकार करावा, असा सल्ला त्याने दिला. मलिक हा बहमनी राजगादीचा सर्वांत अनुभवी आणि निष्ठावंत सेवक असल्यामुळे त्याच्या शब्दाचा मान त्या वेळी तरी सर्वांनी राखला. यातून त्याची राजनिष्ठा दिसून आली. परंतु सुलतानाचा दगलबाजीने झालेला खून लक्षात घेऊन मलिकने राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. यातून त्याचा तत्त्वनिष्ठ स्वभाव दिसून येतो.

पुढे महिनाभरातच दाऊदशाहाचा खून करण्यात आला (२१ मे १३७८) आणि बहमनींचे सिंहासन पुन्हा एकदा रिकामे झाले. यादवीची शक्यता निर्माण झाल्याने दरबारातील उमरावांनी मलिककडे मदतीची याचना केली. राजकारणातून निवृत्त झाल्यावरसुद्धा त्याच्याविषयी दरबारात आदर आणि विश्वास होता. सुलतान मुजाहिदशाहाची बहिण रूह-ए-परवर हिच्या पाठिंब्याने पहिल्या मुहंमदशाहाचा पुतण्या दुसरा मुहंमद (कार. १३७८–९७) सिंहासनावर बसला. दुसरा मुहंमदशाह याला मलिकच्या कर्तृत्वाची आणि प्रामाणिकपणाची जाणीव होती. त्याने पुन्हा मलिकचीच राज्याच्या मुख्य वजीरपदी नेमणूक केली. मलिकच्या सल्ल्यानुसार राज्यकारभार केल्यामुळे बहमनी राज्यात शांतता नांदू लागली आणि राज्य भरभराटीला आले. मलिकसारख्या तत्त्वनिष्ठ आणि धोरणी वजिरामुळे बहमनी सत्तेची पाळेमुळे दख्खनमध्ये खोलवर रुजली.

मलिकचा मृत्यू १३९७ मध्ये दुसरा मुहंमदशाह याच्या मृत्यूनंतर अवघ्या एका दिवसाने झाला. फार्सी इतिहासकार फिरिश्ताच्या मते, मरतेसमयी मलिकचे वय १०७ वर्षे होते व मलिकच्या इच्छेनुसार त्याचे दफन अलाउद्दीन हसन गंगू याच्या कबरीच्या आवारात करण्यात आले आणि त्यावर एक दगडी ओटा बांधण्यात आला.

संकेतशब्द – महंमदशहा, महंमद (पहिला), दाऊदशहा बहमनी

संदर्भ :

  • कुंटे, भ. ग. फरिश्ता लिखित गुलशन ई इब्राहिमी, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, १९८२.
  • कुंटे, भ. ग. महाराष्ट्र राज्य गॅझेटियर, मध्ययुगीन कालखंड (राजकीय व सामाजिक इतिहास), मुंबई, २०१४.
  • खरे, ग. ह. मध्ययुगीन महाराष्ट्राचा इतिहास (इ. स. १२९६ ते १६३६), महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, २००१.

                                                                                                                                                                                     समीक्षक : जयकुमार पाठक