बीदर : (राजकीय इतिहास). कर्नाटक राज्यातील उत्तर भागातील एक इतिहासप्रसिद्ध शहर व जिल्ह्याचे ठिकाण. हे हैदराबादपासून १५० किमी. तर मुंबईपासून ६०० किमी. अंतरावर आहे.

बीदर येथील किल्ला.

बीदर एक प्राचीन शहर असून या शहराचा ज्ञात इतिहास हा इ. स. दहाव्या शतकापासून सुरू होतो. दहाव्या शतकात बीदरवर कल्याणी चालुक्यांचे राज्य होते आणि त्यांची राजधानी कल्याणी ही बीदरपासून पश्चिमेला सु. ५० किमी. अंतरावर होती. अकराव्या शतकात देवगिरीचे यादव आणि वारंगळ येथील काकतीय या दोन नव्या सत्तांनी चालुक्यांच्या साम्राज्याला जबरदस्त आव्हान दिले. पुढे लवकरच चालुक्यांची सत्ता नष्ट होऊन बीदर शहर काकतीय साम्राज्याचा भाग झाले.

पुढे १४ व्या शतकाच्या सुरुवातीला दिल्लीच्या तुघलक राजवटीत दक्षिणेकडील प्रदेशावर हल्ले अधिक तीव्र झाले. तुघलक राजपुत्र उलुघखान (हा पुढे मुहम्मद बिन तुघलक या नावाने प्रसिद्ध झाला) याने वारंगळवरील स्वारीत बीदर शहराला वेढा देऊन हे शहर आणि येथील किल्ला जिंकून दिल्ली साम्राज्याला जोडले. या स्वारीनंतर बीदरवरील हिंदू सत्ता कायमची संपूष्टात आली व हा प्रदेश मुसलमानी सुलतानांच्या ताब्यात गेला. येथे असलेल्या भक्कम किल्ल्याचा उल्लेख मध्ययुगीन इतिहासकार जियाउद्दीन बरनी याच्या लिखाणात येतो. बीदरचा किल्ला हिंदू राजवटीत बांधला गेला असण्याची शक्यता तेथील काही तुरळक अवशेषांवरून दिसते.

मुहम्मद तुघलक याने नुसरतखान याची बीदर सुभ्याचा प्रमुख म्हणून नियुक्ती केली (१३४१). पुढे नुसरतखान व तुघलक यांच्यामध्ये वाद निर्माण होऊन नुसरतखान याने तुघलक सत्तेविरुद्ध बंड पुकारले (१३४५). या सुमारास तुघलक साम्राज्याच्या दक्षिणेकडील दौलताबाद येथे कुतलुघखान हा सुभेदार होता. त्याने जातीने येऊन हे बंड मोडून काढले व नुसरतखान याच्या जागी बीदर व परिसरातील सारा गोळा करण्यासाठी आमीर अली या अधिकाऱ्याची नेमणूक केली. यानंतर काही दिवसांतच आमीर अली याने सुद्धा तुघलक सत्तेविरुद्ध बंड केले. यावेळी परत कुतलुघखान याने बीदर येथे येऊन हे बंड मोडून काढले.

इ. स. १३४७ साली दक्षिणेकडील मुस्लिम सरदारांनी तुघलक सत्तेविरुद्ध बंड पुकारले. यावेळी अल्लाउद्दीन हसन गंगू उर्फ जफरखान या सरदाराने वारंगळच्या राजाच्या मदतीने बीदर शहर व किल्ल्यावर हल्ला चढवला. यावेळी झालेल्या भीषण लढाईत तुघलक सैन्याचा पूर्ण पराभव झाला. या लढाईत मुहम्मद बिन तुघलक याचा जावई इमाद ऊलमुल्क हा मारला गेला. लवकरच पुढे काही दिवसांनी अल्लाउद्दीन हसन गंगू याने दक्षिणेतील तुघलक घराण्याची सत्ता संपुर्णपणे संपुष्टात आणली आणि स्वतःच्या बहमनी साम्राज्याची स्थापना केली (ऑगस्ट १३४७). अल्लाउद्दीन हसन याने आपल्या साम्राज्याचे चार भाग केले व बीदर आणि बाजूचा परिसर यावर आज्जम ई हुमायून याची सुभेदार म्हणून नेमणूक केली. लवकरच बीदर हे शहर बहमनी साम्राज्यातील एक महत्त्वाचे शहर म्हणून प्रसिद्धीस आले. यानंतर पुढची सत्तर ते ऐंशी वर्षे बीदर शहराच्या राजकारणात फार घडामोडी झाल्या नाहीत.

नववा बहमनी सुलतान अहमदशाह बहमनी याचे कारकिर्दीत (१४२२–१४३६) शहराची भरभराट झाली. अल्लाउद्दीन हसन याने बहमनी साम्राज्याची स्थापना केल्यावर त्याने आपल्या साम्राज्याची राजधानी काही काळ दौलताबाद येथे ठेवून नंतर ती दक्षिणेकडील गुलबर्गा या शहरामध्ये हलवली. यानंतर दीर्घकाळ बहमनी साम्राज्याची राजधानी ही गुलबर्गा होती; परंतु बहमनी सुलतान अहमदशाह (नववा) बहमनी याने सुलतान पद स्वीकारल्यावर लवकरच आपल्या साम्राज्याची राजधानी ही गुलबर्गा येथून बीदर येथे हलविण्याचा निर्णय घेतला. १४२५ साली बीदर हे शहर बहमनी साम्राज्याच्या राजधानीचे शहर झाले. या घटनेमुळे दक्षिणेकडील राजकारणात या शहराचे महत्त्व वाढले. या काळात बीदर शहरात आणि किल्ल्यामध्ये अनेक नवीन सुधारणा करण्यात आल्या. गुलबर्गा येथून बीदरला राजधानी करण्याची काही ठळक कारणे होती, त्यांपैकी सर्वांत प्रमुख कारण म्हणजे या शहराचे असलेले भौगोलिक स्थान व तेथील हवामान. अहमदशाह बहमनी याने सत्तेवर येताच बहमनी साम्राज्याच्या पूर्वेकडील वारंगळ राज्याचा बराचसा भाग जिंकून घेतला होता. त्यामुळे बहमनी साम्राज्याची सरहद्द पूर्व दिशेला बरीच वाढली होती. बहमनी साम्राज्यात समाविष्ट झालेले मराठी, कानडी व तेलुगू हे प्रदेश आणि त्याच्या सीमा ध्यानात घेता गुलबर्गा या शहरापेक्षा बीदर हे बहमनी साम्राज्याचे अधिक मध्यवर्ती ठिकाण म्हणून सोयीस्कर होते. हे शहर गुलबर्गा शहरापेक्षा समुद्रसपाटीपासून अधिक उंचीवर असल्यामुळे लष्करीदृष्ट्या अधिक सुरक्षित होते. नैसर्गिक उंचीमुळे येथील हवामान गुलबर्गा शहरापेक्षा अधिक थंड आणि आल्हाददायक होते. याशिवाय गुलबर्गा शहरात बहमनी सुलतानांचे पडलेले खून, कट कारस्थानाचे राजकारण अशी रक्तरंजित इतिहासाची पार्श्वभूमी बीदरला नव्हती. अशा काही प्रमुख कारणांमुळे अहमदशाह बहमनी याने बीदर या शहराची नवी राजधानी म्हणून निवड केली. हा बदल १३२५ साली झाला असावा.

सुलतान अहमदशाह याच्या कारकिर्दीत बीदर हे एक प्रमुख सांस्कृतिक आणि धार्मिक केंद्र म्हणून प्रसिद्धीस आले. या काळात इराणमधून अनेक लोक येथे येऊन स्थायिक झाले. अहमदशाह १४५८ साली मरण पावला. त्यानंतर त्याचा मुलगा अल्लाउद्दीन अहमद हा गादीवर आला. त्याने आपल्या कारकिर्दीत येथे सरकारी खर्चाने एक सार्वजनिक रुग्णालय बांधले. या रुग्णालयामध्ये मुस्लिम तसेच हिंदू वैद्य यांची नेमणूक करण्यात आली. रुग्णालयात रुग्णांवर मोफत उपचार केले जात, तसेच रुग्णालय हे सर्व प्रजेसाठी खुले होते. १४६१ साली बारावा बहमनी सुलतान निजामुद्दीन अहमद हा सत्तेवर आला. हा सुलतान अल्पवयीन होता. ही संधी साधून ओडिशा (ओरिसा) आणि वारंगळ येथील राज्यांनी एकत्र येऊन बहमनी साम्राज्यावर हल्ला चढवला. या दोन्ही राज्यांच्या संयुक्त फौजा बीदर शहराच्या सीमेवर येऊन ठेपल्या. यावेळी बहमनी सरदार महमूद गावान आणि ख्वाजा जहान यांनी शर्थीचा लढा देऊन हे आक्रमण यशस्वीपणे परतवून लावले. या आक्रमणातून शहर सावरेपर्यंत लगेच माळव्याचा सुलतान महमूद खिलजी हा शहरावर चालून आला. त्याने बहमनी फौजाचा पराभव करून शहर जिंकून घेतले. या प्रसंगी बहमनी सरदार महमूद गावान याने अल्पवयीन सुलतान निजामुद्दीन यास बीदरपासून दूर असलेल्या फिरोजाबाद शहरात हलविले आणि गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याची मदत घेऊन माळव्याचे आक्रमण परतवून लावले आणि शहरावर पुन्हा बहमनी सत्ता प्रस्थापित केली.

बीदर येथील मदरसा.

महमूद गावान हा बहमनी साम्राज्याचा अत्यंत कार्यक्षम सरदार होऊन गेला (१४६३–१४८१). त्याने आपल्या कारकिर्दीत बीदर येथे एका प्रचंड मोठा मदरसा बांधला. येथे एकावेळी काही हजार विद्यार्थ्यांना शिकण्याची सोय केलेली होती. या कर्तबगार सरदाराचा बीदरच्या किल्ल्यात खून करण्यात आला.

चौदावा बहमनी सुलतान शिहाबुद्दीन मुहम्मद (कार. १४८२–१५१८) याने बीदरच्या किल्ल्यात काही सुधारणा केल्या. यानंतर आलेले चार बहमनी सुलतान मात्र आपली छाप पाडू शकले नाहीत. हे सुलतान आमीर बरीद या सरदाराच्या हातातील बाहुले बनून राहिले. अमीर बरीद याच्या त्रासाला कंटाळून शेवटचा बहमनी सुलतान कलीमउल्लाह हा बीदर शहरातून पळून गेला. याचा फायदा घेउन अमीर बरीद याने बीदर शहर व किल्ल्यावर आपले पूर्ण नियंत्रण प्रस्थापित केले. पुढे येथे बरीदशाहीचा अंमल सुरू झाला. यानंतर दक्षिणेत बहमनी साम्राज्य पूर्णपणे नष्ट झाले. या साम्राज्याचे विघटन होऊन दक्षिणेत पाच नवीन सत्ता उदयास आल्या.

अमीर बरीद याचे आपला शेजारी विजापूरचा सुलतान इस्माईल आदिलशाह याच्याशी संबंध चांगले नव्हते. बीदर आणि विजापूर या दोन्ही शाह्यांमध्ये सतत युद्ध होत असे. अशाच एका प्रसंगी १५२९ साली इस्माईल आदिलशाह याने बीदरवर आक्रमण करून वेढा दिला. तेव्हा सुलतान अमीर बरीद याने बीदरची सूत्रे स्वतःच्या मुलाच्या हातात देऊन उदगीर किल्ल्याचा आश्रय घेतला. तेव्हा विजापुरी फौजांनी बीदर येथील वेढा अधिक कडक करून उदगीर येथे अमीर बरीदचा पराभव करून त्यास कैद केले (१५२९). पुढे भरपूर खंडणी भरल्यानंतर अमीर बरीद याची सुटका करण्यात आली व बीदर शहर आणि किल्ला पुन्हा अमीर बरीदच्या ताब्यात दिले गेले. अमीर बरीदनंतर त्याचा मुलगा अली बरीदशाह (कार. १५४२–१५८०) याने बीदरची सूत्रे ताब्यात घेतली. अली बरीदशाह याला काव्य, सुलेखन आणि वास्तू शिल्प यांची विशेष आवड होती. त्याने बीदरमध्ये आपल्या हयातीतच स्वतःचे थडगे निर्माण केले. किल्ल्यात रंगीन महाल या अतिशय सुंदर इमारतीची निर्मिती केली. या दोन्ही इमारती अली बरीदशाह याच्या सौंदर्य दृष्टीची साक्ष देतात.

पुढे काही वर्षे येथे फारशा घडामोडी घडल्या नाहीत. १६१९ साली विजापूरचा सुलतान इब्राहिम आदिलशाह (दुसरा) याने बीदरवर आक्रमण करून तेव्हाचा सुलतान आमीर बरीद (दुसरा) याचा पराभव करून बीदरमधील बरीद घराण्याची सत्ता संपुष्टात आणली. पुढे सु. ३८ वर्षे सलग बीदरवर आदिलशाहीचा अंमल होता (१६१९–१६५६). यांपैकी सु. ३० वर्षे बीदरवर मलिक मिरजन नावाचा एक सिद्धी सुभेदार होता. मलिक मिरजन आपल्या कारकिर्दीत बीदर किल्ल्यात संरक्षणाच्या दृष्टीने अनेक सुधारणा केल्या. १६५६ साली दक्षिणेकडील मोगल सुभेदार औरंगजेब याने बीदरला वेढा दिला. यावेळी झालेल्या लढाईत मलिक मिरजन मारला गेला व औरंगजेबाने बीदर जिंकुन घेतले. औरंगजेबाने बीदरचे नाव बदलून झफरबाद असे ठेवले आणि बीदर येथील टांकसाळीत मोगल नाणी पाडण्यास सुरुवात केली (१६५६). पुढे बीदर हे मोगल साम्राज्याचाच एक भाग झाले.

यानंतर बीदरवर इफ्तिकारखान, खान जमान मीर खलीलउल्लाह, मीर शमशुद्दीन मुखतार खान, कलंदर खान, हस्मुद्दीन खान असे अनेक सुभेदार नेमण्यात आले. यांपैकी मीर शमशुद्दीन मुखतार खान याने शहरात अनेक सुधारणा केल्या. येथे त्याने फरहाबाग नावाची मशीद बांधली. हस्मुद्दीन खान याने शहरात एका बागेची तसेच एका मशिदीची निर्मिती केली. त्याच्याच कारकिर्दीत चांदनी चबुतरा ही वास्तू बांधण्यात आली.

पुढे १७२४ साली मोगल दरबारातील वजीर निझाम उल मुल्क याने दिल्लीतील राजकारणाला कंटाळून दक्षिणेची वाट धरली व हैदराबाद येथे स्वतःची सत्ता प्रस्थापित केली. याला मोगल बादशाहने मान्यता देऊन निझाम हा मोगल राजवटीचा दक्षिणेकडील सुभेदार आहे, असे घोषित केले. निझामाचे घराणे हे इतिहासात असफजाही घराणे म्हणून ओळखले जाते. १७२४ पासून ते भारत स्वतंत्र होईपर्यंत बीदर हे शहर या हैदराबाद संस्थानाचा भाग बनून राहिले.

संदर्भ :

  • Yazdani, Gulam, Bidar : It’s History & Monuments, Oxford University Press, London, 1947.
  • कुंटे, भ. ग. गुलशने इब्राहिमी, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, १९८२.
  • कुलकर्णी, गो. त्र्यं. महाराष्ट्राचा इतिहास मध्ययुगीन कालखंड, भाग -१, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, २००१.                                                                                                                                                                                          समीक्षक : अंकुर काणे