महाळुंग हा सदापर्णी वृक्ष रूटेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव सिट्रस मेडिका आहे. लिंबू व बेल या वनस्पतीही रूटेसी कुलातील आहेत. महाळुंग हा वृक्ष मूळचा भारतातील असून भारताच्या पूर्व भागातील वनांत वाढलेला आढळतो. भूमध्य समुद्रालगतच्या प्रदेशात त्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. भारतात हिमालयाच्या पायथ्याजवळील प्रदेशात तसेच महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात हा वृक्ष वाढलेला दिसून येतो.
महाळुंग हा काटेरी वृक्ष २–५ मी. उंच वाढतो. त्याच्या खोडावर अधूनमधून लहान काटे असतात. पाने संयुक्त, एकाआड एक व एकदली असून पर्णिका लांबट, अंडाकृती व दंतुर असतात. पानांवर तेलग्रंथी असून पाने चुरगळल्यावर तेल बाहेर पडून त्यांचा सुगंध दरवळतो. फुले पांढरी किंवा गुलाबी व द्विलिंगी असतात. मृदुफळ पेरूसारखे परंतु त्यापेक्षा मोठे असून १२–१५ सेंमी. लांब असते. त्यावर बारीक खवले असतात. त्याची साल खूप जाड व तेलकट असते. फळाचा रंग प्रथम हिरवा असतो व नंतर पिवळा होतो. त्यातील गर सुगंधी असून चवीला आंबट व कडवट असतो. फळाच्या टोकाला फुगवटा असतो. काही फळांत कधीकधी दोन-तीन फुगवटे दिसून येतात.
महाळुंगाच्या खोडाचे लाकूड टणक असल्यामुळे त्यापासून शेतीची अवजारे बनवितात. फांद्यांपासून काठ्या तयार करतात. उलट्या थांबविण्यासाठी मूळ उगाळून देतात. फळांमध्ये क-जीवनसत्त्व असते. फळांचा उपयोग लोणची, मुरंबे, सरबत व इतर पेये तयार करण्यासाठी होतो. फळाच्या सालींचा उपयोग वातावरणात ताजेपणा आणण्यासाठी केला जातो.