अप् म्हणजे जल. अपां नपात् ही एक वैदिक देवता आहे. या देवतेच्या नावाचा अर्थ ‘जलाचा पुत्र’ असा आहे. यालाच अग्नीचे विद्युतरूप असे सुद्धा म्हणतात. ही अंतरिक्ष स्थानातील देवता आहे. ऋग्वेदातील २.३५ हे सूत्र या देवतेची स्तुती करते. ही एक तेजस्वी आणि दीप्तिमान देवता आहे. कोणत्याही इंधनाशिवाय ही देवता आपले तेज प्रकट करते. असीम तेजाने ही देवता पुष्ट असून या देवतेचा रंग विजेसारखा सुवर्णमयी आहे. घृत हे या देवतेचे खाद्य आहे आणि तिच्याजवळ स्वतःची गाय असून ती उत्तम दुधाचा पुरवठा करते. ‘आशुहेमन’ या विशेषणाचा उल्लेख या देवतेसाठी केला आहे. म्हणूनच या देवतेला अग्नीचे प्रतीक मानले जाते. मेघांच्या आत असलेली वीज असेच या देवतेचे वर्णन येते.

मॅकडॉनलच्या मते अपां नपात् देवतेचे प्रकटीकरण विविध वैदिक देवतांच्या रूपात आढळते. अजएकपाद, अहिर्बुध्न्य आणि सवितृ ही याच देवतेची अन्य रूपे आहेत. अपां नपात् या देवतेला ‘जलाचा गर्भ’ असेही एक विशेषण आहे. ह्या देवतेच्या उत्पत्तीची बीजे इंडो-इराणी काळात सापडतात. अवेस्ता  या पारशी धर्मग्रंथात या देवतेसदृश असुराचे वर्णन आहे. खोल समुद्रात राहणारा, तेजस्वी आणि स्त्रियांनी वेढलेला व वेगवान घोड्यांवर स्वार असलेला असे त्या असुराचे वर्णन आहे. हार्डी या विद्वानाच्या मते अपां नपात् हे चंद्राचे प्रतीक आहे, तर हॅकर्स म्यूलरच्या मते, ही देवता विद्युत किंवा सूर्याचे प्रतीक आहे.

सद्यस्थितीत ही देवता उपासली जात नाही. केवळ ऋग्वैदिक देवता म्हणून तिचे अस्तित्व आहे.

संदर्भ :

  • Macdonell, A. A. Ed. A Vedic Reader for Students, Oxford, 1917.
  • Macdonell, A. A. Vedic Mythology, Strassburg, 1897.
  • उपाध्याय, ब. वैदिक साहित्य और संस्कृती, वाराणसी, १९८९.
  • जोशी, महादेवशास्त्री, संपा. भारतीय संस्कृतिकोश, खंड ३, पुणे, १९९९.

                                                                                                                                        समीक्षक : भाग्यलता पाटस्कर