अश्विनीकुमार : सूर्य, चंद्र, अग्नी, इंद्र, वरुण, वायू इत्यादी ३३ मुख्य देवतांपैकी ऋग्वेदातील एक महत्त्वाची युग्मदेवता. ते कायम परस्परांसोबत राहतात. देवतांचे वैद्य आणि शल्यविशारद या अनुषंगाने वैदिक साहित्यात त्यांचा उल्लेख आहे. शरीरपालन करणे, रोग नष्ट करणे, दीर्घायुष्य प्रदान करणे यांसारखी कामे हे करतात. वेदांतील ५० सूक्ते त्यांवर आहेत. म्हणून त्यांना सूक्तांची देवता म्हणतात. ऐतरेय ब्राह्मणात ‘अश्विनौ वै देवानां भिषजौ’ (१.१८) असा उल्लेख आला आहे. त्यावरून ते देवांचे वैद्य होते, हे स्पष्ट होते. परंतु वेदांत अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्यात त्यांनी मनुष्यांवर चिकित्सा आणि शल्यक्रिया केल्याचे आढळते.

एक पारंपरिक चित्र

अश्विन् या शब्दाची व्युत्पत्ती ‘अश्’ या धातूपासून झाली आहे. निरुक्तात अश्व या शब्दाची व्युत्पत्ती यास्काचार्यांनी पुढील दोन प्रकारे दिली : १) अश्‒(व्यापणे) अश्नुते अध्वनाम्‒जो रस्ता व्यापतो. २) अश्‒खाणे‒तो फार खातो, आणि त्यास ‘णिनि’ प्रत्यय लागून ‘अश्विन्’ हा इन्नत शब्द तयार झाला आहे. तसेच अश्विनौ या शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल निरुक्तात दिले आहे की, जे सर्व जग व्यापतात, दोघांपैकी एक रसाने आणि दुसरा प्रकाशाने व्यापतो. सातवळेकरांनी उल्लेख केल्याप्रमाणे और्णवाभ ऋषींच्या मते त्यांच्याजवळ घोडे असतात (अश्वैरश्विना) म्हणून त्यांना अश्विनौ म्हणतात.

अश्विनीकुमार हे सूर्यपुत्र होत. त्यांची माता सरण्यू. त्यांच्या जन्माची कथा अशी : विवस्वान म्हणजे सूर्य. त्याची पत्नी संज्ञा ही वडवेचे म्हणजे घोडीचे रूप घेऊन फिरत असताना विवस्वानाने तिच्याशी संग केला. त्या वेळी तो परपुरुष आहे, असे समजून तिने त्याचे वीर्य आपल्या नासिकेतून बाहेर सोडले आणि म्हणूनच अश्विनीकुमारांचा जन्म नाकातून झाला. त्यामुळे त्यांना ‘नासत्य’ असेही अभिधान लाभले. अश्विनीकुमारांपैकी ज्येष्ठाचे नाव नासत्य व कनिष्ठाचे नाव दस्र आहे. नासत्य याचा अर्थ कधीही असत्य न बोलणारे. ‘नासिके अश्विनौ’ (श.ब्रा. १२.९.१.१४) म्हणजेच दोन्ही नासपुटे हेच अश्विनौ. यावरून नाकातून संचार करणारे श्वास आणि उच्छ्वास हे अश्विनीकुमारांचेच स्वरूप आहेत, असे मत सातवळेकर यांचे आहे. त्याचप्रमाणे शतपथ ब्राह्मणात अश्विनीकुमारांचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे : पृथ्वी आणि द्युलोक म्हणजे साक्षात त्यांचे स्वरूप आहेत; कारण ते सर्वकाही भक्षण करतात, हे पुष्करमाला धारण करतात, अश्विनीकुमार हे दोन्ही कान आहेत, दोन्ही नाकपुड्या आहेत, दोन्ही डोळे आहेत, ते यज्ञातील अध्वर्यू आहेत, ते गौर वर्णाचे आहेत, ते दोघेही एकाच स्थानातून उत्पन्न झालेले आहेत, ते दोघेही विशेष सुंदर आहेत, त्यांना दोन ताटांतून भोजन दिले जाते, त्यांचा संबंध ग्रीष्म आणि वसंत या दोन ऋतूंशी आहे. तसेच त्यांचे वर्णन द्युलोक व पृथ्वी, दिवस व रात्र, सूर्य व चंद्र असेही आहे. अंधार आणि प्रकाश यांच्या संधिकालाच्या वेळी त्यांची उपासना केली जाते. त्यांपैकी एक विनाशक आणि एक पोषक आहे. म्हणजेच एक रोगाचा विनाश करतो आणि एक रोग्याचे पोषण करतो.

अश्विनीकुमार हे अत्यंत विद्वान वैद्य आणि रोगचिकित्सक आहेत. पुढील अभिधाने आणि विशेषणे त्यांच्या विद्वत्तेचे वर्णन करतात. ‘विद्वांसौ’, ‘विप्रौ’, ‘विचेतसौ’, ‘प्रियमेधौ’, ‘प्रचेतसौ’ या अन्य नामांमुळे त्यांच्या बुद्धिमत्तेची प्रचीती येते.

त्यांच्या निरनिराळ्या वैशिष्ट्यांमुळे त्यांना विविध विशेषणांनी उल्लेखिलेले आहे. ते रोगांचा नाश करणारे म्हणून ‘रिशादासौ’, ‘राक्षो-हणौ’ ही अभिधाने आहेत. तसेच ते सुंदर आणि अजर असल्याने पुढील विशेषणे आहेत. ‘वल्गू’ म्हणजे सुकुमार, ‘रत्नानि विभ्रतौ’ म्हणजे रत्न धारण करणारे, ‘तनूपौ’ म्हणजे शरीराचे पालन करण्यास समर्थ, ‘अश्रान्तौ’ म्हणजे कधीही न थकणारे, ‘अजरौ’ म्हणजे जरारहित, ‘युवानौ’ व ‘अर्वाचीनौ’ म्हणजे कायम तारुण्यात असणारे, ‘अस्त्रिधौ’ म्हणजे शरीरात कोणताही दोष नसणारे, आणि ‘तन्वा शुंभमानौ’ म्हणजे शोभिवंत शरीर असणारे. सारांशरूपाने असे म्हणता येईल की, अत्यंत विद्वान, रोग दूर करण्यात तत्पर, कुशल चिकित्सक, अनुशासनानुसार कार्य करणारे, जनतेचे संरक्षण करणारे व त्यांना सुख प्रदान करणारे आणि मर्त्यांचे रक्षण करणारे म्हणून त्यांचा लौकिक आहे.

मधु हे अश्विनीकुमारांचे आवडते पेय आहे. म्हणूनच त्यांना ‘मधुपौ’ हे विशेषण आहे. तसेच सोमपान करणेही त्यांना आवडते. असुरांचे राज्य मोडण्यासाठी अत्रिऋषींच्या नेतृत्वाखाली चळवळ सुरू होती. त्या वेळी अश्विनीकुमारांनी अत्रिऋषींची शुश्रूषा केली (ऋग्वेद १.११६.८). त्याचप्रमाणे खेलराज या राजाच्या कन्येला म्हणजेच विश्पलेला लोखंडाचा पाय बसवून सक्षम केले (१.११२.१०). त्यांनी च्यवन ऋषींना तारुण्य प्रदान केले (१.११६.१०). च्यवन ऋषींसाठी कायाकल्प प्रयोग त्यांनी केला. कवि नावाच्या ऋषींना त्यांनी दृष्टी दिली (१.११६.१४). त्यांनी दधीची ऋषींना घोड्याचे शिर लावले (१.११६.१२). या संदर्भातली कथा अशी : इंद्राकडून शिकलेली मधुविद्या दधीची ऋषींकडे होती. ती शिकण्याची अश्विनीकुमारांची इच्छा झाली. त्या वेळी त्यांनी दधीची ऋषींच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करून त्यावर घोड्याचे शीर बसविले आणि दधीची ऋषींकडून मधुविद्या प्राप्त केली. तसेच वाल्मिकीरामायणात आणि इतर पुराणांत अहल्येची कथा आली आहे, ती अशी : अहल्या ही गौतम ऋषींची पत्नी होती. गौतम ऋषींच्या ठिकाणी तपस्येमुळे शाप व उ:शाप देण्याचे सामर्थ्य आले होते. गौतम ऋषींचे रूप घेऊन इंद्राने अहल्येशी गैरव्यवहार केला, म्हणून कोपाविष्ट गौतम ऋषींनी दोघांनाही शाप दिले. त्यामुळे इंद्राला शंभर क्षते पडली किंवा त्याचे वृषण गळून पडले व अहल्या शिळा होऊन पडली. ज्या वेळी इंद्राचे वृषण गळून पडले, त्या वेळी इंद्राने अश्विनीकुमारांचा धावा केला आणि त्यांनी इंद्राला मेणाचे वृषण लावून दिले. अशाप्रकारे त्यांनी अनेकांना व्याधिमुक्त व समर्थ केल्याच्या अनेक कथा वेद आणि पुराणांत आहेत.

गुरू-शुक्रांवरून किंवा ध्रुवप्रदेशातील नाक्षत्रप्रकाशावरून ही देवता कल्पिली गेली असावी, अशी आधुनिक मते आहेत.

संदर्भ :

  • Macdonell, A. A. Ed. A Vedic Reader for Students, Oxford, 1917.
  • Macdonell A. A. Vedic Mythology, Strassburg, 1897.
  • Ojha G. C. Ed. Vishveshvarnand Indological Journal, vol. xxxi-xxxii, Hoshirapur, June−Dec, 1993-94.
  • उपाध्याय, ब. वैदिक साहित्य और संस्कृती, वाराणसी, १९८९.
  • करंबेळकर, वि. वा. संस्कृत साहित्याचा सोपपत्तिक इतिहास, नागपूर, १९५४.

                                                                                                                                                             समीक्षक : भाग्यलता पाटस्कर