उषा म्हणजे अरुणोदय. ही प्रातःकाळाची देवता वैदिक साहित्यात आविष्कृत झालेली दिसून येते. ऋग्वेदातील २० सूक्ते उषा देवतेची असून ही सर्व सूक्ते अतिशय आलंकारिक, प्रभावशाली आणि प्रतिभासंपन्न शैलीमध्ये रचलेली आहेत. या देवतेच्या वर्णनप्रसंगी तिचे भौतिक स्वरूप मंत्रद्रष्टारांच्या दृष्टीतून निसटून जात नाही. उषःकाल या नैसर्गिक कालचक्रातील एका घटनेला ऋषींनी विलक्षण दैवी स्वरूप काव्यमय शैलीत दिलेले दिसून येते.

उषस् (उषा) हा शब्द वस्-दीप्तौ = प्रकाशणे या धातूपासून व्युत्पन्न झाला आहे. त्याचप्रमाणे कण्ड्वादी गणातील (एकादश गण) उषस् प्रभातभावे (उषस्यति) या धातूपासूनही ‘उषा’ या शब्दाची व्युत्पत्ती सांगता येते.

ऋग्वेदामध्ये उषा या देवतेचा उल्लेख रेवती, सुभगा, प्रचेता, विश्ववारा, पुराणवती, मधुवती, ऋतावरी, सुम्नावरी, आरुषी:, अमर्त्या, हिरण्यवर्णा, मघोनी इत्यादी विशेषणांनी केला गेला आहे. त्याचप्रमाणे ‘पुराणी युवति:’ (ऋ.४,५१,६) असाही उल्लेख केलेला आढळून येतो. कारण ती प्राचीनतम, आदिम असूनही दररोज नव्या रूपाने प्रकट होते. ती अमरत्वाचे प्रतीक असल्याने तिला अमर्त्या हे विशेषण मिळाले आहे. ती दानशूर या अर्थी मघोनी या विशेषणाने‌ तिचे वर्णन केले आहे. (ऋ. ४.५१.३). त्याचप्रमाणे ती निसर्गनियमांचे यथायोग्य पालन करून वेळेवर प्रकट होते. म्हणून ऋतावरी हे विशेषण तिला सुयोग्य वाटते.

ऋग्वेदातील पुढील सूक्तांमध्ये उषा देवतेचे वर्णन केले आहे (१.३०, १.४८, १.४९, १.९२, १.११३, १.१२३, १.१२४, ३.६१, ४.५१, ४.५२, ५.७९, ५.८०, ६.६४, ६.६५, ७.४१, ७.७५, ७.७६, ७.७७, ७.७८, ७.७९, ७.८०, ७.८१, ८.१०१, १०.१७२).

ऋग्वेदात उषा या देवतेच्या अनुपमेय सौंदर्याचे वर्णन करण्यासाठी मोहक, तरुण नर्तकीचे रूपक योजले आहे. ती एखाद्या लावण्यवती नर्तकीप्रमाणे प्रतिदिनी निरनिराळे वेष धारण करून आपल्या सौंदर्याची प्रचीती अखिल जगाला देते. ज्याप्रमाणे गायी गोठा सोडून जातात, त्याप्रमाणे ती अंधाराचा त्याग करते. ती प्रकाशमय वस्त्रांनी सुशोभित आहे.

ज्या वेळी ती पूर्व क्षितिजावर उदित होते, त्या वेळी ती घोर अंधाराला वस्त्रांप्रमाणे दूर फेकते. आपले प्रकाशकिरणांचे वस्त्र न्हाणाऱ्या युवतीप्रमाणे दूर सारून आपले वक्षस्थळ अनावृत करते आणि सर्वांना आपल्या सौंदर्याने मोहित करते. तिच्या केवळ अस्तित्वाने सारा आसमंत उजळून निघतो आणि अखिल विश्वात हर्ष आणि उत्साह ओतप्रोत सामावून जातो. ती प्रत्येक जीवमात्रास आपापले निहित कार्य करण्यासाठी प्रेरणा देते, त्यांच्यात उत्साह निर्माण करते. तसेच ती अतिशय दानशूर देवता असल्याने ती आपल्या भक्तांना धनधान्य, पुत्र-संतती, समृद्धी आणि आरोग्य प्रदान करते. तिच्या सुवर्णमय रथाचे घोडे तिला आकाशात खेचतात. त्या वेळी पक्षिगण आपल्या मधुर कूजनाने तिचे स्वागत करतात. ती स्वर्गात राहात असल्याने तिला द्युलोकाची कन्या असे म्हटले आहे. त्यामुळे तिला ‘दुहितादिव:’ असेही विशेषण लावले आहे. तसेच ती रात्रीची भगिनी आहे, असे मानले जाते. रात्रीपाठोपाठ तिचा उदय होत असल्याने तिला रात्रीची बहीणही मानले जाते. या दोन भगिनींच्या नावाचा द्वंद्वसमास ‘नक्तोषासा’ किंवा ‘उषासानक्ता’ असा होतो. हिलेब्रांटच्या मते तिचे आणि रात्रीचे नाते भगिनीचे आहे. तसेच त्या दोघी एकमेकींच्या वैरिणी सुद्धा आहेत. ती अंध:काराचा नाश करून उदित होते, अशा प्रतिकात्मक तर्काने हे मत सिद्ध होते.

उषा ही सूर्याची पत्नी आहे. मॅकडॉनलने उल्लेख केल्याप्रमाणे वर-वधूप्रमाणे सूर्य उषेचे अनुगमन करतो. तसेच हिलब्रांटने असे मत प्रतिपादिले की, सूर्याच्याही अगोदर उषा उदित होत असल्याने ती त्याची मातासुद्धा आहे. तसेच अश्विनीकुमारांसोबतही तिचे मैत्रीपूर्ण घनिष्ठ संबंध आहेत. ती त्यांना जागृत करते. त्यामुळे तर त्यांसोबत तिचे मित्रत्वाचे संबंध आहेत. त्याचप्रमाणे ऋग्वेदात अग्नी आणि उषेच्या संदर्भात एक रूपक मांडले आहे, ते असे : प्रज्वलित झालेला अग्नी ऊर्ध्वदिशेने स्वर्गातील उषेला भेटण्याची इच्छा धरतो. ऐतरेय ब्राह्मणातील शुन:शेप आख्यानात यज्ञीयरूपाला बांधलेला शुन:शेप आपल्या मुक्तीसाठी अनेक देवांचा धावा करतो. शेवटी उषेचा धावा केल्यानंतर त्याला बांधलेले पाश गळून पडतात, असा निर्देश आहे (ऐ. ब्रा. ७.३.१६).

अशाप्रकारे युवती रूपातील उषा ही देवता वेदकालीन स्त्रीसौंदर्याचे प्रतीक आहे आणि तत्कालीन सौंदर्य मानदंडाचे प्रतिनिधित्व करणारी आहे. उषा देवतेवरील विविध सूक्तांची शैली अलंकारिक आणि काव्यमय असून मंत्रद्रष्ट्या ऋषींची प्रगल्भ आणि उच्च प्रतिभा प्रतीत करणारी आहे. कालौघात हिची उपासना मागे पडली असून सद्य:कालात ती निसर्गाचा अनुपम आविष्कार आहे, एवढ्यापुरती मर्यादित आहे.

संदर्भ :

  • Haug, M. Trans. Shri Aitereyabrahmanam, Delhi., 2017.
  • Macdonell, A. A. Ed. A Vedic Reader for Students, Oxford, 1917.
  • उपाध्याय, ब. वैदिक साहित्य और संस्कृती, वाराणसी, १९८९.
  • करंबेळकर, वि. वा. संस्कृत साहित्याचा सोपपत्तिक इतिहास, नागपूर, १९५४.
  • जोशी, महादेवशास्त्री, संपा. भारतीय संस्कृतिकोश, खंड १, पुणे, १९९७.

                                                                                                                                                            समीक्षक : भाग्यलता पाटस्कर