दुतोंड्या साप या नावाने सर्वपरिचित असलेला एक बिनविषारी साप. मांडूळ सापाचा समावेश सरीसृप वर्गाच्या बोइडी कुलातील एरिक्स उपकुलात केला जातो. त्याचे शास्त्रीय नाव एरिक्स जॉनाय आहे. अजगर व डुरक्या घोणस अशा बिनविषारी सापांचा समावेश बोइडी कुलात होतो. भारतात मांडूळ सर्वत्र आढळतो. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातदेखील तो दिसून येतो.

मांडूळ (एरिक्स जॉनाय)

मांडुळाचे शरीर अजगरासारखे जाड असून पूर्ण वाढ झाल्यानंतर त्याची लांबी १–१·२ मी. असते. शरीराच्या वरच्या भागाचा रंग गर्द तपकिरी किंवा काळा असतो. पाठीवर पिवळसर रंगाचे ठिपके किंवा पट्टे असतात. काही मांडुळांवर ठिपके किंवा पट्टे नसतात. या सापाची शेपटी बोथट, जाड व आखूड असते. इतर सापांच्या शेपटीला दंडगोलाकार निमुळते टोक असते. मांडुळाची शेपटी आणि डोके प्रथमदर्शनी सारखेच दिसतात. त्यामुळे त्याला दोन तोंडे आहेत असे भासत असल्याने त्याचे नाव दुतोंड्या साप पडले आहे. त्याच्या डोक्यापासून शेपटीपर्यंत पाठीवरील आणि पोटाकडील खवले लहान व एकसारखे असून त्यांच्या कडा षट्‍कोनी असतात. डोक्यावरील खवले मात्र किंचित मोठे असतात. डोळे बारीक असून बाहुल्या उभ्या असतात. मादी ही नरापेक्षा लांब असते.

मांडूळ साप मऊ, भुसभुशीत व वालुकामिश्रित मातीमध्ये किंवा बिळात राहतो. सरडे, उंदीर, घुशी व खारी यांसारखे प्राणी त्याचे भक्ष्य आहे. भक्ष्याभोवती घट्ट विळखे घालून तो प्राण्यावर दाब देऊन त्याला मारून अखंड गिळतो. तो बिनविषारी आणि निरुपद्रवी साप असून मंद गतीने सरपटत पुढे सरकतो. तो स्वत:भोवती वेटोळे घालून डोके जमिनीत खुपसून शेपूट वर ठेवतो व शेपटीची हालचाल करतो.

हिवाळ्यात मांडुळाच्या नर-मादीचे मीलन होते. मादी एका खेपेला ४–१८ पिलांना जन्म देते. पिले तपकिरी रंगाची असून त्यांच्या पाठीवर आणि शेपटीकडे आडवे काळे पट्टे असतात. पिले जसजशी मोठी होतात, तसतसे हे पट्टे हळूहळू नाहीसे होतात. नंतर त्यांच्या पाठीचा रंग काळा होतो.

मांडूळ शेतकऱ्यांचा मित्र आहे. तो उंदीर, घुशी इत्यादी खातो आणि त्यांची संख्या कमी करून शेतीचे उत्पादन वाढण्यास मदत करतो. या सापाविषयी अनेक गैरसमज असल्यामुळे त्यांची अकारण हत्या केली जाते. त्यामुळे त्यांची संख्या कमी होत आहे. १९७२ सालच्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार मांडुळाला संरक्षण देण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा