रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यामधील एक किल्ला. तो वसिष्ठी नदीच्या दक्षिण तीरावरील भूशिरावर वसलेला असून दोन भागांत विभागलेला आहे. खाडीजवळील पडकोट व भूशिरावरील बालेकिल्ला. अंजनवेल गावातून सड्यावर गेल्यावर उत्तरेकडे समुद्राच्या भूशिरावर अंजनवेल उर्फ गोपाळगडची दक्षिणेकडील भक्कम तटबंदी व बुरूज दिसतात.

उत्तरेकडील बुरूज, गोपाळगड.

अंजनवेल गावातून येणाऱ्या वाटेच्या म्हणजेच दक्षिणेकडील तटातून सध्या किल्ल्यात प्रवेश करण्याचा मार्ग आहे. गडाच्या उत्तरेस आणि पूर्वेस असे एकूण दोन दरवाजे आहेत. गावाकडून येणाऱ्या वाटेच्या दिशेला म्हणजेच जमिनीकडील बाजूस खंदक आहे. किल्ल्याच्या आतील जागा खासगी मालकीची असून आत आंब्याची झाडे लावलेली आहेत. या किल्ल्याचा खंदक दक्षिणेच्या तटबंदीजवळ बुजवून व तटबंदी तोडून येण्या-जाण्यासाठी वाट केलेली आहे. गाई, गुरे किल्ल्यात येऊ नयेत, यासाठी नवीन लोखंडी दरवाजा लावलेला आहे. दरवाजाच्या आतील बाजूस देवड्या आहेत. किल्ल्याच्या दरवाजाची कमान कशीबशी तग धरून आहे. दरवाजाच्या कमानीचा जोडदगड (की-स्टोन) पडलेला आहे. दरवाजा हा नेहमीप्रमाणे दोन बुरुजांमधे बांधलेला नसून तटबंदीमध्ये बांधलेला आहे. कमानीच्या बांधणीवरून या दरवाजाची वेळोवेळी दुरुस्ती केलेली असावी. दरवाजावर कोणत्याही प्रकारचे शिल्प नाही. दरवाजातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर आमराई दृष्टीस पडते. प्रवेश केल्यावर डावीकडे तटावर चढण्यासाठी बांधीव पायऱ्या आहेत. तसेच समोरील म्हणजेच नैर्ऋत्येकडील तटबंदीत एक खोली आहे. या खोलीचा कमानयुक्त दरवाजा रेखीव आहे.

पश्चिमेकडील बुरूज, गोपाळगड.

गडाच्या तटबंदीवर एक शिलालेख असल्याची माहिती चिं. ग. गोगटे यांनी त्यांच्या महाराष्ट्र देशातील किल्ले या पुस्तकात दिली आहे. सध्या हा शिलालेख मुंबई येथील छ. शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात (प्रिन्स ऑफ वेल्स म्युझीयम) ठेवलेला आहे. शिलालेख पर्शियन लिपीतील असून त्यात मोगल शासक शाह आलम पहिला याच्या कारकिर्दीत सिद्दी सुरूरच्या आदेशावरून सिद्दी सात याने किल्ला दुरुस्त केल्याचा उल्लेख आहे. त्यातील मजकूर पुढीलप्रमाणे : ‘एखाद्याने नवीन इमारत बांधली व ती बांधत असताना त्याला मृत्युचे बोलावणे आले तर ती इमारत पुढे दुसऱ्याची होत नाही काय, फक्त परमेश्वर अजरामर आहे. बाकी सर्व वस्तू नाशवंत आहेत. अखिल जगदीपक अशा राजांनी हा किल्ला बांधण्याची आज्ञा केली. त्यावरून तो बांधला. परंतु तो पाहण्यास ते जिवंत राहिले नाहीत.’ हा शिलालेख १७०८ मधील आहे.

प्रवेशद्वार, गोपाळगड.

किल्ला डावीकडे म्हणजेच पूर्वेकडे पसरत गेलेला आहे. आत एक बुजलेली विहीर दिसते. दक्षिणेकडील तटाखालून पूर्वेकडे १०० मी. अंतरावर एक बांधीव हौद किंवा तलाव व त्या शेजारी एका वाड्याचे अवशेष दिसतात. हौदामध्ये उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. वाड्याच्या भिंती सुस्थितीत आहेत, पण छप्पर पडलेले आहे. वाड्याच्या इमारतीमागे एक मोठे जोते आहे. या जोत्यावर शेंदूर लावलेला दगड दिसतो. किल्ल्यावर बांधकामाची अनेक जोती दिसून येतात. वाडा व हौदाशेजारून पूर्वेकडे तटबंदीमध्ये पूर्वाभिमुख दरवाजा बांधलेला दिसतो. दोन बुरुजांमध्ये बांधलेल्या या दरवाजाची कमान अर्धवट स्थितीत उभी आहे. दरवाजातील कमानीतील सर्वांत वरचा दगड पडलेला दिसतो. दरवाजाच्या आतील बाजूस देवड्या आहेत. वाडा, बांधीव हौद व पूर्वाभिमुख दरवाजा हे अवशेष पहिल्या दरवाजापेक्षा खालच्या भागात आहेत. पूर्वाभिमुख दरवाजातून पुढे उत्तरेकडे एक यूरोपियन बांधणीचा चौकोनी बुरूज दिसतो. अंजनवेलच्या किल्ल्याला समुद्राजवळ एक पडकोट होता. या पडकोटाचे सध्या फारच थोडे अवशेष असले तरीही एक बुरूज स्पष्ट दिसतो.

तटबंदीतील खोली, गोपाळगड.

गडाचा फारच थोडा भाग हा आदिलशाहीत बांधला गेला. इ. स. १६६० पर्यंत किल्ला विजापूरकरांकडेच होता. छ. शिवाजी महाराजांनी कोकण मोहिमेमध्ये अंजनवेल घेतला असावा. पुढे छ. संभाजी महाराजांनी किल्ल्याची दुरुस्ती करून घेतली.

छ. संभाजी महाराजांनंतर किल्ला १६९९ मध्ये सिद्दी खर्यातखान या हबशाकडे गेला. १७०८ मधे सिद्दी सुरूरखान याने पडकोट बांधला. पडकोटातील शिलालेखावरून ही माहिती मिळते. १७३३ च्या ऑगस्ट महिन्यात पेशवे व आंग्रे यांनी एकत्र येऊन गोवळकोट व गोपाळगड घेण्याचा मनसुबा आखला होता. परंतु १० एप्रिल १७३४ रोजी पेशव्यांचा अधिकारी जिवाजी चिटणीस अंजनवेलला आला. त्या वेळी गोपाळगड घेण्याची तयारी चालू होती. २० जानेवारी १७४५ रोजी छ. शाहू महाराजांनी इंग्रजांना पत्र पाठविले की, तुळाजी आंग्रे यांना अंजनवेल घेण्यासाठी मदत करावी. या पत्रानंतर २३ जानेवारी १७५५ रोजी तुळाजी आंग्रे यांनी अंजनवेलचा किल्ला सिद्दी याकूतखान याच्याकडून रात्री जिंकून घेतला व त्याचे नाव गोपाळगड ठेवले. १७५५ मध्ये गोपाळगड तुळाजी आंग्रेंकडून पेशव्यांकडे आला. पण परत तो आंग्र्यांनी जिंकून घेतला. अखेर पेशव्यांचे सेनापती रामाजी महादेव यांनी आंग्र्यांकडून २४ जानेवारी १७५६ रोजी गोपाळगड जिंकून घेतला.

या किल्ल्याची व किल्ल्याच्या परिसरातील घडामोडींची सविस्तर माहिती अंजनवेलची वहिवाट या मोडी कागदपत्रांत लिहिलेली आहे. ही मोडी कागदपत्रे दत्तो वामन पोतदार यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या त्रैमासिकात मराठीत अनुवाद करून प्रकाशित केली. यामध्ये अंजनवेल उर्फ गोपाळगड परिसर कोणाकडे कोणत्या काळात होता, याबद्दलची माहिती दिलेली आहे; तथापि या बखरीतील तारखा विश्वसनीय नाहीत.

संदर्भ :

  • जोशी, सचिन विद्याधर, रत्नागिरी जिल्ह्याचे दुर्ग वैभव, पुणे, २०१३.
  • पोतदार, द. वा. अंजनवेलची वहिवाट, भारत इतिहास संशोधक मंडळ, त्रैमासिक, पुणे, १९१३.
  • रत्नागिरी आणि सावंतवाडी गॅझेटिअर, बॉम्बे प्रेसिडेन्सी, मुंबई, १८८०.

                                                                                                                                                                                 समीक्षक : जयकुमार पाठक