मानसिक आजार म्हणजे व्यक्तीच्या दैनंदिन जीवनातील बिघाड. मानसिक आजार हे व्यक्तीमधील दैनंदिन मानवी गरजा परिपूर्ण करण्याच्या प्रभावी आणि पारंपरिक क्षमतेमध्ये कमतरता निर्माण करतात. मानसिक आजारी व्यक्ती स्वत:साठी आणि समाजात स्वाभाविक वर्तणूकीसंदर्भात प्रतिसाद देण्याची क्षमता गमावते.
मानसोपचारज्ञांच्या निर्देशानुसार परिचारिका एखाद्या व्यक्तीमध्ये मानसिक आजार होण्याविषयी संभावना लक्षात घेते. उदा., १) जेव्हा त्या व्यक्तीच्या वागण्याने समाजात स्वत:ला किंवा इतरांना त्रास होतो. २) जेव्हा त्या व्यक्तीच्या वागण्याने त्याच्या दैनंदिन नोकरीच्या ठिकाणी आणि कौटुंबिक संबंधात अडचण येते.
जागतिक आरोग्य संघटनेने केलेली व्याख्या : व्यक्तीची स्वत:ची भावना किंवा विचार यांमध्ये बदल होतो किंवा त्याचा त्या व्यक्तीच्या स्वाभाविक वर्तणुकीवर परिणाम होतो आणि ज्यामुळे दैनंदिन कामात अडथळा निर्माण होतो अशा व्यक्तींच्या वर्तणूक व वर्तणुकीसंबंधित आजारास मानसिक आजार असे म्हणतात. (२॰॰१)
मानसोपचारज्ञांच्या व परिचारिकेच्या सल्ल्यानुसार मानसिक आजारांचे गुणधर्म :
- व्यक्तीच्या भावना, विचार, समज, स्मरणशक्ती आणि वर्तणूक यामध्ये झालेला बदल हा समाजातील अपेक्षित निकष व वर्तवणूकीपेक्षा विचलित असल्याचे दिसते.
- व्यक्तींमध्ये झालेले हे बदल त्या व्यक्तीस स्वतःसाठी किंवा समाजात इतरांना त्रास दायक ठरतात.
- व्यक्तीच्या वर्तणुकीत झालेल्या या बदलामुळे व्यक्तीची दैनंदिन कामे व त्या संबंधित महत्त्वाचे आणि व्यावसायिक संबंध यामध्ये अडथळा निर्माण होतो.
मानसिक आजार प्रतिबंधासाठी परिचारिकेची भूमिका : १९६॰ च्या दशकात मानसोपचारज्ञ जेरार्ड केप्लान यांनी मानसिक आजार प्रतिबंधासाठी तीन स्तर दर्शविले आहेत ज्याअंतर्गत परिचारिका मानसिक आजार रोखण्यासाठी महत्त्वाची भूमिका राबवते. ही संकल्पना पुढील आकृतीद्वारे अधिक स्पष्ट होते.
प्राथमिक प्रतिबंध ( Primary Prevention) : व्यक्तीच्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात एकजुटीने आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जगण्याचा प्रयत्न करून मानसिक आजार रोखण्याच्या प्रक्रियेस प्राथमिक प्रतिबंध (primary prevention) म्हणतात.
परिचारिकेची भूमिका : माता, मुले व इतर व्यक्ती यांच्यासाठी :
- गर्भधारणेदरम्यान गरोदर मातेला विशिष्ट औषधांपासून आणि क्ष-किरणांपासून नवजात शिशु वर होणाऱ्या दुष्परिणामांचे परिचारिका शिक्षण देते.
- नवजात बालकांच्या आईला पूर्वपरिपक्वता (prematurity) याबद्दल पूर्वकल्पना देऊन परिचारिका प्रसूतीदरम्यान नवजात बालकांची व आईची काळजी घेते.
- नवजात बालकास प्रसूती दरम्यान होणाऱ्या जंतू संसर्ग व श्वासोच्छ्वासाच्या दुष्परिणामांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी परिचारिका प्रसूती दरम्यान योग्य ती मदत करते.
- नवजात बालकास अंतस्थ ग्रंथींचे आजार असल्यास त्वरित त्या बालकास उच्च उपचार पद्धती मिळण्यासाठी परिचारिका संदर्भ सेवा देण्याचा प्रयत्न करते.
- आशा कर्मचारी व दायी यांच्या मदतीने बाल मार्गदर्शन क्लिनिक मध्ये परिचारिका ग्रामीण विभागातून मानसिक आरोग्य वर्धनाचे शिक्षण देऊन मुलांच्या संगोपनाविषयी माहिती पुरवितात .
- मानसिक व शारीरिक अपंगत्व (जसे अंध, बहिरा, निशब्द इत्यादी) असणाऱ्या रुग्णांकरिता परिचारिका विविध उपक्रम राबवून त्या उपक्रमांची अंमलबजावणी करते.
- शारीरिक व मानसिक अपंगत्व असलेल्या बालकांच्या पालकांना समुपदेशक म्हणून परिचारिका योग्य तो सल्ला पुरविते.
- विद्यार्थ्यांना शाळेमधील भावनात्मक असंतुलन व शैक्षणिक प्रगतीत येणाऱ्या समस्या आणि अडथळे ओळखून परिचारिका त्यावर शाळेतील शिक्षक आणि पालकांच्या सहयोगाने योग्य ती उपाययोजना करते. उदा., मानसोपचारज्ञांचा सल्ला घेते व समस्यांचे समुपदेशकच्या मदतीने निराकरण करते.
- कुटुंबातील सदस्यांना प्रतिकूल परिस्थितीत सामोरे जाण्यासाठी आणि सकारात्मक जीवन शैली स्वीकारण्यासाठी प्रेरणा देण्याचे काम परिचारिका करते.
- परिचारिका ही मानसोपचारज्ञांच्या मदतीने पौगांडवस्थेतील किशोरवयीन मुले आणि सेवानिवृत्त व्यक्तींचे संक्रमण कालीन संकटातून मुक्त होण्यासाठी समुपदेशन करते.
- परिचारिका अतिथी व्याख्यानाद्वारे पालकांना व शालेय शिक्षकांना मुलांची शारीरिक व मानसिक वाढ आणि विकास याबद्दल शिक्षण देते.
- शाळेतील शिक्षकांना मुलांची वर्तणुकीतील समस्येबद्दल सुरुवातीची लक्षणे ओळखण्यासाठी योग्य ते शिक्षण परिचारिका प्रदान करते.
- परिचारिका ही इतर आरोग्य कर्मचारी व संस्थांबरोबर काम करून मानसिक आरोग्य आणि मानसिक सबलता याबद्दल समाजातील लोकांना आरोग्य शिक्षण देते.
- परिचारिका समुपदेशनाद्वारे वैवाहिक दांपत्यास त्यांच्या वैवाहिक जीवनातील समस्यांबद्दल योग्य तो सल्ला आणि संदर्भ सेवा देते.
- परिचारिका लघूचित्रपट शो, फ्लॅशकार्ड व इतर दृक श्राव्य माध्यमांद्वारे समाजात मानसिक आरोग्य जपण्यास प्रोत्साहन देते व सामूहिक आरोग्य शिक्षण कार्यक्रम आयोजित करते.
द्वितीय प्रतिबंध (Secondary Prevention) : मानसिक आरोग्यामध्ये व्यत्यय येणारी लक्षणं, चिन्हे शीघ्रतेणे शोधून त्यावर त्वरित अचूक मानसोपचार करून त्या रुग्णांची कार्यक्षमतेची स्वाभाविक पातळी परत मिळवणे या प्रक्रियेला द्वितीय प्रतिबंध असे म्हणतात.
परिचारिकेची भूमिका :
- मानसिक आजाराचे त्वरित निरीक्षण करून त्या आजाराचा प्रकार शोधण्याचे कार्य परिचारिका करते.
- परिचारिका मानसोपचारज्ञांच्या सल्ल्यानुसार मानसिक रुग्णावर त्वरित व प्रभावी उपचार पद्धती सुरू करते.
- मनोरुग्ण व कुटुंबातील सदस्यांना मानसिक आरोग्य शिक्षण देते.
- परिचारिका समुपदेशक म्हणून रुग्णास योग्य सल्ला पुरवते व संपूर्ण कुटुंबाला संकटातून मुक्त करण्याचा प्रयत्न करते.
- मानसोपचारज्ञांशी संवाद साधून मानसिक- आजार पडताळणी शिबिर राबविण्याचे महत्त्वाचे कार्य गाव, जिल्हा व इतर संस्था याठिकाणी परिचारिका पूर्ण करते.
तृतीय प्रतिबंध पुनर्वसन (Tertiary Prevention Rehabilitation) : मानसिक आजारी असलेल्या रुग्णांना आजाराशी संबंधित अस्वस्थता, मानसिक अपंगत्व व त्याची तीव्रता कमी करण्याच्या प्रक्रियेस व स्वाभाविक मानसिक आरोग्य मिळविण्यास तृतीय प्रतिबंध असे म्हणतात.
परिचारिकेची भूमिका :
- मानसोपचारज्ञांच्या सल्ल्यानुसार व न्यायालयीन नियमांच्या अधीन राहून समाजात वावरत असलेल्या बेवारस मनोरुग्णांचे सामाजिक पुनर्वसन करण्यासाठी परिचारिका मदत करते.
- मनोरुग्णाची मानसिकता प्रबळ करण्यासाठी कुटुंबातील सदस्यांची मदत घेऊन परिचारिका मनोरुग्णाला व्यावसायिक पुनर्वसन व नोकरी शोधून देण्यात मदत करते.
- मानसिक आजारी व्यक्ती रुग्णालयातून रवाना होताना परिचारिका कुटुंबातील सदस्यांचा सहभाग घेऊन समुह उपचार पद्धती राबवण्याचे कार्य करते.
- रुग्णाला समाजाच्या कार्यशील भूमिकेत प्रोत्साहित करण्यासाठी परिचारिका मानसिक आरोग्य संस्था व कुटुंब यांच्याशी संवाद साधून मनोरुग्णाचा पाठपुरावा करते.
- गृहभेट उपक्रमांद्वारे परिचारिका मनोरुग्णाला आवश्यकतेनुसार रुग्णाच्या घरी औषधोपचार नियोजनात मदत करते
- मनोरुग्णाचे पुनर्वसन यशस्वी करण्यासाठी मानसिक आरोग्य सेवा पुरवणाऱ्या संस्थेशी परिचारिका सहयोगात्मक संबंध निर्माण करून एकत्र काम करते.
- रुग्णाची प्रबळ मानसिकता व दीर्घकालीन पुनर्वसनासाठी परिचारिका कुटुंब आणि समाजासोबत काम करते.
पहा : मनोरुग्णाचे पुनर्वसन आणि मनोरुग्ण परिचारिकेची भूमिका.
संदर्भ :
- K Lalitha, Mental Health and Psychiatric Nursing, An Indian Perspectives, 3rd Edition 2010.
- Sreevani, A Guide to Mental Health and Psychiatric Nursing; 4th Edition 2016.
समीक्षक : रोहिदास बिरे