प्रस्तावना : “दोन व्यक्तींमधील असलेली आपुलकी किंवा नाते यालाच संबंध (Relationship) असे म्हटले जाते.” आरोग्य सेवा प्रणालीमध्ये परिचारिका आणि रुग्ण यांचा एकमेकांशी येणारा संबंध हा पूर्णत: व्यावसायिक असतो. रुग्णाला त्याच्या आरोग्याच्या गरजा आणि दैनंदिन जीवनातील विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी परिचारिका मदत करते. परिचारिका आणि रुग्णातील संबंध सामाजिक, जिव्हाळ्याचे किंवा उपचारात्मक प्रकारचे असतात. उपचारात्मक संबंधांत रुग्णाच्या आजारासंदर्भातील सर्व आव्हाने पूर्ण करणे, त्याची आजारपणातून सुटका करणे आणि त्याला आंतरिक संसाणने परत मिळवून देणे या उद्दिष्टाने संपूर्ण वैद्यकीय संघ एकत्र येवून काम करतो. या पद्धतीतील मुख्य घटक जवळीक संबंध (Rapprot), सहानुभूती (Empathy), प्रेमळपणा (Warmth) व प्रामाणिकपणा (Genuineness) हे आहेत.

उपचारात्मक संबंधाचे ध्येय :  रुग्णाच्या सध्याच्या आरोग्य समस्या, त्याला होणारे त्रास, त्याचे नकारात्मक किंवा त्रासदायक विचार इ. जाणून घेऊन; रुग्णाला व त्याच्या नातेवाईकांना रुग्णाच्या आजारातील वास्तविकता समजावून सांगणे, त्या समस्या सोडविण्याकरिता सक्रीय मदत करणे आणि रुग्णाला संवाद साधण्याचे कौशल्य शिकवून समाजाभिमुख बनण्यास प्रोत्साहन देणे हे परिचारिकेचे उपचारात्मक संबंध प्रकारातील मुख्य ध्येय असते.

उपचारात्मक संबंधाचे टप्पे  :  

अ) पूर्व संवाद टप्पा : (Pre-interaction Phase) : रुग्णाशी प्रथम संवाद साधण्यापूर्वी किंवा साधल्यानंतर सुरू होणारा टप्पा म्हणजे पूर्व संवाद टप्पा होय. यात परिचारिकेने स्थिर व आत्मनिर्भर राहून गरजेनुसार आत्मनिरीक्षण करणे आवश्यक असते.

परिचारिकेची भूमिका : पूर्व संवाद टप्प्यामध्ये परिचारिका रुग्णाचा संपूर्ण इतिहास जाणून घेऊन रुग्णाला देण्यात येणाऱ्या उपचारात्मक संबंधाच्या पहिल्या भेटीची योजना तयार करते आणि मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकांना आजाराविषयीची माहिती देते.

पूर्व संवाद टप्प्यामध्ये उद्भवणार्‍या समस्या व त्यावरील उपाय :

 • उपचारात्मक संबंधांमध्ये परिचारिकेला स्वतःचे विश्लेषण व स्वीकृती मध्ये अडचण येते यावर मात करण्यासाठी परिचारिका तिच्या पर्यवेक्षकांकडून मदत घेऊन वास्तविकतेचा सामना करते .
 • परिचारिका तिच्या पर्यवेक्षकांच्या सल्ल्यानुसार प्राथमिक सुसंवाद साधण्याचे लक्ष केंद्रित करून, उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य उपचार पद्धतीचा वापर करते ज्यामुळे परिचारिका कंटाळवाणेपणा, राग, नैराश्य व उदासीनता या समस्यावर मात करते.

आ) प्रस्तावित किंवा सुरुवातीच्या टप्पा : (Introductory or Orientation Phase) : या टप्प्यामध्ये परिचारिका तिचे प्रथम कर्तव्य म्हणून रुग्णाने परिचारिकेची मदत का घेतली हे जाणून घेते. त्यानंतर स्वतःच्या व रुग्णाच्या शुश्रूषा कौशल्याचे निरीक्षण करून स्वतःच्या व रुग्णाच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करते आणि रुग्णाला उपचारासाठी प्रोत्साहन देण्याचे निश्चित करते.

परिचारिकेची भूमिका : या टप्प्यात परिचारिका रुग्णासमवेत सकारात्मक संवाद साधून रुग्णाचा विश्वास व स्वीकृती मिळवते आणि रुग्णाच्या भावना, सामर्थ्य आणि कमकुवतपणा यांविषयीची माहिती गोळा करते. त्याद्वारे रुग्णाच्या समस्या शोधून रुग्णासाठी ध्येय निश्चित करून उपचारात्मक भूमिका पार पाडते.

प्रस्तावित टप्प्यात उद्भवणाऱ्या समस्या व त्यावरील उपाय :

 • परिचारिका आपल्या अनुभव व निदान श्रेणीचा अभ्यास यांद्वारे रुग्णाला केवळ त्याच्या लक्षणांच्या दृष्टीने नव्हे तर मनोविकृती रुग्ण या दृष्टीकोनातून पाहते असते, परिणामी परिचारिका आणि रुग्ण एकमेकांना व्यवस्थित ओळखण्याची किंवा रुग्णाचा असहकार ही मुख्य समस्या या टप्प्यामध्ये निर्माण होते, या समस्येवर मात करण्यासाठी एक सतर्क पर्यवेक्षण गरजेचे असते.
 • परिचारिका आणि रुग्ण यांच्यात सहकार्य प्रस्थापित करण्यासंबंधित समस्या असते यावर मात करण्यासाठी परिचारिका रुग्णसंवाद दरम्यान स्वतःचा समजूतदारपणा, प्रामाणिकपणा आणि भावनांशी प्रामाणिकपणाने संबंध जोडून रुग्णास उपचारात्मक संबंधाबद्दल स्पष्टीकरण देते.

इ) कामकाजाचा किंवा कार्य टप्पा : (Working Phase) : रुग्णाच्या वास्तविक वर्तनात्मक बदलावर या टप्प्यात प्रामुख्याने विचार केला जातो. बरेचसे उपचारात्मक कार्य हे कामकाजाच्या टप्प्यात केले जाते.

परिचारिकेची भूमिका : या टप्प्यात परिचारिका रुग्णाला असलेल्या ताणतणावांचा शोध घेते; त्याच्या आकलनशक्ती, भावना, विचार व कृती यांचे निरीक्षण करते आणि त्याला येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्‍यास मदत करते. परिचारिका रुग्णाच्या एकंदरीत वर्तनबदलाच्या परिणामांचे निरीक्षण करण्यासाठी रुग्णास प्रोत्साहीत करते. त्याला स्वतंत्र आणि स्वावलंबीपणे काम करण्याची संधी देते.

कामकाज टप्प्यात उद्भवणाऱ्या समस्या व त्यावरील उपाय :

 • उपचारादरम्यान रुग्ण बरेचदा नैराश्य अवस्थेत जातो, अशावेळी परिचारिका ही समस्या भावनात्मक रीत्या हाताळते. परिचारिका रुग्णाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेते अणि रुग्णाच्या नकारात्मक वर्तणुकीस भावनांचे प्रतिबिंब आणि स्पष्टीकरण वापरते. यात स्पष्टीकरण हे रुग्णाला काय होत आहे यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास मदत करते, तर भावनांचे प्रतिबिंब याचा विचार केल्यास रुग्णाला स्वतःच्या मनात काय चालले आहे याची जाणीव होते.
 • परिचारिका व रुग्ण जवळीकपणा बद्दल भीती आणि परिचारिकेच्या आयुष्यातील ताणतणाव अशा अनेक कारणांमुळे बहुतेक परिचारिका रुग्णांच्या विशिष्ट नोंदी लिहिण्यास, त्यांचे विश्लेषण करण्यास किंवा नोंदींच्या सामग्री विषयी पर्यवेक्षकांशी चर्चेत भाग घेण्यास तयार नसतात, त्यावर मात करण्यासाठी परिचारिका पर्यवेक्षकाद्वारे रुग्णाला परिचारिकेच्या वर्तणुकीचा अर्थ व परिचारिकेचे कार्य आणि कर्तव्य समजावून सांगते.
 • पर्यवेक्षकांसोबत परिषद आणि इतर कर्मचाऱ्यांशी सामुहिक चर्चेद्वारे येणाऱ्या अडथळ्यांना पार करण्यासाठी परिचारिका उत्तम प्रकारे कार्य करते.

ई) अंतिम व समाप्तीचा टप्पा : ( Termination phase ) : उपचारात्मक परिचारिका- रुग्ण संबंधात हा सर्वात महत्त्वाचा व कठीण टप्पा आहे. ज्यामध्ये परिचारिका आणि रुग्ण नातेसंबंधास  एक उपचारात्मक शेवटास आणण्याचे प्रमुख उद्दिष्ट व कार्य परिचारिका पार पडते.

परिचारिकेची भूमिका :

 • परिचारिका रुग्ण – परिचारिका संबंध विभक्तीचे वास्तव स्थापन करते.
 • रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांसोबत रुग्णाचा उपचारांबद्दल असलेला नकार त्यामुळे होणारा तोटा;  दुःख, राग  या कृतींशी निगडीत रुग्णाचे वर्तन या भावनांची चर्चा करते.
 • परिचारिका उपचारात्मक सत्रांचा व प्रगतीचा आणि उद्दिष्टांच्या प्राप्ती संबंधित पर्यवेक्षकांशी चर्चा करून त्यांचा आढावा घेते आणि भविष्यातील उपचारात्मक गरजा भागविण्यासाठी पुढील सत्रांची योजना तयार करते.

अंतिम टप्प्यात उद्भवणाऱ्या समस्या व त्यावरील उपाय :

 • या टप्प्यात काही रुग्ण शेवटच्या काही संवादात परिचारिकेशी न बोलता त्यांना इजा करण्याचा प्रयत्न करतात व उपचारादरम्यान काहीही बदललेले नसून परस्पर संवाद व रुग्ण-परिचारिका संबंध पूर्वीसारखेच आहेत असे वागून संताप दर्शवतात. या परिस्थितीवर मात करण्यासाठी परिचारिका रुग्णासोबतच्या अंतिम संवादाच्या काही दिवस आधीपासून रुग्णापासून दूर राहते व रुग्णाला संबंध संपुष्टात येण्याचे विचार व भावना उघडपणे स्पष्ट करून सांगते.
 • काही रुग्ण परिचारिका-रुग्ण संबंध संपुष्टात आल्याने निराश होतात किंवा काळजी न घेण्याची प्रवृत्ती गृहीत धरून वाढत्या नुकसानी वर प्रतिक्रिया देतात, परिचारिकेने मधले दोष शोधून उपचाराचे सत्र फायदेशीर नाहीत, परिचारिकेच्या आधी मान्य असलेल्या गोष्टींवर पाठपुरावा करण्यास नकार देतात, या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी परिचारिका सकारात्मक रुग्ण परिचारिका संबंध शक्यता वाढवताना रुग्णाला नुकसान व दुःख सहन करण्याचे कौशल्य शिकवते व रुग्ण परिचारिका संबंध संपुष्टात आणण्याबद्दल रुग्णास स्पष्टीकरण देते.
 • परिचारिका रुग्ण संबंध संपुष्टात येताना आजाराकडे मार्गक्रमण (Flight to illness) उद्भवते आणि रुग्ण अचानक परत लक्षणे दाखविण्यास सुरुवात करतात. परिचारिका रुग्ण संबंध संपुष्टात येणे अयोग्य आहे आणि परिचारिकेची अजूनही आवश्यकता आहे हे दर्शवण्यासाठी रुग्ण स्वतः बद्दल नवीन माहिती सांगतो किंवा आजाराबद्दल अधिक समस्या उघड करतो. कधी कधी रुग्ण आत्महत्या करण्याची धमकीही देतो. या परिस्थितीवर मात करण्यासाठी परिचारिका मानसोपचार तज्‍ज्ञांचा सल्ला घेऊन समुपदेशनाद्वारे रुग्णास परिचारिका-रुग्ण संबंध व त्याची समाप्ती याबद्दल समुपदेशन करते.

परिचारिका रुग्ण संबंध संपुष्टात ठरविण्याचा निकष :

 • उपचारानंतर रुग्णाची सामाजिक स्थिती सुधारलेली असून त्यांचा एकटेपणा कमी झालेला असतो.
 • रुग्णाच्या कार्यक्षमतेत सुधरणा होऊन त्याला त्याच्या अस्मितेची भावना व जाणीव प्राप्त होते.
 • रुग्ण अधिक प्रभावी व आत्मसंरक्षण यंत्रणा (Defense Mechanism) वापरू शकतो.
 • रुग्णाने नियोजित उपचारांचे उद्दिष्ट व ध्येय मिळवलेली असतात.
 • रुग्णाला मानसिक विकारांपासून उद्भवणाऱ्या समस्यांपासून आराम मिळतो.

परिचारिका आणि रुग्ण यांचा उपचारात्मक करार :

 • करार तयार करणे ही परस्पर प्रक्रिया असून यामध्ये परिचारिका आणि रुग्ण यांच्या परिचययानंतर त्यांच्या वैयक्तिक भूमिकांचे स्पष्टीकरण केले जाते. यामध्ये उपचारादरम्यान परिचारिकेच्या व रुग्णाच्या एकमेकांप्रती असणाऱ्या जबाबदाऱ्या स्पष्ट केल्या जातात.
 • परिचारिका ही उपचारात्मक संबंधांचे मार्गदर्शन, गोपनीय माहितीचे संरक्षण आणि व्यवसायिक नियमांचे किंवा सीमांचे पालन करण्यासाठी जबाबदार असते, तर रुग्ण संवाद सत्रास उपस्थित राहून व संवाद साधण्यास परिचारिका व रुग्ण संबंध जपण्यासाठी जबाबदार असतो.
 • कराराच्या तारखा, रुग्ण भेटीच्या वेळा व रुग्ण संमेलनांच्या वेळा, प्रत्येक भेटीचा कालावधी, जेव्हा उपचारात्मक संबंध संपतील तेव्हा त्या प्रक्रियेत कोण व्यक्ती समाविष्ट असतील यावर परिचारिका रुग्णासोबत चर्चा करते. तसेच आत्मविश्वास कायम ठेवून रुग्णांच्या प्रगतीचे निरीक्षण करते व रुग्ण संबंधित कागदपत्रांची नोंद व्यवस्थित ठेवते.

 संदर्भ :

 • K Lalitha, Mental Health and Psychiatric Nursing, An Indian Perspectives, 4th Edition 2011.
 • R Sreevani, A Guide to Mental Health and Psychiatric Nursing, 4th Edition 2016.

समीक्षक : रोहिदास  बिरे