रुग्ण किंवा व्यक्ती ज्याची रोजच्या कामकाजाची क्षमता काही कारणाने किंवा काही आजारामुळे बाधित झालेली असते अशा व्यक्‍तीस त्याच्या सर्वसाधारण कामकाजाच्या अधिकतम व आवश्यक त्या स्तरावर परत आणणाऱ्या सक्षम प्रक्रियेला पुनर्वसन म्हणतात.  मानसिक आरोग्य कार्यक्रमाचा पुनर्वसन हा एक महत्त्वाचा घटक आहे. पुनर्वसनास रोग निवारण प्रतिबंध उपाययोजनेचा ‘तृतीय प्रतिबंध’स्तर असे ( Tertiary Prevention) संबोधिले जाते .

व्याख्या : ” रुग्ण ज्या कार्यात जास्त सक्षम आहे त्या कार्यात जास्तीत जास्त क्षमता  साध्य करण्यासाठीची प्रक्रिया आणि रुग्णाच्या इच्छेनुसार ती प्रदान करण्याची उत्तम सामाजिक भूमिका म्हणजे पुनर्वसन.”

मानसिक आरोग्यामध्ये पुनर्वसन  “सामाजिक भूमिकांमध्ये यशस्वी अनुभव व सहभाग घेऊन मनोरुग्ण व्यक्तीस त्याची क्षमता वापरण्यास, आत्मविश्वास व आत्मसन्मान मिळविण्यास मदत होऊन वैयक्तिक मानसिक आजार, सामाजिक गैरसोय आणि प्रतिकूलता कमी करण्याचा प्रक्रियेस पुनर्वसन असे म्हणतात.”

मानसरोग तज्ञाच्या सल्ल्यानुसार परिचारिकेद्वारे पुढील मानसिक आजारांवर पुनर्वसन प्रदान केले जाते.

 • तीव्र छिन्न मानसिकता (Chronic Schizophrenia)
 • तीव्र चेतना आणि विसरभोळेपणा (Organic Mental Disorder)
 • मानसिक दुर्बलता/ कमकुवतता (Mental retardation)
 • दारू आणि मादक द्रव्यांचे अवलंबन ( Alcohol and Substance Abuse)

मानसरोग तज्ञाच्या सूचनेनुसार मनोरुग्णाचे पुनर्वसन करण्यास परिचारिका पुढील प्रकारे सहाय्य करते :

 • ज्या व्यक्तिमध्ये छिन्न मानसिकता, आमली पदार्थाचे सेवन, इ. मानसिक विकाराचे प्रमाण कमी होत नाही परिणामी अशा व्यक्तींना मानसिक अपंगत्व येते अशा व्यक्तींचे पुनर्वसन करण्यास परिचारिका मदत करते.
 • भारतातील तज्ञ मानसोपचार सेवा टंचाईमुळे व मानसोपचारा अभावी तसेच गंभीर मानसिक आजारी असलेल्या रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे समाजाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. अशा रुग्णांच्या त्वरीत निदानासाठी ( Early Diagnosis) लक्षणांसह संबंधित आणि ते सुधारण्यासाठी परिचारिका मदत करते.

मनोरुग्ण पुनर्वसनाच्या पद्धती : 

 • कौटुंबिक  पुनर्वसन
 • व्यावसायिक पुनर्वसन
 • सामाजिक पुनर्वसन

मनोरुग्ण पुनर्वसनात मनोरुग्ण परिचारिकेची भूमिका 

मनोरुग्ण  परिचर्येमध्ये रुग्ण व सामाजिक व्यवस्था दोन्हींमध्ये पुनर्वसन करणे आवश्यक आहे. यासाठी परिचारिका व्यक्ती, कुटुंब आणि समुदाय या तीन घटकांवर लक्ष केन्द्रित करते.

निरीक्षण :

अ) वैयक्तिक निरीक्षण : समुपदेशक आणि मानसोपचार यांच्या सल्ल्यानुसार परिचारिका मनोरुग्ण व्यक्तीचे उपस्थितीत असलेल्या लक्षणांचे क्षेत्र, सामर्थ्य, परस्पर कौशल्य, स्वाभिमान, औषशोपचाराचे पालन आणि दैनंदिन जीवन जगण्याची क्रिया यांचे निरीक्षण करते.

आ)  कौटुंबिक निरीक्षण : परिचारिका खालील बाबींचे निरीक्षण करते :

 • परिचारिका कुटुंब रचना/कुटुंबाचा प्रकार (एकत्र/विभक्त) कौटुंबिक विकासाचे टप्पे, सदस्यांच्या जबाबदर्‍या, निर्णय, औषध उपचाराचे निकष आणि मूल्ये यांचे निरीक्षण करते.
 • परिचारिका मानसिक आजारी सदस्याकडे कुटुंबाचा बघण्याचा दृष्टीकोण यांचे निरीक्षण करते.
 • मनोरुग्णासाठी कुटुंबातील भावनिक वातावरण व सहकार्य यांचे निरीक्षण करून पुनर्वसनाचे नियोजन करते .
 • परिचारिका कुटुंबातील सदस्यांचा मानसिक आजाराचा पूर्व इतिहास आणि त्यासाठी उपलब्ध असलेला मानसिक आरोग्यसेवा यांचा अभ्यास करते.
 • परिचारिका मनोरुग्णांच्या आरोग्य समस्याबद्दल कुटुंबातील व्यक्तींचा समजूतदारपणा, सहयोग आणि त्या समस्यांचे निराकरण करण्याची पद्धती यांचे निरीक्षण करून पुनर्वसनाचे नियोजन मनोरोग तज्ञ यांच्या सल्ल्याने करण्यास मदत करते.

इ) समुदायाचे / समाजाचे निरीक्षण : समाजातील समुहाचे मानसिक आरोग्य निरीक्षण करण्यामध्ये परिचारिका मदत करते. त्याखेरीज  मानसिक आजारी व्यक्तीस सेवा देणार्‍या संस्था उदा. जिल्हा मानसिक आरोग्यसेवा केंद्र; मानसिक आजाराकडे बघण्याचा दृष्टीकोन, समुदायातील सदस्यांचा सहभाग, इत्यादींचे निरीक्षण करते.

नियोजन आणि अंमलबजावणी : मनोरुग्ण पुनर्वसनात नियोजन आणि अंमलबजावणी द्वारे वैयक्तिक सामर्थ्य वाढवून, मनोरुग्णास स्वावलंबी बनविण्यात परिचारिका मदत करते. या प्रक्रियेमध्ये कामकाजाच्या उर्वरित क्षेत्रांवर मात करण्यासाठी परिचारिका, मनोरुग्ण आणि त्यांचे नातेवाईक  एकत्रित येऊन पुनर्वसनासाठी काम करतात. उदा. शिवणकाम करणे, शोभेच्या वस्तू बनविणे, कागदी किंवा कापडी पिशव्या बनविणे, इत्यादी.

वैयक्तिक  भूमिका (Individual Intervention):-

अ) रुग्णालयातील पुनर्वसन : रुगालयात मनोरुग्णाचे पुनर्वसन करताना परिचारिका रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या सामाजिक आणि दैनंदिन कौशल्याचे प्रशिक्षण, करमणूक व सांघिक उपचार यांचा समावेश करते  .

ब) समाजातील पुनर्वसन : सामाजिक पुनर्वसनामध्ये परिचारिका निवासी/कुटुंबातील देखभाल किंवा दवाखान्यात/डे केअर हॉस्पिटल यासारख्या ठिकाणी मानसिक आरोग्य सेवा प्रदान करते.

क) कौटुंबिक पुनर्वसन / भूमिका :

 • परिचारिका कुटुंबातील सदस्यांना मानसिक रोग प्रक्रिया समजावुन सांगुन मनोरुग्णांसाठी कुटुंबात उपलब्ध असलेले स्रोत (Resources), कौटुंबिक संवाद कौशल्य आणि रुग्णाच्या समस्यांचे निराकारण तंत्र याबद्दलचे आरोग्य शिक्षण देऊन रुग्णाविषयी सकारात्मक दृष्टीकोन तयार करते.
 • परिचारिका कुटुंबातील सदस्यांना मानसिक रुग्णास योग्य ती आरोग्यसेवा पुरविण्यास प्रवृत्त करते.
 • परिचारिका ही बचत गट सदस्यांद्वारे संवाद साधून कुटुंबातीलव्यक्तींनात्यांच्या सहभागासहसमूहउपचारदेण्यासमदतकरते.
 • अनुकूल परिस्थितीत कौटुंबिक रचनात्मक बदल व ताण–तणाव समायोजित करण्यास परिचारिका मदत करते.

सामाजिक / सामुदायिक भूमिका (Community Intervention) :

सामाजिक तृतीय प्रतिबंधात्मक कार्यक्रमामध्ये परिचारिका सहभाग  करू शकणारे बरेच मार्ग आहेत. यामध्ये परिचारिका ही समाजातील विविध गटांना मानसिक आरोग्य विषयी  प्रबोधन करतात. उदा., शालेय शिक्षक, कार्यालयीन कर्मचारी व इतर लोकांना मानसिक आरोग्याबद्दल शिक्षण देते व पुनर्वसन प्रक्रियेत सहभाग असलेल्या इतर आरोग्य सेवकांना मानसिक आरोग्याबद्दल प्रशिक्षण देते.

पुनर्वसनाची तत्त्वे :

 • वाढते स्वातंत्र्य पुनर्वसन हे प्रक्रियेतील पहिले पाऊल आहे.
 • रुग्णांचा सक्रिय सहभाग खूप आवश्यक असतो.
 • कौशल्य विकास आणि उपचारात्मक वातावरण हे यशस्वी पुनर्वसन प्रक्रियेचा मूलभूत घटक आहे.
 • मानसिक रुग्णांच्या कार्यशीलता व त्यातील क्षमता सुधारणा हे प्राथमिक लक्ष्य असते .
 • जास्तीत जास्त विशिष्ट क्षमता वापरणे आवश्यक आहे.

मनोरुग्ण पुनर्वसन पद्धत : 

 • मनोविज्ञान
 • कुटुंबासह काम करत राहणे
 • समुह उपचार
 • सामाजिक कौशल्य प्रशिक्षण

संदर्भ:

• Sharma, Pawan, Essential of Mental Health Nursing Nursing, 1st Edition 2013.

• Sreevani R. A Guide to Mental Health and Psychiatric Nursing, 4th Edition 2016.

समीक्षक : रोहिदास बिरे