स्तनी वर्गातील नरवानर गणाच्या प्लॅटिऱ्हिनी आणि कॅटाऱ्हिनी या श्रेणींत माकडांचा समावेश केला जातो. प्लॅटिऱ्हिनी श्रेणीतील माकडांना ‘नव्या जगातील माकडे’ म्हणतात. ही माकडे पश्चिम गोलार्धातील मध्य व दक्षिण अमेरिका खंडांत आढळतात. कॅटाऱ्हिनी श्रेणीतील माकडांना ‘जुन्या जगातील माकडे’ म्हणतात. ही माकडे पूर्व गोलार्धातील आशिया आणि आफ्रिका खंडांत आढळतात. नरवानर गणात माकडांसमवेत वानर, कपी व मानव यांचाही समावेश होतो.
भारतात माकडांच्या ११ जाती आढळतात. त्यांपैकी सर्कोपिथेसिडी कुलातील माकडाचे शास्त्रीय नाव मॅकाका रेडिएटा आहे. त्याला लाल तोंडाचे माकड किंवा टोपी माकड असे म्हणतात. मॅकाका प्रजातीतील माकडे भारत, चीन, जपान, म्यानमार, मलेशिया इ. देशांत आढळतात. लाल तोंडाची माकडे महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, अहमदनगर, नाशिक, सातारा, सांगली इ. जिल्ह्यांत मोठ्या संख्येने आढळतात. उकिडवे बसले असता या माकडाची उंची ६० सेंमी. असते. शेपटी शरीराच्या लांबीपेक्षा मोठी असते. पूर्ण वाढ झालेल्या नराचे वजन ६–९ किग्रॅ., तर मादीचे वजन ५–८ किग्रॅ. असते. त्यांचा रंग हिवाळ्यात वरच्या बाजूला काळपट भुरा व खालच्या बाजूला मळकट पांढरा असतो, तर उन्हाळ्यात रंग उदी असतो. डोक्यावर काळसर रंगाचे केस असतात. हे केस लांब असून त्यांची ठेवण डोक्यावर एखादी टोपी घातल्यासारखी दिसते. तोंड बरेचसे लालसर रंगाचे असते.
लाल तोंडाची माकडे रानांत व वनांत वानरांबरोबर दिसून येतात. ही माकडे वृक्षवासी असून झाडांची पाने, फळे व मुळे खातात. ही माकडे ज्या झाडांवर राहतात, त्या झाडांखाली बहुधा नीलगायी व हरिणे आढळून येतात. माकडांनी अर्धवट खाल्लेली फळे त्यांच्या खाण्यात असतात. माकडे नेहमी कळपाने राहतात. त्यांच्या एका कळपात ३०–४० माकडे असून त्यांपैकी ७-८ नर, १०–१५ माद्या व बाकीची लहान पिले असतात. कळपाचा प्रमुख एखादा बलवान व दणकट नर असतो. कळपाच्या विशिष्ट जागा आणि मर्यादा ठरलेल्या असतात. तसेच कळपाने कोठे जायचे,हे सुद्धा कळप प्रमुख ठरवतो. माकडे वेगवेगळे आवाज काढून आनंद, राग, भीती व प्रेमभावना व्यक्त करतात.
सामान्यपणे वनांतील माकडे लाजाळू आणि भित्री असतात. मनुष्यवस्तीच्या जवळ येऊन ती धीट बनतात. ज्या ठिकाणी त्यांना खायला मिळेल तेथे ती येतात व खायचे पदार्थ उचलून नेतात. गावातील कौलारू घरांची कौले उचकटणे, अंगणात वाळत घातलेले कपडे पळविणे, फळझाडांवरील फळे तोडून खाली फेकणे, पिकांची नासधूस करणे इत्यादींमुळे माकडे त्रासदायक ठरतात. वाघ व बिबट्या हे माकडांचे शत्रू आहेत. शत्रूची चाहूल लागताच माकडे झाडाच्या शेंड्याकडील फांद्यांवर जातात. माकडे माणसाळली जातात. माणसाने शिकविलेल्या गोष्टी ते चटकन शिकतात. माकडांचा आयु:काल १२–१५ वर्षे असतो.
माकडांमध्ये विणीचा हंगाम ठराविक नसतो.त्यांच्यात वर्षभर प्रजनन होत असते. मादीचा गर्भावधी सु. ६ महिन्यांचा असतो. ती एका खेपेला एका पिलाला जन्म देते. पिलू जन्मल्यानंतर मादीला चिकटून दूध पिते. ते आपल्या हातापायांच्या पंज्यांनी मादीला पकडून ठेवते. त्या वेळी मादीही हातांच्या आणि पायांच्या पंज्यांनी पिलाला घट्ट धरून ठेवते. पिलू थोडे मोठे होऊन रांगायला लागले की, ते मादीच्या पाठीवर बसू लागते. पिलू ४–५ वर्षांत प्रौढ होते.
भारताच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये माकडांची एक वेगळी जाती आढळते. त्यांना सामान्यपणे उत्तरी माकडे म्हणतात. काही वेळा ही माकडे महाराष्ट्रात मुंबई, नाशिक आणि अन्य भागांतही दिसून येतात. उत्तरी माकड लाल तोंडाच्या माकडांपेक्षा वजनाने जास्त असते. त्यांचे शास्त्रीय नाव मॅकाका म्यूलाट्टा असून त्यांना ऱ्हीसस माकड म्हणतात. या माकडांचा कमरेखालचा भाग लालसर असतो. उंदराप्रमाणे या माकडांचा वापर जीवशास्त्रात संशोधन करण्यासाठी केला जातो.
केरळ राज्यातील सायलेंट व्हॅलीमध्ये सिंहपुच्छ माकड आढळते. त्याचे शास्त्रीय नाव मॅकाका सिलेनस आहे. या माकडाच्या दोन्ही गालांवर व कपाळाच्या वरच्या बाजूला (चेहऱ्यावर वर्तुळाकार) करड्या व पांढऱ्या रंगाच्या केसांचे पुष्कळ झुपके असतात. तसेच त्याच्या शेपटीच्या टोकाला सिंहाच्या शेपटीसारखा केसांचा झुबका असतो. त्यामुळे त्याला सिंहपुच्छ माकड म्हणतात. नरामध्ये शेपटीच्या केसांचा झुबका जास्त लांब आणि जाड असतो. ही माकडे विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.