ग्लुकोज हे कर्बोदक वर्गाच्या एकशर्करा (मोनोसॅकॅराइड) गटातील संयुग आहे. याचे रासायनिक सूत्र C6H12O6 आहे. यामधील एक कार्बनाचा अणू आल्डिहाइड (-CHO) या क्रियाशील गटाचा असल्यामुळे त्याचे ‘अल्डोहेक्झोज’ असे वर्गीकरण करतात. यालाच ग्रेप शुगर, कॉर्न शुगर व डेक्स्ट्रोज असेही म्हणतात. निसर्गात ग्लुकोज द्राक्षे, मध व फळे यांमध्ये असते. रक्ताचाही तो घटक आहे. मधुमेह झालेल्या रुग्णांच्या रक्तात त्याचे प्रमाण जास्त असते. ग्लुकोज हा शब्द glukus (गोड) या ग्रीक शब्दावरून आलेला असून ‘ओज’ हा प्रत्यय साखर दर्शवितो.

विवृत रेणू 

ग्लुकोज हा पांढरा आणि C6H12O6.H2O या रूपात स्फटिकमय असलेला स्थायू (घन) पदार्थ आहे. चवीला गोड असलेला हा पदार्थ साखरेपेक्षा कमी गोड आहे. ग्लुकोज पाण्यात विद्राव्य असून द्रावणात त्याचे रेणू विवृत वा वलयांकित असू शकतात. मात्र, स्थायूरूपात त्याचे रेणू वलयांकित असतात. त्याचा वितळबिंदू १४८o ते १५०o से. आहे.

वलयांकित रेणू 

वनस्पतींमध्ये प्रकाशसंश्लेषण क्रियेत तयार होणारे ग्लुकोज हे एक उत्पादित आहे. प्राण्यांमध्ये व कवकांमध्ये ग्लायकोजेनच्या विघटनातून ग्लुकोजची निर्मिती होते; या क्रियेला ‘ग्लायकोजेनोलिसिस’ म्हणतात. तसेच प्राण्यांच्या यकृतात आणि वृक्कातही (मूत्रपिंडातही) पायरुव्हेट आणि ग्लिसरॉल अशा बिगर कर्बोदक पदार्थांपासून ग्लुकोज तयार होत असते; या क्रियेला ग्लुकोनिओजेनेसिस म्हणतात. व्यापारी स्तरावर मका, बटाटा, साबुकंद, रताळी इ. पदार्थांमधील स्टार्चचे जलापघटन करून मोठ्या प्रमाणावर ग्लुकोज तयार करतात.

मानवासह सर्व सजीवांसाठी ग्लुकोज एक इंधनस्रोत आहे. मानवी शरीराला मुख्यत: कर्बोदकांपासून ऑक्सिजन प्रक्रियेद्वारे ऊर्जा मिळते. कर्बोदकांच्या (उदा.,स्टार्चच्या) अपघटनापासून एकशर्करा आणि द्विशर्करा पदार्थांची निर्मिती होते. यात प्रामुख्याने ग्लुकोजचे प्रमाण अधिक असते. ग्लायकोलिसिस आणि नंतरच्या क्रेब्ज चक्र या प्रक्रियांद्वारे ग्लुकोजचे ऑक्सिडीभवन होऊन पाणी, कार्बन डाय-ऑक्साइड आणि ऊर्जा निर्माण होते. ही बहुतांशी ऊर्जा एटीपीच्या (अ‍ॅडेनोसीन ट्रायफॉस्फेटच्या) रूपात साठविली जाते आणि शरीरातील विविध क्रियांसाठी वापरली जाते. इन्शुलिन या संप्रेरकाच्या क्रियेमुळे रक्तातील ग्लुकोजचे नियमन राखले जाते; परंतु इन्शुलिन कमी असल्यास किंवा नसल्यास ग्लुकोजचा वापर होत नाही. परिणामी रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढते व त्यामुळे मधुमेह उद्भवतो. ग्लुकोज हा मेंदूचा एक प्रमुख ऊर्जास्रोत आहे. त्याचे प्रमाण कमी झाल्यास स्वनियंत्रण व निर्णयक्षमता यांसारख्या मानसिक प्रक्रियांसाठी लागणारे मानसिक बळ कमी होऊ शकते. शरीराचे तापमान कायम राखण्यासाठी, स्नायूंच्या हालचाली होण्यासाठी आणि पचनक्रिया व श्वसनक्रिया घडून येण्यासाठी ग्लुकोजपासून ऊर्जा मिळते.

पेशींना ऊर्जास्रोत म्हणून ग्लुकोजचा वापर विनॉक्सिश्वसन वा ऑक्सिश्वसन क्रियांद्वारे होतो. ग्लुकोजच्या विघटनात ग्लायकोलिसिस व क्रेब्ज चक्राद्वारे ऊर्जानिर्मिती होते.

प्रथिनांची निर्मिती आणि लिपीड चयापचयात ग्लुकोज आवश्यक असते. तसेच वनस्पतींमध्ये आणि बहुतांशी प्राण्यांत ते जीवनसत्त्वांच्या निर्मितीत उपयुक्त ठरते. अनेक महत्त्वाच्या पदार्थांच्या निर्मितीसाठी ग्लुकोज वापरले जाते. स्टार्च, सेल्युलोज आणि ग्लायकोजेन ही ग्लुकोजची काही सामान्य बहुवारिके आहेत. दुधातील लॅक्टोज ही गॅलॅक्टोजपासून तयार झालेली द्विशर्करा आहे. सुक्रोज ही फ्रुक्टोजची बनलेली असते.

आहारातील सर्व कर्बोदकांमध्ये प्रामुख्याने ग्लुकोज असते. कधी हे स्टार्च आणि ग्लायकोजेनच्या स्वरूपात असते, तर कधी ते माल्टोज, सुक्रोज आणि लॅक्टोज या स्वरूपात एकशर्करांशी जोडलेले असते. लहान आतडे आणि आद्यांत्र यांच्यात असलेल्या पोकळीत स्वादुपिंड स्रावामुळे आणि आंत्ररसामुळे या पदार्थांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होते. हेच ग्लुकोज शरीराच्या विविध भागांत पोहोचविले जाते. काही प्रमाणातील ग्लुकोज सरळ मेंदूकडे जाते, तर काही यकृत आणि स्नायूंमध्ये ग्लायकोजेनच्या रूपात साठले जाते. ग्लायकोजेन हा शरीरात साठवून ठेवलेला ऊर्जा स्रोत असतो. गरज भासते तेव्हा याच ग्लायकोजेनचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होते.

सामान्य निरोगी माणसाच्या रक्तात दर १०० मिलि.मध्ये ८० ते ११० मिग्रॅ. ग्लुकोज असते. जेवणानंतर ग्लुकोजचे प्रमाण वाढत जाते. एक ते दीड तासात उच्चांक गाठते व दोन तासांनंतर पूर्ववत होते. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये जर ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित नसले, तर ते दोन तासांनंतरही वाढलेले राहते.