रत्नागिरी जिल्ह्यामधील गुहागर तालुक्यातील सागरी किल्ला. हा शास्त्री नदीच्या खाडीच्या मुखावर उत्तर तीरावर जयगड किल्ल्याच्या समोरच्या भूशिरावर समुद्रसपाटीपासून १० मी. उंचीवर आहे. येथील तवसाळ गावातून पडवे गावाकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्यावरून किल्ल्याचा अंदाजे १५ फूट उंच एक बुरूज दिसतो. झाडीतून वाट काढत बुरुजावर पोहोचता येते.

किल्ल्याचे पडकोट आणि भूशिरावरील बालेकिल्ला हे दोन भाग होते. किल्ल्याचा दरवाजा व तटबंदीच्या भिंती नामशेष आहेत, तसेच बुरुजाचा काही भाग व बाहेरील घडीव दगड पडलेले आहेत. किल्ल्यात जुन्या बांधकामाची दोन जोती, तसेच बुजलेल्या दोन विहिरींचे अवशेष आहेत.
किल्ल्याबद्दल फारशी ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही. शास्त्री नदीच्या खाडीतील व्यापारी वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी हा चौकी नाक्याच्या किल्ला बांधला असावा. छ. शिवाजी महाराजांच्या आणि छ. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर किल्ला जंजिरेकर सिद्दीच्या ताब्यात गेला. मराठ्यांनी जंजिरेकर सिद्दी विरुद्ध उघडलेल्या १७३३ च्या मोहिमेमध्ये ३० जून १७३३ रोजी विजयगड सेखोजी आंग्रे यांनी रघुनाथ बाबाजी म्हस्के यांच्याबरोबर एकत्र येऊन जिंकून घेतला. ही लढाई अंदाजे ६ ते ७ दिवस चालू होती. या किल्ल्याचे जास्तीत जास्त उल्लेख आंग्रे काळातच येतात. विजयगड हा किल्ला जयगड बंदराच्या आणि जयगड किल्ल्याच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला असावा.
संदर्भ :
- आवळसकर, शा. वि.आंग्रेकालीन अष्टागर, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे, १९४७.
- जोशी, सचिन विद्याधर,रत्नागिरी जिल्ह्याचे दुर्ग वैभव, पुणे, २०१३.
- पाळंदे, आनंद, डोंगरयात्रा, पुणे, १९९५.
समीक्षक : जयकुमार पाठक
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.