रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाचे ऐतिहासिक बंदर. या बंदरावरच शास्त्री नदीच्या मुखावरील दक्षिण काठावर जयगड किल्ला वसलेला आहे. रत्नागिरीमधून निवळी गावामार्गे डांबरी रस्ता थेट जयगड पोलिस चौकी जवळून किल्ल्याच्या मुख्य दरवाजासमोर येऊन संपतो. मुख्य दरवाजाशेजारी पूर्वेकडे एक छोटा दरवाजा असून ही वाट जयगड बंदराकडे किंवा किल्ल्याच्या पडकोटामध्ये जाते.
मुख्य दरवाजाची कमान उत्तम असून आत देवड्या आहेत. हा दरवाजा आदिलशाही काळात बांधला असल्याचे तेथील स्थापत्यावरून दिसते. दरवाजाची कमान मुस्लीम बनावटीची आहे. दरवाजाच्या कमानीजवळ दोन कमळशिल्प व मधोमध गुलमोहरसदृश्य फुलाचे शिल्प कोरलेले आहे. मुख्य दरवाजावरती म्हणजे मेघडंबरीच्या जागेवर ब्रिटिश काळात दोन मजले बांधून येथे विश्रामगृह बांधलेले होते. सध्या हे मोडकळीस आलेले आहे. मुख्य दरवाजाशेजारी पाण्याचे एक टाके आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर डावीकडे तटबंदीत खोल्या आहेत. समोरच तटाजवळ एका मोठ्या प्रशस्त वाड्याचे जोते आहे. जोत्यामागे तटावर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजवीकडे खूप मोठे मैदान व त्यात अनेक वास्तू दिसून येतात. पुढे उत्तरेकडे एक मोठी तीन मजली वास्तू दिसून येते. या वास्तुमागे एका जोत्याशेजारीच मोठा बांधीव तलाव आहे. तलावाला लागूनच गणेश मंदिर आहे.
मंदिरासमोर दोन दीपमाळा होत्या, त्यांपैकी सध्या एकच सुस्थितीत असून दुसऱ्या दीपमाळेचे अवशेष जवळच विखुरलेले आहेत. गणेश मंदिरासमोर तटबंदीमध्ये जयबाचे स्मारक आहे. मंदिरासमोरील तटावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. मंदिराच्या मागे वायव्येला एका मोठ्या वाड्याची वास्तू आहे. या वाड्याचे दगडातील दरवाजे आजही कसेबसे तग धरून आहेत. एका दरवाजावरील गणेशपट्टी सुस्थितीत असून दुसऱ्या दरवाजाची कमान पडण्याच्या स्थितीत आहे. वाड्याच्या मागील बाजूस ब्रिटिश काळात बांधलेले एक विश्रामगृह आहे. तीन मजली इमारतीच्यामागे व या विश्रामगृहाजवळ दोन विहिरी आहेत. दोन्ही विहिरींत बारमाही पाणी असते. ही इमारत व विश्रामगृह यामधून पुढे उत्तरेकडे किल्ल्याचा दुसरा दरवाजा दिसून येतो. या दरवाजातही देवड्यांच्या जागी लांबच लांब खोल्या बांधलेल्या आहेत. दरवाजातून बाहेर पडताना तीन कमानीतून पायऱ्यांच्या मार्गे बाहेर पडावे लागते. या दरवाजात खूप झाडे वाढली असल्यामुळे दरवाजावरील द्वारशिल्प आहेत का नाही, हे निश्चित दिसू शकत नाही. दरवाजाच्या जवळील तटबंदीत खोल्या बांधलेल्या आहेत. तटबंदीवर एक नवीन बांधकाम केलेली खोली/मनोरा आहे. गडाच्या उत्तरेला तटबंदीवर दोन मजली बुरूज आहे. तटबंदीतून या बुरुजात प्रवेश करण्यासाठी दोन दिंडी दरवाजे आहेत.
गडाचे मुख्य दोन भाग म्हणजे बालेकिल्ला व पडकोट. मुख्य किल्ल्याला १४ बुरूज व पडकोटाला १० बुरूज आहेत. पूर्वेकडील तटाजवळ अखंड दगडात घडवलेले अंदाजे २० फूट उंचीचे तीन स्तंभ दिसून येतात. बालेकिल्ल्याच्या पूर्वेकडील तटावरून हे स्तंभ दिसू शकत नाहीत; कारण या भागात खूप उंच झाडे वाढलेली आहेत. या स्तंभाजवळील कातळकड्यात ‘मोहमायी’ या स्थानिक देवतेचे मंदिर आहे.
गडावरील कमानयुक्त असलेल्या दरवाजातून एक मोठी वाट जयगडाच्या पडकोटात जाते. याच वाटेवर बुरुजावर त्रिकोणाकृती भागात तटबंदीचे अवशेष आहेत. पडकोटामध्ये खाडीजवळ दहा बुरूज बांधलेले आहेत. बालेकिल्ल्यापासून पडकोटात जाताना मोठा उतार आहे. सध्या पडकोटात जयगड गाव वसलेले असल्यामुळे पडकोटातील बुरुजांच्या व्यतिरिक्त इतर अवशेष दिसू शकत नाहीत.
किल्ल्याच्या बांधकामाच्या पद्धतीवरून जयगड हा किल्ला विजापूरकरांनी बांधला असावा असे वाटते. इ. स. १५७८-८० च्या दरम्यान जयगड संगमेश्वर येथील नाईकांनी आदिलशहाकडून जिंकून घेतला. त्यानंतर किल्ला घेण्याचे विजापूरकरांनी अनेक प्रयत्न केले; पण त्यांना तो कधीच घेता आला नाही. मराठ्यांकडे किल्ला केव्हा आला, याबद्दल निश्चित माहिती मिळत नाही; तथापि जयगडच्या बालेकिल्ल्याचे बांधकाम छ. शिवाजी महाराजांच्या काळात झाले, असे काही अभ्यासकांचे मत आहे. १६९५ मध्ये हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्याकडे होता. सातारचे छ. शाहू महाराज व कान्होजी आंग्रे यांच्यात झालेल्या चर्चेमध्ये बाळाजी विश्वनाथ भट यांनी कान्होजींना छ. शाहू महाराजांच्या पक्षात आणले. छ. शाहू महाराजांनी कान्होजीचे १० किल्ले व स्वतःकडील ६ असे १६ किल्ले व सरखेल हा किताब कान्होजी आंग्रे यांना बहाल केला. शेवटपर्यंत हा किल्ला आंग्रेंकडेच राहिला. कान्होजी आंग्रे यांनी इ.स. १७२४ मध्ये जयगड बांधला असा उल्लेख आंग्रे शकावलीत येतो, पण तो सुसंगत वाटत नाही. कान्होजी आंग्रे यांच्या काळात गडाची दुरुस्ती झाली असावी. सेखोजी आंग्रे यांच्या दिनांक १५ सप्टेंबर १७२९ च्या पत्रव्यवहारात जयगडच्या किल्लेदाराचा उल्लेख येतो. १७३३ ची मराठ्यांची सिद्दी विरुद्ध जंजिरा मोहीम ज्या एका हत्तीच्या वादामुळे झाली, तो सिद्दीचा हत्ती आंग्रेंच्या संगमेश्वर येथील चौकीवर अडवला होता आणि पुढे तो हत्ती काही काळ जयगड किल्ल्यामध्ये आणून ठेवला होता. ९ एप्रिल १७३४ रोजी संभाजी आंग्रे विजयदुर्ग किल्ल्यावरून जयगडावर आल्याची माहिती मिळते. पुढे १८१८ मध्ये कोणतीही लढाई न होता किल्ला इंग्रजांनी घेतला.
संदर्भ :
- गोगटे चिं. ग. महाराष्ट्र देशातील किल्ले (भाग – २), पुणे, १९०५.
- जोशी, शं. ना. कुलाबकर आंग्रे शकावली, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे, १९३९.
- जोशी, सचिन विद्याधर, दुर्गजिज्ञासा, पुणे, २०१३.
समीक्षक : जयकुमार पाठक