महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध डोंगरी किल्ला. हा वाई तालुक्यात वाई शहरापासून वायव्येस सु. २८ किमी. अंतरावर, तर पुण्याहून सु. ८० किमी. अंतरावर आहे. गडाची समुद्रसपाटीपासूनची उंची १३०२ मी. आहे. हा गड केळंजा तसेच घेराकेळंज या नावाने सुद्धा ओळखला जातो.

केंजळगड, वाई, जि.सातारा.

कोर्ले (ता. भोर, जि. पुणे) हे गडाच्या पायथ्याचे गाव असून ते गडाच्या उत्तर बाजूस आहे. केंजळगड हा किल्ला रायरेश्वर डोंगरच्या मुख्य डोंगररांगेला एका छोट्या खिंडीने जोडला गेला आहे. कोर्ले गावातून या खिंडीकडे एक दृष्टिक्षेप टाकल्यास केंजळगड हा डावीकडे, तर रायरेश्वर उजवीकडे दिसून येते. कोर्ले गावातून गाडी रस्ता या खिंडीत येतो व पुढे वाई तालुक्यात उतरतो.

सातारा शहरातून केंजळगडला येण्यासाठी वाई, खावली मार्गे खिंडीत पोहोचावे लागते. खावली हे गाव केंजळगडाच्या दक्षिणेकडील बाजूस असून हा गडाजवळ येण्याचा दुसरा गाडीमार्ग आहे.

रायरेश्वर-केंजळगड खिंडीतून केंजळगडच्या दिशेने एक कच्चा रस्ता जातो. या रस्त्याने पुढे काही अंतरावर केंजळमाता मंदिर व ८-१० घरांची वस्ती दिसते. याला केंजळमाची असे म्हणतात. केंजळमाचीतून एक छोटी पाऊलवाट गर्दझाडीतून आपल्याला गडाच्या पहिल्या उद्ध्वस्त दरवाजात घेऊन जाते. केंजळमाची ते गडाचा पहिला दरवाजा ही चढण खडी असून हे अंतर पार करण्यास अंदाजे २० ते ३० मिनिटे लागतात. गडाच्या पहिल्या दरवाजाची सांप्रत एकच बाजू शाबूत असून बाकी दरवाजाचे अवशेष आजूबाजूला पडलेले आहेत. दरवाजाला लागून असलेल्या देवडीच्या ठळक खुणा अद्यापि शाबूत आहेत. या दरवाजाच्या पूढे गेल्यावर एक मानवनिर्मित गुहा आणि पाण्याचे टाके लागते. टाक्याच्या बाजूस काही दगडी बांधकामाचे अवशेष दिसतात. यानंतर गडावर जाण्यासाठी अखंड कातळात खोदून काढलेल्या ५५ पायऱ्या असलेला एक जिनाच आहे. या खोदीव पायऱ्या हे केंजळगडाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. सदर पायऱ्या या अतिशय प्रशस्त आणि रुंद आहेत. या पायऱ्या चढून गेल्यावर गडाचा पार अवशेष रूपात शिल्लक असलेला दुसरा दरवाजा लागतो. सदर दरवाजाच्या उंबऱ्याचे काही अवशेष शिल्लक आहेत. या दरवाजातून मुख्य गडावर प्रवेश होतो.

पाण्याचे टाके, केंजळगड.

केंजळगड हा पूर्व-पश्चिम पसरलेला असून याचा विस्तार कमी आहे. गडाच्या माथ्यावर पाण्याचा एक छोटा तलाव दिसून येतो. गडाच्या मध्यावर पूर्वी असलेल्या जुन्या मंदिराचे अवशेष व त्यातील काही मूर्ती आढळून येतात. हे गडावरील केळंजाई देवीचे मंदिर आहे. याच्या मागील बाजूस एक चुन्याचा घाणा आहे. पुढे काही अंतरावर गडावरील कोठार सदृश्य इमारत दिसते. ही वास्तू दगड आणि विटा मिळून बांधलेली छोटी खोली आहे. सांप्रत यावरील छप्पर अस्तित्वात नाही. एकंदरीत बांधकामावरून ही इमारत उत्तर पेशवेकालीन असण्याची शक्यता आहे. गडावर पाण्याचे दोन तलाव असून खोदीव टाकी देखील आहेत. गडावर थोडेफार तटबंदीचे अवशेष आढळून येतात. सदर तटबंदीच्या भिंतींत ठिकठिकाणी जंग्या दिसून येतात. गडावर उत्तर-पश्चिम बाजूस आणखी एक चुन्याचा घाणा आहे. त्याच्या जवळ काही इमारतींचे चौथऱ्यांचे अवशेष दिसून येतात.

काही ऐतिहासिक कागदपत्रांत वाईजवळ मनमोहनगड नावाच्या एका किल्ल्याचा उल्लेख येतो, तो हाच केंजळगड असावा, असे काही इतिहास अभ्यासकांचे मत आहे.

केंजळगडाचा इतिहास हा सोळाव्या शतकापासून ज्ञात आहे. सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात केंजळगडावर अनुक्रमे निझामशाही आणि आदिलशाही यांची सत्ता होती; परंतु पुढे निझामशाहीचा अस्त झाल्यावर (१६३६) हा किल्ला प्रदीर्घ काळ आदिलशाहीच्या ताब्यात होता. १६६३ साली वाई येथील आदिलशाही कारकुनाला केंजळगडाला मदत करण्याविषयी एक नोंद सापडते. पुढे १६७४ साली मराठ्यांनी केंजळगडावर हल्ला करून हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला. या लढाईत आदिलशाही किल्लेदार मारला गेला. १८१८ साली केंजळगड इतर अनेक किल्ल्यांप्रमाणे इंग्रजांच्या ताब्यात गेला.

संदर्भ :

  • अक्कलकोट, सतीश, दुर्ग, सह्याद्री दुर्गभ्रमण मंडळ, सांगली, २००९.
  • पाळंदे, आनंद, डोंगरयात्रा, प्रफुल्लता प्रकाशन, पुणे, २००५.                                                                                                                                                                                        समीक्षक : अंकुर काणे