लेव्हिनास, इमॅन्यूएल : (१२ जानेवारी १९०५—२५ डिसेंबर १९९५). फ्रेंच तत्त्वज्ञ. त्याचा जन्म लिथ्युएनियातील एका मध्यमवर्गीय ज्यू कुटुंबात झाला. लिथ्युएनिया तेव्हा रशियाचा भाग असल्याने लेव्हिनासचे प्राथमिक शिक्षण रशियन भाषेत झाले. १९०५ साली ज्यूंना तेथून घालविल्यामुळे त्याचे कुटुंब युक्रेनला स्थायिक झाले व १९२० मध्ये ते लिथ्युएनियास परतले. १९२३ मध्ये फ्रान्समधील स्ट्रॅसबर्ग विद्यापीठात त्याची भेट सहाध्यायी मॉरिस ब्लँचोटशी झाली व त्यांची मैत्री कायम राहिली. हुसर्ल-बेर्गसाँ अभ्यासण्यासाठी १९२८-२९ दरम्यान तो जर्मनीतील फ्रेसबर्गला गेला व हुसर्ल तेथून निवृत्त होण्यापूर्वी त्याच्या अखेरच्या सत्रातील अभ्यासक्रमास त्याने प्रवेश घेतला व त्याच्या जागी रुजू होणाऱ्या हायडेगरशीही त्यामुळे परिचय झाला. १९२९ मध्ये लेव्हिनासने दाओस येथे झालेली सुप्रसिद्ध ‘हायडेगर-कासीरर चर्चा’ ऐकली. १९३० मध्ये त्याचा हुसर्लवरील लघुप्रबंध प्रसिद्ध झाला. पॅरिसमधील एका खाजगी ज्यू शाळेत तो शिकवू लागला व त्याचा सार्त्र, मार्सेल आदी नामवंत तत्त्वज्ञांशी परिचय झाला. १९३१ मध्ये हुसर्लच्या कार्टेशिअन मेडिटेशन्स या ग्रंथाचे फ्रेंच भाषांतर प्रसिद्ध झाले. १९३२ मध्ये लेव्हिनास बालपणापासून परिचित असणाऱ्या रैसाल लेव्हीशी विवाहबद्ध झाला. १९३५ मध्ये त्याच्या मुलीचा जन्म झाला. फ्रेंच नागरिक या नात्याने दुसऱ्या महायुद्धात त्याने रशियन-जर्मन भाषांतरकार म्हणून कार्य केले. तत्पूर्वी १९३४ मध्ये त्याचे हिटलरवादाचे तात्त्विक ऊहापोह करणारे लेखन प्रसिद्ध झाले. १९४० पासून ते युद्ध संपेपर्यंत (१९४५) तो उत्तर जर्मनीत आपले ज्यूत्व लपवून युद्धकैदी म्हणून राहिला. पत्नी व मुलगी फ्रान्समध्ये लपून वाचल्या. बाकी कुटुंब मात्र जगू शकले नाही. त्यामुळे तो यथावकाश पती-पत्नी मुलीसह फ्रान्समध्ये एकत्र नांदू लागला. पुढे दोन अपत्ये झाली. मुलगी तान्ही असतानाच वारली; पण तिच्यानंतर १९४९ मध्ये झालेला मुलगा मायकेल वाचला. पुन्हा लेव्हिनास पॅरिसमधील त्याच खाजगी शाळेत रुजू झाला. कालांतराने निर्देशकही झाला. पुन्हा ज्यू परंपरेचे मुळापासून अध्ययन त्याने सुरू केले. १९६१ मध्ये पॉयटायर्स विद्यापीठात तो रुजू झाला. त्याच वर्षी टोटॅलिटी अँड इन्फिनिटी हे त्याचे पुस्तक प्रसिद्ध झाले.

१९६७ मध्ये पॅरिस विद्यापीठाच्या उपकेंद्रात लेव्हिनास प्राध्यापक म्हणून रुजू झाला. नंतर १९७३ मध्ये रिकर, ल्योटाई यांसमवेत सॉर्बोन विद्यापीठात प्राध्यापकपदी त्याची नेमणूक झाली. १९८० मध्ये त्याची भेट पोप जॉन पॉल (दुसरे) यांच्याशी झाली व १९८३, १९८५ च्या त्यांच्या उन्हाळी वर्गातही लेव्हिनास सहभागी झाला.

१९८९ मध्ये लेव्हिनासला अद्वितीय शैक्षणिक व मानवतावादी कार्यासाठी बाल्झन पारितोषिक मिळाले. १९८४ मध्ये त्याच्या पत्नीचे पॅरिसला निधन झाले. हुसर्ल, हायडेगर, सार्त्र, बूबर, मार्सेल यांच्या विचारधारांशी नाते सांगणारे तत्त्वज्ञान लेव्हिनासने मांडले आहे. ‘अन्य’ (The Other) ह्या संकल्पनेला त्यांनी अशा प्रकारे वळविले की, त्यामुळे अस्तित्ववाद सकारात्मक झाला. ‘अन्य’ नेहमी संघर्षात्मक असतो असे नाही. अन्याशी संवाद साधता येतो, सौहार्दपूर्ण नाते शक्य असते, नातेसंबंधातील ताणतणाव अपरिहार्य नसतो, असा विश्वास त्याच्या लेखनांद्वारा व्यक्त होतो.

एरवी ज्ञानमीमांसा, वस्तुमीमांसा, नीतिमीमांसा, तर्कमीमांसा, ईश्वरमीमांसा तत्त्वज्ञानाचा कणा मानल्या जातात. लेव्हिनासने ते स्थान ‘एथिक्स’ला दिले आहे. मात्र त्याची ‘एथिक्स’ची कल्पना निराळी आहे. एरवी ‘एथिक्स’ म्हणजे नीतिशास्त्र किंवा नीतिमीमांसा यात नैतिक प्रश्नांची साधकबाधक चर्चा केली जाते. तशी चर्चा लेव्हिनासला अभिप्रेत नाही, तर संवाद, सुसंवाद त्यास अभिप्रेत आहे. ‘एथिक्स’ला त्याने ‘फर्स्ट फिलॉसफी’ म्हणजे ‘आद्य तत्त्वज्ञान’ म्हटले आहे. म्हणून त्याची ‘एथिक्स’ची संकल्पना समजून घेणे महत्त्वाचे आहे. ‘एथिक्स’मध्ये इतरांचे असणे त्यांच्या व्यक्तिवैशिष्ट्यांसकट समाविष्ट असते; केंद्रस्थानी असते. प्रत्यक्ष भेटीस ते कमालीचे महत्त्व देतात. ‘Face to Face Encounter’ मुळे दुसऱ्यांपर्यंत पोहोचणे, त्यांना समजून घेणे शक्य होते (अन्यथा संबंध तणावपूर्ण होतात किंवा दुरावतात). अर्थात, भेटीचा विपर्यास झाला नाही व उभयतांनी भेटीतील गांभीर्य राखले, तरच ‘एथिक्स’ शक्य असते. कधी इतरांबाबतचे वास्तव रोजच्या धकाधकीत दडपले जाते. संबंधितांच्या व्यक्तिवैशिष्ट्यांचा लोप होतो. परस्परांच्या स्वतंत्र बाण्याची, अस्तित्वाची, व्यक्तित्वाची कदर करत, आत्मप्रतिष्ठा राखत समोरासमोर संवाद झाला तर आंतरविषयीभाव (Intersubjectivity) शक्य होतो.

माणसामाणसांत संप्रेषण (Communication) साधले जाते. मानवी अनुभवांचे केवळ वर्णन न करता त्यांचे विविध अन्वयार्थ शोधून जाणिवांवर प्रकाशझोत टाकण्याचे कार्य लेव्हिनासने १९६० पासून केले. त्यामुळे हायडेगर, सार्त्रप्रणित अस्तित्ववादास नवे परिमाण मिळाले. आपले इतरांशी होणारे व्यवहार सौहार्दपूर्ण असू शकतात; सच्चे मैत्रीपूर्ण संबंध अशक्य नसतात, असा सकारात्मक आयाम त्याने दिला, म्हणून त्याचे योगदान महत्त्वाचे आहे.

‘Gaze’ किंवा रोखलेल्या नजरेचे सार्त्रप्रणित विश्लेषण लेव्हिनासला मान्य नाही. केवळ तार्किक किंवा मानसशास्त्रीय पद्धतीने रोखलेल्या नजरेचा विचार न करता तो ‘संपूर्ण चेहरा’ अधोरेखित करतो. चेहऱ्यात मानवी अस्तित्वाचे सार असते, असे मानतो. मग समोरच्याला समजून घेताना जी अनंत दालने खुली होतात, त्यामुळे आपल्याला ‘इन्फिनिटी’ म्हणजे असीमतेचे भान येते.

अस्तित्ववाद अंतर्वेधास प्राधान्य देतो, तर लेव्हिनास म्हणतात ‘Being is Exteriority’ म्हणे अस्तित्व बाह्यात्मक आहे. समोरील अगणित शक्यता, अन्वयार्थ कळले की, अस्तित्व बाह्यात्मक कसे ते लक्षात येते. माझे अस्तित्व माझ्या दृष्टीने सान्त, परिमित, ठरावीक, बंदिस्त असते; पण समोरील व्यक्तीला अपरिमित आयाम असतात, हे कळले की, माझ्या वर्तुळापलीकडील बाह्य जग दिसू लागते. मग मी व ते जग यांना सामावून घेणाऱ्या समग्रतेची जाणीव होते, हा लेव्हिनासच्या टोटॅलिटी अँड इन्फिनिटीचा मथितार्थ होय. त्यामुळे परस्परातील दुजाभाव, अंतर, दुरावा कमी होतो. वर्चस्व, हुकमत, हिंसाभाव राहात नाही. दोघांचे ऊन्नयन होते. त्यामुळे अस्तित्वास अर्थ प्राप्त होतो. समाजशास्र, मानसशास्र, शरीरशास्र अशा दृष्टिकोनातून मानवी अस्तित्वाकडे पाहात नाहीत. असा हा विस्मयकारक दृष्टिकोन अंगीकारत लेव्हिनास अस्तित्वापलीकडील असीम प्रांतात प्लेटोच्या ‘आयडिआ ऑफ गुड’चा अर्थ लागतो, असे म्हणतात. रूढार्थाने आपण ज्या ईश्वरी अस्तित्वाबद्दल बोलतो, त्याच्या पलीकडील हा प्रांत असतो. एकूणच ज्ञाता-ज्ञान किंवा विषयी-विषय किंवा ‘नोएमा-नोएसिस’च्या पलीकडे जाणे येथे अभिप्रेत आहे. मात्र अशा वेळी आकलनाच्या चाळणीतून जे राहते, ते चेहऱ्यावर उमटते. प्रत्येक क्षणी चेहरा नवनवीन दिशा सूचवितो. म्हणून तत्त्वज्ञानास ‘शहाणपणा’ म्हणणे लेव्हिनासला पटत नाही. त्याच्या मते समोरील चेहऱ्याकडे पाहून आपण शहाणपणा प्राप्त करतो व समोरच्याला आपल्या चेहऱ्यामार्फत तो पुरवितो. एकंदरीत, शहाणपणा किंवा विजडम (Wisdom) काही पोतडीत साठविलेला नसतो.

असंगती (Absurdity) ह्या अस्तित्ववादी संज्ञेचा वापर लेव्हिनास अभिनव रीतीने करतो. असंगती किंवा निरर्थकता मुळात संहितेत नसते. लेखकाने लेखनकार्य पूर्ण केले की, ती संहिता त्याची राहात नाही व कोणाच्या हाती जाऊन पुढे कोणता अन्वयार्थ तिला मिळेल, हे माहीत नसल्याने जी संदिग्धता उत्पन्न होते, त्या संदिग्धतेस व याबाबत असणाऱ्या नामरहिततेस (Anonymity) लेव्हिनास ‘ॲब्सर्ड’ म्हणतो. तसेच राजकारणात, राज्यांच्या इतिहासात व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाची दखल न घेता एकाच्या जागी दुसऱ्याला बसविले जाते, हे लेव्हिनासला असंगत, निरर्थक वाटते. आपण जो वारसा सोडतो, त्याचे मोल होण्यात न्याय आहे, असे त्याचे म्हणणे आहे.

‘अमेरिकन इन्स्टिट्यूट फॉर लेव्हिनासिअन स्टडिज’ ही संस्था लेव्हिनासच्या तत्त्व प्रसारासाठी २००६ पासून कटिबद्ध आहे. मात्र कोणताही तत्त्वविचार पोथीनिष्ठ, शुष्क, बंदिस्त, यंत्रवत न राखता प्रवाहित्व जाणून त्याचा अंगीकार केला पाहिजे, हा विचार लेव्हिनासने अधोरेखित केला व त्याचे स्मरण ठेवून संस्था कार्यरत आहे. मुळात २००० साली बेनी लेव्ही व अन्य दोघांनी जेरुसलेमला संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे लेव्हिनासची विपुल ग्रंथसंपदा सहजपणे उपलब्ध होते.

संदर्भ :

  • Hand, Sean, The Levinas Reader : Emmanuel Levinas, Oxford, 1989.
  • Lingis, Alphonso, Trans. Collected Philosophical Papers of Emmanuel Levinas, The Hague, 1987.
  • Paperzak, Adriaan; Critchley, Simon; Bernasconi, Robert, Eds. Emmanuel Levinas : Basic Philosophical Writings, Bloomington, 1996.
  • वीरकर, शर्मिला, ‘सांगड-न्याय व नैतिकतेची’, लोकसत्ता, २२ जानेवारी, २००५.
  • https://plato.stanford.edu/entries/levinas/
  • https://guides.library.duq.edu/levinas

                                                                                                                                                                        समीक्षक : हर्षा बाडकर