रत्नागिरी जिल्ह्याच्या मुख्यालयात रत्नागिरी बंदराजवळ असलेला किल्ला. या किल्ल्याचे तीन प्रमुख भाग आहेत. महादरवाजा (पूर्व), दीपगृह (दक्षिण) आणि भगवती मंदिर (पश्चिम).
तीन बाजूंनी डोंगररांग आणि चौथ्या बाजूला म्हणजेच उत्तरेला खाली बंदर अशी एकूण किल्ल्याची रचना आहे. डोंगर रांगेवर पूर्ण तटबंदी बांधून किल्ला मजबूत केलेला होता. रत्नागिरी शहरातून किल्ला पेठ भागात जाताना किल्ल्याची तटबंदी खिंडीजवळ पार करावी लागते. तटबंदी पार करून डांबरी रस्ता डोंगर रांगेच्या खळग्यात वसलेल्या किल्ला पेठ भागात जातो. या खिंडीतच उजवीकडे तटबंदीमध्ये पूर्वेला किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. पहिला दरवाजा कमानयुक्त असून बऱ्या अवस्थेत आहे. हा दरवाजा झाडांनी झाकलेला असून दरवाजाशेजारीच एक बुरूज आहे. दरवाजाची कमान व चौकट उत्तम स्थितीत असली, तरीही झाडांमुळे दरवाजा नीट दिसत नाही. दुसरा दरवाजा दक्षिणाभिमुख असून त्यावर कोणतेही शिल्पकाम दिसत नाही. पहिल्या दरवाजापासून पुढे १० मी. उंचीवर गडाचा दुसरा दरवाजा आहे. गडाचा हा महादरवाजा पूर्वाभिमुख असून त्यावर कोणतेही शिल्पकाम नाही. पण आधुनिक प्रकारे सिमेंट वापरून चंद्र व सूर्य कोरलेले दिसतात. दरवाजाच्या आतील बाजूस देवड्या नाहीत. दरवाजाला आतील बाजूस उजवीकडे हनुमान मंदिर असून डावीकडे सैनिकांसाठी अलंगा म्हणजे खोल्या बांधलेल्या आहेत. हनुमान गडाचा महादरवाजा आहे. या दोन दरवाजांतून पूर्वी किल्ल्यात प्रवेश केला जात असे. सध्या येथे सहज पोहोचण्यासाठी खिंड पार करून डांबरी रस्ता सोडून उजवीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याने किल्ल्याच्या महादरवाजापर्यंत जाता येते. हनुमान मंदिराशेजारी पाण्याची दोन टाकी आहेत. या टाक्यांच्या बाजूने जांभ्या दगडातील बांधकाम करून त्यांना उंची दिलेली दिसते. टाक्यांशेजारून उत्तरेकडे किल्ल्याची तटबंदी लांबवर पसरलेली आहे. या तटबंदीमध्येच एके ठिकाणी कोनाडा दिसतो. पुढे गेल्यावर तटबंदीला लागूनच एक घुमटीसदृश्य बांधकाम केलेली छोटी खोली दिसते. ही तटबंदी उत्तरेला अंदाजे अर्धा किमी. लांबपर्यंत पसरलेली आहे. तटबंदीवर चढण्यासाठी तीन ठिकाणी पायऱ्या बांधलेल्या आहेत. तटबंदीची रुंदी अंदाजे ८ ते १० फूट आहे. तटबंदीतील एका बुरजामधून आत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. येथे खाली एक मोठे विहीरसदृश्य बांधकाम तटाला लागून दिसते. त्या विहिरीतदेखील एक दरवाजा आहे. हे बांधकाम नेमके काय आहे, याची माहिती मिळत नाही. तटबंदी रत्नागिरी ते भगवती मंदिर रस्त्यावरील खिंडीपासून सुरू होते. या तटबंदीत एकूण ८ बुरूज आहेत. किल्ल्याची पुनर्बांधणी केल्याचे दिसून येते.
रत्नदुर्ग किल्ल्याचा दुसरा भाग म्हणजे दीपगृह परिसर. खिंडीतील डांबरी रस्त्याच्या डावीकडे म्हणजेच दक्षिणेला तटबंदी दीपगृहापर्यंत पसरलेली दिसते. मुख्य डांबरी रत्यापासूनच दक्षिणेकडे डांबरी रस्ता थेट तटबंदी जवळून दीपगृहाच्या दारात जातो. खिंडी जवळच तटबंदीमध्ये दाट झाडीत एक उत्तम कमानयुक्त दरवाजा असून दरवाजावर कोणतेही शिल्पकाम नाही. जुनी वाट या दरवाजातून गडाच्या दक्षिणेकडील बुरुजापर्यंत जात होती. सध्या हा दरवाजा दाट झाडीत झाकला गेला आहे. या भागात देखील तटबंदी अंदाजे एक ते सव्वा किमी. पसरलेली आहे. दीपगृहाकडे जात असताना डावीकडे तटबंदीतील जंग्या व उजवीकडे काही अंतरावर बांधकामाची जोती पसरलेली दिसतात. तटबंदीवरून देखील चालत जाता येते. तटावरून पूर्वेला रत्नागिरी शहर व दक्षिणेला समुद्र दिसतो. किल्ल्याचा उतार पूर्वेला जेथे समुद्राला मिळतो, तेथे एक बुरूज बांधलेला दिसतो. दीपगृह परिसराला तारेचे कुंपण घालून आधुनिक पद्धतीचा दरवाजा केलेला आहे. पूर्व परवानगीशिवाय दीपगृह परिसरात जाता येत नाही. दीपगृहाजवळ एक मोठा बुरूज आहे. दीपस्तंभाशेजारी चार तोफा ठेवलेल्या आहेत. त्यांपैकी दोन तोफा ४ फूट लांबीच्या, तर दोन तोफा अंदाजे १२ फूट लांबीच्या आहेत. खिंडीपासून दीपगृहापर्यंत दक्षिणेला सात बुरूज व भक्कम तटबंदी आहे.
गडाचा तिसरा आणि महत्त्वाचा भाग म्हणजे भगवती मंदिर परिसर. गडाच्या या भागाला बालेकिल्ला असेही संबोधले जाते. या भागात भक्कम नुतनीकरण केलेली तटबंदी असून त्यामधे अकरा बुरूज बांधलेले आहेत. हा परिसर समुद्रापासून साधारणतः २०० फूट उंच आहे. भगवती मंदिराच्या परिसरापर्यंत गाडी रस्ता आहे. रस्त्यावरून पायऱ्यांच्या वाटेने गडाच्या दरवाजाजवळ जाता येते. दरवाजाशेजारी एक बुरूज आहे. दरवाजाची दुरुस्ती केल्यामुळे तो नवीन पद्धतीने बांधल्याचे दिसते, पण चौकट मात्र जुनीच आहे. दरवाजावर दोन फुलांचे शिल्प कोरलेले आहे. सध्या दरवाजाला पांढरा रंग लावल्याने ही कमळशिल्प नीट दिसत नाहीत. दरवाजातून आत गडामध्ये प्रवेश होतो. दरवाजा सकाळी ८ वाजता उघडण्यात येतो व संध्या. ६ वाजता बंद होतो. येथील भव्य असे भगवती मंदिर ही गडावरील सर्वांत मोठी वास्तू आहे. मंदिर परिसरात कर्मचाऱ्यांची घरे व कचेऱ्या आहेत. १९८९ साली मंदिराच्या ट्रस्टने भगवती मंदिराचा जीर्णोद्धार केला. भगवती मंदिराशेजारी उत्तरेला तीन भुयारी मार्ग आहेत. या भुयारी मार्गाच्या बाजूने सिमेंटचे बांधकाम करून त्यांचे नुतनीकरण केले आहे. सध्या ही सर्व तथाकथित भुयारे पूर्णपणे बुजलेली आहेत.
रत्नागिरीचा किल्ला बहमनी काळात बांधला गेला. पुढे विजापूरकरांकडे तो १६६० पर्यंत होता, अशी माहिती मिळते; पण ती पुराव्यांना धरून नाही. किल्ल्याचा काही भाग विजापूरकरांनी बांधला असावा. किल्ल्याची बांधणी ही वेगवेगळ्या काळात तसेच टप्प्याटप्प्याने झाली असावी. छ. शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याची दुरुस्ती झाली असावी व काही भाग आंग्रे काळात बांधला असावा. १६७० च्या सुमारास कोकणातील अनेक किल्ले छ. शिवाजी महाराजांनी स्वराज्यात आणले. यामध्ये रत्नदुर्ग देखील स्वराज्यात आला असावा. ज्या बुरजावर दीपगृह बांधले आहे, त्या बुरुजाला सिद्ध (सिद्द) बुरूज असे म्हणतात. याचे नाव सिद्दी बुरूज आहे. कारण विजयदुर्गच्या धुळुपांशी झालेल्या लढाईमधे एक सिद्दी सरदार या बुरुजावर मारला गेला. १७१० ते १७५५ या काळामधे रत्नदुर्ग हा आंग्र्यांकडे होता. १७५५ नंतर किल्ला पेशव्यांकडे आला. १७९० साली धोंडो भास्कर प्रतिनिधी यांनी किल्ल्यांच्यी डागडुजी केली, अशी एक कथा सांगितली जाते. १९५० मध्ये भगवती मंदिराची दुरुस्ती झाली व १९८९ मध्ये पुन्हा एकदा किल्ल्याची डागडुजी करण्यात आली.
संदर्भ :
- गोगटे, चिं. ग. महाराष्ट्र देशातील किल्ले (भाग – २), पुणे, १९०५.
- जोशी, शं. ना. आंग्रे शकावली, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे,१९३९.
- जोशी, सचिन विद्याधर, दुर्गजिज्ञासा, पुणे, २०१३.
- ढबू, दा. गो. कुलाबकर आंग्रे सरखेल, मुंबई, १९३९.
- रत्नागिरी आणि सावंतवाडी गॅझेटिअर, मुंबई, १८८०.
समीक्षक : जयकुमार पाठक