सातारच्या गादीचे पहिले संस्थापक छ. शाहू महाराज (१६८२–१७४९) यांचा सातारा किल्ल्यावरील विजय मराठी राज्यात शनिवारची नौबत म्हणून प्रसिद्ध आहे.
छ. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर शाहू, येसूबाई यांना औरंजेबाच्या नजरकैदेत राहावे लागले. पुढे औरंजेबाच्या मृत्यूनंतर शाहूंची मोगलांच्या कैदेतून सुटका करण्यात आली. शाहू महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांना अनेक मराठे सरदार येऊन मिळाले; तथापि महाराणी ताराबाईंनी त्यांना विरोध केला. नगर मुक्कामी राहून शाहूंनी आपला जम बसविला आणि ताराबाईंच्या फौजा चालून येतात असे कळताच शाहूंनी नगरहून पुढे खेडवर मुक्काम केला (सप्टेंबर १७०७). नदीपलीकडे कडूस येथे धनाजी जाधव, परशुराम त्रिंबक इ. ताराबाईंचे सरदार लढाईस सज्ज होते. १२ ऑक्टोबरच्या सुमारास खेड येथे लढाई होऊन शाहूंनी सातारा घेतले. खेडच्या लढाई पूर्वी त्यांनी ताराबाईंच्या पक्षातील लोकांची मने आपल्या बाजूस वळविण्याचे काम केले होते. खेडच्या लढाईचा रंग ओळखून परशुरामपंत प्रतिनिधींनी चाकणला मुक्काम करून पुन्हा लढण्याचा निर्णय केला. पण प्रतिनिधींचे लोक लढण्यास पुढे येत नव्हते. हे पाहून प्रतिनिधी लगेच साताऱ्यास जाऊन सातारा किल्ला बळकावून युद्धास उभे राहिले.
खेड येथील विजयानंतर छ. शाहू महाराजांनी पुढची रणनीती आखली. आळंदी, तुळापुरावरून ते पुण्यास आले. तेथून सुपे, जेजुरी या गावावरून शिरवळ येथे आले. त्यानंतर चंदन-वंदन किल्ल्याजवळ दाखल झाले. अगोदरच तेथील हवालदारांना त्यांनी पत्रे पाठविली होती, ते येऊन भेटले. त्यांचा सन्मान करून किल्ले घेतले. तेथून लगेच सातारा हवाली करण्याची पत्रे त्यांनी प्रतिनिधींस पाठविली. सातारा लढवण्याची जबाबदारी ताराबाईंनी प्रतिनिधींवर सोपवून त्या मुलासह पन्हाळ्याकडे निघून गेल्या होत्या.
वाईचा शेख मिरा हा सातारा किल्ल्याचा हवालदार होता. महाराजांनी त्याला किल्ला स्वाधीन करण्यास सांगितले, पण त्याने मान्य केले नाही. त्याची मुले-माणसे वाईहून पकडून आणून त्यांना तोफेने उडवून देऊ, अशी भीती महाराजांनी घातली. त्यानंतर शेख मिरा याने प्रतिनिधींना साताऱ्याचा किल्ला महाराजांच्या हवाली करण्यास सांगितले; मात्र ते प्रतिनिधींनी मान्य केले नाही. यापूर्वीही औरंगजेबाने साताऱ्याच्या किल्ला घेण्यास बरीच मेहनत घेतली होती व त्यावेळेस देखील परशुरामपंतच गडावर होते.
शाहू महाराज पाच हजार फौजेनिशी जातीने किल्ल्यावर गेले. शाहू महाराजांनी किल्ला आठ दिवसात घेण्याचा संकल्प केला होता. अखेर शेख मिरा याने प्रतिनिधींस पकडून किल्ला महाराजांच्या हवाली केला. महाराजांनी किल्ला आठ दिवसांत ताब्यात घेण्याचा संकल्प सिद्धीस नेला. फत्तेची नौबत तेथेच वाजवली. त्या दिवसांपासून मराठ्यांच्या राज्यात शनिवारची नौबत वाजत होती.
संदर्भ :
- ओक, वामन दाजी, नागपूरकर भोसल्यांची बखर, पुणे, २०१६.
- मेहेंदळे, वामन परशराम, परशुराम त्र्यंबक प्रतिनिधी यांचे चरित्र, पुणे, १९१७.
- सरदेसाई, गो. स. मराठी रियासत खंड ३, मुंबई, २०१०. समीक्षक : मंदार लवाटे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.