बीरबल : (१५२८–१५८६). अकबराच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक व अकबराचा विश्वासू मित्र. त्याचे मूळचे नाव महेशदास. त्याचा जन्म उत्तर प्रदेशातील कानपूरपासून ७८ किमी. अंतरावर असलेल्या काल्पी या गावात एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्याच्या आजोबांचे नाव रूपंधर, तर वडिलांचे नाव गंगादास असे होते. बीरबलच्या वडिलांचे नाव एका महत्त्वाच्या शिलालेखावरून समजते. चक्रवर्ती राजा सम्राट अशोक याने भारतात जे स्तंभ उभारले, त्यांपैकी एक स्तंभ सध्या अलाहाबाद किल्ल्यामध्ये आहे. त्याच्यावर बीरबलने एक शिलालेख कोरलेला आहे, तो पुढीलप्रमाणे : संवत १६३२ शके १४६३ मार्ग वदी पंचमी सोमवार गंगादास सूत महाराजा बिरबर श्री तीर्थराज प्रयाग के यात्रा सफल लेखितम।

बीरबल महाल, फतेपूर सीक्री (उत्तर प्रदेश).

बीरबल हा गंगादास यांचा तिसरा मुलगा. त्याच्या आईने त्याला माहेरी वडिलांकडे शिकण्यासाठी ठेवले होते. विद्यार्थिदशेतच त्याने हिंदी, संस्कृत व फार्सी या भाषा आत्मसात केल्या. काव्यरचना आणि गायन यांचेही त्याने शिक्षण घेतले. पुढे त्याने रेवा संस्थानचा राजा रामचंद्र (कार. १५५५–९२) याच्याकडे व नंतर अंबर येथील दरबारात काही काळ नोकरी केली. या संपूर्ण काळात बीरबल हा ब्रह्मकवी या नावाने प्रसिद्ध होता. याच काळामध्ये बीरबल याचे कालिंजर येथील एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या मुलीशी लग्न झाले. पुढे मोगल सम्राट अकबर (१५४२–१६०५) याने रेवा संस्थानातील कालिंजर किल्ला व आसपासचा काही प्रदेश काबीज केल्यानंतर रामचंद्रने अकबराचे मांडलिकत्व मान्य केले (१५७०). तेव्हा बीरबल आणि अकबर यांचा संबंध आला. डूंगरपूरच्या राजाच्या मुलीबरोबर झालेल्या अकबराच्या लग्नात बीरबलाने मध्यस्थी केली होती. तबाकत-इ-नासिरी  या ग्रंथानुसार त्याला ‘वीरवरʼ (चांगला योद्धा) ही पदवी अकबराच्या दरबारात दिली गेली, तिचाच पुढे अपभ्रंश बीरबल असा झाला असावा, असे म्हणतात. बीरबलाने आपल्या बुद्धीच्या जोरावर अकबराच्या दरबारात स्थान मिळविले. अकबराने आपल्या दरबारातील श्रेष्ठ गायक तानसेन आणि बीरबल यांच्यात गाण्याची जुगलबंदीही केली होती. बीरबलाची बुद्धिमत्ता, विनोदबुद्धी आणि हजरजबाबीपणा यांमुळे अकबराची त्याच्यावर विशेष मर्जी होती.

बीरबल कवी, प्रशासक आणि संगीतज्ञ असल्याने त्याने अनेक कविता व दोहे केलेले होते. त्याचा बीरबलनामा  हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्याच्या काव्यनैपुण्यामुळे त्यास १५७३ मध्ये ‘कविरायʼ हा किताब देण्यात आला. अकबराच्या दरबारात हा एकमेव हिंदू माणूस होता की, ज्याचे सल्ले अकबर ऐकत असे. अकबराने त्याला कांग्रा जिल्ह्यातील नागरकोट हे गाव जहागीर म्हणून दिले. त्यानंतर अकबराने सुभेदारीची वस्त्रे, राजा हा किताब, कालिंजर येथील जहागिरी आणि दोन हजारची मनसबदारी दिली. १५७४ च्या पाटण्याच्या स्वारीत बीरबल अकबराबरोबर होता. बीरबलाच्या कामावर खूश होऊन १५८३ साली अकबराने त्याची न्यायखात्यावर नेमणूक केली. न्यायखात्यामध्ये आलेले अर्ज दाखल करून त्यांची छाननी करणे आणि न्याय मागण्यासाठी आलेल्या लोकांना अकबराच्या दरबारात न्यायासाठी उभे करणे, हे बीरबलाचे काम होते. तसेच काही महत्त्वाचे जिन्नस खरेदी-विक्री करणे हे काम देखील त्याच्याकडे सोपविले होते. बऱ्याचदा वकील म्हणून अनेक हिंदू राजे, तसेच इराणच्या बादशाहकडे तो गेला होता.

अकबराने स्थापन केलेल्या दिन-ए-इलाही या धर्माचा बीरबल हा एकमेव हिंदू अनुयायी होता. बीरबल स्वतः सूर्योपासक होता. अकबर आणि बीरबल यांचे जेवढे संदर्भ आहेत त्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी हेच आढळून येते की, अकबराला सूर्योपासनेकडे बीरबलाने वळविले. अकबर सर्व धर्मगुरूंशी चर्चा करायला बसत असे, तेव्हा बीरबल तेथे हजर असे. अकबराचे राहणीमान बदलण्यास आणि त्याचे विचार हिंदू धर्मासाठी अनुकूल करण्यात बीरबलाचा महत्त्वाचा वाटा होता.

दरबारातील बीरबलाच्या वर्चस्वामुळे अनेक मुसलमान सरदार त्याचा द्वेष करीत. अकबराने १५८६ मध्ये स्वात आणि बाजौर येथील डोंगराळ प्रदेशांत राहणाऱ्या यूसुफझाई टोळ्यांविरुद्ध मोहीम उघडली. या मोहिमेवर आधीच झैनखान कोका आणि सैदखान हे होतेच. मोहिमेसाठी अकबराने आपला खासगी चिटणीस अबुल फज्ल (१५५१–१६०२) आणि बीरबल यांच्यात दरबारामध्ये चिठ्ठ्या टाकून बीरबलाची निवड केली. अकबराने झैनखानच्या हाताखाली आणखी सैन्य पाठवायचे ठरवून त्याचे आधिपत्य बीरबलला दिले (२२ जानेवारी १५८६). दानिषकोलच्या वाटेने झैनखान बाजौर येथे शिरला आणि तेथील ताबा घेऊन स्वातच्या दिशेने निघाला. स्वातमध्ये ४०,००० टोळीवाले राहात होते. स्वात नदीच्या पलीकडे चकदरा येथे झैनखानने एक किल्ला बांधला. झैनखान याला बीरबल आणि हकीम अब्दुल फतेह येऊन मिळाले. अटक येथून ते पेशावर आणि तेथून स्वात नदीच्या जवळ असलेल्या समाहा पठाराच्या उत्तरेकडे जाण्यास निघाले. या दरम्यान बीरबल आणि हकीम अब्दुल फतेह यांच्यामध्ये भांडण सुरू झाले. अखेर चकदऱ्याच्या किल्ल्यामध्ये एकत्र बसून भांडणे सोडवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिंकून घेतलेल्या भागाचे रक्षण करण्यासाठी झैनखान मागे राहील आणि काराकार व बुनेर येथील टोळीवाल्यांचे पारिपत्य हे बीरबल आणि हकीम अब्दुल फतेह करतील, असे ठरले. परंतु बीरबलाने झैनखानचा सल्ला ऐकला नाही. पहाडी टोळ्यांचा बंदोबस्त करावा; पण त्यांचा मुलूख घेऊ नये, असा आदेश असल्याचे बीरबलाचे म्हणणे होते. बीरबल आणि फतेह यांना युद्धाचे डावपेच फार माहिती नव्हते; तथापि बीरबलचे अकबराच्या दरबारातील वजन बघता झैनखानने फारसा आग्रह धरला नाही. १२ फेब्रुवारी १५८६ रोजी काराकार जवळच्या खिंडीत लढाई झाली आणि बादशाही सैन्याचा विजय होऊन हजारो टोळीवाले कैद केले; तथापि दुसऱ्या दिवशी झालेल्या युद्धात मात्र बादशाही सैन्याची खूप हानी झाली. डोंगराळ मुलखात पुढे जात असताना शत्रू रात्री हल्ला करेल, अशी सूचना झैनखानने बीरबलला दिली होती (१६ फेब्रुवारी १५८६); परंतु ती सूचना बीरबलने मानली नाही. सूर्यास्तापर्यंत बीरबलचे सैन्य हे एका अरुंद खिंडीजवळ पोहोचले. याचवेळी अंधाराचा फायदा घेऊन अफगाणी टोळ्यांनी खिंडीतील सैन्यावर जोरदार हल्ला चढवला. यामध्ये बीरबल मारला गेला आणि झैनखान व फतेह हे थोडक्यात बचावले.

बीरबलाची काव्यप्रतिभा उच्च दर्जाची होती. बीरबलने सांगितलेल्या गोष्टी, अकबर आणि त्याचा संवाद, त्याने दिलेले सल्ले प्रसिद्ध आहेत.

संदर्भ :

  • Beveridge, H. Akbarnama, AbulFazal, Vols. II & III, Calcutta, 1897.
  • Blochmann, H. & Jarret, H. S. Trans. The Ain-i-Akbari, Vols. I to III, New Delhi, 1896.
  • Cunningham, Alexander, Corpus Inscriptionum Indicarum, Inscriptions of Asoka, Vol. I, Calcutta, 1877.
  • Luard, C. E. Rewa State Gazetteer, Lucknow, 1907.
  • Prasad, Bainy, Tabaquat-i-Akbari, Vol II, Calcutta, 1939.
  • Ranking, George S. A. Muntakhabu-t-Tawarikh, Al Badaoni, Vol. 2, New Delhi,1990.                                                                                                                                                                                                                                                        समीक्षक : प्रमोद जोगळेकर