फतेशाह : (१६६५–१७१६). हिमालयीन प्रदेशातील (सांप्रत उत्तराखंड राज्य) गढवाल संस्थानचा एक प्रसिद्ध व पराक्रमी राजा. हा पृथ्वीपत शाहचा नातू आणि मेदिनी शाहचा मुलगा होता. या राज्याचे मूळ संस्थापक राजपूत होते. सोळाव्या शतकात बलभद्र सिंह याने स्वतःला ‘शाह’ किताब घेतल्यापासून त्यानंतरच्या राजांनीही स्वत:च्या नावापुढे तोच प्रत्यय वापरला. या राज्याची राजधानी उत्तराखंड राज्याच्या पौडी गढवाल जिल्ह्यात अलकनंदा नदीच्या काठी श्रीनगर येथे होती.

गढवालचे राज्य सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत स्वतंत्र होते. मोगलांपैकी शाहजहानचे लक्ष या भागाकडे सर्वांत आधी गेले. कारण तत्कालीन गढवालचा राजा पृथ्वीपत शाह हा अल्पवयीन होता व कर्णावती नावाच्या त्याच्या आईच्या हातात सर्व सत्ता होती. गढवालचे राज्य हिमालयाच्या पलीकडे असलेल्या तिबेटशी भारताला जोडणाऱ्या महत्त्वाच्या व्यापारी मार्गावर वसले होते. शाहजहानने गढवालवर हल्ला केला, पण कर्णावतीने मोगलांचा पराभव केला (१६४०). औरंगजेब १६५८ मध्ये बादशाह झाला, तेव्हा दारा शिकोहचा मुलगा सुलेमान शिकोह हा गढवालच्या आश्रयाला आला. औरंगजेबाने पृथ्वीपत शाहकडे त्याला आपल्या स्वाधीन करण्याची मागणी केली; पण पृथ्वीपतने ती नाकारली. तेव्हा औरंगजेबाने त्यांच्याविरुद्ध सैन्य पाठवले. पण गढवाली सैन्याने पुन्हा एकदा मोगलांचा हल्ला परतवून लावला.

सैन्याचा दबाव चालत नाही, असे पाहिल्यावर मोगलांनी कारस्थाने करून गढवाल दरबारात दुही माजवली. पृथ्वीपतचा मुलगा मेदिनी शाहला त्याने बापाविरुद्ध उठाव करण्यास फूस दिली. गढवाली राज्यात बंडाळी माजल्याचे पाहून कुमाऊँ आणि सिरमूरचे राजे, या त्यांच्या पिढीजात शत्रूंनीही यात भाग घेतला. अखेरीस पृथ्वीपत शाहने मोगल सार्वभौमत्व पतकरण्यास होकार दिला. सुलेमान शुकोहसुद्धा औरंगजेबाला शरण गेला. मेदिनी शाहला मात्र पृथ्वीपतने राज्याबाहेर हाकलून लावले. तो मोगलांच्या आश्रयाला गेला; पण दिल्लीच्या वाटेवर १६६२ मध्ये मरण पावला. यानंतर १६६७ साली पृथ्वीपत शाहही मरण पावला. मेदिनी शाह आधीच मरण पावल्याने पृथ्वीपतच्या मृत्यूनंतर गढवाल राज्याचा वारसा त्याचा नातू फतेशाहकडे गेला. राज्यप्राप्ती झाल्याबद्दल औरंगजेबाने खास फर्मानाद्वारे त्याचे अभिनंदन केले. या फर्मानावरून असे दिसते की, पृथ्वीपतने १६६५ सालीच राज्याची धुरा फतेशाहकडे सोपवली होती. फतेशाहने पुढची पन्नास वर्षे राज्य केले.

सतराव्या शतकाच्या अखेरच्या दशकांत औरंगजेब पूर्ण शक्तीनिशी दख्खनमध्ये उतरल्याचा फायदा घेऊन फतेशाहने मोगलांपुढे हिमालयीन टेकड्या आणि लगतच्या पठारी प्रदेशांत मोठे आव्हान उभे केले. मोगलांनी दिलेल्या मांडलिकीचा फायदा घेत त्याने पहाडी भागांतल्या इतर राजे-रजवाड्यांवर वचक निर्माण केला आणि त्यांच्याकडून मोठा प्रदेश जिंकून त्याने गढवालचे राज्य वाढवले. यातून त्याचा शीख गुरू गोविंदसिंग यांच्याशी भांगनी या ठिकाणी संघर्ष झाला (१६८८). पुढे सहारनपूरच्या मोगल ठाण्यावर केलेल्या स्वारीत गढवाली फौजांना मिळालेल्या विजयाचे स्मारक म्हणून फतेशाहने ‘फतेपूर’ नावाचे शहर वसवले (१६९२).

फतेशाहचा मृत्यू १७१६-१७ साली झाला. लष्करी शौर्याबरोबरच तो साहित्य आणि कलांचाही भोक्ता होता. सुलेमान शुकोहबरोबर गढवालला आलेल्या शामदास आणि हरदास या दोन चित्रकारांना त्याने पदरी ठेवून गढवाली चित्रशैलीची निर्मिती केली. त्याच्या दरबारी अनेक कवी, टीकाकार, धार्मिक पंडित होते. रतन कवी रचित फते प्रकाश हे चरित्रात्मक काव्य, तसेच कविराज सुखदेव मिश्र लिखित वृत्तविचार आणि मतिराम लिखित वृत्तकौमुदी  अथवा छंदसार पिंगल  अशा ग्रंथांची निर्मिती त्याच्या आश्रयाने झाली.

फतेशाहने गढवालमधील श्रीनगर येथे पाडलेला चांदीचा रुपया, वजन ११.४१ ग्रॅम, (१६९२).

फतेशाहसंबंधीच्या उपलब्ध ऐतिहासिक पुराव्यांत त्याने पाडलेल्या नाण्यांचाही समावेश होतो. ही नाणी अतिशय दुर्मीळ असून, नाणकशास्त्रदृष्ट्याही रोचक आहेत. फतेशाहने सहारनपूरवर हल्ला चढवल्यानंतरचा विजय साजरा करण्यासाठी मोगल पद्धतीचे नाणे पाडले. त्यावर समोरच्या बाजूस ‘सिक्का झद दर दहर चू मिहर अयान श्री महाराज फतह शाह झमानʼ व मागील बाजूस ‘झर्ब श्रीनगर सनत (१)७५० बदरीनाथ सहायʼ असा फार्सी लिपीतील मजकूर आहे. समोरच्या बाजूस ‘महाʼ या शब्दाखाली फार्सी लिपीतच २९ हा आकडाही आहे. मोगलांचे नामधारी मांडलिकत्वही झुगारून देऊन पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा करणारे हे नाणे तत्कालीन परिप्रेक्ष्यात पाहता अभिनव असून, त्यावरील ‘श्री बदरीनाथʼ हा उल्लेखही रोचक आहे. हिंदू दैवतांची अशी नावे फार्सी लिपीयुक्त नाण्यांवर क्वचितच पाहावयास मिळतात. २९ हा आकडा म्हणजे फतेशाहचे राज्यारोहण अर्थात जुलूस वर्ष असून १७५० हा आकडा म्हणजे इ. स. १६९२ या वर्षीचा विक्रम संवत आहे. टांकसाळीचे नाव श्रीनगर असे नमूद आहे.

या नाण्यापेक्षाही विशेष उल्लेखनीय आहे, ते त्याचे संस्कृत भाषेत मजकूर असलेले अष्टकोनी आकाराचे नाणे. त्यावर पृष्ठभागी ‘मेदिनीशाह सूनो श्री फतेशाहावनीपते: ३५ʼ व पार्श्वभागावर ‘बदरीनाथ कृपया मुद्रा जगति राजते १७५७ʼ असा देवनागरी लिपीतील मजकूर आहे. ‘मेदिनीशाहचा मुलगा फतेशाह, जो ‘अवनिपतीʼ म्हणजे राजा आहे, त्याने बद्रिनाथाच्या कृपेने निर्माण केलेली मुद्रा जगावर राज्य करतेʼ असा याचा अर्थ आहे. ह्यातील १७५७ हा आकडा विक्रम संवत दर्शवतो. ३५ हे फतेशाहचे तत्कालीन राज्यारोहणाचे वर्ष आहे. या काळात फतेशाह आणि कुमाऊँच्या राजांमधल्या संघर्षाला धार चढली होती आणि त्यांच्या विरुद्ध मिळालेल्या एखाद्या विजयाचे स्मारक म्हणून त्याने हे नाणे पाडले असावे.

फतेशाहने अष्टकोनी आकारातील पाडलेले चांदीचे नाणे, वजन १०.५५ ग्रॅम, (१७००).

या नाण्याचा अष्टकोनी आकार, संस्कृत भाषा, देवनागरी लिपी तसेच ‘..सूनोʼ, ‘मुद्रा…राजतेʼ इत्यादी शब्दांवरून काही संशोधकांनी या नाण्यावरील मजकुरामागे छ. शिवाजी महाराजांच्या ‘प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजतेʼ या सुप्रसिद्ध राजमुद्रेची प्रेरणा असावी, असा तर्क केला आहे. छ. शिवाजी महाराजांचा मृत्यू १६८० साली झाला, तर १६८०-१७०० हा फतेशाहच्या कारकिर्दीतील सर्वोच्च काळ आहे. दोघांच्या चरित्रांत अनेक साम्ये असून, याच सुमारास छत्रसालानेही छ. शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेतल्याचे ज्ञात आहेच. छत्रसाल,  कवी भूषण व मराठ्यांविरुद्ध लढून अपयशी झालेले अनेक मोगल सरदार इत्यादी कारणांमुळे या सुमारास उत्तर भारतात छ. शिवाजी महाराजांचे नाव प्रसिद्ध होते.

गढवालसारख्या महाराष्ट्रापासून शेकडो किमी. दूर असलेल्या मुलुखात त्यांचे नाव पोहोचविण्यात फतेशाहच्या पदरच्या मतिराम नामक कवीचा मुख्य सहभाग होता. छंदसार उर्फ पिंगल काव्यग्रंथाच्या सुरुवातीला मतिरामने आपला धनी फतेशाह याची त्याच्या औदार्याच्या बाबतीत छ. शिवाजी महाराजांशी तुलना केली आहे. मतिरामला छ. शिवाजी महाराजांची माहिती असण्याचे कारण म्हणजे तो प्रसिद्ध कवी भूषण याचा भाऊ होता. या शिवाय भूषणचा उल्लेख रतन कवी या फतेशाहच्या पदरी असलेल्या आणखी एका कवीने लिहिलेल्या फते प्रकाश या स्तुतीपर काव्यग्रंथाच्या प्रास्ताविकातही येतो. भूषण महाराष्ट्रात असताना मतिराम हा कुमाऊँच्या राजाच्या पदरी राहिला आणि पुढे तेथूनच त्याने फतेशाहच्या दरबारात प्रवेश केला. छ. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर भूषण काही काळ कुमाऊँला राहिला होता. त्यातूनच मतिरामाद्वारे विशिष्ट संकेतांचे अनुकरण फतेशाहने केले असावे, असा संशोधकांचा तर्क आहे. छ. शिवाजी महाराजांच्या प्रेरणेचे हे दख्खनबाहेरील सर्वांत जुने नाणकशास्त्रीय मूर्तरूप असल्यामुळे हे नाणे अतिशय महत्त्वाचे आहे.

संदर्भ :

  • Bhandare, Shailendra, ‘THE SILVER RUPEES OF FATH SHAH OF GARHWAL REVISITEDʼ, Journal of the Oriental Numismatic Society, Vol. 221, pp.34-36, UK, 2014.
  • Rawat, Ajay S., Garhwal Himalaya: A Study in Historical Perspective, New Delhi, 2002.
  • छायाचित्र सौजन्य: https://www.zeno.ru/

                                                                                                                                                                           समीक्षक : प्रमोद जोगळेकर