ऋग्वेदातील एक देवतायुग्म. माता आणि पिता यांचे प्रतीक असलेली ही देवता कायम परस्परांच्या जोडीनेच वेदांमध्ये उल्लेखलेली आहे. या देवतेशी निगडित ऋग्वेदात सहा सूक्ते आहेत. देवतांचे आईवडील अशा अर्थी विविध अभिधाने आणि विशेषणे यांनी ही देवतायुग्म ख्यात आहेत. ह्या देवतेची ‘पितरा’, ‘मातरा’, ‘जनित्री’ अशी नावे आढळतात. तसेच द्यौ म्हणजे आकाश हे पुरुषतत्त्व आणि पृथिवी हे स्त्रीतत्त्व, असे मानले गेले आहे. त्यांच्या संयोगानेच विविध देवतांची उत्पत्ती झाली आहे. द्यौला आदित्य, अग्नी, अंगिरस, अश्विनौ, इंद्र, पर्जन्य, सूर्य आणि उषा यांचा पिता मानले आहे. मॅकडॉनलच्या मते, द्यौ म्हणजे शक्तिशाली वृषभ आणि पृथिवी म्हणजे प्रजननशील गाय असून उत्तम प्रजोत्पादन क्षमता त्यांच्यात आहे. त्यामुळेच त्यांचा उल्लेख ‘भूरिरेतस्’ असा केला आहे. (ऋ. ६.७०.१). त्याचप्रमाणे ते दोघे चिरतरुण आणि अजर आहेत. व्याप्ती आणि विपुलतेचे ते प्रतीक आहेत आणि सृष्टीमध्ये धन, धान्य, आणि ऐश्वर्याचे दान करतात. द्यावापृथिवी हे देवतायुग्म विद्वान असून कायम सदसद्विवेकबुद्धीस प्रोत्साहन देतात. ते मातापिता असल्याने कायम देवतांचे अवकृपेपासून रक्षण करतात.
सृष्टीनिर्माते मातापिता म्हणून ‘विश्वकर्मन्’ असा एक अर्थ मॅकडॉनल यांनी घेतला आहे. ऋग्वेदात उल्लेख केल्याप्रमाणे पवित्र आणि तेजस्वी अशा सूर्याची उत्पत्ती याच देवतेपासून झालेली आहे. ऋग्वेदातील एका सूक्तात द्यावापृथिवी या देवतायुग्मांना स्त्रीरूपी संबोधले आहे. त्या परस्परांच्या भगिनी असून (समन्ते स्वसारा) त्यांनी घोर संकटापासून भक्तांचे रक्षण करावे, अशी प्रार्थना केली आहे. तसेच द्यावापृथिवी हे तूप आणि अमृताने परिपूर्ण आहेत. ‘इमौ वै लोकौ रेतःसिचौ’ (शत. ब्रा. १.८.१.२९) म्हणजेच द्यावापृथिवी रेतसिंचन करणारे आहेत. तसेच ते दोघे प्राण व उदान वायूप्रमाणे आहेत. (शत. ब्रा. ४.३.१.२२). आश्वलायन श्रौतसूत्रामध्ये (२.१४) द्यावापृथिव्योरयन या काम्य यागाचे वर्णन केले आहे. ऋग्वेदातील काही ऋचांमध्ये द्यौला आदित्य या देवतेचा पिता मानले आहे.
सध्याच्या काळात द्यावापृथिवीपासूनच पृथ्वी म्हणजेच धरणी माता ही कल्पना रूढ झाली आणि भारतीय संस्कृतीत, कृषिसंस्कृतीत तिच्या पूजेस आजही अनन्यसाधारण महत्त्व आहे. वैदिकोत्तर काळात ह्या युग्मदेवतेची उपासना मागे पडली. मात्र काळाच्या ओघात द्यावापृथिवीमधील पृथिवीतत्त्वाची उपासना विविध सण आणि व्रतांद्वारे केली जाते.
संदर्भ :
- Macdonell, A. A. Ed. A Vedic Reader for Students, Oxford, 1917.
- Macdonell A. A. Vedic Mythology, Strassburg, 1897.
- उपाध्याय, ब. वैदिक साहित्य और संस्कृती, वाराणसी, १९८९.
- जोशी, महादेवशास्त्री, संपा. भारतीय संस्कृतिकोश, खंड ३, पुणे, १९९९. समीक्षक : भाग्यलता पाटस्कर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.