सोवनी, नी. वि. (Sovani, N. V.) : ( १७ सप्टेंबर १९१७ – ४ मार्च २००३ ). प्रसिद्ध भारतीय अर्थतज्ज्ञ. सोवनी यांनी पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजमधून बी. ए. आणि गोखले अर्थशास्त्र संस्थेमधून १९४० मध्ये एम. ए. ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ धनंजयराव गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गोखले अर्थशास्त्र संस्थेत संशोधनपर कार्य केले व संस्थेच्या संशोधन कार्यात भरीव योगदान दिले. त्यांच्या विचारांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली होती. इ. स. १९६० मध्ये अमेरिकेतील जॉन हॉफकिन्स विद्यापीठात ते अभ्यागत प्राध्यापक म्हणून अध्यापन केले. इ. स. १९६५ मध्ये बनारस येथे झालेल्या इंडियन इकॉनॉमिक असोसिएशनचे ते अध्यक्ष होते. संयुक्त राष्ट्राच्या जिनिव्हा येथील रिसर्च इइन्ट्यिट्यूट ऑफ सोशल डेव्हलपमेंट या संस्थेत कार्यक्रम संचालक तसेच बँकॉक येथील युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर एशिया अँड दी पॅसिफिक (ESCAP) या संस्थेत लोकसंख्या विभागाचे संचालक म्हणून त्यांनी यशस्वीपणे कार्य केले. ते पुणे येथील गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्थेचे सहसंचालक होते.

सोवनी यांनी अर्थशास्त्राचे अध्यापन व लेखन करीत असताना असामान्य गृहपाठ करण्याची प्रता सुदृढ केली. ही प्रथा रुजावी या सद्हेतूनेच त्यांनी ‘मराठी अर्थशास्त्र परिषदे’ची उभारणी (स्थापना) व जडणघडण ही सर्वाधिक उल्लेखनीय कामगिरी केली. इ. स. १९७७ मध्ये मुंबई येथे झालेल्या पहिल्या मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष व नंतर नऊ वर्षे कार्याध्यक्ष होते. ते महाराष्ट्र शासनाच्या अर्थशास्त्र परिभाषाकोश  निर्माण करणाऱ्या समितीचे अध्यक्ष होते. मराठीतील अनेक अर्थशास्त्रीय संज्ञा व संकल्पना निर्मितीचे श्रेय त्यांना जाते.

आपल्या सुमारे सहा दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत सोवनी यांनी मराठी व इंग्रजीमधून ४० ग्रंथ व सुमारे १०० संशोधनपर वैचारिक लेख (शोधनिबंध) लिहिले. त्यात प्रामुख्याने अर्थशास्त्राचे स्वरूप व विविध सिद्धांताचे टीकात्मक परीक्षण, आर्थिक इतिहास, ख्यातनाम पाश्चात्त्य अर्थतज्ज्ञांच्या विचारांचे सर्वप्रथम मराठीतून विश्लेषण अशा सैद्धांतिक विषयांबरोबरच लोकसंख्या अभ्यास, नागरीकरण, सर्वेक्षण, भारतीय राजकारण व अर्थकारण, लेनिनवादाची मीमांसा, पद्धतीयुगावरील भाष्य, हिराकुड धरणाच्या आर्थिक लाभावरील अहवाल इत्यादी व्यावहारिक व प्रसंगोपात्त विषयांचाही समावेश आहे.

सोवनी यांनी अर्थशास्त्राच्या अभिजात, नवअभिजात, केन्सवाद व केन्सोत्तर विचारांचा सखोल परामर्श घेतला आहे. झां बातीस्त से विरुद्ध माल्थस विरुद्ध मिल = झां बातीस्त से असा अभिजात विचारांचा पट उलगडून दाखवून त्यांनी नवअभिजात विचारांमधील अपुरी मागणी व अधिक गुंतवणूक यांवर आधारित विक्सेल, फ्रिड्रिक ऑगस्ट फोन हायेक, योझेफ आलोईस शुंपेटर, क्लार्क, आर्थर सेसिल पिगू, हॉब्सन या प्रसिद्ध अर्थतज्ज्ञांच्या विचारांचा आढावा घेतला आहे. त्यांच्या मते, नवअभिजात विचारांमध्ये व्यापारचक्रांना विकृती मानल्याने त्यावरील विचार अर्थशास्त्राच्या मुख्य प्रवाहाबरोबर राहिले. हे विचार मूळ प्रवाहात आणण्याचे श्रेय त्यांनी प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ जॉन मेनार्ड केन्स यांना दिले. नवअभिजातवादातील समतोलाची व्याख्या अवास्तव असल्याचे सोदाहरण स्पष्टीकरण सोवनी यांनी केले.

सोवनी यांनी केन्सवादाचे तटस्थ परीक्षण करून केन्स यांच्या विचारांतील मूलभूत दोष दाखविले आहे. त्यांच्या दृष्टीने केन्स यांच्या अपूर्ण रोजगार स्थितीतील समतोलाच्या विवेचनात सैद्धांतिक व तार्किक बारकावे नाहीत. केन्स यांची प्रभावी मागणी ही संकल्पना केवळ विशिष्ट लकब म्हणून वापरली गेली आहे, असे त्यांचे मत होते. ‘सूक्ष्म’ व ‘समग्र अर्थशास्त्र’ या संज्ञांऐवजी ‘व्यष्टीय’ व ‘समष्टीय अर्थशास्त्र’ या पर्यायी संज्ञा सोवनी यांनी सुचविल्या होत्या. मूळ गणिती संकल्पना दैनंदिन उदाहरणांनी सुलभ करण्याची त्यांची हातोटी उल्लेखनीय होती. संज्ञांसाठी अचूक परिभाषा व तिचा काटेकोर वापर, विचारांतील नेमकेपणा व परखड, तटस्थ शैली हे त्यांच्या विचारांचे प्रमुख वैशिष्ट्ये होते.

सोवनी यांनी स्वतंत्र भारतीय अर्थशास्त्राचा पुरस्कार केला. त्यांच्या मते, प्रत्येक देशाचे स्वतंत्र अर्थशास्त्र असते व प्रचलित पाश्चात्त्य अर्थशास्त्र हे एका विशिष्ट कालखंडाशी व समाजसमुहाशी निगडित आहे. भारतीयांनी आपले स्वतंत्र अर्थशास्त्र विकसित न करण्यामागील कारणमीमांसाही त्यांनी विशद केली आहे. तसेच भारतीय अर्थशास्त्राच्या उभारणीबाबत मौलिक मार्गदर्शनही त्यांनी केले आहे. पाश्चात्त्य अर्थशास्त्रातील पूर्ण रोजगार, प्रछन्न बेकारी, समतोल अशा अयोग्य संकल्पनांचा त्याग करून पर्यायी व अनुकूल नव्या संकल्पना निर्माण करून वास्तवदर्शी विश्लेषणात्मक पद्धतीने भारतीय अर्थशास्त्राचा पाया घालणे योग्य ठरेल, असे सोवनी यांनी सुचविले होते. अर्थशास्त्रीय घटनांचे स्वरूप हे गुंतागुंतीचे असल्याने कोणत्याही तज्ज्ञाचे विचार परिपूर्ण असणार नाहीत, असे ते मानत. पाश्चिमात्य विचारवंतांप्रमाणे आपल्या वैचारिक चुका खिलाडुवृत्तीने स्वीकाराव्यात, असे त्यांना वाटते.

मराठीतील बहुतांश ग्रंथलेखन ज्ञानाची गरज भागविण्याच्या हेतूने केलेले नसून अर्थोत्पादनाच्या हेतूने केले आहे, असा त्यांचा आरोप होता. मराठी अर्थसाहित्यात चर्चात्मक व टीकात्मक लेखनाचा संपूर्ण अभाव असल्याची त्यांना खंत होती. आपल्या विचार-लेखन-भाषण-कृती यांमधून आपल्या प्रकांड बुद्धिमत्तेचे व वस्तुनिष्ठ विश्लेषणात्मक परखड शैलीच्या योगदानाचे सोवनी यांनी भारतीय अर्थशास्त्रीय लेखन समृद्ध केले आहे.

सोवनी यांनी लिहलेले महत्त्वपूर्ण ग्रंथ : दी पॉपुलेशन प्रॉब्लेम इन इंडिया, १९३९; दी पॉपुलेशन प्रॉब्लेम इन इंडिया : ए रिजनल ॲप्रोच, १९४२; इकॉनॉमी इफेक्ट ऑफ इरिगेशन, १९४५; दी इंटरनॅशनल पोझिशन ऑफ इंडिआज रॉ मटेरिअल, १९४८; दी सोशल सर्व्हे ऑफ कोल्हापूर सिटी – पार्ट १, १९४८; रिपोर्ट ऑफ दी कमोडिटी प्रायसेस बोर्ड, १९४८; इकॉनॉमिक रिलेशन ऑफ इंडिया विथ साउथ-ईस्ट एशिया अँड दी फार ईस्ट, १९४९; पोस्ट-वॉर इन्फ्लेशन इन इंडिया : ए सर्व्हे, १९४९; इंडियाज रिसेंट इकॉनॉमिक अँड स्पेशल डेव्हलपमेंट, १९५०; आर्थिक घडामोडी, १९३०-१९३५, १९५१; प्लॅनिंग ऑफ पोस्ट-वॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इन इंडिया, १९५१; प्रायमरी एज्युकेशन इन सातारा डिस्ट्रिक्ट, १९५५; फर्टिलिटी सर्व्हे ऑफ नासिक, कुलाबा अँड सातारा (नॉर्थ) डिस्ट्रिक्ट, १९५५; पुना : ए रिसर्व्हे, १९५६; इकॉनॉमिक ऑफ ए मल्टिपल-पर्पज रिव्हर डॅम, १९६०; चेंजिंग इंडिया : एसे इन हॉनर ऑफ प्रोफेसर डी. आर. गाडगील, १९६१; अर्बनायझेशन अँड अर्बन इंडिया, १९६६; अर्थवेदा, १९७९; आपल्या आर्थिक विकासाच्या समस्या, १९७९; इंडियन इकॉनॉमिक्स, दी ओल्ड अँड दी न्यू पॅरडाइम, १९८१; इंडियन इकॉनॉमिक्स : सम थिअरी, सम प्रॅक्टिस, १९९१ इत्यादी.

संदर्भ :

  • सोवनी, नी. वि., अर्थसिद्धांत – आणखी चिकित्सक निबंध, १९७७.
  • सोवनी, नी. वि., अर्थवेध ज्ञानविज्ञान, ठाणे, १९७९.
  • सोवनी, नी. वि., माझे गुरू धनंजयराव गाडगीळ, पुणे, १९७४,
  • Das, Debendra Kumar, Great Indian Economists Their Creative Vision for Socio-economic Development, Ed., Vol. 1 to 10, New Delhi, 2004.

समीक्षक : विनायक देशपांडे