भगवती, जगदीश (Bhagwati, Jagdish) : (२६ जुलै १९३४). प्रसिद्ध भारतीय अर्थशास्त्रज्ञ. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या शाखेतील प्रमुख विचारवंतांमध्ये भगवती यांचे नाव अग्रभागी आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आर्थिक विकास या विषयांत त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांचा जन्म मुंबईत झाला. तेथील सिडनेहॅम महाविद्यालयातून पदवी मिळविल्यानंतर त्यांनी १९५६ मध्ये केंब्रिज विद्यापीठाची बी. ए. अर्थशास्त्र या विषयाची पदवी प्राप्त केली. तेथे त्यांचे सहाध्यायी सर पार्थ दासगुप्ता आणि भारताचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग होते. त्यांनी १९६१ मध्ये अमेरिकेतील एमआयटी या ख्यातनाम विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात डॉक्टरेट ही पदवी मिळविली. ‘एसेज इन इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. अर्थतज्ज्ञ चार्ल्स किंडलबर्जर हे त्यांचे मार्गदर्शक होते. कोलंबिया विद्यापीठातील अर्थतज्ज्ञ आणि रशियन अर्थव्यवस्थेच्या अभ्यासक पद्मा देसाई या त्यांच्या पत्नी होय. दोघांनी एकत्रितपणे ओएसीडी स्टडी ऑफ इंडिया प्लॅनिंग फॉर इंडिया हे महत्त्वाचे पुस्तक लिहिले आहे. भारताचे तत्कालीन मुख्य न्यायाधिश पी. एन. भगवती आणि प्रसिद्ध न्युरोसर्जन एस. एन. भगवती हे त्यांचे भाऊ होत.

भगवती यांनी शिक्षण पूर्ण करून भारतात परतल्यानंतर सर्वप्रथम कोलकात्याच्या इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्युटमध्ये आणि नंतर दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे १९६२ ते १९६८ या काळात अध्यापन केले. पुढे १९६८ ते १९८० या काळात ते एमआयटी विद्यापिठात प्राध्यापक होते. २००१ पासून ते जागतिक व्यापार संघटनेत सल्लागार म्हणून कार्यरत होते. तसेच युनो आणि गॅट संघटनेतही त्यांनी सल्लागाराची भूमिका पार पाडलेली आहे.

भगवती यांना मुक्त व्यापार व जागतिकीकरण आणि खुल्या अर्थव्यवस्थेचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाते. त्यांच्या विचारसरणीवर रॉबर्ट एम. सोलो, जोन व्हायोलेट रॉबिन्सन आणि हॅरी जॉन्सन या अर्थतज्ज्ञांचा प्रभाव आहे. अमेरिकेच्या धोरणांची परखडपणे चिकित्सा करणारे निर्भीड विचारवंत अशी भगवती यांची ख्याती आहे. बिल क्लिंटन यांच्या धोरणांवर अनावृत्त पत्राद्वारे जाहीरपणे टीका करण्याचे धाडस त्यांनी दाखविले होते.

भगवती यांनी लेस्टर थरो यांच्या ‘गॅट इज डेड’ या विधानाला कडाडून विरोध केला आणि खुल्या व्यापाराचे आणि मुक्त जागतिकीकरणाचे समर्थन हिरीरीने केले. जपान, अमेरिका आणि यूरोप या तीन आर्थिक सत्तांपैकी अमेरिकेचेच धोरण यशस्वी होणार, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. रॉबर्ट सॅम्युएल्सन, जेफ्री मॅड्रीक यांसारख्या अमेरिकेच्या निराशाजनक भविष्यवेत्त्यांच्या लिखाणाचे त्यांनी खंडन केले आहे. त्यांच्या मते, खुल्या स्पर्धेमुळेच ज्ञान वाढते आणि संरक्षणवादी धोरण अंतिमतः महागात पडते. अर्थातच, कोणतेही धोरण किंवा मार्ग शंभर टक्के अचूक नसतो, याचेही त्यांना भान आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रात त्यांनी सैद्धांतिक स्वरूपाचे योगदान दिले आहे. यात हॅरॉड–डोमर प्रारूपाचे सुधारित रूप म्हणजे भगवती-श्रीनिवासन प्रारूप प्रसिद्ध आहे (१९७२). यात त्यांनी उद्योगांतर्गत व्यापाराचे अर्थव्यवस्थेच्या उत्पादन रचनेवर होणाऱ्या परिणामांचे स्पष्टीकरण दिले आहे. यालाच ‘व्यापाराचा जैविक सिद्धांत’ (बायोग्राफिकल थिअरी ऑफ ट्रेड) असे नाव आहे. त्यांचेच पट्टशिष्य व प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ पॉल क्रुगमन यांच्या ‘खुला व्यापार कालबाह्य झाला आहे का?’ या लेखामधील संरक्षण धोरणाची किंमत नगण्य नसेल, तर अगदी कमी आहे, या मताला विरोध करताना भगवती यांनी ‘संरक्षणाची किंमत मोठी असते’, असे विधान केले आहे. त्यांच्या या विचारसरणीला रॉबर्ट फिट्रा, पॉल रोमर या अर्थतज्ज्ञांनी पाठींबा दिला आहे.

भगवती यांच्या व्यापार सिद्धांताचा प्रमुख गाभा ‘शोभादर्शक सिद्धांत’ (कॅलिडोस्कोपी थिअरी) आहे. खुले व्यापार धोरण ही एकदाच अंमलात आणायची बाब नसून त्यात सतत बदलत राहणारी, चुकांतून, वादांतून प्रगत होत जाणारी प्रक्रिया आहे, असे ते म्हणतात. खुला व्यापारामुळे आरोग्यासारख्या सेवावरील खर्च घटतील असे त्यांचे मत आहे. तौलनिक लाभाचा फायदा सतत मिळत नाही, तो तर बदलत राहतो, हे त्याचे सूत्र आहे. तसेच त्यांनी दोन देशांमधील कराराधारित व्यापार धोरणावर टीका केली आहे. द्विपक्षी करारांपेक्षा अनेकदेशीय करार मंद गतीने अंमलात येतात, ही टीकाही भगवती यांनी खोडून काढत दोहा करार पाळण्यावर भर दिला; मात्र संरक्षणवादाचे यशस्वी दुर्मिळ उदाहरण म्हणजे जपान होय, हेसुद्धा त्यांनी मान्य केले. अमेरिकेच्या अलीकडच्या पर्यावरणीय निकषांच्या आधारे भारत, केनिया यांसारख्या विकसनशील देशांशी खुल्या व्यापारावरील निर्बंध घालण्याच्या धोरणावर त्यांनी टीका केली आहे. त्यांच्या मते, अशा निर्बंधांमुळे अर्थातच, अमेरिकेचे काहीही नुकसान होणार नाही; परंतु अमेरिकेसारखे प्रगत देशच पर्यावरणाची अधिक हानी करतात.

भगवती यांना स्थलांतरीतांचे हक्क संरक्षित करण्यासाठी ‘जागतिक स्थलांतर संघटना’ (वर्ल्ड मायग्रेशन ऑर्गनायझेशन) स्थापन करण्यात यावे, असे वाटते. त्यांच्या या विचारांनाच ‘बहुसंस्कृतीय सिद्धांत’ (कॉस्मोपोलिटन थिअरी) असे म्हणतात. स्थलांतर प्रक्रिया आपले भविष्य घडवेल, हा त्यांचा विश्वास आहे. जर स्थलांतरीतांचे शोषण होत नसेल, तर ते शिक्षेस पात्र नाहीत, असे ते मानतात. विशेषतः अमेरिकेचा शेजारी देश मेक्सिको येथून होणाऱ्या मोठ्या प्रमाणातील अवैध स्थलांतराबाबत त्यांची भूमिका मानवतावादी आहे. बुद्धीवंतांच्या स्थलांतराकडे पाहण्याचा विकसित आणि अविकसित देशांचा दृष्टीकोन भिन्न असल्याचे ते नमूद करतात. बुद्धीवंतांना कौशल्य, शिक्षण देण्यासाठी विकसनशील देशांचा एकूण खर्च वसूल करण्यासाठी कर लादावा, हा ॲरो आणि स्पेन्स यांनी मांडलेला विचार प्रत्यक्षात आणणे गुंतागुंतीचे ठरेल, असे स्पष्ट करताना त्यांनी स्थलांतरीतांच्या प्रशिक्षणावर विकसित देशही खर्च करत असतात, याकडे लक्ष वेधले आहे. यालाच भगवती, फिल्ड आणि श्रीनिवासन सिद्धांत असे म्हणतात.

भगवती यांचा लोकशाही व्यवस्थेवर गाढा विश्वास आहे; मात्र लोकशाही किंवा विकास अशा पर्यायांना ते क्रूर द्विधावस्था असे म्हणतात. लोकशाही आणि बाजारव्यवस्था या दोन चांगल्या गोष्टी एकत्रच असल्या पाहिजे. हुकुमशाही देशांतील द्रव्यीय धोरण शासनाच्या हातून निसटते, ही मोठी विसंगती असल्याचे त्यांचे मत आहे. गोर्बाचेव्ह यांचे बाजाराधिष्ठित समाजवादी धोरण सामाजिक आणि समग्र दृष्टीकोनाभावी अपयशी ठरले, हेही त्यांनी स्पष्ट केले आहे. भगवती यांची दारिद्र्यमूलक विकास ही मूलभूत संकल्पना आहे. वृद्धीमुळे कालांतराने व्यापारशर्ती प्रतिकूल बनतात आणि दारिद्र्यात वाढ होते, असे मानतात.

भगवती यांनी भारतात ८ नोव्हेंबर २०१६ रोजी जाहीर झालेल्या ८६% चलनबदलाविषयी सकारात्मक भूमिका घेतली होती. त्यांच्या मते, गरीब माणसाजवळ बंद केलेल्या ५०० आणि १,००० रूपयांच्या नोटा नसतात आणि त्यामुळे त्यांना मुळीच त्रास होणार नाही. या धोरणाविरुद्ध देशातील ३०% गरिबांची काहीही तक्रार नव्हती, असेही त्यांनी नमूद केले आहे. एका व्यक्तीविरोधात सर्वांनी एकत्र येणे चुकीचे आहे. आपण पूर्णपणे खुल्या विचारांचे असायला हवे. भारतातील चलनबदलावर भगवती आणि सेन यांच्यात परस्परविरोधी विचार होते.

अर्थशास्त्रीय योगदानामुळे भगवती यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यात इंडियन इकॉनोमॅट्रिक सोसायटीचा महालनोबीस स्मृती पदक (१९७४), फेलो ऑफ अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्स (१९८२), सिडमॅम डिस्टिंगश्ड अवॉर्ड इन इंटरनॅशनल पॉलिटिकल इकॉनॉमिक्स (१९९८), भारत सरकारचा पद्मविभूषण (२०००), इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचा जीवन गौरव पुरस्कार (२००४), जपानचा ऑर्डर ऑफ दी राइजिंग सन (२००६), जर्मनीचा बर्नार्ड हार्म्स पुरस्कार, स्वित्झर्लंडचा फ्रीडम प्राईस पुरस्कार, अमेरिकेचा किनन एंटरप्राइज अवॉर्ड आणि जॉन आर. कॉमन्स पुरस्कार, तसेच अनेक मानद पदव्या आणि बिरुदे यांचे ते मानकरी आहेत.

भगवती यांची विविध विषयावरील ४० हून अधिक पुस्तके आणि २०० पेक्षा अधिक लेख उपलब्ध आहेत. त्यावरून त्यांची बौद्धिक समृद्धी लक्षात येते. त्यांच्या प्रमुख लिखाणाचे पाच खंड एमआयटी विद्यापीठाने प्रसिद्ध केले आहेत. त्यांच्या वैचारिक लिखाणाचे जगातील अनेक भाषांत अनुवाद झाले आहेत. त्यांचे ग्रंथ पुढील प्रमाणे ꞉ फ्री ट्रेड, फिअरनेस अँड द न्यु प्रोटेक्शनिझ्म, १९५५; द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ कमर्शियल पॉलिसी, १९६८; इलिगल ट्रँझॅक्शन इनइंटरनॅशनल ट्रेड, १९६९; इंडिया ꞉ प्लॅनिंग फॉर इंडस्ट्रिलायझेशन, १९७०; इकॉनॉमी अँड वर्ल्ड ऑर्डर फ्रॉम द १९७० टु १९९०, १९७२; ॲनाटॉमी अँड कॉन्सेक्वेन्सेस ऑफ एक्सचेंज कंट्रोल रिजिमस, १९७८; लेक्चर्स ऑन इंटरनॅशनल ट्रेड, १९८३; वेल्थ अँड पाव्हर्टी, १९८५; प्रोटेक्शनिज्म, १९८८; द वर्ल्ड ट्रेडिंग सिस्टिम ॲट रिस्क, १९९१; पोलिटिकल इकॉनॉमी अँड इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स, १९९१; इंडिया इन ट्रान्झिशन ꞉ फ्रिइंग द इकॉनॉमिक्स, १९९३; राइटिंग ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स, १९९७; ए स्ट्रीम ऑफ विंडोज, १९९८; डब्ल्यु. टी. ओ. अँड इंडिया, २००२; द वाइंड ऑफ द १०० डेज, २००२; इन डिफेन्स ऑफ ग्लोबलायझेशन, २००७; टर्मिटेज इन द ट्रेडिंग सिस्टिम, २००८; ऑफशोरिंग ऑफ अमेरिकन जॉब, २००९; फ्रिबल क्रिटिक्वेज ꞉ कॅपिटॅलिझ्म पेट्टी डिट्रॅक्टर्स, २००९; रिफॉर्म अँड इकॉनॉमिक्स ट्रान्सफॉर्मेशन इन इंडिया, २०१२; व्हाय ग्रोथ मॅटर्स, २०१३; इंडियाज ट्रिस्ट विथ डेस्टिनी, २०१३; फ्री ट्रेड टुडे, २०१३ इत्यादी.

भगवती यांची विचारसरणी आर्थिक धोरणातून चांगला समाज निर्माण करण्यावर भर देते. आर्थिक धोरण खुले आणि लोकशाही पद्धतीचे, तसेच स्त्रिया, मुले, अल्पसंख्यांक आणि स्थलांतरीतांना सामावून घेणारे व्यापक स्वरूपाचे व्हावे, हा त्यांचा ध्यास आहे. पॉल सॅम्युएल्सन यांनी २००५ मध्ये भगवती यांच्या सत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने भरलेल्या एका परिषदेत त्यांची तुलना हेडेन या संगीतकारांशी केली होती. या संगीतकाराने शंभराहून अधिक सुरावटी केल्या आहेत आणि त्यातील प्रत्येक सुरावट उच्च दर्जाचीच आहे. एकाच वेळी विकसित आणि विकसनशील देशांच्या प्रगतीसाठी मार्गदर्शन करण्याची अभूतपूर्व कामगिरी भगवती हे बजावीत आहेत.

संदर्भ :

  • मुसमाडे, मंजूषा, मागोवा अर्थविचारांचा, जुन्नर, २००५.
  • The Economic Times, 2011.

समीक्षक ꞉ ज. फा. पाटील