टोकाझुर्क, ओल्गा : (२९ जानेवारी १९६२). पोलिश कवयित्री, कादंबरीकार आणि सामाजिक कार्यकर्ती. तिला २०१८ चा साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे (२०१९ मध्ये सन्मानित). तिचा जन्म शिक्षकी पेशा असणाऱ्या कुटुंबात सुलेच्यू, पोलंड येथे झाला. तिचे बालपण खेड्यात व्यतीत झाले. खेड्यातील जीवन, तेथील लोकजीवन हा तिच्या आस्थेचा विषय होता. तिच्या वडिलांनी तिला परिसरातील अनेक लोककथा बालपणी सांगितल्या होत्या. कालांतराने तिचे कुटुंब वॉर्सा येथे स्थायिक झाले. वॉर्सा येथील विद्यापीठात तिने मानसशास्त्रात पदवी प्राप्त केली. १९८५ मध्ये पदवी घेतल्यानंतर तिने क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट म्हणून नोकरी केली पण ते काम समाधानकारक नसल्याने निराशेने नोकरी सोडली. वॉर्सा युनिव्हर्सटिीत परिचय झालेल्या रोमन फिनागास हिच्याशी तिचे लग्न झाले होते. पब्लिशिंग ही प्रकाशनसंस्था या दोघांनी काही काळ चालविली. महाविद्यालयीन जीवनात कार्ल गुस्ताव युंग या मानसशास्त्रज्ञाच्या लेखनाने ती प्रेरित होती. १९८६ नंतरच्या काळात तिच्या लेखनाला सुरुवात झाली. महाविद्यालयीन साहित्य स्पर्धांमध्ये तिला पारितोषिके मिळत असत. त्याचदरम्यान तिच्या कविता तत्कालीन नियतकालिकांतून प्रकाशित होत होत्या. Miasta w lustrach (इं.शी. Cities in a mirror) हा तिचा काव्यसंग्रह १९८९ मध्ये प्रसिद्ध झाला.

ओल्गा टोकाझुर्क हिचे साहित्य : काव्यसंग्रह – Miasta w lustrach (Cities in a mirror, १९८९);  कादंबरी – Podróz ludzi ksiegi ( इं.शी. द जर्नी ऑफ द बुक पीपल – १९९३), Prawiek i inne czasyl (इं.शी. Primeval and Other Times, १९९६), Dom dzienny, dom nocny (इं.शी. House of Day, House of Night, १९९८), Ostatnie historie (इं.शी. The Last Storiesl,२००४), Beiguni (इं.शी. Flights, २००७), Drive Your Plow Over the Bones Of the Dead (२००९), siegi Jakubowe (इं.शी. The Books of Jacob,२०१४).   Beating on Many Drums हे तिचे लघुकथांचे पुस्तक प्रकाशित आहे. याशिवाय कमरे और अन्य कहानियाँ (२०१४) हा तिचा हिंदीतून अनुवादित असलेला लघुकथांचा संग्रहही उपलब्ध आहे.

ओल्गा टोकार्झुक या शतकानुशतकांच्या पौराणिक कथांमधील आशय, दृष्टिकोन आणि तेथे उपस्थित झालेली मानवी जीवनातील गुंतागुंत मांडू पाहणाऱ्या कादंबरीकार म्हणून ओळखल्या जातात. आपल्या कल्पनेने कथानकातून मानवी जीवनाचे एक नवे रूप त्या व्यक्त करतात, म्हणून त्यांच्या लेखनाचे विशेष कौतुक झाले. फ्लाइट्स  या त्यांच्या कादंबरीला मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळेपर्यंत देशाबाहेर प्रसिद्ध लेखिका म्हणून त्या फार परिचित नव्हत्या.  Primeval and Other Times  ही त्यांची एक कादंबरी लक्षणीय कादंबरी आहे. या कादंबरीमध्ये पौराणिकतेतील मानवी अस्तित्त्वाचे मिथकाच्या आधारे अधोरेखन केले आहे. फ्लाइटस या कादंबरीत लेखिकेने जीवन आणि मृत्यूबद्दल एक कथा मिथकाद्वारे प्रकट केली आहे. या कादंबरीचे इंग्रजी भाषांतर हे जेनिफर क्रॉफ्ट यांनी केले असून प्रभात रंजन यांनी या कादंबरीच्या एका भागाचे इंग्रजीमधून हिंदीमध्ये भाषांतर केले आहे. पोलंडच्या इतिहासाची छाननी करण्याच्या प्रयत्नामुळे टोकार्झुक ह्या त्यांच्या देशातील वादग्रस्त लेखिका ठरल्या. विशेषत: त्यांच्यावर उजव्या विचारसरणीच्या राष्ट्रवादयांनी त्यांच्यावर टीका केली. यूरोपमध्ये पोलंडला राष्ट्र म्हणून एक सार्वभौम ओळख असावी अशा पद्धतीची राष्ट्रवादाची चळवळ पोलंडमध्ये निर्माण झाली आहे. या दरम्यान पोलंडचा इतिहास हा वसाहतिक भूमिकेने भारलेला आहे अशा आशयसूत्राचे लेखन तिने केले असल्याने तिच्यावर टीका झाली आहे. जगभरात देशी राष्ट्रवादाची नवी कट्टर रूपे पुढे येत असताना तिचे लेखन हे विचार तेवत ठेवणारे आहे.बंडखोर विचारांची लेखिका म्हणून त्यांचे वेगळेपण उठून दिसणारे आहे.

टोकार्झुक यांनी आपल्या लेखनासाठी मिथाकाधारे एक शैली, एक भाषा आणि आविष्काराचा एक नवीन मार्ग शोधला आहे. कल्पिताबरोबर ललित निबंधासारखं गद्य, विसंगत वाटणारी कथानकं असे प्रयोग तिने तिच्या निवेदनात केले आहेत. ती स्वतः तिच्या लेखनातील कथानकांना नक्षत्रकथा म्हणून संबोधिते. अर्थात तिच्या कादंबऱ्यातील कथानके ही स्वतंत्र आहेत; मात्र नक्षत्राच्या प्रारूपाने त्या एकमेकांशी निगडित आहेत. पौराणिक मिथके आणि समकालीन जीवन यांनी तिचे लेखन सुसंबद्ध झाले आहे. कादंबर्‍या लिहिणे म्हणजे स्वतःला परीकथा सांगणे अशा मनोभूमिकेतून तिने लेखन केले आहे. त्यांच्या लेखनात भावनांचा वेगळा पोत दिसतो. त्यांची पात्रेही वेगळी आहेत. आजच्या जगात मानव जात ही भटक्यासारखी जगते, सतत काहीतरी मिळवून पुढे चालण्याची ही वृत्ती व मानवी  शरीराची मर्त्यता त्यांना खुणावते. टोकार्झुक हया एक अत्यंत समीक्षात्मक स्तरावर आणि भाषांतरित लेखन करणाऱ्या पोलिश लेखकांपैकी एक आहेत. नव्वदच्या दशकात पोलिश साहित्यात निर्विवादपणे आपला ठसा त्यांनी उमटवला. त्यांच्या लेखनाला समीक्षक आणि वाचक या दोघांनीही दाद दिली. त्यांच्याकडे ज्ञान, साहित्यिक कौशल्य, तत्वज्ञानविषयक खोली आणि कथाकथनासाठी आवश्यक असलेल्या लोकप्रियतेची गहनता आहे. ओल्गा टोकार्झुक यांची ओळख ही केवळ लेखिका एवढीच नाही तर त्या कार्यकर्त्या व विचारवंतही आहेत.

नोबेल पुरस्काराव्यातिरिक्त त्यांना द जर्नी ऑफ द बुक-पीपल’ या कादंबरीला पदार्पणासाठीचे सर्वोत्कृष्ट पोलिश पब्लिशर्स असोसिएशन पारितोषिक  (१९९३), Bieguni या कादंबरीसाठी त्यांना पोलंडचा प्रतिष्ठित निके (Nike) पुरस्कार (२००८),  फ्लाइट्स या कादंबरीसाठी मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार (२०१७) इत्यादी महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

संदर्भ :