ग्लुक, लुईस : ( २२ एप्रिल १९४३ ). २०२० मध्ये साहित्याचे नोबेल मिळालेल्या लुईस ग्लुक या अमेरिकन कवयित्री आणि निबंधकार म्हणून परिचित. न्यूयॉर्क येथे जन्मलेल्या आणि गेल्या सहा दशकांपासून सातत्याने कविता लेखन करणार्‍या या कवयित्रीचे आजपर्यंत एकूण १२ कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत. लुईस ग्लुक यांचे सुरूवातीचे वास्तव्य हे लॉन्ग आयलंड येथे राहिलेले आहे तर कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. अग्निमांद्य या आजाराने त्रस्त असतांनाच त्या कवितेकडे वळल्या. लुईस अवघ्या पंचवीस वर्षांच्या असतांना प्रकाशित झालेल्या फर्स्ट बॉर्न (१९६८) या त्यांच्या कविता संग्रहाने कवितांची वैशिष्ट्यपूर्ण शैली, अल्पाक्षरत्व आणि भावना यामुळे समीक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

द हाऊस ऑफ मार्शलँड (१९७५) या दुसर्‍या संग्रहानंतर त्यांची गणना अमेरिकेतील महत्त्वाच्या कवींमध्ये होऊ लागली. त्यानंतर डिसेंडिंग फिगर (१९८०) आणि द ट्रम्फ ऑफ ॲशिलिश (१९८५) हे कवितासंग्रह प्रकाशित झाले. १९९० मध्ये आलेल्या ॲराराट  या संग्रहातून कौटुंबिक आयुष्यातील विषय, बुद्धिमत्तेचा साधेपणातून परिचय आणि त्यांच्या रचनेतील सफाई हे तीन वैशिट्य प्रामुख्याने लक्षात येतात. व्हीटानोव्हा (१९९९) मधून हरवलेले प्रेम साजरे करणे असो वा फेथफुल अँड व्हर्चुअस (२०१४) मधील कवितांमधून मृत्युकडे सहजतेने आणि लक्षणीय दिमाखात पाहणे असो, त्यांच्या कविता म्हणजे आयुष्यातील घटनांची काव्यात्मता आहे जी वैयक्तिकतेला वैश्विकता बहाल करते. ९ /११ च्या हल्ल्यानंतर त्यांनी ऑक्टोबर  ही सहा भागात विभागलेली दीर्घ कविता लिहिली आणि अमेरिकन नागरिकांच्या मनाची भयग्रस्त अवस्था यात शब्दबद्ध केली. मिथकांचा अचूक वापर करत ही कविता आधुनिक जगण्याचे प्रतिबिंब मांडते. तर ॲव्हर्नो (२००६) या संग्रहातून डिडो, पार्सफानी आणि युरिडायस यासारख्या ग्रीक साहित्यातील व्यक्तिरेखा ह्या फसवणूक झालेल्या, नाकारल्या गेलेल्या, शिक्षेस सामोरे गेलेल्या लोकांचे प्रतीक म्हणून ताकदीने कवितेत येतात. त्यांच्या कवितांचा नैसर्गिक स्वर, प्रांजळपणा, भावनिकता आणि अल्पक्षरातील काव्यात्मता ही काही ठळक वैशिट्य आहेत. त्यांच्या सुरुवातीच्या कवितांमधून बालपण, आई-वडील आणि भावंडासोबतचे नाते, कौटुंबिक नातेसंबंध हे विषय प्रामुख्याने आहेत ज्यात बालपण आणि तारुण्याला ग्रीक आणि रोमन मिथकांची जोड आहे. निरागसतेचा ऱ्हास, वेदना आणि पडझड, वैयक्तिक अनुभव आणि इतरांचे अनुभव, ट्रामा, स्वप्न आणि भ्रम यामध्ये असणारा ‘स्व’ आणि त्यातून ‘स्व’ साठी उरणार्‍या बाबी, ‘स्व’ ची ओळख, जीवनाचा अर्थशोध, एक स्त्री म्हणून लिंगभावावर आधारित भूमिका आणि त्यांचा ऊहापोह, सामाजिक धारणा आणि स्त्रीचे शरीर अस्तित्व हे विषय केंद्रस्थानी आहेत. बारा कवितासंग्रह आणि प्रुफ्स अँड थिअरीज : एसेज ऑन पोएट्री (१९९४) आणि अमेरिकन ओरीजनॅलीटी : एसेज ऑन पोएट्री  ही दोन निबंधांची पुस्तके आणि द गार्डन आणि ऑक्टोबर  ही दोन चॅप बुक्स नावावर असणार्‍या या कवयित्रीला गगेनहाम फेलोशिपसह विल्यम्स फॉले आणि मिडलबरी कॉलेजने मानद विद्यावाचस्पती ही पदवी प्रदान केलेली आहे. प्रसिद्धी पराङ्मुख असणार्‍या लुईस ग्लुक यांना अमेरिकेतील सर्व महत्वाचे पुरस्कार व सन्मान लाभले आहेत, ज्यात नॅशनल बुक क्रिटिक्स अवॉर्ड (१९८५), पुलित्झर पुरस्कार (१९९३), बेलिगन प्राइझ (२००१), यू एस पोएट लॉरेट (२००३), नॅशनल बुक अवॉर्ड (२०१४) आणि नॅशनल हयूमॅनिटीज मेडल (२०१५) यांचा समावेश आहे. वैयक्तिक आयुष्यात १९६७ मध्ये लग्न, नंतर लगेचच घटस्फोट याला सामोरे गेलेल्या ग्लुक यांना गोडार्त महाविद्यालयातील जॉन ड्रानऊ यांची साथ मिळाली.  १९७३ मध्ये मुलाचा जन्म आणि १९७७ मध्ये लग्न केलेल्या ग्लुक यांनी यानंतर आयुष्याचा मोठा प्रवास केला; परंतु वैयक्तिक आयुष्यात दु:ख आणि वेदनेने त्यांची साथ सोडली नाही. वडिलांचा मृत्यू, पुन्हा १९९६ मध्ये घटस्फोट आणि त्यामूळे जॉन ड्रानऊ समवेत स्थापन केलेल्या ‘न्यू इंग्लंड कलीनरी इंस्टिट्यूट” यासंबंधाची गुंतागुंत यावर मात करत आयुष्याचा दीर्घ प्रवास केलेल्या ७७ वर्षीय लुईस ग्लुक यांनी स्टानफोर्डसह अनेक विद्यापीठात अध्यापन केलेय आणि आता त्यांचे वास्तव्य मॅसॅंचुसेट्स मधील केंब्रिज येथे असून त्या येल विद्यापीठात अध्यापन करतात.

संदर्भ :