मॉरीसन, टोनी :  (१८ फेब्रुवारी १९३१- ५ ऑगस्ट २०१९).साहित्यातील सर्वोच्च असा नोबेल पुरस्कार मिळविणाऱ्या अमेरिकन इंग्रजी साहित्यिका. अमेरिकेतील ओहियो प्रांतात जन्मलेल्या टोनी मॉरीसन या एक कादंबरीकार, निबंध लेखक, संपादक, शिक्षक आणि प्रिन्स्टन विद्यापीठातील प्राध्यापक म्हणून सर्वपरिचित आहेत. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून बी.ए. इंग्रजी आणि कोर्नेल विद्यापीठातून अमेरिकन साहित्यात एम.ए. ची पदवी संपादन केली. वैयक्तिक आयुष्यात लग्न, मुलं, घटस्फोट असे अनेक चढ उतार पाहिलेल्या आणि जगभरातील स्त्रिया आणि आफ्रिकन–अमेरिकन लोक यांच्या वेदनेचा आणि विद्रोहाचा आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या लेखिकेने आपल्या कादंबरीतून जीवनाचे प्रत्ययकारी चित्रण केले. त्यांच्या एकूण अकरा कादंबऱ्या या केवळ अमेरिकनच नव्हे तर जगभरातील साहित्यातही अतिशय महत्वाच्या आहेत.

वयाच्या ३९ व्या वर्षी हार्वर्ड विद्यापीठात कवी–लेखकांच्या एका अनौपचारिक भेट-चर्चेमध्ये टोनी यांनी निळे डोळे हवे असणाऱ्या एका कृष्णवर्णीय मुलीची कथा वाचली, जी पुढे द ब्लूएस्ट आय (१९७०) या कादंबरीत रुपांतरीत झाली आणि तिथेच टोनी यांचा कादंबरीकार म्हणून प्रवास सुरु झाला. त्यांचे प्रकाशित साहित्य पुढीलप्रमाणे : कादंबरी –  द ब्लूएस्ट आय (१९७०), सुला (१९७३), सॉंग ऑफ सालोमन (१९७७), टारबेबी (१९८१), बिलव्हेड (१९८७), जाझ (१९९२), पॅराडाईझ (१९९७) लव्ह (२००३), अ मर्सी (२००८); संपादित ग्रंथ – ब्लॅक बुक (१९७४), कॉन्टेम्पररी आफ्रिकन लिटरेचर (१९७२); याशिवाय ड्रिमिंग एमेट्ट (१९८६) आणि डेस्डीमोना (२०११ ) ही दोन नाटके आणि बालवाचकांसाठीची द बिग बॉक्स (१९९९) आणि रिमेंबर (२००४) यासह आणखी काही पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.

स्त्रियांच्या आयुष्याला केंद्रवर्ती ठेऊन दोन कृष्णवर्णीय मुलींची मैत्री, बदलत्या काळानुसार त्यातील उतार चढाव त्यांनी सुला  या कादंबरीमधून मांडले. कृष्णवर्णीय स्त्रियांच्या इच्छा, आकांक्षा आणि त्यांना सामोरे जावे लागणारे सामाजिक वास्तव हा गाभा असणारी ही कादंबरी स्त्रीचे आयुष्य मांडतानाच मानवी आयुष्य आणि नातेसंबंध यातील गुंतागुंतीवर प्रकाश टाकते. उन्मुक्त जीवनाचा ध्यास आणि चाकोरीबद्ध जीवन याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वास्तवाच्या दोन्ही बाजू यातून समोर येतात. बदलाची आस, अस्थिरता, मानसिक–भावनिक आंदोलने याबरोबरच जीवनाच्या अपूर्णतेचे सावट आणि समाजाचा वैयक्तिक जीवनातील हस्तक्षेप यांना धरून असणारा स्त्री वेदनेचा आणि विद्रोहाचा धागा त्यांनी त्यांच्या कादंबऱ्यांतून वेगवेगळ्या आयामांनी उलगडला आहे. आत्मभानाचा प्रवास, स्त्रियांची शारीरिक–मानसिक–सांस्कृतिक वेदना, विद्रोह आणि भगिनीभाव यांचे वास्तव आणि मर्मभेदी चित्रण त्यांनी आपल्या लिखाणातून केले. वंशभेद आणि गुलामगिरीच्या इतिहासाने एका मोठ्या समूहाची झालेली प्रातिनिधिक ससेहोलपट आणि त्यानंतरचा जगण्याचा अथक संघर्ष त्यांच्या कादंबऱ्या अधोरेखित करतात.

आफ्रिकन–अमेरिकन म्हणून जगतांना आपली मूळं शोधण्याची धडपड, असोशी आणि आफ्रिकन परंपरेशी घट्ट बांधलेली नाळ हा टोनी यांच्या लेखनाचा विशेष आहे. यात जोडून ठेवणारी, आयुष्याला बळ पुरविणारी गोष्ट म्हणून परंपरा येते, त्यामागे अनेक वर्षांच्या गुलामगिरीचा हृदयद्रावक इतिहास आहे. त्याचप्रमाणे प्राप्त परिस्थितीत न चुकलेला वांशिक संघर्ष आणि उपरेपणाची करून देण्यात येणारी जाणीवही आहे. हिंसा, नाकारलेपण, अस्तित्वाचा संघर्ष, छुपा आणि उघड वंशवाद, जगण्यासाठी साधनांचा शोध या सगळ्या पार्श्वभूमीवर टोनी यांच्या कादंबऱ्यात लक्षणीय आहे तो मौखिक परंपरेचा ठाम उच्च्चार, सगळी साधनं हिरावली गेली, विस्थापन आले, भौगोलिक अंतर वाढले, निर्बंध आले, स्थलांतर करावे लागले तरीही आफ्रिकन-अमेरिकन लोकांचं गाणं त्यांच्याजवळ राहिलं. याचं फार प्रत्ययकारी चित्रण अनेक संदर्भांनी त्यांच्या लिखाणात येते.

स्त्रीपुरुष संबंधाचे वास्तववादी चित्रण करणाऱ्या टोनी यांनी स्त्रियांच्या अथक परिश्रमाचे, आर्थिक अभावाचे आणि कुटुंबाची जबाबदारी घ्यावी लागण्याचे टोकदार वास्तव मुखर केले आहे. हे संबंध भूतकाळातील इतिहासाने तणावपूर्ण आहेत, नात्यातून वजा होण्याचे आहेत तसेच नात्यातील मर्म उलगडणारे ही आहेत. ‘स्त्रीवादी लेखिका’ हे बिरूद टोनी यांना मान्य नसले तरीही त्यांचे लिखाण हे स्त्रीकेंद्री आहे. विपरीत परिस्थितीत आशावादी असणारा भगिनीभाव त्यांच्या कादंबरीत प्रकर्षाने जाणवतो.

कृष्णवर्णीयांचे साहित्य मुख्य प्रवाहामध्ये आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. ब्लॅक बुक  या संपादित ग्रंथातून त्यांनी अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचे जीवन छायाचित्रे, निबंध आणि इतर माध्यमातून मांडले. कॉन्टेम्पररी आफ्रिकन लिटरेचर  हा ग्रंथ म्हणजे टोनी यांनी नायजेरियन लेखक वोल सोयिंका, चीनुआ अचेबी आणि दक्षिण आफ्रिकी लेखक ॲथोल फुगार्ड यांच्या साहित्याचे केलेले एकत्रित स्वरूप आहे. याशिवाय नव्या तरुण आफ्रिकन–अमेरिकन लेखकांना त्यांनी दिलेलं प्रोत्साहन अनुकरणीय आहे. एका प्रस्थापित लेखकाने टोनी केड बाम्बरा, अन्जला डेविस, ह्यू न्यूटन आणि गेल जोन्स या उमेदीने लिहिणाऱ्या लेखकांना शोधलं आणि जगासमोर आणलं. आपल्या स्वतंत्र लिखाणाव्यतिरिक्त जागतिक कीर्तीचे मुष्टीयोध्ये महमद अली यांचे द ग्रेटेस्ट: माय ओन स्टोरी (१९७५) हे आत्मचरित्र आणि हेन्री डोम्स या लेखकाच्या अकाली अपघाती मृत्यूनंतर त्याची कादंबरी व कविता यांचे लेखन–प्रकाशन त्यांच्या नावावर असणे ही त्यांच्यातील लेखक व माणूस म्हणून असणाऱ्या उत्तरदायित्वाची साक्ष आहे.

अत्यंत मानाच्या नोबेल पुरस्काराव्यतिरिक्त (१९९३) पुलित्झर पुरस्कार, नॅशनल बुक क्रिटीक सर्कल अवॉर्ड, नॅशनल बुक फौंडेशन अवॉर्ड, अमेरिकेचे प्रेसिडेन्शिअल मेडल ऑफ फ्रीडम, नॅशनल हयुमॅनिटीज मेडल, कॉमनवेल्थ अवॉर्ड, पेन ओकलंड अवॉर्ड असे प्रतिष्ठेचे सन्मान त्यांना मिळाले आहेत. याशिवाय रॅडम हाउस या महत्वाच्या प्रकाशन संस्थेच्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला संपादक होण्याची नोंद देखील त्याच्या नावावर आहे. त्यांचा जगण्याचा मार्ग, लेखनाविषयीची भूमिका, ठामपणा आणि समाजाप्रती असणारी कणव यामुळे देश–वंश–काळ–भाषा यांना ओलांडून त्यांचे लिखाण जगभर मान्यता पावले. कादंबरीकार म्हणूनच प्रामुख्याने जागतिक ओळख असणाऱ्या, आफ्रिकन-अमेरिकन माणसाच्या खऱ्या स्वातंत्र्याचा उच्च्चार करणाऱ्या आणि स्वातंत्र्याचे खरे कार्य हे दुसऱ्याला स्वतंत्र करणे आहे यावर अढळ विश्वास असणाऱ्या टोनी मॉरीसन या अमेरिकन साहित्यातील एक महत्त्वाच्या लेखिका आहेत.

संदर्भ :