पुणे येथे पेशवाईत बांधलेले प्रसिद्ध मंदिर. पुण्यातील सदाशिव पेठेत सावकार रघुनाथ सदाशिव उर्फ दादा गद्रे यांनी मुरलीधराचे मंदिर बांधले (१७९९). सदाशिव पेठेत गद्रे सावकारांची बाग होती. मुरलीधराची मूर्ती घडविण्यासाठी जयपूरहून बखतराम नावाच्या एका प्रसिद्ध मूर्तिकारास पुण्यात आणण्यात आले. त्याच्या पसंतीने शुभ्र संगमरवराचा पाषाण आणून मुरलीधर, राधा व चार गायी अशा मूर्ती बनविण्यात आल्या. मुरलीधराची मूर्ती एका पायावर उभी असून हातामध्ये मुरली आहे. मूर्तीचा संपूर्ण भार एकाच पायावर तोललेला असून आधारासाठी मागे प्रभावळ नाही. मूर्ती १ फूट ११ इंच व राधेची मूर्ती १ फूट ८.५ इंच आहे. सिंहासन २-२.५ फूट उंचीचे व सोळा कोनांचे असून एकसंध काळ्या पाषाणातील आहे. या कामाबद्दल बखतराम यास दहा हजार रुपये देण्यात आले होते.

प्रवेशद्वार, खुन्या मुरलीधर मंदिर, पुणे.

मंदिराला खुन्या मुरलीधर हे नाव पडण्याच्या संदर्भात दुसरा बाजीराव व नाना फडणीस यांची नावे घेतली जातात. ही मूर्ती या दोघांना हवी होती व त्यातून झालेल्या रक्तपातातून खुन्या नाव पडले, असे सांगितले जाते. तथापि वस्तुस्थिती वेगळी आहे. वासुदेवशास्त्री खरे यांनी ऐतिहासिक लेखसंग्रहाचे पंधरा खंड लिहिले असून त्यांत मिरजकर पटवर्धनांच्या संग्रहातील अस्सल कागद छापले आहेत. यांमधील दहाव्या खंडात या मुरलीधरासंदर्भात दोन पत्रे आहेत. मुरलीधराची स्थापना झाली तेव्हा पटवर्धनांचा वकील तेथे उपस्थित होता. काय झाले ते प्रत्यक्ष पाहून त्याने पटवर्धनांना ती घटना पत्र लिहून कळविली. त्यानुसार, मुरलीधराची स्थापना गद्रे यांनी स्वतः केली. त्या वेळेस तेथे चौकीवर इंग्रज अधिकारी मेस्तर बेट, त्याचा कंपू (मेस्तर बेट म्हणजे इंग्रजी नावाचे पत्रलेखकाने केलेला अपभ्रंश) व अरब लोक होते. मेस्तर बेट व अरब यांच्यात तेथे भांडणे झाली. त्या वेळेस दादा गद्रे तेथे गेले व समजूत घालू लागले. परंतु भांडणे कमी न होता गोळीबार सुरू झाला. तेव्हा गद्रे नाना फडणीस यांच्याकडे गेले व झालेला प्रकार सांगितला. नाना फडणीसांनी भांडणे सोडविण्यास चोपदार पाठविला, तर तोच गोळी लागून जखमी झाला. गोळीबारावर हे प्रकरण न थांबता दोन्ही बाजूनी तोफांचा भडीमार सुरू झाला. तेव्हा नाना फडणीसांनी त्याच्या वाड्यापुढे जे अरब होते त्यांना पाठविले. अरबांनी कंपूची पांगापांग केली. तोफा सोडवून आणल्यावर ही मारामारी संपली. याच पत्रात शहरातील काही तमासगीर जखमी झाले, तसेच श्यामसूंदर नावाच्या घोड्याच्या पायास गोळा लागला व तो जखमी झाला, असेही म्हटले आहे. दुसऱ्या पत्रात अंदाजे पन्नास माणसे ठार पडली, असा उल्लेख आहे. या घटनेनंतर पुढे पन्नास वर्षे या मंदिराचा उल्लेख खुन्या असा झालेला आढळत नाही.

सदाशिव पेठेत ज्या दिवशी मुरलीधराची स्थापना झाली, त्याच दिवशी नाना फडणीस यांनी नानावाड्यात कालिया मर्दनाची सोन्याची मूर्ती स्थापन केली होती. पुढे शंभर वर्षांनी १८९९ साली वासुदेव चाफेकर व महादेव विनायक रानडे यांनी गणेश शंकर व रामचंद्र शंकर या द्रविड बंधूंना सदाशिव पेठेतील गद्रे यांच्या या मंदिरानजीक गोळ्या घातल्या. त्या वेळेस चापेकर व रानडे यांच्यासोबत त्यांचे मित्र खंडो विष्णू साठे हेही होते. यामुळे या मंदिरास खुन्या मुरलीधर असे नाव पडले.

संदर्भ :

  • जोशी, ल. ना. खुन्या मुरलीधर, पुणे नगर संशोधन वृत्त, खंड – २, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे, १९४३.
  • जोशी, वि. श्री. कंठस्नान आणि बलिदान, (द्वितीय आवृत्ती), मुंबई, १९८६.

                                                                                                                                                                                       समीक्षक : भासवती सोमण