महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील प्रसिद्ध भुईकोट किल्ला. उदगीर हे लातूर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असून लातूरपासून ६५ किमी. अंतरावर वसले आहे. उदगीरच्या आसपास पसरलेल्या टेकड्यांना ‘उदयगिरी’ हे नाव असावे, त्यावरून ‘उदगीर’ हे नाव पडले, असा एक मतप्रवाह आहे. तसेच उदगीर किल्ल्यातील उदागीर बाबांच्या नावावरून उदगीर हे नाव अस्तित्वात आले असावे, असे म्हटले जाते.
उदगीरचा किल्ला ज्या टेकडीवर वसलेला आहे, ती टेकडी एका खोल दरीतील दोन खोऱ्यांच्या आत आहे. किल्ल्याच्या पश्चिमेला व पूर्वेला या खोऱ्यांचे फाटे फुटलेले आहेत, तर उत्तरेला मोठी दरी आहे. म्हणजेच पूर्व, पश्चिम व उत्तरेस नैसर्गिक खोरे व दक्षिणेस उदगीर शहर वसलेले आहे.
उदगीर शहराच्या उत्तरेस चौबारा ते किल्ला वेस या मार्गाने पुढे भुईकोट किल्ला दिसतो. किल्ल्याभोवती खंदक असून सर्वत्र त्याची उंची व रुंदी समान दिसत नाही. खंदक पार करून पहिल्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्यासाठी खंदकावर एक दगडी पूल आहे. खंदकाची भिंत दगडी असून उदगीरच्या पश्चिमेस असणाऱ्या तलावातील पाणी यात सोडण्याची व्यवस्था होती. खंदक पार केल्यानंतर किल्ल्याचा बाह्य तट लागतो. तटाचा परीघ ६७० मी. असून उंची ९ मी. आहे. आतील तटबंदी बाह्यतटापेक्षा खूप उंच आहे. किल्ल्यातील एकूण बुरुजांची संख्या १९ आहे. पहिल्या तटाला १२ बुरूज असून त्यावर सैनिक व तोफा ठेवण्याची सोय आहे. दुसऱ्या तटास सात बुरूज असून त्यांपैकी पूर्वेकडे व पश्चिमेकडे असलेल्या दोन मुख्य बुरुजांना अनुक्रमे ‘जमना’ व ‘चांदणी’ अशी नावे आहेत. हे दोन्ही विशाल आकाराचे टेहळणी बुरूज असून त्यांवरून आसपासच्या प्रदेशावर नजर ठेवली जात असे. याशिवाय दोन्ही तटांवरून बंदुकींचा मारा करण्यासाठी तटांना जागोजागी जंग्या ठेवलेल्या आहेत.
पहिल्या तटात किल्ल्याचे प्रवेशद्वार असून त्याची उंची १२ मी. व रुंदी २.२५ मी. आहे. याच्या कवाडांवर लोखंडाचे मजबूत आवरण आहे. डाव्या हातास काटकोनात असलेल्या या प्रवेशद्वारासमोर भिंत असल्याने तेथे पोहोचेपर्यंत ते दिसत नाही. हे प्रवेशद्वार पार केल्यानंतर उजवीकडून सरळ मार्गाने उदागीर बाबाच्या मठाकडे जाता येते. पहिल्या प्रवेशद्वारापासून दुसरे प्रवेशद्वार १७ मी. दूर अंतरावर आहे. दोन्हींच्या दरम्यानच्या मार्गावर सैनिकांसाठी कमानीदार चौक्या आहेत. दुसरे प्रवेशद्वारही पहिल्या प्रवेशद्वारासारखे मजबूत असून ते दुसऱ्या तटात बांधले आहे. येथील एका चौकीतून राजवाड्यात जाण्याचा एक गुप्त मार्ग आहे. तिसऱ्या प्रवेशद्वाराची उंची पहिल्या दोन प्रवेशद्वारांपेक्षा तुलनेने अधिक आहे. हेही अतिशय मजबूत असून त्यास ‘अंधारी दरवाजा’ या नावाने ओळखले जाते. दुसऱ्या व तिसऱ्या प्रवेशद्वारादरम्यान दोन्ही बाजू मिळून १० चौक्या असून त्यांतील सहाव्या चौकीतून वरील भागात जाण्याचा गुप्त मार्ग आहे. या प्रवेशद्वारानंतर राजवाडा चौकात प्रवेश करता येतो.
किल्ल्याच्या बाह्य तटाच्या सर्व बुरुजांवर तोफा ठेवण्याची सोय आहे. सध्या किल्ल्यात १२ लहान-मोठ्या तोफा आहेत. पूर्वेकडील जमना बुरुजावर येथील सर्वांत मोठी ‘पंचरशी’ तोफ आहे. चांदणी बुरुजावरही ३ मी. लांबीची मकराकृती मुख असलेली तोफ आहे. किल्ल्यात काही गुप्त मार्ग आहेत. किल्ल्याच्या उत्तरेस नक्षी महालाच्या पाठीमागे बुरुजाच्या बाजूने बाहेर पडण्यासाठी एक गुप्त मार्ग आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यांनतर समोर अनेक छोट्या-मोठ्या आकाराच्या वास्तू दिसतात. किल्ल्याच्या पूर्वेकडे उंच महाल आहे, यास राजवाडा म्हटले जाते. या राजवाड्यावर पडझडीच्या अवस्थेत असलेली ‘गगन महाल’ ही वास्तू बहमनी कालखंडातील कलेचा उत्तम नमुना समजली जाते. बहमनी कालखंडानंतर बांधलेल्या राजवाड्याची वास्तू किल्ल्याच्या तिसऱ्या प्रवेशद्वाराच्या बाजूस आहे. या वास्तूत कमानींच्या आधारे अनेक महाल किंवा दालने उभारण्यात आली होती. त्यांतील काही बऱ्यापैकी शाबूत आहेत, तर काही सध्या अवशेष रूपात दिसतात.
किल्ल्याच्या उत्तर भागात भग्न स्वरूपातील ‘खास महाल’ कमानींनी जोडलेल्या १८ दगडी खांबांवर उभा आहे. याच्या तिन्ही बाजूंस इतर महाल आहेत. दिवाण-इ-खास किल्ल्याच्या उत्तर भागातील नक्षी महालासमोर जीर्ण अवस्थेत आहे. याचा दर्शनी भाग उत्तरेकडे असून समोर चौकोनी हौद आहे. दिवाण-इ-आम ही वास्तू खास महालाच्या पूर्वेकडे आहे. ‘नक्षीमहाल’ दक्षिणाभिमुख असून समोरच दिवाण-इ-खास ही वास्तू दिसते. नक्षी महालाच्या कमानींवर वेलबुट्टीची सुंदर नक्षी आहे. दिवाण-ए-खास महालाच्या बाजूस धान्याचे कोठार आहे. किल्याच्या तिसऱ्या दरवाजाशेजारील ‘जनानखाना’ ही दुमजली वास्तू किल्ल्यातील सर्वांत भव्य वास्तू आहे. वरच्या मजल्यावर कमानदार घुमटाकृती सज्जात झरोके आहेत. या वास्तूस दोन प्रवेशद्वारे असून त्या व्यतिरिक्त एक गुप्त द्वारही आहे. वरच्या मजल्यावर जनानखाना आहे. निजाम काळात येथे तहसील कचेरी होती. याच्या पश्चिमेस ‘गादी महाल’ आहे. तहसील कचेरीच्या ओट्यास लागून हाफीज मौलाना मोइनुद्दीनची कबर आहे. या कबरीच्या पश्चिमेला सु. ३१ मी. अंतरावर दुमजली रंगीन महाल आहे. या वास्तूच्या वरील भागातून किल्ल्याचा पश्चिमेकडील खंदक आणि दूरवरचा प्रदेश दिसतो. ही वास्तू शिपाई व सरदारांच्या करमणुकीचे महत्त्वाचे साधन होते.
किल्ल्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या दरवाजादरम्यान तहसील कचेरीच्या अंगणातून डावीकडे वळल्यास खातमखान किल्लेदाराचे जुने घर लागते. येथे एक शिलालेख असून त्यातील नोंदीनुसार खातमखानाने १६८५ मध्ये याचे बांधकाम केले. अंधार बावडीच्या बाजूला असलेल्या बुरुजामागे सजावारूल मुल्कचे घर आहे. तिथे खातमखानाचे घर पार करून जावे लागते. तेथील कमानीवर दोन्ही बाजूस दोन शिलालेख असून त्यात मुर्तझा निजामशहाच्या काळात ही इमारत बांधली गेल्याचे म्हटले आहे. किल्याच्या पश्चिमेस दुमजली हमामखाना आहे. तहसील कचेरीच्या दक्षिणेला तीन कमानीयुक्त जामा मशीद असून समोर एक सुंदर अष्टकोनी हौद आहे. जामा मशीद समोरील रस्त्याने शमशाद महालाकडे जाता येते. जामा मशिदीच्या पूर्वेस साधारणतः २१.५ मी. अंतरावर अच्छी बेगमची माडी नावाची तीन मजली पूर्वाभिमुख वास्तू आहे. या वास्तूत सुंदर नक्षीकाम आहे. या ठिकाणाहून पूर्वेकडील पूर्ण खंदक व दूरवरचा प्रदेश दिसतो. अच्छी बेगमच्या माडीच्या उत्तर-पश्चिमेस किल्ल्याच्या दुसऱ्या तटाच्या आतील भिंतीत लागून रोशन महाल आहे. या वास्तूचे दोन भाग असून दोन्हींना मिळून ‘रोशन महाल’ म्हटले जाते. किल्ल्याच्या पूर्वेस बुरुजा इतक्या उंचीच्या दुमजली वास्तूचा बराचसा भाग पडलेला आहे, यास ‘हवा महाल’ म्हटले जाते. यास मनोरा असून वास्तूच्या बाजूच्या भिंतीत कबुतरखाना तयार करण्यात आला होता. उदागीर मठाजवळील विहिरीतून संपूर्ण किल्ल्यास पाणीपुरवठा केला जाई.
किल्ल्यात एखाद्या हिंदू किंवा जैन मंदिराचे स्तंभ, गर्भगृहातील जलकुंभ, गजथर शिल्पपट्ट, भारवाहक इ. अवशेष दिसतात. यांतील बऱ्याच शिल्पांचा पुनरुपयोग किल्ल्यासाठी केलेला दिसतो. बहुधा इतर किल्ल्यांप्रमाणे येथील परिसरातही पूर्वी एखादे मंदिर, विशेषतः यादवकालीन मंदिर, असावे. याशिवाय उदगीर शहरात गुंड्याचा बाग, बाग-ए-मकबूल, बाग-ए-किला, बाग-ए-मेहमुदी, बाग-ए-हिस्साम, बाग-ए-शामपेठ इ. मध्ययुगीन उद्याने आहेत. बाग-ए-हिस्साम आकर्षक असून तीन मजली आहे. ही वास्तू मोगल बादशाह शाहजहान (१५९२–१६६६) याच्या काळात तयार झाली (१६५४). या व्यतिरिक्त या परिसरात काही दर्गे, मशिदी व मंदिरे आहेत.
उदगीरवर वेळोवेळी यादव, काकतीय, बहमनी, बरीदशाही, निजामशाही, आदिलशाही, इमादशाही, मोगल, मराठे व हैदराबादच्या निजामांनी राज्य केले. यादव राजा दुसरा सिंघण (कार. १२१०–४६) याच्या कारकिर्दीत उदगीर ‘अंबादेश’ मंडळातील देशविभागाचे स्थान होते. याचा एक उल्लेख यादवांच्या राजवटीतील सेनापती खोलेश्वर याच्या अंबाजोगाई येथील १२२८ (शके ११५०) च्या एका शिलालेखात ‘उदगिरी’ या नावाने आलेला आहे. उदगीर हे काकतीयांच्या सरहद्दीवरील ठाणे असल्यामुळे तेथे यादव सैन्याची छावणी होती. काकतीयांच्या गणपती नावाच्या राजाने उदगीरवर ताबा मिळविल्याचा उल्लेख त्याच्या उपरपल्ली शिलालेखात (इ. स. १२३५) आलेला आहे. यादवांनी हा प्रदेश पुन्हा परत मिळविला, अशी माहिती कान्हरदेव यादवाच्या १२५८ च्या कान्हेगाव लेखातून मिळते. कान्हरदेवाच्या राजवटीत उदगीरदेश हे लातूर मंडळातील गोपाल राष्ट्रौड याच्या अधिकार कक्षेत समाविष्ट होते. महानुभाव साहित्यातील नोंदीवरून व महिकावतीच्या बखरीनुसार रामचंद्र यादवाचा पुत्र भिल्लम (सहावा) हा यादव राजवटीच्या अखेरीस उदगीरचा शासक असल्याची माहिती मिळते.
चौदाव्या शतकात हा भाग बहमनी राजवटीच्या ताब्यात गेला. उदगीर येथील किल्ला कधी व कोणाच्या राजवटीत बांधला याची ठोस माहिती मिळत नाही. या किल्ल्याचा सर्वप्रथम उल्लेख बहमनी सुलतान शिहाबुद्दीन महमूद (कार. १४८२-१५१८) याच्या काळात मिळतो. दस्तूर दिनार या सरदाराचे बंड यशस्वीपणे मोडून काढल्याप्रीत्यर्थ कुली कुतुब यास वैयक्तिक खर्चासाठी त्याने हा किल्ला एका वर्षासाठी दिला होता. १४९२ मध्ये कासीम बरीदलाही औसा आणि कंधार येथील किल्ल्यांबरोबर उदगीरचा किल्ला जहागिरी म्हणून दिल्याचा उल्लेख मिळतो.
पुढे कासीम बरीदने आपला पुत्र अमीर बरीदला हा किल्ला दिला (१५०४). बहमनींच्या विघटनानंतर १५१७ मध्ये बरीद आणि माहूरचा जहागीरदार खुदावंदखान हबशी यांच्यात उदगीर येथे लढाई होऊन हबशी मारला गेला व किल्ला पुन्हा अमीर बरीदच्या ताब्यात राहिला. अमीर बरीदच्या काळात आदिलशाहीबरोबर संघर्ष सुरू झाला होता. अमीरच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र अली बरीदशाह सुलतान बनला. त्याच्या काळात बुऱ्हाण निजामशहाने उदगीर किल्ला जिंकून नंतर इमादशाहाकडे सुपुर्द केला (१५४८). परंतु इमादशाहाने दयाभाव दाखवून पुन्हा तो बरीदकडे सुपुर्द केला. त्यानंतर बरीच वर्षे हा किल्ला बरीदशाहीकडे राहिला. त्यानंतर मुर्तझा निजामशहा (कार. १५६५–१५८८) याने तो निजामशाहीत समाविष्ट करून घेतला.
खान दौरान या मोगल सरदाराने निजामशाहीकडून हा किल्ला घेतला (१६३६). तसेच मोगलखान कोका याची या किल्ल्याचा किल्लेदार म्हणून नियुक्ती केली गेली (१६३७). तसा उल्लेखही किल्ल्यातील एका कमानीवरील फार्सी शिलालेखात आहे. १७२४ पर्यंत सजावरखान उल्मुल्क, खातमखान व अन्य मोगल उदगीर किल्ल्याचे किल्लेदार होऊन गेले. १६८५ मध्ये खातमखानाने या किल्ल्यात काही वास्तू बांधल्या संबंधीचा एक शिलालेख आहे. १७१५ मध्ये मोगल-मराठे यांच्यात तह होऊन या प्रदेशातून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचे हक्क मराठ्यांना मिळाले होते. १७२४ मध्ये हा किल्ला निजामाकडे गेला. १७६० मध्ये येथे मराठे व निजाम यांच्यात उदगीरची प्रसिद्ध लढाई झाली. यात मराठ्यांनी निजामाचा पराभव करून तहात ६० लक्ष रुपयांचा मुलूख मिळवला. परंतु पुढच्याच वर्षी पानिपतच्या लढाईच्या संकटामुळे या तहाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. मराठ्यांकडून या लढाईचे नेतृत्व सदाशिवराव भाऊ यांनी केले होते. १८१९ व १८२० मध्ये निजाम राजवटीविरुद्ध मराठवाड्यात बंड झाले. त्यांपैकी उदगीर येथील देशमुखांचे बंड प्रसिद्ध आहे. १८२० मधील या उठावात देशमुखाने हा किल्ला बळकावला होता. १९४८ साली उदगीर स्वतंत्र भारतात सामील केले गेले. १९५६ पर्यंत उदगीर कर्नाटकातील बीदर जिल्ह्यात समाविष्ट होते. परंतु राज्य पुनर्रचनेनंतर ते उस्मानाबाद जिल्ह्यात तालुक्याचे ठिकाण बनले.
संदर्भ :
- Thosar, H. S. Studies in the Historical and Cultural Geography and Ethnography of Marathwada, (Unpublished Ph.D. Thesis), Aurangabad Marathwada University, Aurangabad, 1977.
- कुंटे, भ. ग. अहमदनगरची निजामशाही, मुंबई, १९६२.
- कुंटे, भ. ग. गुलशने इब्राहिमी, फरिश्ता लिखित ‘गुलशन-ई-इब्राहिमी’ या ग्रंथाचा अनुवाद, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई. १९८२.
- महाराष्ट्र राज्य गॅझेटिअर, लातूर जिल्हा भाग-२, मुंबई, २००८.
- राठोड, रा. था. उदगीर : इतिहास आणि स्मारके, उदगीर, १९६८.
समीक्षक : जयकुमार पाठक