सतराव्या आणि अठराव्या शतकांमध्ये यूरोपमध्ये घडून आलेली बौद्धिक चळवळ ज्ञानोदय ह्या नावाने ओळखली जाते. ह्या काळात ईश्वर, विवेक (Reason), निसर्ग आणि मानव ह्यांच्याबद्दलच्या कल्पनांचे संश्लेषण एका व्यापक जागतिक दृष्टिकोणात करण्यात आले आणि हा दृष्टिकोण मोठ्या प्रमाणावर स्वीकारला गेला. त्यामुळे कला, तत्त्वज्ञान, राजकारण ह्यांसारख्या अनेक क्षेत्रांत क्रांतिकारक बदल घडून आले. विवेकाचा गौरव करून त्याचा उपयोग केला पाहिजे, हा ज्ञानोदयाचा मध्यवर्ती विचार होता. विवेकशक्तीने विश्व काय, हे जाणता येते आणि मनुष्याला स्वतःच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणता येते. ज्ञान, स्वातंत्र्य आणि सुख ह्यांची प्राप्ती हे विवेकनिष्ठ व्यक्तीचे उद्दिष्ट असले पाहिजे अशी धारणा निर्माण झाली. ज्ञानोदय ही केवळ चळवळ नव्हती, तर ती मनाची एक अवस्थाही होती. ज्ञानोदय ह्या संज्ञेने यूरोपच्या बौद्धिक इतिहासाचा एक टप्पा निर्देशित होतो. त्याचप्रमाणे ह्या जगापेक्षा अधिक चांगले जग निर्माण होणे शक्य आहे, हा बुद्धिमंतांचा विश्वासही प्रकट होतो.
विवेकाच्या शक्ती आणि त्यांचे उपयोग ह्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न प्राचीन ग्रीकांनीही केला होता. निसर्गात आढळून येणारी नियमबद्ध व्यवस्था पाहून यामागे अतिशय बुद्धिमान असे मन असावे, असे ग्रीकांनाही वाटत होते. रोमनांनी बरीचशी ग्रीक संस्कृती–विशेषतः निसर्गव्यवस्था आणि निसर्गनियम ह्यांच्याबाबत–आत्मसात केली होती. पुढे साम्राज्याच्या काळात मुक्तिप्राप्तीचा विचार सुरू झाल्यानंतर ख्रिस्ती धर्माच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. आपल्या ग्रीक-रोमन वारशाची उपयुक्तता ख्रिस्ती विचारवंतांच्या लक्षात आली. मध्ययुगातील श्रेष्ठ धर्मशास्त्रज्ञ व तत्त्वचिंतक थॉमस अक्वायनस याच्या कार्याकडे स्कोलॅस्टिक तत्त्वज्ञानाच्या विशाल प्रवाहाच्या संदर्भात पाहता येते. प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञान आणि ख्रिस्ती धर्मश्रद्धेत अंतर्भूत असलेले सिद्धांत ह्यांचा समन्वय साधणे हे ह्या तत्त्वज्ञानाचे उद्दिष्ट होते आणि अक्वायनसने ते समर्थपणे तडीस नेले. आकलनाचे साधन म्हणून अक्वायनसने विवेकाला मानले; तथापि ईश्वराने प्रकट केलेल्या सिद्धांतांची तार्किक व्यवस्था लावण्याचा प्रयत्न अक्वायनसच्या ईश्वरविद्येत आहे.
मध्ययुगात अभेद्य वाटणाऱ्या ख्रिस्ती धर्माच्या बौद्धिक आणि राजकीय इमारतीला मानवतावाद, प्रबोधनकाल आणि मार्टिन ल्यूथरची धर्मसुधारणेची चळवळ यांनी धक्के दिले. फ्रान्सिस बेकन (१५६१–१६२६) हे आधुनिक विज्ञानाचे प्रेषित होते. भविष्यकाळात वैज्ञानिक संशोधनाचे संघटन होणार याची त्यांना पूर्वकल्पना होती. त्या दृष्टीने त्यांनी काही सूचनाही जेम्स राजापुढे ठेवल्या होत्या. माणसांनी पद्धतशीरपणे निरीक्षण करावे आणि त्यातून जी माहिती मिळेल तिचा चिकित्सकपणे अर्थ लावावा, प्रयोग करावे आणि अज्ञात निसर्गनियम शोधून काढावे, असे त्यांचे प्रतिपादन होते. ज्ञान म्हणजे शक्ती होय, अशी त्यांची धारणा होती. निकोलेअस कोपर्निकस (१४७३–१५४३) हे सतराव्या शतकाच्या कक्षेत येत नसले, तरी पृथ्वी गोल असून ती स्वतःभोवती फिरते आणि सर्व ग्रह पृथ्वीभोवती नव्हे, तर स्थिर अशा सूर्याभोवती फिरतात, ह्या त्यांच्या प्रतिपादनामुळे गॅलिलीओ गॅलिली (१५६४–१६४२) ह्यांची दुर्बिण, योहानेस केप्लर (१५७१–१६२९) ह्यांचे गतीविषयीचे नियम आणि आयझॅक न्यूटन (१६४२–१७२७) ह्यांचे गुरुत्वाकर्षणाचे नियम ह्यांना चालना मिळाली.
आधुनिक तत्त्वज्ञानाचे जनक असलेले आणि गणितातही मौलिक भर घालणारे रने देकार्त (१५९६–१६५०) आणि थोर तत्त्वज्ञ व गणितज्ञ गोटफ्रीट व्हिल्हेल्म लायप्निट्स (१६४६–१७१६) यांचीही नावे ज्ञानोदयाच्या संदर्भात महत्त्वाची आहेत. गणिताच्या पद्धतीवर निसर्गाचे एकसंध ज्ञान आधारता येईल आणि हे आपले जीवितकार्य आहे अशी त्यांची धारणा होती. त्यांना ज्ञानाची तर्कशुद्ध आणि भक्कम पायावर उभारणी करायची होती आणि प्रमाण ज्ञानात भर पडत राहील, अशी व्यवस्था लावून द्यायची होती. लायप्निट्स हे आयुष्यभर बौद्धिक व्यापारात रमले.
सोळाव्या शतकात धर्मसुधारणेचे आंदोलन सुरू झाले आणि ख्रिस्ती धर्मातील प्रॉटेस्टंट पंथाचा प्रवर्तक जर्मन धर्मोपदेशक मार्टिन ल्यूथर (१४८३–१५४६) ह्याने १५३७ मध्ये आपले प्रसिद्ध ९५ सिद्धांत (Thesis) जाहीर केले, तेव्हापासून धर्मसुधारणेच्या चळवळीला प्रारंभ झाला आणि एक आंदोलन ह्या स्वरूपात ही चळवळ एका शतकाहून अधिक काळ टिकली. यूरोपचे धार्मिक, वैचारिक आणि राजकीय जीवन ह्या चळवळीने ढवळून काढले. यूरोपचा कायापालट करणारी ही चळवळ होती. ह्या चळवळीने व्यक्तिस्वातंत्र्याचे मूल्य धार्मिक जीवनात आणले. धर्माच्या किंवा अध्यात्माच्या क्षेत्रात सत्य काय आहे, ह्याचा निर्णय व्यक्तीला स्वतंत्रपणे करता येतो, हा ह्या चळवळीमागचा एक मूलभूत सिद्धांत होता. व्यक्तिस्वातंत्र्याचे हे मूल्य नंतर जीवनाच्या सर्वच अंगांत रुजले. व्यक्तिस्वातंत्र्याबरोबरच समता आणि ऐहिक जीवनाची स्वायत्तता ही मूल्येही यूरोपीय संस्कृतीत रुजली. बेकन काय, देकार्त काय आणि ल्यूथर काय, सत्याकडे जाणारा मार्ग मानवी विवेकाच्या माध्यमातून जातो, असेच मानत होते.
आता, कुठल्याही प्रश्नासाठी विवेकाचे यशस्वी उपयोजन करावयाचे असेल, तर त्यासाठी विवेकाधिष्ठित विचार करण्याचे एक पद्धतिशास्त्र (Methodology) विकसित करावे लागते. हे पद्धतिशास्त्र स्वतःच स्वतःच्या प्रामाण्याची खात्री असते. असे पद्धतिशास्त्र गणितात आणि विज्ञानांत साध्य करता आले. विगामी आणि निगामी तर्कशास्त्रांमुळे नव्या विश्वस्थितिशास्त्राची निर्मिती करणे शक्य झाले. सर आयझॅक न्यूटन ह्यांना ग्रहगतींचे नियम काही थोड्या गणिती समीकरणांतून मांडणे शक्य झाले आणि ज्ञान प्राप्त करून घेण्याच्या माणसाच्या क्षमतेवरील विश्वासही वाढला. त्याच वेळी विश्व ही काही नियमांनी बांधली गेलेली यंत्रणा आहे, ही कल्पना प्रसृत झाली आणि परमेश्वर, व्यक्तिगत मुक्ती ह्या ख्रिस्ती धर्माच्या केंद्रीय संकल्पनांवर तिचा प्रतिकूल परिणाम झाला. त्यातून अटळपणे विवेकाची रीत प्रत्यक्ष धर्मालाच लागू करण्यात आली. नैसर्गिक, विवेकाधिष्ठित धर्माच्या शोधातून देववाद निर्माण झाला. देववाद हा सनातन ख्रिस्ती मताचा नव्हता. देववाद्यांच्या बौद्धिक आस्थेचे तीन प्रभावस्रोत होते : (१) मानवी विवेकशक्तीवरील विश्वास, (२) श्रद्धावाद आणि असहिष्णुतेला जन्म देणाऱ्या साक्षात्काराचा धार्मिक दाव्यांवर अविश्वास आणि (३) सुव्यवस्थित अशा जगाचा विवेकी, प्रज्ञावंत असा शिल्पकार अशी ईश्वराची प्रतिमा. ईश्वर एक आहे; तो चांगल्या कृत्यासाठी बक्षीसही देतो आणि पापाचे प्रायश्चित्तही देतो, अशी देववादाची भूमिका होती.
ज्ञानोदयाच्या चळवळीच्या तीन शतके आधी यूरोपच्या प्रबोधनकाळात (१४ वे, १५ वे, १६ वे अशी ही तीन शतके) मानवतावादी आंदोलनाचा प्रारंभ झाला होता. मानवी जीवनमूल्ये ही अंतिम मूल्ये होत. तसेच माणूस हा ज्ञानाने स्वतःला बदलणारा आणि विकसित होणारा असा प्राणी आहे, स्वतःचे हित साधणे वा न साधणे ह्याबाबत त्याला स्वातंत्र्य आहे; मानवाच्या हातातच त्याचे भवितव्य आहे; ऐतिहासिक परिस्थिती निर्माण करण्याचे वा बदलण्याचे त्याला स्वातंत्र्य आहे, मानवच सर्व अस्तित्वाचा मानदंड आहे, अशा विचारसरणीचे समर्थन मानवतावादाने केले. मानवतावादानेही ख्रिस्ती धर्माच्या चौकटीला धक्के दिले होते.
देववाद हा संघटित असा पंथ कधीच नव्हता; तथापि त्याने दोन शतके ख्रिस्ती धर्माशी संघर्ष केला. विशेषतः फ्रान्स आणि इंग्लंडमध्ये हे घडले.
ज्ञानोदयाने मानसशास्त्राच्या आणि नीतिशास्त्राच्या पहिल्या आधुनिक, धर्मनिरपेक्ष अशा प्रणाली निर्माण केल्या. इंद्रियानुभव हाच मानवी ज्ञानाचा एकमेव उगम आहे आणि मानवी ज्ञानाचे प्रामाण्य इंद्रियानुभवावर आधारलेले असते, ही विचारसरणी मानणारा अनुभववादी तत्त्वज्ञ जॉन लॉक (१६३२–१७०४) ह्याने माणसाच्या मनाविषयी असा सिद्धांत मांडला की, मानवी मन जन्मतः कोऱ्या पाटीसारखे असते आणि त्याच्यावर पुढे जे काही लिहिले जाते, ते इंद्रियानुभवांकडून लिहिले जाते. असे जे जगाचे अनुभव लिहिले जातात, त्यांतून माणसाचा स्वभाव घडत जातो. जन्मजात चांगुलपणा किंवा मानवाचे आद्य पाप (Original Sin) ही वास्तवता नाही. थॉमस हॉब्स ह्यांनी केवळ स्वतःच्या सुखदुःखांच्या विचाराने कार्यप्रवण होणारा, असे मानवाचे चित्र उभे केले. माणूस चांगला नाही आणि वाईटही नाही; त्याला मुख्यतः आपल्या जीवितामध्ये (Survival) स्वारस्य असते; स्वतःचे जास्तीत जास्त सुख तो जपत असतो, ह्या अधिकल्पनेने अनेक मौलिक राजकीय प्रणाली जन्माला घातल्या. राज्य हे एका शाश्वत, चिरंतन अशा व्यवस्थेचे पृथ्वीवरील रूप असून मानवनिर्मित बहर हे ईश्वरी शहराच्या प्रतिरूपावर आधारलेले आहे हा विचार मागे पडला आणि राज्य म्हणजे प्रत्येकाचे नैसर्गिक हक्क आणि हितसंबध रक्षण करणारी; परस्परांना लाभदायक अशी एक व्यवस्था आहे, हा विचार पुढे आला. झां झाक रूसो (१७१२–१७७८) ह्याची सामाजिक कराराची प्रणाली ज्ञानोदयाच्याच काळातली. त्याचप्रमाणे माँतेस्क्यू (१६८९–१७५५) आणि व्हॉल्तेअर (१६९४–१७७८) (फ्रान्स); जॉन लॉक आणि जेरेमी बेंथॅम (१७४८–१८३२) (इंग्लंड); टॉमस जेफर्सन (अमेरिका) ह्या सर्वांनी प्राधिकारवादी राज्याची चिकित्सा केली आणि माणसाच्या नैसर्गिक हक्कांची जपणूक करणाऱ्या उच्च मूल्यांवर अधिष्ठित असलेल्या आणि राजकीय लोकशाहीच्या रूपात कार्यरत होईल अशा एका सामाजिक संघटनेचे रूप घडविण्यात आपले योगदान दिले. माँतेस्क्यूने आपल्या लॅत्र पॅसीन (पर्शियनलेटर्स) ह्या ग्रंथातून यूरोपमधील–विशेषतः फ्रान्समधील–समाज, धर्म, नीती, तत्त्वज्ञान अशा सर्व सांस्कृतिक घटकांवर उपरोधप्रचुर टीका केली. द्लेप्री दे ल्वा (द स्पिरिट ऑफ द लॉज) ह्या त्याच्या ग्रंथात निरंकुश राजेशाहीच्या जुलुमी कारभारावर अंकुश कसा ठेवता येईल, ह्याबद्दलचा त्याचा विचार आढळतो. इस्त्वार द् शार्ल द् झ (१७३१) मध्ये व्हॉल्तेअरने युद्धखोरीपेक्षा संस्कृती संपन्न करणे आवश्यक आहे, असा विचार मांडला असून स्वीडनचा राजा बारावा चार्ल्स ह्याच्या युद्धखोरीवर त्याने टीका केली आहे. त्याने लिहिलेली २५ पत्रे लॅत्र फिलोझोफीक (१७३४) ह्या नावाने पुस्तकरूप झाली आहेत. त्यात त्याने फ्रान्सिस बेकन, जॉन लॉक, सर आयझॅक न्यूटन ह्यांच्या विचारपद्धतीकडे लक्ष वेधले. ल् सियॅक्ल द लूई कार्तोझ (१७५१) हा त्याचा महत्त्वाचा इतिहासग्रंथ. राजेरजवाडे आणि युद्धे ह्यांमध्ये इतिहासाला सीमित करण्यापेक्षा समाज, मानवी मन आणि संस्कृती ह्यांच्या अभ्यासाला त्याच्या ह्या ग्रंथात त्याने महत्त्व दिले. राजेरजवाड्यांना ‘इतिहासा’तून हद्दपार करण्याची कृती पश्चिमी समाजात राजेशाहीच्या साक्षात अंताकडे घेऊन जाणारी ठरली. जॉन लॉक ह्याचे राजकीय विचार टू ट्रीटिझिस ऑफ गव्हर्नमेंट (१६९०) मध्ये व्यक्त झाले आहेत. टू ट्रीटिझिस …मध्ये समाविष्ट असलेल्या दोन प्रबंधांपैकी पहिल्यात लॉकने राजांच्या तथाकथित ईश्वरदत्त अधिकारावर हल्ला चढवला. त्याचा आणखी एक निर्देशनीय राजकीय विचार म्हणजे जे लोक कायदे करतात, त्यांना त्या कायद्यांची अंमलबजावणी करण्याचा अधिकार असू नये. तसे केल्यास त्या अधिकारांची अंमलबजावणी स्वतःच्या बाबतीत न करण्याचा मोह त्यांना होऊ शकतो. अधिकारांचे असे विभाजन राज्यघटनेतच नमूद करायला हवे, असे त्याचे प्रतिपादन होते. पुढे ह्याच तत्त्वाचा फ्रेंच राजकीय तत्त्वज्ञ माँतेस्क्यू याने विकास केला. जेरेमी बेंथॅम हा इंग्लंडमधील उपयुक्ततावादी नैतिक पंथाचा संस्थापक. राज्यसंस्थेची घडण कशी असली पाहिजे, राज्यसंस्थेचे अधिकार कोणते असले पाहिजेत, राज्यसंस्थेच्या संदर्भात नागरिकांची कर्तव्ये काय आहेत, ह्या प्रश्नांची उत्तरे उपयुक्ततावादाच्या दृष्टिकोणातून त्याने दिली. बेंजामिन फ्रँक्लिन (१७०६–१७९०) हे अमेरिकेच्या संस्थापक जनकांपैकी एक. अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. ब्रिटिशांच्या हुकूमशाहीविरुद्ध ते उभे राहिले. अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याच्या मसुदा समितीत ते होते. स्वतंत्र अमेरिकेच्या संविधानाचे स्वरूप निश्चित करून (१७८७) ते सर्वानुमते मान्य होण्यासाठी त्यांनी मोठे परिश्रम केले. अमेरिकेतील गुलामगिरीविरुद्ध स्थापन झालेल्या संस्थेचे ते अध्यक्ष होते. तसेच शुद्ध विज्ञानात आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवणारे ते पहिले अमेरिकन शास्त्रज्ञ होते.
ज्ञानोदयाची चळवळ अनेक कारणांमुळे अस्तंगत झाली. देववाद्यांचा धर्म जसजसा एका लहानशा वर्तुळात संकोचत गेला, तसतसा त्याच्यापासून ज्यांना मानसिक शांततेची आणि मुक्तीची आस होती, अशांना देण्यासारखे फारसे काही उरले नाही. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर दहशतीचा काळ (Reign of Terror) आला. माणूस स्वतःला नियंत्रित करू शकतो, ह्या विश्वासाची त्यामुळे कसोटी लागली. ज्ञानोदयाच्या विचाराने जो एक आशावाद निर्माण केला होता, त्यातून एक गोष्ट ह्या चळवळीचा टिकाऊ वारसा म्हणून मागे उरली आणि ती म्हणजे माणसाचा इतिहास हा सर्वसाधारण प्रगतीचा इतिहास होय, हा विश्वास.
संदर्भ :
- Cassara, Ernest, The Enlightenment in America, 1988.
- Cassirer, Ernst; Koelln, Fritz C. A.; Pettegrove, James P. Tr. The Philosophy of the Enlightenment, Boston, 1955.
- Crocker, Lester G. An Age of Crisis : Man and World in the 18th Century French Thought, Greenwood, 1980.
- Deane, Seamus, The French Revolution and The Enlightenment in England, Harvard, 1988.
- Dupré, Louis, The Enlightenment and the Intellectual Foundations of Modern Culture, New Haven, 2004.
- Eze, Emmanuel Chukwudi, Ed. Race and the Enlightenment : A Reader, Cambridge, 1997.
- Fleischacker, Samuel, What is Enlightenment? (Kant’s Questions), New York, 2013.
- Gay, Peter, The Enlightenment : An Interpretation, 2 Vols., Norton, 1977.
- Hampson, Norman, The Enlightenment : An Evaluation of its Assumptions, London, 1968.
- Himmelfarb, Gertrude, The Roads to Modernity : The British, French and American Enlightenments, London, 2008.
- Israel, Jonathan, A Resolution of the Mind : Radical Enlightenment and the Intellectual Origins of Modern Democracy, Princeton, 2009.
- Kramnick, Isaac, Age of Ideology : Political Thought, 1750 to the Present, New York, 1979.
- Mell, Donald C. & Others, Ed. Man, God and Nature in the Enlightenment, New York, 1988.
- O’Hara, Kieron, The Enlightenment : A Beginner’s Guide, Oxford, 2010.
- https://www.bl.uk/restoration-18th-century-literature/articles/the-enlightenment
- https://courses.lumenlearning.com/boundless-worldhistory/chapter/the-enlightenment/
- https://www.history.com/topics/british-history/enlightenment
- https://iep.utm.edu/amer-enl/
- https://plato.stanford.edu/entries/enlightenment/
- https://www.sup.org/books/pages/1103/Chapter%201.pdf