थोर ग्रीक तत्त्वज्ञ ॲरिस्टॉटल याची शिष्यपरंपरा. ॲरिस्टॉटलने प्रस्थापित केलेल्या लायसिअम पीठाच्या प्रांगणात एक छायाच्छादित मार्ग−पेरिपॅटॉस−होता आणि त्यावरून फिरत फिरत ॲरिस्टॉटल आपल्या शिष्यांना शिकवीत असे. ह्यामुळे लायसिअममध्ये विकसित झालेल्या विचारपंथाला ‘पेरिपॅटेटिक’ हे नाव पडले. ह्या पंथाच्या इतिहासाचे तीन भाग पडतात : (१) स्ट्रेटोच्या मृत्यूपर्यंतचा प्रारंभीचा काळ (इ.स.पू. ३२२−२७०); (२) स्ट्रेटो ते अँड्रॉनिकस हा अवनतीचा कालखंड (इ.स.पू. २७०−७०) आणि (३) शेवटचा कालखंड (इ.स.पू. ७० ते इ.स. २३०).

(१) प्रारंभीचा कालखंड व तत्त्ववेत्ते :  रोड्झचा युडीमस (इ.स.पू. चौथे शतक) हा ॲरिस्टॉटलच्या आवडत्या शिष्यांपैकी एक होता. त्याने भौतिकी, तर्कशास्त्र आणि पदार्थप्रकार ह्या विषयांवर ग्रंथ लिहिले आहेत. शिवाय अंकगणित, ज्योतिष आणि भूमिती ह्यांचे इतिहासही त्याने लिहिले. पण ॲरिस्टॉटलनंतर युडीमस हा लायसिअमचा प्रमुख न होता थिओफ्रॅस्टस (इ.स.पू. ३२२ ते २८८) तिचा प्रमुख झाला. ॲरिस्टॉटलने निर्माण केलेल्या सबंध विस्तृत ज्ञानभांडाराचा हा खराखुरा वारस होता. तर्कशास्त्रात त्याने संवाक्याच्या पहिल्या आकृतीची नवी व्याख्या केली आणि चौथ्या आकृतीच्या पाच संघातांचा तिच्यात अंतर्भाव केला. तसेच त्याने सोपाधिक आणि वैकल्पिक संवाक्यांची दखल घेतली. ॲरिस्टॉटलच्या तत्त्वमीमांसेचे त्याने चिकित्सक विवरण केले. भौतिकीतील विविध मतांचा आणि सिद्धांतांचा इतिहास त्याने लिहिला, वनस्पतिशास्त्रावर दोन ग्रंथ रचले आणि खनिजशास्त्रावरही लिखाण केले. नीतिशास्त्रात त्याने नव्याने उदयाला आलेल्या स्टोइक तत्त्वज्ञानाविरूद्ध ॲरिस्टॉटलच्या भूमिकेचे समर्थन केले आणि सुखप्राप्तीसाठी सद्गुणी असणे पुरेसे असते, ह्या स्टोइक मताचा प्रतिवाद केला. पारिक्रमिकी पंथातील पहिल्या पिढीचे दोन महत्त्वाचे तत्त्ववेत्ते म्हणजे ॲरिस्टॉक्सीनस (टरेन्टमचा रहिवासी) आणि डायकीआर्कस (मसीनीचा रहिवासी) हे होत. ॲरिस्टॉक्सीनस (इ.स.पू. चौथे शतक) हा प्रारंभी पायथॅगोरस (इ.स.पू.सु. ५७२−४९७) याच्या पंथाचा अनुयायी होता आणि त्याने पायथॅगोरस व ॲरिस्टॉटल यांच्या सिद्धांतांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. स्वरविज्ञानावर लिहिलेल्या ग्रंथामुळे तो प्रसिद्धी पावला होता. आत्मा म्हणजे शरीराच्या वेगवेगळ्या घटकांमधील सुसंवाद होय, ह्या पायथॅगोरसच्या मताचा त्याने अनुवाद केला आणि ह्या आधारावर आत्म्याच्या अमरत्वाचा सिद्धांत अमान्य केला. डायकीआर्कस (इ.स.पू. चौथे शतक) याने संस्कृतीच्या इतिहासावर एक ग्रंथ लिहिला होता. शिवाय ट्रायपॉलिटिकस ह्या आपल्या ग्रंथात राज्यव्यवस्थेच्या व संविधानांच्या वेगवेगळ्या प्रकारांचे त्याने विवेचन केले. थिओफ्रॅस्टसनंतर स्ट्रेटो (लँप्सकसचा रहिवासी) हा इ.स.पू. २८८ ते २७० पर्यंत लायसिअमचा प्रमुख होता. भौतिकी हा ह्याच्या संशोधनाचा प्रमुख विषय होता. विश्वातील घडामोडी आणि विकास हा केवळ वेगवेगळ्या नैसर्गिक शक्तींमुळे होतो, त्यांचा उलगडा करण्यासाठी निसर्गातीत असा ईश्वर मानण्याची आवश्यकता नाही, ह्या सिद्धांताचा त्याने पुरस्कार केला. मानसशास्त्रातही ज्ञानाचे स्वरूप, संवेदना, विचार, जाणीव इ. विषयांवर त्याने महत्त्वाचे विचार मांडले.

ह्या कालखंडात लायसिअम हे विविध ज्ञानशाखांतील अनुभवाधिष्ठित आणि चिकित्सक संशोधनाचे केंद्र होते. परंपरेने ॲरिस्टॉटलचा म्हणून मानण्यात येणारा जो ग्रंथसंभार आहे, त्यातील कित्येक भाग ह्या पारिक्रमिकी तत्त्ववेत्त्यांकडून लिहिले गेले असले पाहिजेत, असे अंतर्गत पुराव्याच्या आधारे दिसून येते. मज्जातंतूचा हीरॉफिलस (इ.स.पू.सु. ३००) आणि इरेझिस्ट्रेटस यांनी लावलेला शोध, तसेच लाखेच्या अंगी विद्युत्-धर्म असतात हा थिओफ्रॅस्टसचा शोध, हे ह्याच कालखंडात लावण्यात आले. लायसिअमपुढे सादर करण्यात आलेल्या, वेगवेगळ्या प्रश्नांवरील शोधनिबंधांचे ३८ खंडांचे समस्या ह्या नावाचे एक संकलनही उपलब्ध आहे.

(२) अवनतीचा कालखंड : स्ट्रेटोनंतर लायकॉन (इ.स.पू. तिसरे शतक, ट्रोॲसचा रहिवासी), त्यानंतर ॲरिस्टो (सीआसचा रहिवासी) त्याच्यामागून क्रिटोलेउस (इ.स.पू. दुसरे शतक), मग डायोडोरस (इ.स.पू. दुसरे शतक, टायरचा रहिवासी) आणि नंतर एरिम्नस अशी लायसिअमच्या प्रमुखांची परंपरा सांगता येईल. स्ट्रेटोनंतरच्या दोन शतकांत ह्या विचारपंथातून एकही पहिल्या दर्जाचा विचारवंत निपजला नाही. विज्ञान आणि तत्त्वमीमांसा ह्यांच्याऐवजी साहित्यिक, ऐतिहासिक, चरित्रात्मक, व्यावहारिक नीतिशास्त्र ह्या विषयांच्या अभ्यासावर भर दिला गेला. नीतिशास्त्रात स्टोइक तत्त्ववेत्त्यांनी प्रतिपादन केलेला निर्विकार वृत्तीचा आदर्श अमान्य केला आणि ‘चांगल्या जीवना’च्या संकल्पनेत सद्गुणासोबत भावनिक समाधान, शारीरिक सुख आणि बौद्धिक आनंद तसेच भौतिक साधनांची अनुकूलता यांनाही योग्य ते स्थान दिले गेले. पण एकंदरीत ह्या कालखंडात सखोल आणि तर्ककर्कश तात्त्विक विचारांचा अभावच आढळतो. चोख विचारांची जागा उथळ सर्वसंग्राहक वृत्तीने घेतलेली आढळते.

(३) शेवटचा कालखंड : इ.स.पू. पहिल्या शतकात ॲरिस्टॉटलने लिहिलेल्या जवळजवळ समग्र ग्रंथांचा परत शोध लागला. रोड्झचा रहिवासी अँड्रॉनिकस (इ.स.पू. सु. ७०) तेव्हा लायसिअमचा प्रमुख होता. त्याने हे सर्व ग्रंथ संपादन करून त्यांचा क्रम लावला. आज ॲरिस्टॉटलच्या ग्रंथांची जी हस्तलिखिते उपलब्ध आहेत, ती बहुधा ह्या आवृत्तीवर आधारलेली आहेत. ह्याशिवाय अँड्रॉनिकसने भौतिकी, पदार्थप्रकार आणि नीतिशास्त्र ह्या ॲरिस्टॉटलच्या ग्रंथांवर भाष्येही लिहिली. ह्यानंतर ह्या कालखंडात ॲरिस्टॉटलच्या ग्रंथांचे संपादन करणे, त्यांच्यावर भाष्ये लिहिणे आणि त्यांतील सिद्धांतांचे विवरण करणे, हे पारिक्रमिकी तत्त्ववेत्त्यांचे प्रमुख कार्य बनले. ह्या कालखंडातील सर्वांत प्रसिद्ध  आणि प्रभावी तत्त्ववेत्ता  म्हणजे अलेक्झांडर ॲफ्रोडिझिअस हा इ.स. १९५ ते २११  पर्यंत लायसिअमचा प्रमुख होता. ह्याने ॲरिस्टॉटलच्या तत्त्वमीमांसेवर लिहिलेले भाष्य बराचशा मूळ स्वरूपात उपलब्ध आहे. अलेक्झांडरनंतर पारिक्रमिकी पंथ, तत्त्वज्ञानाच्या इतर पंथांप्रमाणेच, नव-प्लेटोमतात विसर्जन पावला; पण तरीही पुढील तीन शतके ॲरिस्टॉटलच्या ग्रंथांवर भाष्ये लिहून त्यांतील सिद्धांतांचे विवरण करण्याचे काम जोराने चालूच राहिले. त्यानंतर ही कामगिरी अरबी व नंतर मध्ययुगीन स्कोलॅस्टिक तत्त्ववेत्त्यांकडे आली.

संदर्भ :

  • Baltussen, Han, Aristotle Heirs : An Introduction to the Peripatetic Tradition, Oxfordshire, 2016.
  • Coplestone, Frederick, A History of Philosophy from Thales to Present Time, Vols. I and II , London, 1961, 1962.
  • Fortenbaugh, William W. Ed. On Stoic and Peripatetic Ethics : The Work of Arius Didymus, New Jersey, 1983.
  • Sharples, R. W. Peripatetic Philosophy : 200 BC to AD 200, Cambridge, 2010.
  • https://www.e-torredebabel.com/greekphilosophy/theperipateticschool-burt.htm
  • https://iep.utm.edu/peripati/
  • https://oxfordre.com/classics/view/10.1093/acrefore/9780199381135.001.0001/acrefore-9780199381135-e-4870