हॉब्ज, टॉमस : (५ एप्रिल १५८८—४ डिसेंबर १६७९). ब्रिटिश राजकीय विचारवंत व तत्त्वज्ञ. त्यांचा जन्म वेस्ट पोर्ट (इंग्लंड) येथे एका धार्मिक, मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील वेस्ट पोर्ट व चार्लटन येथे पाद्री म्हणून काम करीत असत. टॉमस हॉब्ज हे त्यांचे दुसरे अपत्य होते. हॉब्ज यांचे सुरुवातीचे शिक्षण जन्मगावी झाले. ऑक्सफर्ड विद्यापीठातून वयाच्या विसाव्या वर्षी ते पदवीधर झाले (१६०८). त्यांनी काही काळ शिक्षकाची नोकरी केली. पुढे दुसऱ्या चार्ल्सचा शिक्षक म्हणूनही त्यांनी काम केले.

महाविद्यालयीन जीवनातच हॉब्ज यांचा संबंध थोर तत्त्वज्ञ फ्रान्सिस बेकन यांच्याशी आला. बेकन यांच्याप्रमाणेच ते ॲरिस्टॉटलवादाचे द्वेष्टे होते. त्यांनी फ्रान्सिस बेकन यांचे सचिव म्हणून अनेक वर्षे काम केले. तसेच विल्यम कॅव्हेंडिश यांचेही ते शिक्षक होते. पुढे कॅव्हेंडिश घराण्याशी त्यांचा सहवास दीर्घकाळ राहिला. १६१०–३७ दरम्यान ते कॅव्हेंडिश कुटुंबाबरोबर परदेशात होते. याच काळात त्यांनी प्राचीन ग्रीसमधील शास्त्रशुद्ध इतिहास लेखनपद्धतीचे जनक व इतिहासकार थ्यूसिडिडीझ यांच्या ग्रंथाचे भाषांतर प्रसिद्ध केले (१६२९). केप्लर, गॅलिलीओ, देकार्त इ. विचारवंतांचा त्यांच्यावर प्रभाव होता. हॉब्ज यांच्या मते ज्ञानप्रक्रियेतील पहिला भाग म्हणजे बाहेरील जगाचे इंद्रियांवरील परिणाम. प्रत्येक व्यक्तीत वेगळी असणारी रंग, रूप वगैरे संवेदने विषयगत असून बाह्य जगात गतीखेरीज काहीच नाही. पुसटवेदना म्हणजे स्मृती, अनुभव म्हणजे भूतकालीन वेदनांची स्मृती व भविष्यकालीन संवेदनांची अपेक्षा. एकसारख्या अनेक स्मृतींना एक नाव मिळते व भाषेची निर्मिती होते. सामान्ये अस्तित्वात नसून ती मनुष्यनिर्मित कल्पना होत. केवळ विशेषच अस्तित्वात असतात.

द शॉर्ट ट्रॅक्ट (१६३०), द एलेमेन्ट्स ऑफ लॉ नॅचरल अँड पॉलिटिक (१६४०), द थर्ड सेट ऑफ ऑब्जेक्शन्स टू देकार्तस् मेडिटेशन्स (१६४१), De Cive (१६४२), टॉमस व्हाइट्स डी मण्डो इक्झॅमिन्ड (१६४३), अ मायन्यूट ऑर फर्स्ट ड्राफ्ट ऑफ द ऑप्टिक्स (१६४६), लेव्हायथन (१६५१), ऑफ लिबर्टी अँड निसेसिटी (१६५४), De Corpore (१६५५), De Homine (१६५८), Behemoth (१६६८), Decameron Physiologicum (१६७८) हे त्यांचे काही उल्लेखनीय ग्रंथ होत. याशिवाय त्यांनी इलिअड व ओडिसी (१६७५) या श्रेष्ठ साहित्यकृतींचा इंग्रजी अनुवाद केला असून लॅटिन पद्यात आत्मवृत्त (१६७९) लिहिले आहे. हॉब्ज यांच्या मते, शब्दांच्या एकीकरणातून प्रतिज्ञा, विधानांच्या एकत्रीकरणातून संविधान, संविधानातून अनुमान व त्यातून विज्ञानाची निर्मिती होते. म्हणून सर्व ज्ञान गणिती छापाचे असते. चिन्हांचा योग्य संबंध म्हणजे सत्य; अयोग्य संबंध म्हणजे असत्य. शब्दांची योग्य व्याख्या देणे, हे तत्त्वज्ञानाचे पहिले कर्तव्य आहे. लेव्हायथन या ग्रंथात त्यांनी राजकीय तत्त्वज्ञानाचे व्यापक विवेचन केले असून त्यांनी या ग्रंथास एका प्रचंड जलचर प्राण्याचे नाव दिले आहे. दुःसह्य रानटी अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी मनुष्याने आपापसांत करार केला आणि त्यातून सार्वभौम सत्तेची उत्पत्ती झाली, असे सामाजिक कराराचे विवेचन या ग्रंथात त्यांनी केले आहे.

हॉब्ज यांचे सत्ताशास्त्र म्हणजे जडद्रव्य व गती यांबद्दलचा सिद्धांत. हे सत्ताशास्त्र म्हणजे भौतिकशास्त्रच आहे. गती म्हणजे यांत्रिक आवश्यकता. स्वरूप कारण व प्रयोजक कारण अस्तित्वात नसून फक्त निमित्तकारणेच अस्तित्वात असतात. वस्तू नैसर्गिक व कृत्रिम किंवा मनुष्यनिर्मित असून तदनुसार नैसर्गिक व नागरिक असे दोन प्रकारचे तत्त्वज्ञान असते. मनुष्यनिर्मित राज्याची कल्पना हॉब्ज दुसऱ्या प्रकारात घालतात.

द एलेमेन्ट्स ऑफ लॉ… या ग्रंथात हॉब्ज यांनी मन व ईश्वर यांबाबत जडवादच खरा आहे; बाह्य वस्तूंमुळे होणारे वेदन मेंदूपाशी न थांबता हृदयापर्यंत जाते; तेथे ज्याप्रमाणे ते प्राणतत्त्वाच्या गतीला मदत किंवा अडथळा करते, त्याप्रमाणे सुख किंवा दुःख होते व सुखदुःखाच्या साहचर्याने वस्तू हव्याशा किंवा नकोशा वाटतात, असा विचार मांडला आहे. त्यांच्या या विचारात साहचर्यवादी मानसशास्त्राचे मूळ आहे. मन विशुद्ध जडद्रव्य असून अभिमान, धैर्य, आशा, लज्जा, प्रेम इ. सर्वच जडद्रव्याच्या गती आहेत. आत्मस्वातंत्र्याची कल्पना चुकीची आहे. मनुष्य व पशू यांत केवळ अंशाचा फरक आहे. वस्तू कमी-अधिक सूक्ष्म असून सूक्ष्म वस्तू इतर वस्तूंना प्रतिबिंबित करतात, असा विचार त्यांनी व्यक्त केला आहे.

कारणांच्या मालिकेत मागेमागे गेल्यास आपण पहिल्या प्रेरकापर्यंत येतो. तोच ईश्वर अगर आत्मा किंवा आध्यात्मिक ईश्वर हे सत्ताशास्त्राचे विषय नसून ईश्वरशास्त्राचे आहेत. श्रद्धा व बुद्धी यांची गल्लत करून चालणार नाही. तत्त्वज्ञान हे कार्यकारणाचे ज्ञान असल्याने प्रकटीकृत धर्माला त्यात स्थान नाही. बायबलमधील विचार या जगाला लागू नसून परलोकाला लागू आहेत. तरीही हॉब्ज यांचा ईश्वरावर विश्वास होता. ईश्वर ही संकल्पना मान्य असली, तरी तो कसा आहे, हे माहीत नाही. ईश्वराला बुद्धी, ज्ञान, आवेग आहेत, असे म्हणून आपण आपली कल्पनाशक्ती त्याच्यावर लादतो, असे त्यांचे मत होते.

समाजापासून वेगळ्या व्यक्तीचा विचार केला, तर श्रेयस हे स्थल-काल-परिस्थितिसापेक्ष असते. स्वरक्षण हेच निःश्रेयस असून मैत्र, धन, ज्ञान ही त्याची साधने होत. राज्यात मात्र श्रेयसला निकष लावला जातो. सार्वत्रिक कल्याणाप्रत नेते ते श्रेयस. निरपेक्ष श्रेयस, दुरित, न्याय, नैतिकता हे सर्व ईश्वरवाद व सत्ताशास्त्राने शोधलेले निरुपयोगी बुडबुडे आहेत.

नैसर्गिक अवस्थेत कशालाच बंधन नसून बलिष्ठताच युक्त ठरते; तथापि नैसर्गिक अवस्था सोडून मनुष्य नागरिक का बनतो? समाजाचे मूळ मनुष्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीत आहे, ही ॲरिस्टॉटल यांची कल्पना चुकीची असून मनुष्य स्वभावतः समाजोन्मुख नसतो. लेव्हायथन या ग्रंथात हॉब्ज यांनी मनुष्याच्या नैसर्गिक स्थितीचे वर्णन केले आहे. तेथे मनुष्य एकाकी, दुष्ट, स्वार्थी व घृणास्पद असून कुणाचा कुणावर विश्वास नसतो. लांडग्याप्रमाणे सगळेच सगळ्यांच्या जिवावर उठलेले असून प्रत्येकजण जिवाच्या भीतीने ग्रासलेला असतो. यातून शांततेचा मार्ग काढण्यासाठी बुद्धी नियमबद्ध समाजाची मागणी करते. हा करार करताना स्वतःच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येकजण आपले काही नैसर्गिक हक्क सोडतो. म्हणजेच हा करार भीती व स्वार्थावर आधारलेला आहे. सर्वांची शक्ती एकाच इच्छाशक्तीत विलीन होते; हीच सामान्य इच्छाशक्ती होय. हिच्यापुढे प्रत्येकाला मान झुकवावी लागते. जेथे ती एकवटते ते प्रजाधिपत्य होय. तिच्याच हातात प्रभुसत्ता असते. म्हणून निसर्गतः कोणतीही व्यक्ती इतरांवर सत्ता गाजवू शकत नाही. उलट, परस्परांवर मात करण्याच्या सततच्या प्रयत्नांतून युद्धसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते.

राज्यसंस्थेची निर्मिती दैवी इच्छेतून होत नसून ती मनुष्यनिर्मित आहे. राज्यसंस्था स्वायत्त व अनिर्बंध स्वरूपाची असते, या विचाराच्या पुष्ट्यर्थ त्यांनी ‘राजकीय सार्वभौमत्वा’ची संकल्पना मांडली. सार्वभौम निरंकुश, अविभाज्य, अक्षय व अदेय असते, असे ते म्हणतात. हॉब्ज यांनी ते एका व्यक्तीकडे किंवा व्यक्तिसमुदायाकडे असते, असे जरी म्हटले असले, तरी त्यांना निरपेक्ष राजतंत्र सर्वांत उत्तम वाटते. सम्राट जे करतो ते युक्त व ज्याला बंदी घालतो ते अयुक्त वाटते. सम्राटाने व्यक्तीचे रक्षण केले नाही, तर व्यक्ती त्याची अवज्ञा करू शकते. नीतिशास्त्र ईश्वरशास्त्राहून वेगळे करण्याचे, नीतीचे मूळ सामाजिक भावनेत न शोधता बुद्धीत शोधण्याचे व व्यक्तीचे हित समाजाच्या हितात गुंतले आहे, हे सांगण्याचे श्रेय हॉब्ज यांना दिले पाहिजे.

अत्यंत तर्कशुद्ध व शास्त्रीय पद्धतीने राजकीय तत्त्वज्ञानामध्ये सामाजिक कराराचा नवा सिद्धांत मांडणारे हॉब्ज हे पहिले विचारवंत होत. धार्मिक कल्पनांना बाजूस ठेवून हॉब्ज यांनी राज्याची नैतिक मीमांसा केली आहे. त्यात त्यांची स्वतंत्र बुद्धिमत्ता, कल्पकता व व्यापकता दिसून येते. त्यांची सार्वभौमत्वाची कल्पना पुढे इंग्रज विधिज्ञ जॉन ऑस्टिन यांनी विस्ताराने मांडली असली, तरी त्याचे जनकत्व हॉब्ज यांच्याकडेच जाते. हॉब्ज यांचे समग्र वाङ्मय द इंग्लिश वर्क्स ऑफ टॉमस हॉब्ज (११ खंड, १८३९) या नावाने प्रसिद्ध झाले आहे. त्यांना राजाने निवृत्तिवेतन दिले होते (१६६०).

हार्डविक (इंग्लंड) येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

 • Airaksinen, Timo; Bertman, Martin A. Hobbes : War Among Nations, Hampshire, 1989.
 • Hinnant, Charles H. Thomas Hobbes : A Reference Guide, Boston, 1980.
 • Lemetti, Juhana, Historical Dictionary of Hobbes’s Philosophy, Lanham, 2011.
 • MacDonald, Hugh; Hargreaves, Mary, Thomas Hobbes : A Bibliography, London, 1952.
 • Martinich, A. P. A Hobbes Dictionary, Cambridge, 1995.
 • Martinich, A. P. Hobbes : A Biography, Cambridge, 1999.
 • Martinich, A. P. Hobbes, New York, 2005.
 • Rogers, G. A. J.; Ryan, Alan, Eds. Perspectives on Thomas Hobbes, Oxford, 1988.
 • Sorell, T. Hobbes, London, 1986.
 • Stomp, Gabriella Ed. Thomas Hobbes, Aldershot, 2008.
 • Tuck, Richard, Hobbes, Oxford, 1989.
 • Warrender, H. The Political Philosophy of Hobbes : His Theory of Obligation, Oxford, 1957.
 • Watkins, J. W. N. Hobbes’s System of Ideas, London, 1973.