जस्ट, अर्नेस्ट एवेरेट : ( १४ ऑगस्ट, १८८३ – २७ ऑक्टोबर, १९४१ )

अर्नेस्ट एवेरेट जस्ट यांचा जन्म चार्ल्सटन, साऊथ येथे झाला. डार्टमाऊथ कॉलेजला प्रवेश घेण्यापूर्वी किंबल हॉल अकॅडेमी, न्यू हॅम्पशायर या शाळेत ते शिकत होते. विद्यापीठात शिकत असताना फलन (fertilization) आणि अंडी विकास (egg development) यांवरील एक प्रबंध वाचत असताना जस्ट यांना जीवशास्त्रात असलेली आपली आवड लक्षात आली. शैक्षणिक कारकिर्दीच्या पहिल्याच वर्षी या हुशार युवकाने ग्रीक विषयात सर्वोत्कृष्ट श्रेणी मिळवली आणि त्याची रुफस चोएट स्कॉलर म्हणून निवड झाली. वनस्पतीशास्त्र, समाजशास्त्र आणि इतिहास या विषयांत त्यांनी पदवी मिळवली.

महाविद्यालयीन शिक्षण झाल्यावर त्यांनी काही काळ शिक्षकी केली आणि हॉवर्ड विद्यापीठात एक संशोधक म्हणून देखील काम पाहिले. नंतर त्यांनी मॅसच्युसेट्स येथील वुड्स हॉल मरीन बायालॉजिकल लॅबोरेटरी येथे संशोधक म्हणून काम पाहिले. शिकागो विद्यापीठातून त्यांनी प्रायोगिक भ्रूण विकास विज्ञानाचा (experimental embryology) अभ्यास करून पीएच्.डी.मिळवली.

विकास शरीरविज्ञानाचे (Physiology of Development) ते  आद्यसंशोधक होते. त्यात  फलन (fertilization), प्रायोगिक अनिषेकजनन (experimental parthenogenesis), सजलीकरण (hydration), पेशी विभाजन (cell division), सजीव पेशीतील निर्जलीकरण (dehydration) आणि अतिनील कर्कार्बुद्जनक किरणांचा पेशींवर होणारा परिणाम (ultraviolet carcinogenic radiation) या गोष्टींचा समावेश होतो.

जस्ट यांनी तीन प्रतिष्ठित नियतकालिकांचे संपादक म्हणून देखील काम पाहिले आणि गौरवर्णेतर अमेरिकन म्हणून त्यांना पहिले स्पीङ्गार्न पदक मिळाले. त्याशिवाय ते नॅशनल रिसर्च कौन्सिलचे जूलियस रोजेनवल्ड फेलो होते.

वॉशिंग्टन डी. सी. येथे अर्नेस्ट जस्ट यांचे स्वादुपिंडाच्या कर्करोगाने निधन झाले.

 समीक्षक : मोहन मद्वाण्णा