फडके, रघुनाथ कृष्णाजी : ( २७ जानेवारी १८८४ – १८ मे १९७२ ). महाराष्ट्रातील ख्यातकीर्त शिल्पकार, चित्रकार, संगीत तज्ञ, साहित्यिक व ज्योतिषशास्त्राचे जाणकार. त्यांचा जन्म मुंबईजवळील वसई येथे सामान्य कुटुंबात झाला. त्यांचे वडील कृष्णाजी हे वसई येथील न्यायालयात नोकरीस होते. रघुनाथ यांना लहानपणापासूनच मूर्तिकलेचा छंद होता. चित्रकार श्रीनिवासराव हरपणहळ्ळी हे त्यांचे पहिले कलागुरू. रघुनाथ यांच्यातील शिल्पकलेचे गुण त्यांनी ओळखले. त्यांच्या प्रोत्साहनाने फडके यांनी प्रवचन हे एका वृद्ध माणसाचे पहिले शिल्प घडवले. याच शिल्पाला बाँबे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनात गव्हर्नरांच्या हस्ते सुवर्णपदक मिळाले. फडके यांचे हेच शिल्प पुढे भारत शासनातर्फे इंग्लंड येथील वेम्ब्ले आणि अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील प्रदर्शनांत पाठविण्यात आले. फडके यांचा वयाच्या सोळाव्या वर्षी मनोरमाबाई यांच्याशी विवाह झाला. मात्र पत्नीचा सहवास अवघा बारा वर्षे टिकला. मध्यंतरीच्या काळात ताडदेव, मुंबई येथे त्यांनी आपला स्टुडिओ उभारला आणि देवदेवतांच्या मूर्ती बनवण्याचे काम सुरू ठेवले.
१९१७ च्या दरम्यान फडके यांनी ‘हालती चालती मेणाची चित्रे’ हे प्रदर्शन मुंबई येथे भरविले. या चित्रप्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यांना अर्थप्राप्तीही चांगली झाली. त्यामुळे अशी चित्रप्रदर्शने ते नियमित भरवीत असत. त्यांत देवदेवतांच्या मूर्ती, शेतकरी जोडपे, मंदिरात जाणारी युवती, तत्कालीन नेते अशा विविध प्रकारच्या मूर्ती असत. १९२५ मध्ये इंग्लंड येथील वेम्ब्ले येथील प्रदर्शनात ही मेणाची हालती चित्रे त्यांनी पाठविली होती. तेथेही या प्रदर्शनाला खूप लोकप्रियता लाभली. १९२६ मध्ये अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने फिलाडेल्फिया येथेही हे प्रदर्शन पाठविण्यात आले. यासाठी फिलाडेल्फियाच्या महापौरांकडून फडके यांना प्रशस्तीपत्रक मिळाले होते. अशी प्रदर्शने त्यांनी दहा वर्षे (१९१७-१९२७) भरविली.
फडके यांची कला विविध अंगाने बहरत होती. तो काळ भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीचा होता. त्यांच्या कलाकृतींवरही या वातावरणाचाही परिणाम झाला. या काळातील त्यांच्या प्रदर्शनांत त्यांनी शोकाकुल हिंदमाता, तिच्याभोवती लाला लजपतराय, लोकमान्य टिळक, दादाभाई नवरोजी आदी नेते मंडळींचे तसेच महात्मा गांधींचा तुरुंगवास, या काळात महात्मा गांधींवर झालेली शस्त्रक्रिया इत्यादी विषय मांडले होते. मेणाचे हे पुतळे पाहून लोक थक्क होत. हेराल्ड या इंग्रजी वृत्तपत्राच्या आवृत्तीत देखील या संदर्भात कौतुकाचे उद्गार आहेत. या प्रदर्शनामुळे फडके यांना खूप प्रसिद्धी मिळाली; मात्र एक इंग्रज पत्रकार बी. जी. हॉर्निमन यांच्या वक्तव्याने त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्यांनी मेणाचे पुतळे बनवणारा कारागीर म्हणून फडके यांची हेटाळणी केली आणि त्यापेक्षा शिल्पकार होण्याबाबत सुचविले. टीका आणि मनस्ताप सहन करत नैराश्याच्या मनःस्थितीमध्ये त्यांनी हे प्रदर्शन यशाच्या अत्युच्च शिखरावर असताना बंद केले. परंतु फडके यांनी भरविलेल्या कलाप्रर्शनाचा खूप मोठा फायदा त्यांना झाला. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्याशी त्यांच्या ओळखी झाल्या. लोकमान्य टिळकांनी त्यांच्यावर पुणे येथील शिवाजी मंदिरासाठी शिवशिल्प – शिवछत्रपतींचा अर्धपुतळा – करण्याचे काम सोपविले. हे स्मारकशिल्प कसे असावे याबाबत त्यांना मार्गदर्शनही केले. शिवरायांचे हे पहिले संगमरवरातले स्मारकशिल्प १९२३ मध्ये शिवाजी मंदिरात बसविण्यात आले.
रत्नाकर मासिकाचे आप्पासाहेब गोखले यांच्यामुळे नंतर फडके साहित्याकडे वळले. त्यांनी रत्नाकर, नवनीत, मनोरंजन या मासिकांतून लेखन सुरू केले; आणि ‘टीकाकार फडके’ म्हणून ते प्रसिद्ध झाले. साहित्यासोबतच संगीत, नाटक, ज्योतिष या विद्यांतही ते रस घेऊ लागले. कृ. प्र. खाडिलकर, रा. ग. गडकरी, बालगंधर्व यांसारख्या दिग्गजांनादेखील त्यांच्या टीकेला सामोरे जावे लागले. नाट्यपरामर्श हा फडके यांचा संग्रह खूप गाजला. स्वल्पविराम हे विनोदी लेखनाचे एक पुस्तकही त्यांनी लिहिले, ते तरुण साहित्य मालेने प्रकाशित केले (१९३७). भास्करबुवा बखले, बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, अमानअलीखाँ यांसारख्या नामांकित गायकांना त्यांनी तबल्याची साथ केली. कलेच्या क्षेत्रातील हरहुन्नरी कलाकार असे त्यांना संबोधले जाते.
१९३२ मध्ये फडके यांना गिरगाव चौपाटीवरील लोकमान्य टिळकांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम मिळाले. या कामात त्यांच्याजवळची शिल्लक रक्कम खर्च करूनही काम अर्धवट राहिले. तेव्हा बाबूराव पेंटर यांच्या मदतीने त्यांनी ते काम कोल्हापूरला जाऊन पूर्ण केले आणि चौपाटीवर लोकमान्यांचे स्मारकशिल्प उभे राहिले. लोकमान्य टिळकांचे हे शिल्प पाहून एकेकाळी त्यांची हेटाळणी करणारे पत्रकार बी. जी. हॉर्निमन यांनी सुद्धा फडके यांचा शिल्पकार म्हणून गौरव केला. याच काळात त्यांना मध्य प्रदेशातील धार येथील नरेश श्रीमंत उदाजीराव पवार यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे काम मिळाले. ही शिल्प प्रतिमा धारच्या प्रवेशद्वारी स्थापित केलेली आहे. यानंतर फडके धार येथेच वास्तव्यास गेले. १९३७ मध्ये धार येथे झालेल्या मध्य भारतीय साहित्य संमेलनाच्या कला आणि काव्य परिषदेचे ते अध्यक्ष होते.
१९३८ मध्ये फडके यांनी धारच्या संस्थानिकांच्या आदेशावरून ‘लक्ष्मी कला भवन’ (आता – ललित कला महाविद्यालय) ही कलेचे शिक्षण देणारी संस्था स्थापन केली. तेथे त्यांनी बरीच वर्षे कलेची सेवा केली. अनेक विद्यार्थी घडविले. १९६१ मध्ये भारत सरकारने ‘पद्मश्री’ ह्या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. १९७२ मध्ये धार येथील खंडेराव टेकडी येथे त्यांचे निधन झाले. धार येथील फडके स्टुडिओत त्यांची सर्व शिल्पे संग्रहीत आहेत.
संदर्भ :
- संपा- मोटे, ह. वि., विश्रब्ध शारदा, खंड तिसरा, भारतातील चित्रकला व शिल्पकला
- संपा- बहुलकर, सुहास; घारे दीपक, दृश्यकला खंड, हिदुस्थान प्रकाशन, मुंबई, २०१३.
समीक्षण : नितीन हडप